रविवार, २२ जानेवारी, २०१७

निद्रापुराण ....



झोप सर्वांना हवीहवीशी असते, नीटनेटकी झोप नसेल तर माणसे बेचैन होतात. डुलकी, झापड, पेंग ही सगळी झोपेची अपत्ये. 'कुंभकर्ण' हा झोपेचा देव आहे की नाही हे ज्ञात नाही पण 'निद्रा' नावाची देवी अनेकांना प्रिय असते. झोपेच्या सवयी, झोपेचे प्रकार, झोप येण्याच्या घटनास्थिती देखील व्यक्तीपरत्वे भिन्न असतात. वेगवेगळ्या ठिकाणी, विविध अवस्थेत येणाऱ्या झोपांचे एक स्वतंत्र निद्रापुराण लिहिले जाऊ शकते. झोपेत काहीजण तंबोरा लावतात, काही पिपाणी वाजवतात, काहींनी त्रिताल धरलेला असतो तर काही शेळी फुरफुरल्यागत ओठ फुरफुरवत झोपतात.

दोन्ही अंगाला घोरणाऱ्या नरदेहांच्या मधोमध झोपावं लागणारा जीव हा पृथ्वीतलावरील सर्वात केविलवाण्या जिवांपैकी एक असतो. भरपूर गवत चरून झाल्यावर लिंबाच्या सावलीत बसून रवंथ करताना म्हशीने आपला भलामोठा जबडा वटावटा हलवावा तसं झोपेतच काहींचं तोंड हलवणं सुरु असतं. तर भिंतीवरच्या पालीने चूकचूक आवाज करावा तसे काहीजण चुकारा करत राहतात. तर काही बिचारे असे काही निपचित पडून असतात की त्यांच्या कानापाशी बॉम्ब फोडला तरी 'जू भी रेंगती नही' अशी त्यांची अवस्था असते. काही माणसे इतकी गाढ झोपलेली असतात की ते 'गेले' की काय असं वाटते. 'ब्रम्हानंदी टाळी' म्हणजे ती हीच का अशी शंका मग येते.तर काहींची झोप अगदी 'पाखरा'ची असते म्हणजे एकदम सावध झोप ! कुठे काही खुट्ट वाजलं तरी हे डोळे बंद करून ओळखतात आणि "अगं, तू मघाशीच जेवली होतीस ना ? मग आता फडताळावरच्या पितळी डब्यात काय शोधते आहेस ?" असा 'रोकडा' सवाल टाकतात.

झोप येण्याचेही विविध प्रकार असतात. काहींना झोप सहज येते, "अगदी पडल्या पडल्या झोप लागते हो !" असं तिचं कौतुकही होत असतं. तर काहींना बराच वेळ ताठकळत पडावे लागते. तर काहींना झोप यावी म्हणून डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांवर भिस्त ठेवावी लागते. तर काहीजणांकडे अनोखे झोपकारक उपाय असतात. जसे की, 'जड' विषयावरील जाडजूड पुस्तकातला एखादा परिच्छेद वाचला की डोके 'जड' होऊन पेंग येतेच. कधी कधी पुस्तक न वाचता नुसते उशाला जरी पुस्तक ठेवले तरी झोप येते. शास्त्रीय संगीत ऐकणे, नावडती रटाळगाणी लावणे असे अघोरी उपायही काहीजण करतात. आजकालच्या पोरांनी कानात हेडफोन घातले की निद्रादेवी त्यांच्या मेंदूत उतरते कि काय कोण जाणे ! काही गुणीजन टीव्ही बघत बघत झोपी जातात तर तरुणाई म्हणता म्हणता प्रौढाई (तरुणाईच्या धर्तीवरचा नवा शब्द !) देखील मोबाईल वरच्या क्लिप्स बघितल्याशिवाय झोपी जाऊ शकत नाही. काहींना बारमाही अंगभर पांघरूण लागते, काहींना वेगाने भिरभिरणारा पंखा अनिवार्य ठरतो, काहींना अंगावरचे कपडे सोसत नाहीत, काहींना अर्धेमुर्धे पांघरल्याशिवाय जमत नाही, काहींना डोईला तेलमालिश केल्याशिवाय निद्रादेवी प्रसन्न होत नाही. अशा एक ना अनेक तऱ्हा आढळतात.

झोपेचीही साधने सोपी असतात. अंथरूण आणि पांघरूण असे दोन गोलार्ध यात आहेत. चटई, सतरंजी, गादी, वाकळ यावर पाठ टेकली की जगातल्या अनेकोत्तम सुखांचा आनंद मिळतो. पूर्वी लोक आपल्या ऐपतीनुसार बिछाना वापरायचे आता पाठ दुखते, मान दुखते या नावाखाली अनेक जण बिछान्यात झोप धुवून घेतात ! पूर्वी लोक भुईवर बिस्तरा अंथरायचे तेंव्हा मणक्यांचे विकार होत नसत आता साध्या गावठी पलंगापासून ते डिजिटल बेडपर्यंत अनेक तऱ्हा सोकल्यात. जाडजूड, पातळ, मऊशार, गुबगुबीत, कडक, राठ, फोमयुक्त, काथ्यामय, कपाशीयुक्त अशा अनेक तऱ्हेत हे चहाटळ वाण उलपब्ध असतात. अगदी पूर्वी मांजरपाट असायचे नाहीतर बारदाण्यापासून तयार केलेले चवाळे. अजूनही गावाकडे खतांच्या गोण्यांचे प्लास्टिकचे चवाळे नाहीतर ताडपत्री देखील काहीजण वापरतात. कोण कशावर झोपतो यावरून काही पुण्यात्मे त्यांचा दर्जा ठरवतात. पण फरशीवर पाठ टेकून झोपणारास कधी झोपेच्या गोळ्या खाव्या लागत नाहीत अन टंच फोमच्या गुडघाभर खड्ड्याच्या गादीवर झोपणारयास मात्र अनेकवेळा या गोळ्यांचा आधार घ्यावा लागतो. काही जण तक्क्याला टेकून झोपी जातात तर काहींना पाठीशी वा डोक्याशी लंबोडका लोड असला की बरे वाटते.

झोपणाऱ्यांच्या देहाकृत्याही विविध असतात. उजवी आणि डावी कूस ही झोपेची दोन अंगे असतात. शिवाय पालथे आणि उताणे असे दोन पोटपाठदर्शक वर्गही आढळतात. पोटात पाय दुमडून झोपणे, पायावर पाय टाकणे, दोन्ही पायांची कात्री करणे, एक पाय उत्तरेला तर एक दक्षिणेला करणे, डोंगरावर चढत असल्याच्या अविर्भावात झोपणे, दोन्ही हात छातीशी घेणे, एक हात उशाला तर एक हात कंबरेवर, दोन्ही हात उशाखाली, एक हात वर तर एक हात खाली करून रनिंग रेसच्या पोझिशन मध्ये झोपणे, दोन्ही हात गुडघ्यात खुपसून झोपणे, अंगाचा अर्धगोल - त्रिकोण- काटकोन करणे, अंगाचे मुटकुळे करणे, गुडघे दुमडून उभे करणे अशा अनेक झोपाळू पोझेस असतात. तर काही लोक अमिबासारखे असतात दर तासाला वेगवेगळ्या अवस्थात ते दिसून येतात, अशा लोकांच्या शेजारी झोपणे हा युध्दजन्य अनुभव असतो. तर काहींच्या झोपेत गतजन्माच्या गर्दभकाळातील रम्य आठवणी जाग्या होतात आणि शेजारी झोपलेल्यास ते लत्ताप्रहाराचा ठणकेबाज प्रसाद देतात. तर काही जीव आकाशात जन्मल्यासारखे झोपेत भिंतीला पाय लावतात ! तर काहीजण डोक्याकडून उशाला आणि उशाकडून डोक्याला असा सूडाचा प्रवास करतात. हे सर्व कमी असते की काय म्हणून अनेक नररत्ने झोपेत मोठमोठाले ढोल वाजवण्यापासून ते सनई वाजवण्याचे महत्कार्य करत राहतात जोडीला 'गंध'ही पसरवतात. हे सारं असं काही 'रंगलेलं' असतं की शेजारचा पळूनच जावा !

रात्रीच्या आणि दुपारच्या झोपांची परिमाणे वेगळी असतात. दुपारच्या झोपेला वामकुक्षी असं गोजिरं नाव आहे. जेवण आटोपून थोडीशी शतपावली करून दुपारची झोप पुरी होते. तुंदिलतनू पोटावरून हात फिरवण्यात जो आनंद आहे तो झोपेतदेखील आहे मात्र हा आनंद सर्वांना मिळतोच असे नाही. दुपारी कधी कधी बसल्या जागी डुलकी लागते मग भरतनाट्यममध्ये मान हलावी तशी मान हिसके देत खाली वाकते. डोळ्यावर झापड येते आणि देह गरगरू लागतो. मग येते ती पेंग. "अहो, डोळा कसा लागला काही कळलेच नाही" असं माणसं सांगत राहतात पण झोपलं की कसं ताजंतवानं वाटतं याचा सुखद अनुभव लपवून ठेवतात.

ही सर्व झाली घरातली झोप ! घराबाहेर काढलेल्या झोपा आणि घरातील झोपांत बराच फरक आहे. हवेशीर बांधावर झुळझुळत्या वाऱ्याच्या साथीने काढलेली झोप, डेरेदार आंब्याच्या सावलीतली गाढ झोप, चिंचेच्या नक्षीदार पानाखालील सावलीतली अर्धीकच्ची सावध झोप, दिवसभरच्या ताणाने ऑफिसमध्ये हलकेच येणारी बेसावध झोप, कंटाळवाण्या कार्यक्रमात येणारी नीरस झोप, नाईलाजाने रटाळ सिनेमा - नाटक पाहताना येणारी जडझोप, एसटीच्या प्रवासात दर थांब्यागणिक वास आणि कूस बदलत येणारी आर्त झोप, धाडधाड आवाज करत जाणाऱ्या अजस्त्र रेल्वेच्या आवाजात आदळत आपटत येणारी चिवट झोप, दुकानात गिऱ्हाईकाची आवक कमी झाल्यावर येणारी नाजूक झोप, सलग जाग्रणानंतर कुठेही येणारी ओढाळ झोप, लग्नघरातील मांडववारा लागल्यानंतर येणारी गोडझोप, पहाटे लवकर उठल्यामुळे सकाळीच डोळ्यांवर रुळणारी चतुर झोप, शाळेत अभ्यास करताना येणारी स्वप्नाळू झोप असे अनेकविध प्रकार सांगता येतील.

या सर्व प्रकारात एक वेगळा प्रकार आहे तो साखरझोपेचा आहे. भल्या पहाटे जी झोप लागते तिला साखरझोप असं गोंडस नाव आहे. नवविवाहितांची साखरझोप आणि विरहाग्नीत होरपळणाऱ्यांची साखरझोपेतले अंतर हे वसंत आणि शिशिरातील धगधगत्या शुष्कतेच्या फरकासारखे असते. आईच्या मांडीवर डोकं ठेवल्यावर येणारी झोपही अशीच स्वर्गीय आविष्काराची अनुभूती असते. भीतीने कुठे तरी लपून बसल्यावर येणारी निरागस झोप देवभेट घडवून आणणारी असते. स्वप्नपूर्तीनंतर येणारी झोप समाधानाचे सर्वोच्च सुख देऊन जाते. एखादयाने अत्यंत मनस्ताप दिल्यानंतर मोठ्या मुश्किलीने येणारी काटेरी झोप डोळे मिटल्यानंतरही डागण्या देत राहते. लोक झोपेचा हरतऱ्हेने आस्वाद घेत आयुष्य कंठतात. झोपेत हसणारं बाळ जसं गोजिरवाणं दिसतं तसेच झोपेत रडणारे बाळही साजिरेच वाटते ही झोपेची जादू असते. पण काही मजेशीर अपवाद असतात. काही महाभाग तर चालतानाही झोपतात तर काही झोपेत चालतात !

मोकळ्या शिवारात बाजेवर पडल्या पडल्या खुल्या आभाळाखाली येणारी झोप, एखादा वक्ता माईकला बटीक ठेवून श्रोत्यांना पिळत असतो तेंव्हा येणारी झोप आणि रात्रपाळीहून थकून आल्यावर सकाळी येणारी झोप वेगवेगळी असते. पाळण्यात झोपलेले बाळ डोळे मिटून पडलेले असते पण झोपेत कधी मुठी आवळत असते तर कधी अंगठा चोखत असते. कधी भेदरल्या चेहऱ्याने तर कधी स्मितहास्याने ते झोपेचा आस्वाद घेत असते. गात्र शिथिल झालेली डोक्याची चांदी झालेली वयस्क माणसं देखील अशीच झोपतात पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात सगळे भाव विरून गेलेले असतात, मात्र मधूनच संथगतीने होणारी पापण्यांची हालचाल आणि हलणारी बुब्बुळे त्यांच्यातली चलबिचल जाणवून देते. दिवाळीच्या दिवसांत रात्री लवकर झोप येत नाही तसेच घरात मंगलकार्य असले तरी झोप आपोआप पळून जाते. घरात दुर्घटना घडली कुणाचा मृत्यू झाला तर त्या रात्री झोप कसली म्हणून येत नाही. दवाखान्यात कुणी आजारी माणूस मरणपंथाला लागलेलं असलं अन बाहेर बसलेल्या माणसांचे जीव टांगणीला लागलेले असले की झोपेचे खोबरे होते. रात्री अपरात्री आलेल्या फोनकॉलने झोपेचे वाटोळे होते. रात्री झोपेतून उठून पाणी पिण्याची सवयही अशीच असते, झोपेसाठी कधी तारक तर मारक. परगावाहून अपरात्री येणारं माणूस ठरवलेल्या वेळेस आलं नाही तर झोप खिडकीवाटे रस्त्याकडे डोळे लावून बसते. निर्मनुष्य एसटीस्थानक वा रेल्वे स्टेशनवर गाडी चुकल्यानंतर काढाव्या लागणाऱ्या थंडीच्या मोसमातील भयाण रात्रीत डोळ्यावर झापड यावी तशी येणारी झोप वेळेची किंमत शिकवून जाते.

आजकाल लोक झोप येत नाही म्हणून डॉक्टरांकडे जातात. खरे तर त्यावरचा उतारा त्यांच्याकडेच असतो पण तो शोधण्याइतका वेळ आजकाल लोकांकडे नसतो. झोप उडावी असं आपणच वागतो, नको ते विचार करत बसतो, फालतू दुखणी विकत घेतो, नुसता बिछाना मखमली अंथरून गाढ झोप येऊ शकते का याचा विचार होताना दिसत नाही. अतिव सुखातही झोप जवळ येत नाही आणि गडद दुःखातही झोप कवटाळत नाही. झोपेत माणूस स्वप्नं बघतो. त्या स्वप्नांच्या आधारे जगतो. झोप नसेल तर माणसाचा जीव कासावीस होतो. काही चुकलं तरी लोक विचारतात, "झोपेत होतास का ?" पण झोपेत काही चुकण्याचे कारणच नसते. झोपेत मेंदू काम करत नसतो फक्त हृदयाची धडधड सुरु असते. आईच्या गर्भात नऊ महिने झोपूनही प्रत्येकजण बालपण अक्षरशः झोपण्यात घालवतो, कुमारवयात जागं राहण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा समान असतात तर तारुण्यात झोप कमी आणि स्वप्नं जास्त असतात, प्रौढत्वात झोप टाळून संसाराची ओझी वाहिली जातात, वृद्धत्व येते आणि झोपून राहावं वाटतं पण डोळ्यापुढे आठवणींचा फेर सतत सुरु असतो आणि त्याबरहुकुम झोपेचा लपंडाव सुरु असतो. जीवनाची सुरुवात आईच्या गर्भातील झोपेतून जागे होण्याने होते आणि शेवट होतो काळझोपेने !!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा