साठ सत्तर एकर शेताच्या मधोमध असणारं ते पाच एकराचं माळरान असावं. बहुधा असे कार्यक्रम तिथे नित्याचे असावेत. त्या पाच एकराच्या तुकड्याला चारी बाजूनी पलानी होत्या. पलानीच्या कडेने निलगिरीची उंच गेलेली दाट झाडी आणि खाली जमीनीलगत चौहूबाजूनी दाट बदामाची झाडं. या ठिय्यापर्यंत पोहोचायला दोन अडीच तास लागले. हायवेपासून काही किमी अंतरावर आत हा इलाखा असल्याने मोबाईलला फुल रेंज होती. त्यामुळे काही अडचण संकट आल्यास सावध करायला सोपे जात असावं. शेताच्या एका बाजूला वीस बाय दहाचा कात्री मारलेला स्टेज होता. त्यावरच्या फळ्या काथ्याने मजबूत बांधलेल्या. स्टेजवर मोठ्या फोकसच्या ऐवजी ट्यूबलाईटस खांबाला बांधलेल्या. फोकस लावले की दुरून उजेडाचा माग काढता येतो त्यामुळं ही व्यवस्था ! ‘डीजे’चा आवाज सतत कमीजास्त केला जात होता. स्टेजवर काही लेसरबीम लाईट्स होत्या पण त्यांचे फोकस पब्लिकवर नसून आर्टिस्टच्या दिशेने होते त्यामुळे त्याचा उजेड वर अंधाराच्या दिशेने जाण्याचा प्रश्न नव्हता. सतराशे अठराशे माणसं घेऊन आलेले ट्रक, टेम्पो, क्रुझर शेतालगत उभे करण्यात आले होते. तिथेच डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था होती. पिण्याच्या पाण्याचा टँकरच मागवलेला होता. जागेवर कुठली व्यसनसामग्री पुरवली जात नव्हती. येतानाच सर्व गाड्यातली माणसं 'टाकी फुल्ल' होऊन आलेली. सगळे झिंगलेले. येणार्या प्रत्येक वाहनाचा आणि संबंधित ठेकेदाराचा नंबर टिपून घेतला जात होता. गाडीतून उतरताच जो तो ठेकेदार आपआपल्या मजुरांना दिवाळीचा फराळ, फटाके, शर्टपीस, पँटपीस अशी सर्व सामग्री एकत्र बांधलेली पॉलिथिन पिशवी हाती देत होता. ही सामग्री एका स्वतंत्र वाहनात ठेवलेली होती ज्यावर नजर ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर नेमले होते.
आंध्र पासिंगच्या दोन टेम्पो ट्रॅव्हलरमधून ऑर्केस्ट्राच्या मुली आल्या होत्या. त्यातील एक गाडी स्टेजलगत उभी करून तिलाच चेंजरूमचे स्वरूप देण्यात आलेले. मुली बहुधा पाचच्या सुमारास तिथे आलेल्या असाव्यात. सहाच्या सुमारास 'शो'ला सुरुवात झाली. आधी मुख्य ठेकेदारांचं एक छोटेखानी भाषण झालं. मग गंगेची आरती झाली आणि नंतर धूमधडाका झाला. गाण्यांची लडच पेटली जणू. यातील 'कमरीया लालीपॉप लागे' हे एकच पूर्वी ऐकलेले गाणे होते. बाकी सगळी नवी गाणी होती. ही सर्व गाणी द्विअर्थी आणि पराकोटीची पांचट होती. जसजसा अंधार गडद होऊ लागला तेंव्हा लक्षात येऊ लागले की जवळसपास प्रत्येकाच्या खिशात एक 'चपटी' होती. नंतर तिचे खुलेआम प्राशन सुरु झाले आणि वातावरण बेधुंद झाले. स्टेजवरच्या मुलींना बहुधा याची सवय होती. त्यांच्याजवळ जाऊन नाचायचा प्रयत्न करायचा असेल तर पैसे टाकावे लागत होते. कुठेही कशाही अवस्थेत राहून काहीही खाऊन गुरांहून जास्त कष्ट करणाऱ्या त्या बिहारी मजुरांपैकी काहींनी वर जाऊन आपली हौस भागवून घेतली, ते बहुतांश अविवाहित होते तर 'शादीशुदा' मात्र खाली मातीत उभे राहून वा नाचत नाहीतर रिंगण करून बसूनच आनंद घेत होते.
पहिल्या मुली थकल्या तेंव्हा दुसरा संच स्टेजवर आला आणि काहीसा संथ झालेला वातावरणाचा टेम्पो पुन्हा फास्ट झाला. या मुलींच्या अंगावरचे कपडे अत्यंत उत्तान होते आणि हावभावदेखील अगदी अचकट विचकट होते. काही वेळात तिथे नोटांचा धुरळा उडाला. त्यातून काहींनी पोरांना रागे भरले. थोडीफार बाचाबाचीही झाली. एकापाठोपाठ एक नाचगाणी होत राहिली. या दिवाली नाईटमध्ये आजूबाजूच्या वाड्यावस्त्यावरील तरणीताठी पोरं 'अंघोळीत लघवी' या हिशोबाने आत घुसली होती त्याला आयोजकांचा नाईलाज होता. त्यांना बाहेर काढणं सोपं नव्हतं, त्यांना हाकलून लावलं असतं तर त्यांनी बाहेर जाऊन बोभाटा केला असता त्यामुळे तेव्हढी सूट देणे अनिवार्य होते. ती पोरेही तर्राट झालेली. सगळा माहौल एकदम चेकाळून टाकणारा होता. साडेअकराच्या सुमारास नाचगाणं थांबवलं गेलं आणि पोरींनी सुस्कारा टाकला. दरम्यान मध्ये एकदा एक पोलीस व्हॅन येऊन 'सारे काही ठीकठाक चालू असल्याची' शहानिशा करून गेली. मुली स्टेजवरून थेट गाडीत जाऊन बसल्या. त्यांचे जेवण गाडीत पोहोच झालेलं. त्यांचे चेंजओव्हर करून झाल्यावर एक दीड तासाचा जेवणादरम्यानचा वेळ गप्पाष्टकासाठी मिळाला. मात्र ठेकेदाराचा एक माणूस मी काय बोलतोय यावर नजर ठेवण्यासाठी तिथे पुतळ्यासारखा उभा होता.
जवळपास सगळ्याचजणी बिहार बंगालच्या सीमेवरील कटीहार आणि किशनगंज भागातल्या होत्या. त्यातल्या दोन तर सख्ख्या बहिणी होत्या, एक तर चुलती आणि पुतणी होती. अर्ध्याहून अधिक मुस्लीम होत्या. आर्थिक अडचणीतून आलेल्या जास्त होत्या तर पाचसहा जणींचा एक स्वतंत्र डान्स ग्रुपच मोठ्या रकमेच्या पैशापायी सामील झालेला. या सर्वांचा' दादा' (मालक) रतन मुखर्जी हा बंगाली मध्यमवयीन, अट्टल चेनस्मोकर. त्याची बायकोदेखील या जथ्थ्यात होती, गायिका म्हणून तिचा समावेश नावालाच होता. तिचे खरे काम यांच्यावर आतून नजर ठेवणे हेच असावे. काही मुली फिल्मी अभिनेत्रींहून सरस देखण्या होत्या. रटाळ हिंदी वाहिन्यात नायिकेच्या भूमिकेचा रतीब घालणारया भुक्कड मुलींच्यापेक्षा कितीतरी अधिक आकर्षक सौंदर्य त्यांच्याकडे निश्चितच होतं.
सगळ्यांचे चेहरे विलक्षण बोलके होते. तरीही माहिती देताना मात्र एकदोघींनी शेवटपर्यंत तोंडावरची माशी हलू दिली नाही. एक चकार शब्द त्या बोलल्या नाहीत. कदाचित त्यांना माझा संशय आला असावा वा या बाबतीत त्यांचा पूर्वानुभव वाईट असावा. नंतर कळले की त्यांच्या घरच्या लोकांना रतनने कर्ज दिले होते. त्याची वसुली होईपर्यंत त्यांना इच्छेविरुद्ध हे काम करावे लागणार होते. त्यातली माजीथा नावाची मुलगी नंतर दिलखुलास बोलली. या सर्वांत एक अगदी तलम मखमल होती, स्नेहा तिचं नाव. नाकीडोळी अगदी नीटस पाहता क्षणी भुरळ पडावी अशी अन तारुण्यानं नेमक्या ठिकाणी गोंदणाचं गारुड केलेलं. यात एक 'सोनी'ही होती. अशा मुलींत दहापैकी दोनेक मुलींचं नाव शक्यतो सोनी, सोना, शुनाली, सोनिया वा मोना हेच असतं. पण ते खोटं असतं. मूळ नावं क्वचित समोर येतात. सगळी खोटी नावं, खोटी व्यक्तिमत्वे अन खोटा लडिवाळपणा. सारं काही खोटंच. फक्त पोटाची भूक आणि पैशाची गरज व लाईफस्टाईलची चटक हेच काय ते सत्य. इथली सोनी अगदी कमनीय होती. नाचताना तिने कपडेही अगदी त्रोटकच घातलेले होते.
या दोन मुलींवर लोकांकडून जास्त दौलतजादा केली गेली होती. तो धागा पकडून त्यांना हिंदीतूनच विचारलं, "हे गरीब लोक हातावर पोट घेऊन जगतात. दोन पाच वर्षे गावाचं तोंड बघत नाहीत. काबाडकष्ट करून पैसे कमवतात. वर्षभराचा थकवा जावा, दिवाळीतदेखील घराची आठवण येऊ नये आणि काही दिवसातच कामाला जुपून घेणं सोपं जावं म्हणून यांना इथं आणलं जातं. अशा नाडलेल्या लोकांना बेफाम झिंगवून त्यांच्याकडून दौलतजादा केली जाते तेंव्हा त्यांची दया येत नाही का ? हे पैसे का घेता ? ते परत द्यावेसे वाटत नाहीत का ? स्वतःची शरम वाटत नाही का ?"
यावर मुबीनाचे उत्तर भारी होते -
"हम भी तो गरीब है ! इज्जतकी कमीज उतारकर नाचते है, कभी खुसीसे तो कभी जबरन. जिस्म की नुमाईश करनी पडती है.... उनको पैसा बांटकर खुसी मिलती होगी... वैसेभी अगर लडकी फोकट में नाचेंगी तो गली का आवारा कुत्ता भी टांग उपर करेगा"
भाषा ओळखीची वाटली. म्हटलं ही तर भोजपुरी नाही. "मै पहले डान्सबार में थी... ये ग्रुप मैनेही बनाया हुआ है"
थोडक्यात ती 'टोळीची मुकादम' होती.
दरम्यान तिने माझी उलटतपासणी सुरु केल्यावर इतरही काही बोलत्या झाल्या - "ई सब काहे पूछ रहे हो ? कहा छपवाओगे ? तोहर गांव कौनसा है ? इंहा काहे आये हो ? पुलिस का खुफिया आदमी तो नाही ना ? लिख कर का करोगे ? इसका पैसा मिलता है क्या ? हमरे नाम किसको बताई द्येव तो तोहर हाल का होगा इसका तनिक अंदाजा है का ? इससे कछु फर्क नाही पडेगा ! इ सब मगजमारी के लिये इतना दूर कोई आता है का ? इस उम्र में सठीया गये हो का ?" एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती केली गेली. शेवटी मुबीनाने सगळयांना शांत केलं. एव्हाना सगळ्यांची जेवणं होत आलेली.....
डान्सबार बंद पडल्यावर जगण्याच्या प्रश्नावर मुबीनाने तिच्यापरीने काढलेले हे ‘देसी सोल्युशन’ होतं. ऑर्केस्ट्रा जमवून तिने याची मुहूर्तमेढ रोवलेली. अडलेल्या नडलेल्या आणि पैशाची गरज असलेल्या तर काही 'फास्टमनी'च्या हेतूने आलेल्या बायकापोरींची तिने मोट बांधली. बार बंद पडल्यावर काही काळ 'धंदा' केल्याचंही ती उघडपणे सांगते. बार बंद झाल्यावर गावात परत गेल्यावर लोकांच्या नजरा गप्प बसत नव्हत्या. अंगावरून वासनेचे सर्प फिरताहेत असं तिला वाटायचं. लोक तिच्याबद्दल काहीबाही बोलायचे. येताजाता अंगचटीला जायचे. त्यामुळे तिने आपला मार्ग पुन्हा एकदा बदलला आणि ही लाईन निवडली. दिवाळीच्या त्या रात्री तिथं असलेल्या सर्व बायकापोरीत ती जास्ती बदनाम होती पण तितकीच वस्ताद होती. अंगाने भरलेली, टचटचलेली कुणाच्या डोळ्यात भरावी अशी होती ती....
या शोचे स्वरूप अगोदर ठरलेले असते. रतन बोली लावतो आणि शो घेतो, तर मुबीनाकडे ग्रुपचा ठरलेला वाटा येतो. त्या वाट्यापेक्षा मोठी बोली मिळाली तर ती रतनची वरकमाई. खालची बोली मिळाली की ग्रुपचा आकार छाटला जातो आणि त्या बजेटमध्ये भागेल इतक्या मुली नेल्या जातात. वरून रतनचे कमिशन द्यावे लागते. बदल्यात पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून ते लोकल पब्लिकची वांदेवाडी, राडेबाजी याचे जांगडगुत्ते त्याने सोडवून द्यायचे. सगळा हिशोब आणि कामे ठरलेली. मुबीनाकडे आलेल्या पैशाची वाटणी पोरींमध्ये करताना जिच्या तिच्या वकूबानुसार दिली जाते. त्यात दया माया दाखवली जात नाही. एखादी ऐन वेळेस आजारी पडली तर तिचा फक्त प्रवास आणि दैनंदिन गरजा भागतात. हाती काही येत नाही.
या ग्रुपमध्ये सर्वात जास्त वयाची होती ती, गव्हाळ रंगाची, बुटक्या चणीची रेश्मा. पस्तीशी पार केलेली, पावलं काहीशी संथ झालेली, अंगात ढिलाई आलेली अन चेहऱ्यावर काहीशी सुस्ती आलेली. जेवणाआधी तिने दोन गावठी बाटल्या रिचवलेल्या. तिचा नवरा सोडून गेलेला. दिराने आणि सासऱ्याने संबंध ठेवावेत म्हणून जबरदस्ती केलेली. पंचायतीनेही हाच फैसला सुनावलेला. एकदा मुबीनाचा ग्रुप तिच्या गावी आला आणि ती त्यांच्याबरोबर पळून आलेली. नंतर मुबीनाने तिच्या मागे लागलेल्या पोलिसांचे तोंड बंद केलेलं. तिला डिमांड नसली की ती चक्क सर्वांची धुणीभांडी करते पण काहीही करून मुबीनाचे शेपूट सोडत नाही. तिला सारखे अनसेफ वाटते, आपला दीर येऊन आपला खून करेल याची भीती सतावते. त्यातून ती दारूच्या आहारी गेलेली. या प्रत्येकीची कथा अशीच इंटरेस्टींग असावी. पण सगळ्यांशी बोलता आले नाही. तेव्हढा वेळही नव्हता. एव्हाना जेवणं झाली आणि पोरींची चुळबुळ सुरु झाली.
त्यांची आपसात काही खुणवाखुणवी झाली आणि निघण्याची तयारी सुरु झाली. तोवर मध्यरात्र झालेली. मुलींना घेऊन दोन्ही टेम्पो ट्रॅव्हलर गाड्या रवाना झाल्या. बोलताना मुबीनाने मला सांगून ठेवले होते, "आखिर का तमाशा देख के जाओ". काही तरी विशेष बघायला मिळणार या आशेपायी मी अडकून पडलेलो. सगळे पब्लिक निघून गेलेलं होतं. काही तासापूर्वी जिथे नशीली रात्र रेंगाळत होती तिथे आता दारूचा भपकारा आणणारा वास रानातल्या हवेवरून दरवळत होता. काही मुकादम, गुत्तेदार, ठेकेदार निवांत पीत बसलेले होते. तर काही नुसते वेटोळे करून हिशोबाला मेळ घालत बसलेले. काहींनी जेवणाऐवजी लाडू चिवडा खाऊन उरलेला फराळ जमीनीवरच सांडू दिला होता. काहींच्या पिशव्या इथंतिथं पडल्या होत्या, शुद्धीवर असणारे त्या पिशव्या गोळा करून काखेत मारत होते. तर काही चुकार मजूर इथं अजून काही तरी स्पेशल होणार आहे त्याचे साक्षीदार बनण्यासाठी रेंगाळून होते. हवा सर्द होत होती, झाडांची सळसळ वाढत होती. कर्णकर्कश्श आवाजामुळे डोके धरले होते. पोटोबा न केल्यामुळे पित्त वाढल्यासारखे वाटत होते. स्टेजवरच्या दोन ट्यूबलाईटस चालू होत्या त्यातून बरंच काही नजरंस पडत होतं...
तिथं आता मुबीना, रेश्मा आणि रतन मागे राहिले होते. एका कारमध्ये सोनी आणि स्नेहा बसून होत्या. किंबहुना अशा प्रत्येक शोनंतर अशा शेकडो प्रसंगांना ते सामोरे गेले असावेत. त्यांनी अक्कल हुशारीने जेवण उरकून ताबडतोब दोन्ही टेम्पो ट्रॅव्हलर पुढे पाठवल्या होत्या. ऍडव्हान्स वजा जाऊन राहिलेले पैसे घेतले की निघायचे असे त्यांचे गणित होते. मुख्य ठेकेदार तिथे हॅन्डबॅगेत पैसे घेऊन आला. त्यांची थोडीशी खरखर सुरु होती. दोनपाच शिव्या हासडून झाल्या. यात काही वेळ गेला आणि बहुधा त्या भागातील दोनतीन मोठ्या व्यक्ती एका अलिशान मोटारीतून तिथे आल्या. त्यांना काय हवे याचा रतन आणि मुबीनाला अंदाज आधी पासूनच असावा. कदाचित मोबाईलवरून आधीच 'डिमांड' कळवली गेलेली. त्यामुळेच सोनी आणि स्नेहाला मागे ठेवून घेतलेलं असावं. मुबीना आणि रतन त्या अलिशान गाडीजवळ गेले. काळ्या काचा खाली झाल्या. या दोघांनी त्यांना काही तरी सांगितले. आतली माणसं अत्यंत अर्वाच्च शिव्या देऊ लागली. एकाने खस्सकन मुबीनाला जवळ ओढले. त्यात तिची ओढणी फाटली.
अचानक घडलेल्या या घडामोडीने तिथे मागं राहिलेलली सर्व माणसं एकदम सावध झाली. एकदम काटा किर्र ! तोवर मुलींच्या कारमध्ये बसून असलेली रेश्मा धावतच मुबीनाजवळ आली. आतल्या धेंडांनी तिलाच आत ओढले. मात्र दोनच मिनिटात तिला बाहेर ढकलण्यात आलं. आता त्या गाडीतून उतरून आडमाप अंगाच्या तीन रानटी व्यक्ती मुलींच्या कारच्या दिशेने झपाझप पावले टाकत निघाल्या होत्या. मुबीनाने रेश्माचा हात गच्च दाबून धरलेला. ते तिघेही कारमध्ये घुसले आणि बहुधा त्यांच्या पूर्वसुचनेनुसारच स्टेजवरच्या ट्यूबलाईट्स बंद केल्या गेल्या. सर्वत्र अंधार झाला. चांदण्यांचाच काय तो उजेड होता. काही वेळ गाडीत झटापट झाली. दोनतीन मिनिटात ते सगळे कारमधून शिव्यागाळी करत बाहेर पडले. त्यांच्या अलिशान गाडीत बसताना मुबीनाच्या अंगावर पचकन थुंकून गेले. ती गाडी शेताबाहेर गेल्याची खात्री होताच रतनच्या आणि मुबीनाच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळला. त्यांची बिदागी त्यांना देण्यात आली.
त्यांचा लवाजमा निघण्याआधी मला मुबीनाला गाठायचं होतं. 'आखिरी तमाशा'त नेमकं काय घडलं याची उकल करून घ्यायची होती. कारमधल्या मुलींचे कपडे ठीकठाक करून झाल्यावर मुबीनाने इशाऱ्याने मला जवळ बोलावून घेतले. तिने जे सांगितलं ते ऐकून दिवाळीच्या थंडीच्या रात्रीतही माझ्या अंगावर शहारे आले. त्या तीन बड्या धेंडांनीच आधी पोलीस पाठवलेले होते. त्या पोलिसांनी ऑर्केस्ट्रातील दोन 'आयटम' हेरून त्यांचे वर्णन त्यांना पोहोच केलेलं होतं. बड्या धेंडांकडून मुख्य आयोजकांना त्या दोन मुली थांबवून ठेवायची ऑर्डर झाली होती. त्यांनी ती रतन आणि मुबीनाच्या कानी घातली होती. त्यामुळे मुबीनाने डोकं चालवून घाईत सगळ्या पोरी पुढे रवाना करून या दोघींना मागे ठेवले होते. रेश्मा तर मुबीनाची सावली होती. मागे ठेवलेल्या मुलींची थोडक्यात कशी सुटका कशी करायची याचे अनेक फंडे तिच्याकडे होते. त्यातलाच एक फंडा तिने त्या रात्री वापरला होता.
ती माणसं जेंव्हा तिथे आली होती तेंव्हा मुबीनाने जवळ जाऊन त्यांना सांगितले होते की," बच्ची लोग को रुकाये है ... लेकीन एक प्राब्लेम है... उनका एमसी आयेला है.... अगर आप चाहते हो तो फिर भी कर सकते हो ... " दरम्यान दारू पिलेली रेश्मा मुद्दाम होऊन तिथे जवळ आली होती. तिच्या गावठी दारूच्या उग्र दर्पाने त्यांचे मस्तक आणखी भणाणून जावे हा तिचा हेतू. शिवाय त्यांनी आपल्याला आत ओढावे म्हणून तिनं उठवळपणा केलेला. त्यांनी तिला आत ओढलीही आणि काही क्षणात बाहेर लोटलीही. रेश्मामुळे मुबीनाची आफत ओढणीवर टळली. तरीही ते मस्तवाल टोणगे मुलींच्या कारमध्ये गेले. आत जाऊन झटापट करून त्यांचे सलवार कुर्ते ओरबाडले. पण 'त्या' कारणाची जाणीव होताच ते चडफडत बाहेर पडलेले. शेवटी शिव्याशाप देऊन निघून गेले. जाताना मुबीनावर थुंकून आपला राग व्यक्त करून गेले.
मुबीना, रेश्मा आणि रतन आता मुलींच्या कारमध्ये बसून त्यांच्या पुढच्या ठिय्याकडे निघाले होते. निघताना इशारा करून बोलावून घेऊन मुबीनाने सांगितले होते की, "लडकी लोग का कोई एमसी वेमसी नही आया था. मैने इनको एक जालीम बात बतायी थी उसको इन लोगोंने अंमलमें लाया और उसीके वजहसे ये आज तो बच गयी." मुबीनाने अवलंबलेला उपाय इथे लिहिण्याजोगा नाही कारण आपल्या भोंदू सभ्यतेच्या जगात काही खोट्या मर्यादा आहेत ज्या पाळाव्या लागतात. असो. मुबीनाने दाखवलेलं धाडस आणि तिची समयसूचकता याचं अफाट कौतुक वाटलं. दुसर्याच दिवशी हैदराबादजवळ त्यांचा असाच आणखी एक शो बुक होता, त्या दिशेने धुरळा उडवत तिची गाडी निघून गेली. या नाट्यमय घटनांमुळे तिथे मागे थांबलेल्या अनेकांची नशा उतरली होती.
तिथून निघून सभ्य सुखाच्या सुरक्षित चाकोरीबद्ध विश्वातल्या घरी यायला मला पहाटेचे पाच वाजलेले. भाऊबीजेची सकाळ झाली तरी काही केल्या मुबीना डोक्यातून जात नव्हती. अनेक प्रश्न आणि अनेक मुद्द्यांचे नुसते काहूर माजले. गरज माणसाला अनेक मार्ग दाखवते आणि संघर्ष करत जगायला शिकवते हेच खरे. कुणी कशातून सुख मिळवावे याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे आणि जडणघडणसापेक्ष भिन्न असतात. त्यामुळे कसल्याही विषम परिस्थितीत घरादारापासून हजारो किमी अंतरावर राहणाऱ्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी वाट्टेल ते काम करणाऱ्या लोकांनी आपले मनोरंजन कसे करावे, सणावारातही घरादारापासून दूर राहताना घराची आठवण काढू नये यासाठी त्यांना कुठली नशा द्यावी आणि याच्या चौकटी काय असाव्यात याची निश्चिती जोवर व्यवस्थेला करता येणार नाही तोवर यांचे शोषण करणारे व्यवस्थेत सभ्यतेचा बुरखा घालून मिरवतील. जगण्याचे अनेक पर्याय समोर असतात पण एकदा एक पर्याय निवडला की तो सोडून दुसरा निवडणं मोठं कठीण काम असतं. पहिला पर्याय जगाच्या नैतिक चौकटीत बसणारा नसेल तर ते काम सोडल्यानंतर जे पर्याय उपलब्ध होतात ते बहुतांशी अनैतिकच असतात कदाचित हा नियतीचा सूड असावा किंवा अशा लोकांचे दुर्दैव असते. अब्रू विकण्यासाठी निर्ढावलेली स्त्री इतर स्त्रियांचे शील वाचवण्यासाठी धडपड करते हे तिच्या मनातील संवेदनशीलतेचे आणि स्त्रीसुलभ भावनांचे प्रतिकच समजतो. माझ्या लेखी अशी स्त्री पतिव्रताच आहे. तिची दिवाळी प्रकाशमान व्हावी यासाठी समाज जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत तिला नावं ठेवण्याचा अधिकार समाजाला नाही.
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा