Tuesday, May 9, 2017

पुराने 'जख्म' - तुम आये तो आया मुझे याद....

१९९८ मध्ये महेश भट्टनी 'जख्म' हा चित्रपट काढला होता. त्यात एक अवीट गोडीचं अर्थपूर्ण गाणं होतं. "तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला.."
अलका याज्ञिकनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं होतं. आर्त हळव्या स्वरातील ही रचना गाणं ऐकल्यानंतर ओठांवर रेंगाळत राहते. गाणं बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की या दाखवलेला प्रसंग म्हणजे महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या जीवनातला 'तो' प्रसंग आहे.

महेश भट्टच्या प्रेमात देहभान हरपलेली परवीन एकदा सुरा हातात घेऊन त्याच्या घरात घुसली होती आणि महेशनी अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर हात जोडल्यानंतर तिने तिथून पाऊल काढते घेतले होते. (हाच प्रसंग त्यांनी 'अर्थ'मध्ये दाखवला होता). या नंतर बरेच दिवस महेशभट्ट परवीन बाबीकडे फिरकले नाहीत. तिनं मात्र पिच्छा पुरवला. शेवटी काही दिवस तिच्यापासून स्वतःला चुकवत फिरणाऱ्या महेश भट्टनी तिचं घर गाठलं तर त्यांना दारात उभं पाहून तिला हर्षवायुच व्हायचा राहिला होता. महेश आत आल्यावर तिनं भाबडेपणाने सगळी दारं खिडक्या लावून घर बंदिस्त करून घेतलं. जणू आता महेश तिच्या घरात कायमचे कैद झाले असा तिचा होरा असावा. पण पुढे जाऊन नियतीने तिची क्रूर चेष्टा केली हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. असो.... ही घटना महेश भट्ट यांच्या मनावर खोल कोरली गेली अन तिचे पडद्यावरील प्रकटीकरण म्हणजे 'जख्म'मधलं हे गाणं...

'जख्म'मध्ये एका रमण देसाई ह्या हिंदू चित्रपट निर्मात्याचे एका मुस्लीम तरुणीवर प्रेम बसते. त्यांचे लग्न होते पण कागदोपत्री वा समाजमान्यता होईल असे त्याचे कोणते पुरावे त्यांच्याकडे नसतात. त्यांना एक मुलगा होतो. तो मोठा झाल्यावर त्याच्या आयुष्याची फरफट होते. पुढे या कथानकाला हिंदू मुस्लीम संघर्षाचा मुलामा दिलाय. पण कथेतील गाभा प्रेमाचा आहे. नागार्जुनने निभावलेल्या रमण देसाईच्या भूमिकेचा गेटअप अगदी चष्म्याच्या फ्रेमपासून ते हेअरस्टाईल, वेशभूषा सगळं काही महेश भट्टच्या रिअल लाईफशी साम्य राखणारं आहे. तर त्याची पत्नी झालेल्या पूजा भट्टचा संपूर्ण लुक परवीन सारखा आहे. कानाआडून रुळणाऱ्या पूजाच्या केसांच्या बटा परवीनची आत्यंतिक आठवण करून देतात. काहीसे सैल पोलके, नीटनेटकी नेसलेली साडी, मधोमध भांग पाडून बांधलेला सुळसुळीत केसांचा सैलसर अंबाडा, कपाळावरची बारीकशी टिकली, कमी मेकअप, बारीक काळ्या पोतेत गुंफलेलं नाजूक मंगळसूत्र व अंगावरची मोजकी ज्वेलरी ; तिची उभी राहण्याची ढब अन एकंदर देहबोली सर्वतोपरी परवीनची आठवण करून देणारं !

महेश भट्टच्या आयुष्यात सोनी राजदान आल्यावर आपली आई मुस्लीम होती म्हणून आपणही मुस्लीम धर्म स्वीकारून पहिल्या पत्नीला (किरण भट्ट) सोडून न देता सोनीसोबत निकाह करावा असा निर्णय घेतल्याचे (१९८६) महेश भट्ट सांगतात. पण परवीनला स्वीकारू शकलो नाही तरी निदान तिच्या धर्माला स्वीकारून आपले संसारचक्र सुरळीत ठेवू याची त्यांना खात्री पटली होती. त्यांचं आयुष्य रांकेला लागलं पण तिचं काय झालं ? जितेपणी मरण यातना तिला भोगाव्या लागल्या. तशाच यातना, तीच मानसिकता 'जख्म'मधील पूजा भट्टच्या पात्रात त्यांनी चितारली आहे. कितीही वेगळ्या पद्धतीने विषय मांडला असला तरी अंतःकरणाला पडलेले पीळ सुटत नसतात ते कधी फुल बनून तर कधी जखम बनून व्यक्त होतच राहतात. या व्यथा व्यक्त होतच राहतात. तसेच 'जख्म'चे झाले होते...

पूजा भट्टचं फिल्मी करिअर अगदीच विस्कळीत आणि छोटेखानी राहिलं. पण तिने साकारलेल्या सर्व भूमिकांपैकी या चित्रपटात ती दिसते देखील खूप सुरेख आणि यात तिने कामही मन लावून केलंय. यामागचे कारण म्हणजे तिने आपल्या वडीलांच्या काळजावरील 'जख्म' परवीनच्या नजरेतूनही पाहिले होते आणि मुलीच्या दृष्टीकोनातूनही अनुभवले होते...

चित्रपटात याच गाण्याचं एक सॅड व्हर्जनही आहे. ते पाहवत नाही. त्यात एक सीन असा आहे की अजय (अजय देवगण) आपल्या अम्मीचे (पूजाभट्टचे) शव दफन करायला दफनभूमीत आणतो. तिथल्या खड्ड्यात जड अंतःकरणाने तिचा अचेतन देह ठेवला जातो. माती लोटण्याआधी काळी चादर ओढली जाते तेंव्हा आत तिच्या कलेवराशेजारी ओलेत्या डोळ्यांनी बसलेला अजय अन त्याला जाणवलेला तिचा बंधमुक्त आत्मा हे सर्व महेश भट्ट आणि परवीन यांच्याशी कुठेतरी को रिलेट होते. चित्रपटातील नायिकेला निदान मुलगा तरी असतो पण परवीनची प्रचंड परवड झाली, तिच्या आत्म्याला सुख लाभावे म्हणून महेश भट्टचा जीव असाच कासावीस झाला असणार. तीच ससेहोलपट त्यांनी अजयच्या पात्रातून मांडली आहे. मात्र त्याला थोडासा वेगळा वर्ख चढवला आहे. पण म्हणून अंतस्थ रंग बदलले जात नाहीत कारण हे पुराने जख्म असतातच असे. जितके कुरतडत जाऊ तितके खोलवर भावनांच्या गर्तेत घेऊन जाणारे....

एका जुन्या दर्दभऱ्या आठवणीला उजाळा देणारं हे श्रवणीय गाणं तुम्ही बघा अन कसे वाटले ते सांगा..
गाण्याची युट्यूब लिंक - गली में आज चांद निकला...... 

गाण्याच्या सॅड व्हर्जनची यु ट्यूब लिंक - गाण्याच्या सॅड व्हर्जनची यु ट्यूब लिंक -


- समीर गायकवाड.

संदर्भ - द सारांश ऑफ महेश भट्ट'स लाईफ - ले. अनुभा साहनी.