नागरी भागातील बेचव होळी आणि धुळवडीच्या तुलनेत हे सण गावाकडं अधिक उजवे वाटतात. उपदेशाचे डोस पाजणाऱ्या लोकांचे या दोन दिवसात तिकडं काहीच खरं नसतं. त्यातही प्रत्येक गावात या सणांची रंगत न्यारीच असते. माझ्या गावाशेजारी लमाण तांडा आहे. तिथल्या होळीची लज्जत जगात सर्वात न्यारी असावी. आजच्या दिवशी विवाहित लमाण स्त्रिया आपल्या नवऱ्यांना वेताच्या फोकाने किंवा पोकळ बांबूने फटके देतात. नवरोबाने उत्तरादखल हात उचलायचा नसतो. त्याला फार तर एखादा वार चुकवता येतो. खास वेशभूषा केलेल्या देखण्या केशभूषेतल्या बायका विशिष्ठ हेल काढत आगळ्या सुरात गाणं गात हा उद्योग पार पाडत असतात. नवरोबांना ठोकून झाल्यावर उन्हं काहीशी डोक्यावर आल्यानंतर आपआपल्या दारापुढं पाच गोवऱ्यांची होळी पेटवून झाली की मग जेवणाचे वेध लागतात. चुलीवर शिजवलेलं तिखटजाळ मटण आणि पुरणपोळी दोन्हीचा बेत असतो. नवसागरापासून बनवलेली गावठी दारू अफाट झिंगवते. दिवस नुस्ता झिंगाटून जातो. दुपार कलताना माणसं दमून जातात. बसल्या जागी लुडकतात. होळीच्या या आगळ्या वेगळ्या रिवाजात मनमोकळं जगताना सगळी दुःखे वेदना विसरून सहजीवनाचा खरा आनंद घेताना कुणीही जुनं चंदन उगाळत बसत नाही. की कुठला कृत्रिमतेचा लवलेश त्यांच्या वागण्यात राहत नाही. जुनी भांडणं मिटवून आपसातला सलोखा टिकवण्यावर भर राहतो.
सूर्याची किरणं तिरपी होऊ लागतात आणि धारोष्ण दुधाच्या मधुर चहाचे आधण विस्तवावर चढते. म्हातारी माणसं वर्षभरातल्या संसारीक सुखदुःखाचा पाढा वाचून दाखवतात. कोण कुठं चुकला, कुणी काय करायला पाहिजे होतं, झाल्या गोष्टीवर काय उपाय कारायचा याचे सणकून ताशे वाजवले जातात. अंधार दाटून येऊ लागताच गावभरातून गोळा केलेल्या उंडीव, फोडीव लाकडांची रास करून त्यावर गोवऱ्या रचून पाचट - पाला टाकून दिला जातो. कधी कधी वेड्या बाभळींची चळत लावली जाते. पोरं ठोरं आठवड्यापासून या मोहिमेत राबत असतात. आजकाल लाकडं चोरण्याचं आणि जाळण्याचं प्रमाण खूप कमी झालंय पण गावाच्या आड येणाऱ्या घराच्या आणि माणसांच्या नावाने अर्वाच्च शिव्या देत बोंब मारत त्या राशीभोवती फिरण्याचा प्रघात मात्र जोमाने टिकून आहे. माझ्याप्रमाणेच अनेकांना त्यांच्या आयुष्यातील शिव्यांचे यथेच्छ आणि प्राथमिक ज्ञान याच सणातून प्राप्त होत आलेय. शिव्यांची लाखोली वाहणे म्हणजे काय हे या दिवशी अनुभवास येते. जाणती माणसं देखील आपल्या मनातील भडास या निमित्ताने काढतात, उनाड पोरांच्या कानात एखाद्या दुष्मनाचे नाव सांगून त्याच्या नावाने शिव्या देत बोंब मारायला सांगतात. बायाबापड्या यात पडल्या की शब्दबंबाळ तुंबळ युध्द आकार घेतं.
अखेर अंधार गडद व्हायच्या बेतात असताना गावातली म्होरकी मंडळी पुढे येतात. होळी पेटवली जाते. गोवऱ्या धडाडून पेटतात. आगीच्या ज्वाळा जिभा काढून वखवखल्यागत वर तोंड काढू लागतात. तडतड आवाज करत लाल निखारे वाऱ्यावर उडून हवेत उंचावर फेर धरतात. पोरांना जाम चेव येतो. मोठ्याने बोंब ठोकत ते सगळा परिसर दणाणून सोडतात. स्त्रिया होळीच्या पाया पडतात, कुणी नैवेद्य अर्पण करते तर कुणी घरातलं जुनं सरपण आणून टाकते. निब्बर झालेली धगुरडी माणसं मात्र मिशीवर ताव देत आपल्या टायमात कसं आलबेल होतं आणि सगळं कसं चिकणं चोपडं होतं याचं गुऱ्हाळ मांडतात. होळीपासून काही अंतरावर उभं असलेली उपाशी तोंडाची तरणी पोरं आल्यागेल्या सुक्मासावित्रीला नजर चोरून न्याहाळत असतात. तळ्यावर पाणी प्यायला आलेल्या हरिणीवर डाव टाकून सावध उभ्या असलेल्या वाघासारखी ही पोरं भासतात. बघता बघता होळीचा आर चांगला पेटला की सगळ्यांची पांगापांग होते. उशिरा 'राष्ट्रीय कार्यक्रम' सुरु केलेली काही 'पावली कम माणसं' मात्र उगंच मयताला आल्यावानी मुस्कट करून बसून राहतात.
दुसऱ्या दिवशी धुळवडीची सुरुवात नाट्यमय असते. अजूनही धग टिकवून असलेल्या विस्तवावर कुणी एक टवाळ धटींगण पाण्याचे पातेले आणून ठेवतो. त्याचे पाणी तापेपर्यंत दुसरा खाजकोलतीचा दत्तक पुत्र काडीकामठीच्या दामाहून कमी असलेल्या दौलतीची घमेंड दाखवत आपलं भगुणं आणून तिथं मांडतो. हे कमी की काय म्हणून एखादा हलकट इसम अर्धवट भाजलेलं, फुटायला झालेलं मडकं आणून त्या निखाऱ्यावर ठेवतो. पातेल्यातलं पाणी तापण्याआधीच शेजारीच ठेवलेलं मडकं फुटून जातं. मातीत मिसळलेली बरीचशी राख ओली होऊन तिचा लगदा होतो. यामुळं पाण्याची पातेली तोल ढळून आडवी तिडवी होतात. सगळीकडे पाणी सांडते. नकळत होळी विझून जाते. पण राखेचा, धुळीचा चिखल होतो आणि ज्या कुणामुळे चिखल झाला त्याला त्यात लोळवण्यापासून ते त्याच्या सर्वांगात (!) राख घालेपर्यंतची तमाम सोंगे ढोंगे होतात. अंगावरची कपडे फाडेपर्यंत माणसं एकमेकाला त्या चिखलात लोळवतात. त्यांचा आदर्श घेत चिल्लर पोरंही मातीच्या चिखलात न्हाऊन निघतात. मातीत लोळून झालं की त्यांच्यात आपसूक दिलजमाई होते. यामुळे जुनी भांडणं मिटवण्यासाठी लोकं धुळवडीला राखेच्या चिखलात नवी भांडणं करतात. या सगळ्या लाथाळ्यातून दिवस डोईवर येईपर्यंत गाव चिडीचूप झालेलं असे. 'काल पोळी आज नळी' या न्यायाने ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार सगळ्या गल्ल्यात, वरच्या खालच्या आळ्यात खमंग वासाचा घमघमाट सुटलेला असतो. जेवणावळी झाल्या की बायका कुणा एका तालेवाराच्या घरी एकत्र येऊन होळीच्या, ओढाळ मातीच्या ओव्या गातात. सुतक पडल्यानं वा अन्य अडचणीपायी कुणाचा मंगल कार्यक्रम मागं राहिलेला असेल तर या निमित्ताने साजरा केला जातो. इरकली साडीचोळी नेसलेल्या डोईच्या चांदी झालेल्या वठलेल्या खोडांचा तोरा यावेळी बघण्याजोगा असतो. धुळवडीच्या दिवशी सूर्य मावळताना अंग जड होऊन जातं अन रात्र अंगणात येण्याआधी बाजेवर पाठ टेकताच डोळ्यात चांदणं लखलखलेलं असते.
वसंतोत्सव, पानं -फुलं, बहार वगैरे पुस्तकी शब्द झाले. प्रत्यक्षात होळीनंतर सूर्य मातीला भाजून काढू लागतो. अंगाचा तीळपापड होईल अशी आग सूर्य ओकू लागतो. रामप्रहरीच उन्हाची धग अंगाची काहिली करून जाते. झाडे करपून जाऊ लागतात. पानं फुलं सुकून जाऊ लागतात. विहिरींचं, डोबीचं पाणी तळाला जाऊ लागतं. शेत शिवारातील वाफे कोरडे होतात. उसाचं उरलं सुरलं टाचकं खाण्यासाठी गुरं तरसू लागतात. रांजणं कोरडी होऊ लागतात. पाखरांच्या चोची सुकून जातात, बांधावरच्या झाडातली घरटी तडतडून जातात. गोठे भाजून निघतात आणि गायीम्हशीसमोरची आमुन्याची पाटी जशी न तशी राहू लागते. या पार्श्वभूमीवर संक्रांतीनंतर आषाढातला पहिला पाऊस पडण्याच्या दिवसापर्यंतच्या मधल्या काळात गावाकडच्या माणसांच्या जीवनात खरा आनंद भरण्याचं काम होळी धुळवडीतून साध्य होतं. येणाऱ्या मौसमात सलग तीनचार महिने जीवाची लाही लाही करणाऱ्या उन्हाची चाहूल देणारे हे सण अग्नीच्या पूजनाने आणि अग्नी विझवण्याने साजरे होतात हा कसला योगायोग म्हणायचा ?
या होळी, धुळवडीची रंगतच न्यारी आहे हेच खरं ...
- समीर गायकवाड.
टीप - धुलीवंदन म्हणजे बंदिस्त खोलीत बसून वाटीतली माती भाळी लावल्यासारखं वाटतं आणि धुळवड म्हणताना मातीत अंगभर लोळताना आईच्या कुशीत खेळल्यासारखं वाटतं म्हणून धुळवड हाच शब्द वापरला आहे.
नोंद - ढासळत्या पर्यावरणाचे स्वरूप पाहता पारंपारिक होळीचं चित्र आता कालसुसंगत असायला पाहिजे याची उशिरा का होईना पण थोडीफार जाणीव आता होते आहे ही आनंदाची बाब होय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा