Friday, May 19, 2017

अंघोळाख्यान ...बाळ जन्मल्यानंतर त्याला अंघोळ घालून स्वच्छ केले जाते आणि मग आईकडे त्याला सुपूर्द केले जाते. तेच मूल मोठे होते. बाल्य, कुमार, तारुण्य, प्रौढ अवस्थेनंतर वृद्धावस्था पार केल्यानंतर एका दुर्दैवी दिवशी त्याचा मृत्यू होतो आणि त्याचे अंतिम संस्कार करण्याआधी त्याला अंघोळ घातली जाते. व्यक्ती कोणत्याही जातधर्माचा असो त्याच्या आयुष्यात आरंभ, अंताच्या या बाबी घडतातच. एक जितेपणी तर एक मृत्यूनंतर ! अशा रीतीने आपल्या जीवनाचा अंघोळीशी अत्यंत जवळचा संबंध येतो ! अंघोळ ही कोणत्याही व्यक्तीच्या दिनक्रमात नित्यनेमाचे स्थान असणारी बाब आहे. तरीही काही आळसप्रेमींना अंघोळ नकोशी वाटते. 'अंघोळीची एखादी गोळी असती तर किती बरे झाले असते' अशी हुरहूर त्यांना वाटते. पण अशी सोय अजून तरी झालेली नाही त्यामुळे जन्मल्यावर सुरु होणारी अंघोळ श्वास थांबल्यावरही एकदा 'अंगावर' येतेच, मग कुठे त्यातून सुटका होते.

अंघोळीचे देखील वेगवेगळे नुस्खे आहेत. तान्ह्या बाळाला आईने, आजीने, मावशीने, काकीने, मामीने आपले पाय लांबवून पिंढरयावर मूल पालथे घालून त्याला तेलाने माखून मालिश करून झाल्यावर घमेलेभर तापते पाणी अंग थापटत ओतताना पाहणे हा एक हृदयंगम सोहळा असतो. ते बाळ मांडीवर शांतपणे पडून भरपूर पाणी अंगावर घेत असते. त्याची आई त्याचे हात दुमड, पाय दुमड असं करत करत त्याचं सर्वांग चेपून चोपून काढते. माझ्या पिढीने बालवयात पितळी घंगाळात बसून केलेली अंघोळ आताची पिढी टबात बसून करते. ही अंघोळ खूप आनंददायी असते. कंबरेइतक्या पाण्यात बसून वरतून आई कडक कडक पाणी घालत असते तेंव्हा हात आपटून तिच्या अंगावर पाणी उडवण्यात जो आनंद असतो तो ज्याचा त्यालाच ठाऊक ! थोडं मोठं झाल्यावर डोबीत मारलेल्या उड्या अजूनही आठवणीच्या गावात घेऊन जातात. शहरी मुलांनी हाच आनंद पाण्याच्या हौदात कधी न कधी घेतलेला असतो. हातपाय मारता येऊ लागले की विहीर जवळ करावीशी वाटते आणि ती देखील पुढच्या पिढीला कवेत घेते. तिचं निळंशार थंड पाणी खूप हवेहवेसे वाटते. मला कधी पोहता आलं नाही, माझी काही भावंडं शिकली पण मला ते कधी जमलं नाही. पाण्यात पोहणारी मुलं पाहिली की त्यांचा हेवा वाटतो. नदीतली अंघोळ मात्र एकदम सुखावह असते. नदीपात्रात पाणी जिथे कमी आहे तिथे जाऊन उभं रहायचे आणि सूर्याकडे बघत ओंजळभर पाणी वाहून झालं की दोन तीन डुबक्या मारायच्या. नाक तोंड दाबून डोकं पाण्याखाली घेताना सगळं अंग हलकं होऊन जातं. नदीत आणि विहिरीत अंघोळ करताना खबरदारी घेतली नाही तर ती जीवावर बेतते. विहिरीच्या मचाणावरून सणासण सूर मारणारी पोरे आणि त्याचे अंगावर उडणारे तुषार, एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याने मारलेला मुटका हे सगळं हवंहवंसं वाटतं. झऱ्याखालची किंवा धबधब्याखालची अंघोळ फक्त भिजण्याचे सुख देते पण त्यातलं नाविन्य संपलं की मग ती रटाळ वाटू लागते. त्या पेक्षा वाईट अवस्था रोजच्या नळाखालच्या अंघोळीत होते. तिचं ते धार मारणारं पाणी आणि बादली, घमेल्याने व्यापलेलं बाथरूम यात अंघोळीचं दिव्य पार पाडताना अंगाला साबण लावलेला असेल अन पाणी गेले तर युद्धात हत्यारं संपलेल्या सैनिकासारखी त्या अंघोळकर्त्याची अवस्था होते.

पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी अंघोळीसाठीची मोरी होती आता तिथेही बाथरूम्स होऊ लागलीत. कुडाच्या पेंडया मातीने लिपून केलेल्या मोरीत बाहेरच्या उजेडाचे कवडसे अंगावर खेळत तेंव्हा पाणी अंगावर घेताना न्यारीच मजा यायची. काही ठिकाणी नुसतेच फळकुटाचे आडोसे असत तर काही ठिकाणी जुनी लुगडी वाशाला बांधून त्याची मोरी केलेली असे. आता सर्रास अंघोळीची छोटी का होईना पण स्वतंत्र खोली असते जिला बाथरूम असे गोंडस नाव असते. आता काहींची बाथरूम भली मोठाली निघाली आहेत त्यात चारजणांचं कुटुंब घर करून राहू शकतं ! काहींची तर काचेची बाथरूम्स आहेत, पारदर्शक कारभाराची हौस लोक कुठे कुठे भागवून घेतील याचा नेम नाही !! मध्यमवर्गीय माणसाचे बाथरूम त्याच्या चाकोरीबद्ध जीवनासारखेच अगदी टिपिकल असते ! एखाद दुसरे पाण्याचे टिपाड भरून ठेवलेले, दोन पाच ड्रम भरून ठेवलेले, टोपणाशिवाय लोळत पडलेल्या आणि पोटापाशी दाबून दाबून चेमटया झालेल्या शांपूच्या रित्या बाटल्या, दात वेडेवाकडे झालेला फारशी घासायचा ब्रश, म्हातारीचे केस विस्कटावे तशा तारा विस्कटलेली घासणी, कान तुटलेले मग आणि दोन बादल्यापैकी एकीचे हॅंडल तुटलेले तर पाण्याच्या नळातून चित्र विचित्र आवाज करत हवेच्या बुडबुडयासह बाहेर येणारे पाणी ! याच्या जोडीला आता मध्यमवर्गीय माणसाने एक नवी डोकेदुखी स्वकर्तृत्वाने निर्मिली आहे, ती म्हणजे मोबाईल बाहेर ठेवून तो अंघोळीला गेला की त्याला हमखास फोन येतो आणि 'सीमेवरुनी फिरलो मी माघारी शस्त्रे टाकुनी' या आवेशात तो अंघोळ अर्ध्यात टाकून त्या फोनकडे झेपावतो ! नेमका अंघोळ करताना फोन येतो म्हणून त्याने मोबाईल बाथरूममध्ये नेला तर फोन काही येत नाही पण तो ओला नक्कीच होतो !

अंघोळ करताना हातून साबण निसटणे, अचानक पाठीला खाज सुटणे, गरम पाणी संपून जाणे, शांपूच्या बाटलीत ओतून ठेवलेलं पाणी जमिनीवर सांडून जाणे अशा घटना नित्य घडत असतात. संपत आलेला विद्ध साबण साबणाच्या नव्या वडीवर जो व्यवस्थित चिटकवतो आणि "गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु।।"असा मंत्रघोष करत जो स्नान करतो तो मूळ मध्यमवर्गीय पांढरपेशी पुरुष होय ! अंग पुसता पुसता बाहेर येण्यात त्याला विलक्षण सुख असते त्याची अर्धांगिनी देखील आपले ओले केस बाल्कनीत किंवा सज्जात उभी राहून अल्लड बालिकेसारखी फटकावत उभी असते तेंव्हा तो तिच्याकडे अपार कौतुकाने पाहत असतो. अंघोळ करण्यास टाळाटाळ करणारी किशोरवयीन पोरे न्हाऊ घालणे हा प्रत्येक आईच्या आवडत्या छंदापैकीचा एक असतो. “किती कळकटून गेला आहेस रे, बघ आता मी कशी खसखसून अंघोळ घालते” हे वाक्य जरी ऐकलं तरी पोर घरभर उड्या मारतं आणि कंबरेला साडी खोचलेली आई त्याच्या मागोमाग फिरते. या 'चोरपोलीस' खेळाचा अंत फार वाईट असतो, डोक्यातले सगळे केस उपटले जातात की काय अशी जाम भीती त्या पोराच्या काळजात दाटून येते ! 'यावच्चंद्र दिवाकरौ' आईच्या हाताने अंघोळ करू नये असे त्याला वाटते पण बिचाऱ्याचे बखोट आईने असे करकचून धरलेलं असते की डोळ्यापुढे दिवाकराच्या ऐवजी काजवे चमकत. पण आईच्या हातची ही अंघोळ खरंच अवर्णनीय सुखदायी असे. आईचा हात सर्वांगावरून फिरताना जाणवे की, काम करून करून तिच्या बोटात मांस काही उरलेलेच नाही ! ज्याने आईकडून डोक्याला तेल लावून घेऊन, निमुळत्या हनुवटीला गच्च धरून भांग पाडून घेतलेला नाही ते अपत्य कमनशिबीच म्हणायला हवे !

तारुण्यात असताना काहींना जोडीने अंघोळ करावीशी वाटते ! अर्थात यात त्यांचा दोष नसतो तर तो त्या वयाचा प्रभाव असतो. लग्नात भर मांडवात अंघोळ घालताना आधी हळद लावून आणि नंतर तिच हळद काढताना नवदांपत्य एकमेकाकडे चोरटे कटाक्ष टाकतातच. हे सुख ज्याने अनुभवलेले नसते तो मग बायकोला बाथरूममध्ये ओढून नेतो ! कधी त्याचा हेतुपुरस्सर टॉवेल विसरतो, नाहीतर साबण संपतो वा त्याचे कपडे बाहेर विसरलेले असतात. भावंडासोबत पाणी उडवत केलेली अंघोळ असो वा सहलीवर गेल्यावर मित्रांसोबत पाण्यात घातलेला धुमाकूळ असो त्या प्रत्येकाचा आनंद निराळाच आहे. शिवलिंगावर अभिषेकाची धार धरावी तसे डोक्यावर पाण्याचा शॉवर घेऊन अंघोळ करण्यातही एक आगळीच अनुभूती मिळते. मोठाल्या टबमध्ये डुंबत पडून अंघोळ करणे हा कंटाळया लोकांचा आवडता उपक्रम असतो. तर सोना बाथमध्ये सोना कुठेच नसते अन बाथही नावालाच असतो त्या मनाने जॅकुझीच बरे ! स्विमिंग टॅंकमध्ये पोहताना काहींना अनकंफर्ट वाटतो तर काहींना बाथरूममध्ये कोंडल्यासारखं वाटते. मग ते पडवीत उघड्याने अंगावर पाणी घेतात. पुढे वय झाल्यानंतर आयुष्याच्या जोडीदारापैकी एखादा अंथरुणाला खिळला तर त्याला अंघोळ घालताना मनात उठणारे दुःख वेद्नाचे काहूर मात्र नकोनकोसे असते !

दिवाळीतली अंघोळ हे या ‘अंघोळाख्यानाचे सोनेरी पान’ ठरावे. पहाटे उठून मस्त गारव्यात अंगाला उटणे. तेल लावून केलं जाणारं हे अभ्यंगस्नान पौराणिक संदर्भातून कसे का असेना पण ते मनाला प्रसन्नता देऊन जातं. या उलट एखाद्याच्या मयतीवरून आल्यानंतर केलेली अंघोळ खूप जड वाटते, ती अंघोळ खूप क्लेशदायक वाटते. अंघोळ करूनही अप्रसन्न वाटत राहते. तद्वतच काही दिवसाच्या आजारपणानंतर अंघोळ करताना अंगावर पडणारं पाणी संपूच नये असे वाटते तर स्वच्छ अंघोळ करून नीटनेटके आवरून बाहेर गेल्यावर पावसात चिंब भिजलं की अंघोळ व्यर्थ गेल्यासारखी वाटते. अंघोळ या शब्दांत घोळ आहे पण कृतीत बिल्कुल घोळ नाही इतकी ती साधीसुधी आणि नित्यक्रिया आहे. अंघोळ न करणारा इसम पारोसा या पदवीने उपकृत केला जातो. पारोशा माणसाची लक्षणे ठरलेली असतात. केस पिंजारलेले, तोंड खरवडलेले, देह कळकटलेला आणि अंगावर धुळीची पुटं ! काही अति पारोसे तर कपडेही बदलत नाहीत ते गलिच्छ असतात ! स्वच्छतेचं आणि त्यांचं वाकडं असतं. अंघोळ या शब्दानेच त्यांना हिव भरतं. बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांची अडचण आपण समजू शकतो पण डोक्यात बर्फ झालेल्या पारोशांना कोण आणि कसे समजून घेणार ? त्यामुळेच पारोशा लोकांना जगभर हेटाळणी सहन करावी लागते. उन्हाळयाच्या दिवसांत अंग घामेघूम होऊन जाते तेंव्हा मात्र कुणालाच पारोसं राहावं वाटत नाही. उन्हाची तीव्रता अंगावरच्या थंड पाण्याने कमी होते. 'ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिये, गाना आये ना आये' आपला सिनेमादेखील हेच सांगतो. झऱ्याखाली अंघोळ करत उभी असलेली नायक नायिका आणि त्यांना मनसोक्त भिजवून दर्शकांना शृंगाररसात भिजवून टाकणारा रुपेरी पडदा अंघोळीच्या दृश्यांनी परिपूर्ण आहे. "अंघोळीला बसले, माझं मलाच येई हसू गं" अशी नायिकांची अवस्था उगाच होत नाही ! यामुळेच की काय पण काही लोक दिवसातून दोन वेळा अंघोळ करत असावेत. सौंदर्य सम्राज्ञी राणी क्लिओपात्रा गुलाब पाकळ्यांनी तुडूंब भरलेल्या अत्तराच्या हौदात अंघोळ करायची म्हणे, आपल्याकडच्या ऐतिहासिक प्रासाद, महालात, राजवाडयात अंघोळीचा मोठा जामानिमा आढळून येतो. ‘शाहीस्नान’ म्हणतात ते हेच असावे. हरप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती यावरून अंघोळीची ओढ किती जुनी आहे याचा अंदाज येतो. 'हमाम में सब नंगे होते है' अशी म्हण याच क्रियेमुळे पडली असावी !

देवपूजा करताना माणूस देवांनाही साग्रसंगीत अंघोळ घालतो ! इतकं त्याला अंघोळीचं अप्रूप आहे !! "आग्नेयं भस्मना स्नानं सलिलेत तु वारुणम्। आपोहिष्टैति ब्राह्मम् व्याव्यम् गोरजं स्मृतम्।।" असे स्नानाचे चार प्रकार सांगणाऱ्या हिंदू धर्मात तर स्नान न करणे हे अपवित्र मानले जाते. कुंभमेळ्यात तर आधी कोणी अंघोळ करायची आणि नंतर कोणी करायची याचे वाद होतात. विशिष्ट मुहूर्तावर स्नान केल्यास पुण्य लाभते असे समज रूढ असल्याने काही ठराविक दिवशी पवित्र समजल्या गेलेल्या नद्यात अंघोळ करण्यासाठी लोकांची झुंबड उडते. ही स्नाने पवित्र की अपवित्र हे माहिती नाही पण मानवाने आपल्या गलथानपणाने दुषित केलेल्या नदीपात्रात अंघोळ केल्याने रोगराई निष्पन्न होते हे नक्की ! अंघोळीसाठी पाणी वापरणे ही दुष्काळी भागात चैन ठरते इतके पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले तेंव्हाकुठे माणूस पाण्याच्या स्त्रोताची काळजी करू लागलाय. जल हेच जीवन आहे आणि हे पाणी अंगाला लागल्याशिवाय दिवस प्रसन्न जात नाही हेच नश्वर सत्य आहे. जन्मल्यावर इतरांच्या हाताने, नंतर आईच्या हाताने आणि पुढे जाऊन स्वतःच्या हाताने अंघोळ करणाऱ्या माणसाच्या कलेवरास जेंव्हा अंघोळ घातली जाते तेंव्हा उपस्थितांच्या डोळ्यात पाणी येते. अचेतन देह बसवलेला असतो त्याच्या अंगावर त्याचे नातलग एकेक करून पाणी घालत राहतात, खरे तर त्यात प्राण नसतात त्यामुळे अंघोळ घातली काय किंवा न घातली याचा त्या देहाला काहीच फरक पडत नसतो. पण तो देह अंतिम संस्कारासाठी सज्ज करताना त्याला पवित्र केलं जावं, त्याला स्वच्छ केलं जावं ही भावना त्यात असते. थोडक्यात अंघोळ नसेल तर जीवन परिपूर्ण होत नाही. व्यासांच्या महाभारतात नसलेली, पण लोकवाङ्मयातून झिरपलेली एक विलक्षण कथा म्हणजे 'जांभूळ आख्यान' अनेकांना ज्ञात असेल पण हे ‘अंघोळाख्यान’ प्रत्येकाचे स्वरचित असते आणि त्याची मजा काही औरच असते..

- समीर गायकवाड