Tuesday, March 28, 2017

नवविचारांची गुढी ...

चैत्र शुक्ल प्रतिपदेस 'सालाबादप्रमाणे यंदाही'च्या धर्तीवर महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्यभर विविध आक्षेप साक्षेपांच्या फैरी झडतात. त्यातील काही मुद्द्यांचा हा परामर्श..गुढीपाडवा साजरा करताना त्यामागे असणारी धार्मिक पार्श्वभूमी सांगितली जाते. यानुसार गुढीपाडव्याच्या परंपरेस मुख्यत्वे तीन घटना कारणीभूत आहेत.


एका मतप्रवाहानुसार भगवान श्रीविष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला. दुसऱ्या एका कथनान्वये वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेन्द्र झाला. स्वर्गातील अमरेंद्राने याच तिथीस वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. तिसर्‍या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रित्यर्थ पाडव्याच्या तिथीपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते ‘शक’ असा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ यामध्ये करण्यात येतो. शालिवाहन शकासंबंधी सांगितल्या जाणारया आणखी एका कथेनुसार शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी. हिंदू धर्मीयांच्या पाडव्यासंबंधी विविध आख्यायिका आहेत पण आजच्या काळात सर्व हिंदू धर्मीय पाडवा साजरा करताना आढळतात का, याचे उत्तर नकारार्थी येते. हिंदूनववर्ष म्हणून हे महाराष्ट्रात साजरे होत असले तरी अन्य राज्यातील हिंदू गुढीपाडवा साजरा करत नाहीत. अन्य राज्यात नववर्षदिन वेगवेगळे आहेत. बैसाखी, पोंगल, बिहू, उगडी, विशू ही त्याची विविध रूपे आहेत. त्यामुळे गुढीपाडवा हा सकल भारतातील हिंदूंचा सण सिद्ध होत नाही. ज्याप्रमाणे दिवाळी, होळी किंवा हिंदूंचे अन्य सण देशभरात साजरे केले जातात तसा गुढीपाडवा देशभरात साजरा होत नाही. या शिवाय अलीकडील काळात 'गुढीपाडवा साजरा करू नये, कारण तो संभाजीराजांचा पुण्यस्मरण दिवस आहे' असा प्रतिवाद काही सामाजिक संघटना जाहीर रित्या करताना आढळतात. ही सर्व विसंगती पाहता गुढीपाडवा हा सण न राहता हिंदूंमध्येच मतभेद असणारी परंपरा बनून राहतो की काय असे चित्र डोळ्यापुढे येतेय.

गुढीपाडवा हा केवळ हिंदू नववर्षदिवस आहे म्हणून त्याकडे वेगळ्या भावनेने बघण्याचा दृष्टीकोन काही लोक बाळगतात. वस्तुतः गुढीपाडव्याला पुराणांचा आणि प्राचीन वदंतांचा आधार आहे म्हणून तो साजरा केला जावा या विचारापेक्षा निसर्गचक्राच्या पुनरुथ्थानाचा हा दिवस आहे असा विचार मांडला जाणे जास्त संयुक्तिक ठरू शकते. कारण अनेक बुद्धिवंत, विचारवंत जाणकार मंडळी गुढीपाडव्याच्या आधाराची चिकित्सा करू इच्छितात. त्यात सैद्धांतिक ठोस असं काही हाती लागत नाही. मात्र या पारंपारिक दृष्टीकोनाऐवजी या दिवसाकडे सृष्टीच्या नवजन्माचा जागर म्हणून पाहिले तर खऱ्या अर्थाने ते सकल भारतवर्षाचे नववर्ष ठरते. कारण या महिन्यात फुटणारी चैत्रपालवी सर्वत्र अवतीर्ण होते. हिवाळा संपून नवं पीक हाती येतं, झाडांना नवी पालवी फुलते, पक्षांची नवी घरटी याच काळात बांधली जातात, मातीची मशागत सुरु होते आणि कोंबांना नवे अंकुर फुटतात. नवतेच्या या नवनवोन्मेषशाली सोहळ्याला कोणी नाकारणार नाही, त्यामुळे पारंपारिक धार्मिक नववर्षाच्या संकल्पनेसोबत वसुंधरेच्या नवनिर्माणाच्या दृष्टीकोनातूनही या दिवसाकडे पाहिले पाहिजे, कालमानानुसार हा दृष्टीकोन सुसह्य ठरतो. हा दृष्टीकोन ठेवल्यास हा सण सर्वसमावेशक ठरू शकतो. इंग्रजी नववर्ष फक्त ख्रिश्चन लोकंच साजरा करतात का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते कारण त्यात असलेली साकल्याची भावना. तारखेच्या बदलाव्यतिरिक्त अन्य कुठल्या धार्मिक अनुष्ठानांचे बालंट त्याला जोडलेले नाही त्यामुळे जगभरात ग्रेगरियन नववर्षाचे स्वागत आणि निरोपसमारंभ धडाक्यात साजरे होतात.

धार्मिक सणवारांची मांडणी असो वा ते साजरे करण्याचे कर्मकांड असो स्त्रियांचा त्यातील सहभाग अनिवार्य आहे. काळमानानुसार जग बदलत चालले आहे, देशही बदलतो आहे. मग 'आपल्याकडील स्त्रीविषयक जाणिवांत काही फरक पडला आहे किंवा नाही' याचे पुनर्विलोकन करायचे म्हटले की काही धर्ममार्तंडांना संताप अनावर होतो. बदलत्या काळाबरोबर या जाणीवा आपल्याला का बदलाव्याशा वाटत नाहीत हा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे. जसजसे जग प्रगत आणि आधुनिक होत चालले आहे तसे जगभरातील स्त्रिया स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत आणि आपल्याकडे गंगा दक्षिणेकडून उतरेकडे आणण्याचे प्रयत्न सुरु झालेत. मुलींनी टाईट फिटिंग्जचे कपडे घालू नयेत, मोबाईल वापरू नयेत, सर्वांग झाकलेलेच असावे वगैरे वगैरे तालिबानी सूचनावजा आदेश केले जाताहेत. हे कशाचे दयोतक आहे ? स्त्रीचे सामाजिक वर्तन बदलावे अशी खरी आस असेल तर तिच्यावरची बंधने काढली पाहिजेत. कुटुंबाचे पालन पोषण आणि सणवार साजरे करण्यापुरतीच तिची सीमा मर्यादित ठेवणे म्हणजे तिच्या अस्मितेवर बंधने घालण्यासारखे आहे. गुढी उभी करताना स्त्रीचा सहभाग जसा अनिवार्य केला गेलाय तसा तिच्या विमुक्त जडणघडणीची गुढी उभी करण्यात समाजाने आपला वाटा उचलला पाहिजे.

स्त्रीविषयक संकुचित बोथट जुन्या प्रतिमा तोडण्यासाठी गुढीपाडवा ही चांगली संधी ठरू शकतो. सौभाग्यवती स्त्री घरात नसेल तर काही लोक विधवा स्त्रियांना गुढी उभी करण्यास मज्जाव करतात. ज्या पुरुषाची पत्नी निवर्तली आहे त्याचा सहभाग चालत असेल तर विधवा स्त्रियांचा सहभाग काहींना का निषिध्द वाटावा ? गुढी नववर्षाच्या स्वागतासाठी असेल तर त्या नववर्षाचे स्वागत करण्याचा अधिकार विधवांना का नसावा ? विधवा स्त्रियांनादेखील नववर्षाच्या शुभेच्छा दयाव्या घ्याव्या वाटत असतील. मग त्यांना मज्जाव कशापायी ? आणखी किती दिवस आपण हा सौभाग्यवती - विधवा हा भेदाभेद करणार आहोत. मोठ्या शहरात अलीकडील काळात काही ठिकाणी या बदलाची नांदी घडताना दिसून येतेय. ग्रामीण भागातदेखील या परिवर्तनाची कास धरणे आवश्यक आहे. असे परिवर्तन घडणे म्हणजेच नव्या विचारांची गुढी उभारणे होय.

गुढीपाडवा साजरा करताना किंवा त्याचे समर्थन करताना अनेकजण आपल्या 'मराठीपणा'चे गोडवे गात फिरत असतात. वस्तुतः जगभरात इंग्रजी भाषा स्वीकारली गेलीय आणि आपल्याकडेही अनेक इंग्रजी शब्द आपल्या दैनंदिन जीवनाचे घटक होऊन गेलेत. आपल्या रोजच्या संभाषणात काही इंग्रजी शब्द वगळणे आता जवळपास अशक्यच आहे. शिवाय मराठी बाण्याची पिपाणी जे लोक वाजवतात त्यांची मुलेच इंग्रजी शाळांत शिकत असतात. खरे तर जोवर खेडी आहेत, वस्त्या - वाड्या आहेत, आदिवासी आहेत, श्रमिक कष्टकरी शेतकरी आहेत, बोलीभाषा टिकून आहे तोवर मराठीच्या अस्तित्वाला कसलाही धक्का लागणार नाही. तसे पाहता गुढीपाडवा हा केवळ मराठीभाषिकांचा सण होऊन राहिलाय अन मराठी माणसाला मात्र वाटते की देशभरात, जगभरात हा सण हिंदूनववर्ष म्हणून साजरा व्हावा. याचवेळी तो इतर भाषांप्रती संकुचित वृत्ती बाळगतो हा विरोधाभास नव्हे का ? इतर भाषिकांबद्दल वृथा पोटशूळ बाळगायचा आणि दुसरीकडे गुढीपाडवा सकल हिंदूंचा नववर्षदिन आहे असे सांगायचे हा दुटप्पीपणा आहे. मराठीच्या वापराविषयी लवचिक भूमिका स्वीकारून अन्य भाषांचा योग्य तो आदर केल्यास अन्यभाषिक देखील केवळ मराठी माणसांच्या परिघात बंदिस्त झालेल्या या सणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघतील. भाषांच्या सीमा ओलांडून जग जवळ येत चाललेय आणि आपण आजही तेच जुने चंदन उगाळणार असू तर तितकी खोली आपल्या परंपरात असायला हवी.


नवीन वर्षाचे स्वागत करताना सगळीकडे कशी आनंदाची उधळण झालेली असायला पाहिजे पण तसे वास्तवात गुढीपाडव्याच्यावेळी दिसत नाही. 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गातली दरी अधिक रुंदावत चालली आहे. समाजातील वंचित, उपेक्षित आणि शोषित घटकांच्या घरी गुढीपाडव्याचा तितकाच जोश असेल का जो सामान्य मध्यमवर्गीय पांढरपेशा, उच्चमध्यम व उच्चवर्गीयांच्या घरी असतो ? याचे उत्तर नक्कीच नकारार्थी येते. समाजातील एक मोठा घटक विविध वर्गवारीच्या सापेक्षतेनुसार दबत चालला आहे आणि एक वर्ग बलदंड होत चालला आहे. सामाजिक विषमतेचे हे जुनेच दुखणे आहे, पण नवीन वर्षाचा एखादा संकल्प वा नवीन वर्षापासून आपला एखादा 'शेअर' या दबलेल्या घटकासाठी कोणी सुरु केल्याचे कुठे ऐकिवात येत नाही. गुढीपाड्व्यापासून सामाजिक समरसता वाढवता येणं सहज शक्य आहे पण सर्वांनाच वरवरच्या कार्यात जास्त रस असल्याने या 'झंझटा'त कुणी पडत नसावे, अन्यथा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर असे अनेक उपक्रम पाहायला मिळाले असते.

याहून अधिक गहन मुद्दा आहे धार्मिक कडवटतावादाचा. जगभरात अनेक देशात धार्मिक कडवटता वाढीस लागल्याचे दिसून येतेय. मात्र अनेक लोक या कट्टरतावादाच्या विरोधात खुलेपणाने समोर येतानाही दिसतात. तर काही लोक या सर्व वादात तटस्थ असल्याचे दिसून येते. एकतीस डिसेंबर वा एक जानेवारीस कुठल्या धर्माचे लेबल अजून चिटकलेले नाही मात्र गुढीपाडवा हा हिंदूनववर्षदिन म्हणून साजरा केला जात असेल तर धार्मिक कट्टरतावादयांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणारया मवाळवादी लोकांचे या सणाबद्दल काय दृष्टीकोन आहेत हे जाणून घेणे अनिवार्य ठरते. पण तसेही होताना दिसत नाही. गुढीपाडवा सर्व हिंदूंनी सण म्हणून साजरा करावा यावर कर्मठ हिंदू जितके ठाम आहेत तितके मवाळवादी का ठाम नाहीत याचाही अभ्यास गुढीपाडव्याच्या अनुषंगाने केला गेला तर त्यातील तथाकथित गुणदोष निवारण होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

याही पलीकडे विचार करताना असे लक्षात येते की दरवर्षी गुढी उभी करणे हा एक शुष्क परिपाठ होऊन गेलेला आहे, त्यापलीकडे याचे अस्तित्व उरलेले नाही. आजकाल अनेक घरांना अंगण नसते, तुळशी वृंदावन नसते तिथे हिंदू धर्मशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे गुढी कशी उभी करायची याची उत्तरे शोधताना सोयीस्कर शॉर्टकट स्वीकारले जातात. त्यातली फारशी माहिती न घेता किंवा त्याची यथासांग पद्धत माहिती करून घेण्याऐवजी एक परंपरा म्हणून गुढी उभी करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. गुढीचा इतिहास माहिती नसतो, त्यामागचे शास्त्र वा लॉजिक माहिती नसते पण एक रिवाज म्हणून अनेक जण गुढी उभी करताना दिसून येतात. यातून नववर्षाचे कोणते स्वागत होते, गुढीपाडव्याचा कोणता हेतू तडीस जातो, काय फलश्रुती होते ? काहीच नाही. मग गुढी उभी करताना तिची साद्यंत माहिती घेऊन त्याच वेळेस नव्या अभिनव विचारांची जोड तिला दिली गेली तर हा सण अधिक शोभून दिसेल. अन्यथा गुढी उभी केली नाही तर तिथल्या वृत्तीत काय फरक पडणार आहे ? परंपरा आणि नवसंवेदना यांचा मेळ घातला गेला तर या गुढी उभी करण्याला खरा अर्थ प्राप्त होऊ शकतो. सामाजिक विषमता, जात धर्मवाद, लिंगभेद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद यांच्या पलीकडे जाऊन सकल एतद्देशियांच्या सबलीकरणाच्या हिताची नव्या विचारांची गुढी उभारणे हे ध्येयनिश्चित करून त्या विचारांना बांधील असणारी गुढी आपण ज्या दिवशी उभी करू तो खऱ्या अर्थाने एका नव्या युगाच्या नव्या वर्षाचा पहिला दिवस असेन.

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment