आज एकाच दिवशी दोन ‘दिन’आल्याने शुभेच्छोत्सुकांची चंगळ आहे.. किती शुभेच्छा देऊ आणि किती नको असे काहीसे झाले असेल नाही का ?..असो...
महाराष्ट्राच्या विभाजनाची स्वप्ने पाहणाऱ्या, त्याची शकले करू इच्छीणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र दिनाचे गोडवे गावेत हे म्हणजे कसायाने गाईची महती सांगण्यासारखे आहे....
एकीकडे मंगल देशा, राकट देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा आणि कुठल्या कुठल्या देशा म्हणून तुताऱ्या फुकत राहायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्र विभाजनाचे 'रेशीम' विणत राहायचे हा दुट्टपीपणा आहे.
विभाजनाचा कंड असणाऱ्या आणि त्याला समर्थन देणारया पावटयांनी आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे सरकारने शेतकऱ्यांसाठी टाहो फोडत छाती पिटण्याचे सोंग करण्यासारखे आहे..
उगाच कशाला शब्द वाया घालवावेत ? जे पोटात आहे तेच ओठावर असू द्यावे हेच खरे ....
हाताशी मोबाईल किंवा संगणक असतो इतर चार गुणीजनांनी शुभेच्छांची रेडीमेड फुले उधळली की कुणीही उत्साहित होतो आणि तराळाने गावभर दवंडी पिटत फिरावे तसे शुभेच्छां देतो. त्यात त्याचे काय जाते. हाताशी ढीगभर स्मायली पडून असतात. सतराशे साठ मेसेज पोस्ट येऊन पडलेले असतात. त्यातलेच काही दिवसभर बोटं चिटकावून इकडून तिकडे पाठवत राहायचे. आडातच काही नसते, आड बुजवायची पाळी आलेली त्यात पोहऱ्यात काय येणार ? सगळा आनंदीआनंद ! पुन्हा एकदा असो..
ज्यांना महाराष्ट्र दिनाच्या नुसत्या फेस्बुक्या शुभेच्छा द्याव्या वाटतात त्यांनी राज्यासाठी, इथल्या मातीसाठी थोडं बूड घासण्याची अन सदैव इमान राखण्याची मानसिकता अंगी जोपासणे अनिवार्य आहे. अन्यथा वाळूत मुतले फेस ना पाणी अशी सगळी गत होणार आहे..
तिसऱ्यांदा असो...
याचबरोबर....
आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांचे यथैनैव शोषण करणाऱ्या लोकांनीही आज कामगारदिनाच्या शुभेच्छांच्या पोळ्या आपल्या तव्यावर भाजू नयेत... कामगारांच्यात आपसात भांडणे लावून व्यवस्थापनाचे तळवे चाटणाऱ्या, कामगारांच्या नावाने युनियन काढून आपले राजकीय स्वार्थ साधणाऱ्या संधीसाधू पाप्याच्या पितरांनी तर कामगारदिनाच्या शुभेच्छांचे नाव देखील काढू नये...
ज्यांना कामगारदिनाच्या शुभेच्छा द्याव्या वाटतात त्यांनी आपल्या अंतरंगात डोकावून पहावे, आपण कामगारांसाठी वंचितांसाठी काही केले आहे का याचे पुनर्विलोकन करावे. किंवा भविष्यात आपण त्यांच्यासाठी काही करणार आहोत का याची उत्तरे धुंडाळावीत मग शुभेच्छांचे फुकटे गुच्छ गावभर वाटत फिरावेत.. सोशल मिडीया स्वस्त झाल्यापासून वाढदिवस, जयंत्या, मयंत्या, पुण्यतिथ्या, सणवार, उत्सव, 'डे'ज, दीन होत चाललेले 'दिन' या सर्वांच्या घाऊक शुभेच्छा देत फिरणाऱ्या बाजारबुणग्यांचे खूप पीक आलेले आहे. आपले वर्तन आणि विचार विरोधी असूनही कोणीही कशाच्याही शुभेच्छा देत फिरतो. येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही स्त्रीला हळदीकुंकू लावावे तसे प्रत्येक पर्वणीस शुभेच्छांचे 'पौ' सर्वत्र टाकत जाणे हा या लोकांचा छंद असतो. आपण कशाच्या शुभेच्छा देत आहोत आणि त्या का देत आहोत याचा साधा प्रश्न आपल्या मनाला कधीतरी विचारून पाहावा. स्वतःचे अनेक अपराधीक खुलासे होतील. (या लेखातले) अखेरचे असो...
मंगल देशा पवित्र देशा गायचे आहे की आत्महत्येच्या देशा, अशांततेच्या देशा हे गायचे आहे याचा पक्का निर्धार करून महाराष्ट्राचे चणेफुटाणे आपल्या वॉलवर सजावटीसाठी वापरावेत ... तसेच 'कामगार दिन' साजरा करू इच्छिणाऱ्यांनीही सुर्वेमास्तर काय सांगून गेले आहेत ते जमल्यास वाचावे आणि त्यातून काही बोध घेता येतो का बघावा.... उगाच टीरी बडवत फिरू नये...
"रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,
थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखीलेले आहे माझ्या जगाची एक गन्धवेनाही त्यात आहे
केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे जसा जगात आहे मी तसाच शब्दातही आहे..."
खरे तर आजचा महाराष्ट्र दिन असो वा कामगार दिन असो हे दोन्ही दिवस दीनवाणे झालेले आहेत. दोघांचेही काही खरे नाहीत. सत्तासूर आपली खुर्ची शाबूत राहण्यासाठी महाराष्ट्राचे कधी आणि किती तुकडे पाडतील याचा नेम नाही. त्याचप्रमाणे मोठाल्या उद्योजकांपुढे व भांडवलशहांपुढे आपल्या विजारी काढून उभ्या राहणारया सरकारकडून कामगारांचा एल्गार कधी गार केला जाईल याची शाश्वती नाही. तरीही ह्या दोन्ही दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वत्र कुतरओढ बघायला मिळते आहे ही मोठी मजेशीर गोष्ट आहे.. अशी बुंदी पाडणाऱ्या सर्व प्रज्ञावंतांना खूप खूप शुभेच्छा...
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगारदिनाच्या निमित्ताने शब्दांच्या लाह्या आणि बत्तासे माझ्याकडून तमाम सोशल मीडियाकरांना सप्रेम भेट...
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा