गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

'लिओ टॉलस्टॉय' - कादंबरीकार ते तत्ववेत्ता .... पूर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध



काही काळापूर्वी अभिनेता रजनीकांतचा एक किस्सा वाचनात आला होता. रजनीकांत मंदिराबाहेर थांबलेला असताना एका महिलेने त्याला भिकारी समजून दहा रुपये दिले आणि त्याने ते भीक म्हणून स्वीकारले ! असाच किस्सा लिओ टॉलस्टॉय यांच्याबाबतीत पूर्वी घडलाय. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होता. तो आपल्या काही सैनिकांची मॉस्को स्टेशनवर वाट पाहत होता. मॉस्कोत नेहमीच रक्त गोठवणारी थंडी असते त्यामुळे अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच उमगत नव्हतं. तेव्हढ्यात एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ हमाल आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय गोंधळला. पण पुढच्याच क्षणी त्यानं ते सगळं सामान उतरवलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना ! हे सैनिक एका हमालाला का सॅल्यूट मारतायत ? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्यावर बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर उभ्या असलेल्या सार्वकालीन महान कादंबरीकाराने आपलं सामानही उतरवून दिलं या कृतीनं बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनंच त्यांचे आभार मानले, ते तिने दिलेल्या कामाबद्दल. हमालाला देय असलेली रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

टॉलस्टॉय ! जगाच्या इतिहासात कोरलं गेलेलं एक ठळक नाव. टॉलस्टॉय आपल्या सर्वांना परिचयाचा आहे तो त्याच्या "वॉर अँड पीस" आणि ‘ऍना कॅरेनिना’मुळे. एकोणिसाव्या शतकाची अठ्ठय़ाहत्तर वर्षे आणि विसाव्या शतकाचं पहिलं दशक पाहिलेला हा महामानव. त्याच्या हयातीतच तो उदंड कीर्तीचा आणि प्रचंड तिरस्काराचाही धनी झाला होता. त्याचं सबंध आयुष्य म्हटलं तर अत्यंत संपन्न होतं. एकेकाळचा काउन्ट (सरदार) असलेला हा मनस्वी 'लिओ' वयाच्या ब्याऐंशिव्या वर्षी वैफल्यग्रस्त अवस्थेत पहाटेच्या सुमारास घर सोडून निघून गेला आणि अॅंस्टोपोवो रेल्वे स्टेशनवर मृत्यूच्या अधीन झाला. टॉलस्टॉयची एक बोधकथा जगप्रसिद्ध आहे, आपण सर्वांनी वयाच्या कुठल्या तरी टप्प्यावर ती ऐकली वा वाचली असतेच. ‘माणसाला जगायला किती जागा लागते?’-‘हाऊ मच लॅण्ड डझ ए मॅन नीड?’ ही ती कथा. अर्थातच माणसाला जगायला फार जागा लागत नाही; मेल्यावर पुरायला तीन फूट गुणिले सहा फूट एवढी जमीन पुरते असं या कथेचं सूत्र होतं. कथानायकाला एक वर मिळतो की ‘दिवसभरात धावत जाऊन जेवढी जमीन पायाखालून जाईल तेवढी जमीन मालकीची होईल’. मात्र त्यानं सूर्यास्तापर्यंत मूळ जागी परत आलंच पाहिजे अशी अटही असते. इथे त्यानं स्वत:च्या शक्तीचा, वेळेचा उपयोग नीट करणं, अचूक अंदाज बांधणं अपेक्षित असतं. पण त्याला मोह सुटत नाही. अजून थोडं पळूया, अजून काही जमीन मिळवूया असं म्हणत तो खूप लांबवर जातो. अर्थातच सूर्यास्तापर्यंत तेवढं अंतर कापून माघारी येणं त्याला शक्य होत नाही. आणि परतीच्या निम्म्या वाटेवर धाप लागून, छाती फुटून तो कोसळतो. त्यानं फार हाव धरली नसती, तर थोडीफार तरी जमीन मिळवली असती. त्याला शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागतं. आपल्या कथांतून बोजड वाटणारं तत्वज्ञान सुलभ पद्धतीनं मांडण्यात टॉलस्टॉयचा हातखंडा होता. 'वॉर अँड पीस' ही लिओ टॉलस्टॉयची कादंबरी म्हणजे संपूर्ण मानवी जीवनाचे, तत्कालीन रशियाचे, राष्ट्रांच्या इतिहासाचे परिपूर्ण चित्र आहे. मानवतेच्या आनंदाचे, महानतेचे, व्यथांचे, अपमानांचे परिपूर्ण चित्र आहे. टॉलस्टॉयचं लेखन जाणून घेण्याआधी त्याच्या आयुष्यात डोकावणं अनिवार्य आहे, अन्यथा त्याच्या साहित्यनिर्मितीचे नेमके संदर्भ आणि अन्वयार्थ लागत नाहीत.

टॉलस्टॉयचा जन्म ९ सप्टेंबर १८२८- (काहींच्या मते २८ ऑगस्ट) रोजी झालेला. टॉलस्टॉयचं घराणं मूळचं जर्मन. पीटर दि ग्रेटच्या काळांत त्याचं कुटुंब रशियांत राहण्यास आलेलं. त्याच्या पूर्वजांत प्रथम लौकिक मिळवला तो पीटर अँड्रिव्हिच टॉलस्टॉय याने. टॉलस्टॉयचे वडील निकोलस हे सैन्यांत काही दिवस नोकरीवर होते. पुढे त्याचे लग्न मराया व्हॉयकनस्काया नांवाच्या एका राजकन्येशी झाले. कौंट टॉलस्टॉय हा या दांपत्याच्या पांच अपत्यांपैकी चौथे. तो तीन वर्षांचा असतांना आई वारलेली. यानंतर सहा वर्षांनी त्याचा बापही वारला. लहानपणी टॉलस्टॉय विचारशील व शोधकबुद्धीचा, प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करणारा असे खरा ; परंतु त्याची बुद्धिमत्ता त्यावेळेस फारशी चकाकाली नाही. मायेनं नजर ठेवणारं कोणीच नसल्याची उणीव त्याला फार जाचक वाटे. मोठा झाल्यावरही याच कारणाने आपल्या स्नेहीमंडळीतही फारसा न मिसळता तासंतास एकांती चिंतनात घालवी. ''मरणाचे ताट आपल्यापुढे नेहमीच वाढून ठेविलेले आहे; आपल्याला सुखी व्हावयाचे असेल तर चाललेली घडी आपली समजून भविष्यकालाचा विचार न करता आनंदात काळ घालवावा'' असे विचार बालपणीच त्याच्या मनात कसे काय आले याचे वर्णन त्याने लिहून ठेवलंय. हे विचार येताच त्यानं आपल्या पेन्सिली पुस्तकं फेकून देऊन, बिछान्यावर पडून खानपान करत मजा मारणे, कादंबर्या् वाचणे वगैरेत काळ घालविण्यास सुरवात केली. मात्र त्याच्या बापाला शिकारीचा वगैरे नाद असल्यामुळे, त्याच्या नादाने या प्रकारच्या त्याच्या वागण्यास थोडासा आळा बसला.

वडीलांच्या मृत्यूनंतर टॉलस्टॉय व त्याच्या भावंडांचं पालकत्व त्याच्या एकामागून एक दोन आत्यांकडे आले. जुकशाव्ह या आत्येची नीतीसंबंधाची मते फार उदारपणाचीं होती व ही बाई संगीतप्रिय असल्यामुळे कोणाही आल्यागेल्यास तिच्या घरी मज्जाव नसे. या बाईच्या देखरेखीखाली येण्याच्या समयी टॉलस्टॉय ११ वर्षाचा होता व या बाईच्या वर्तनाचा त्याच्यावर जो परिणाम झाला तो एकंदरीने वाईटच होता, असे टॉलस्टॉय स्वत: पुढे सांगत असे. काझन येथील युनिव्हर्सिटीत प्रवेश करण्यापूर्वी टॉलस्टॉय व त्याची भावंडे एका फ्रेंच शिक्षकाच्या हाताखाली शिकत असत. फुरसतीच्या वेळी टॉलस्टॉय आपले दिवस मानवी चरित्रासंबंधाच्या निरनिराळ्या पश्नांचा विचार करण्यात घालवी व क्वचितप्रसंगी तो तालमीत कसरतही करीत असे.

वयाच्या १५ व्या वर्षी टॉलस्टॉय युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. या (काझन) युनिव्हर्सिटीत बडया बापांचा लाडावलेल्या बेट्यांचा प्रवेश सत्वर होई असा या युनिव्हर्सिटीचा लौकिक असल्याने टॉलस्टॉयला आपल्या आवडत्या विषयावर म्हणजे समाजासंबंधी उत्पन्न होणार्याय निरनिराळ्या प्रश्नांवर विचार करण्याचे तत्व आढळत असे. मनुष्याने जगात कशाकरिता जगावयाचे अशासारख्या गहन प्रश्नांवर टॉलस्टॉय नेहमी विचार करीत असे. चिमणीने दाणे टिपल्याप्रमाणं इतर ग्रंथकारांच्या वचनांपासून कथा निर्मिण्यापेक्षा स्वत:चे विचार प्रगट करण्याकडं त्याचा जास्त कल असे. या परिस्थितीमुळे त्याचे लक्ष पौर्वात्य भाषांकडं वळलं. परंतु त्याच्या अष्टपैलू बुद्धीला तो एकांगी अभ्यास रुचेना, तेव्हा १८४५ साली त्यानं कायद्याकडं आपला मोर्चा वळविला. इतिहास, धर्म व कायदा यांचे अध्ययन करून त्यांत युनिव्हर्सिटीची पदवी घ्यावयाची असा इरादा त्याला अखेरीस करावा लागला. धार्मिक बाबतीत त्याचे विलक्षण मतांतर होऊन टॉलस्टॉय पुरा नास्तिक बनला. इतिहास हा विषय तो कुचकामाचा समजे. शेवटी १८४७ साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे युनिव्हर्सिटी सोडून टॉलस्टॉय बाहेर पडला व ईथेच त्याच्या शिक्षणाची इतिश्री झाली. त्याच्या बुद्धीची, स्वतंत्र विचारांची काही थोडे लोक तारीफ करीत. परंतु त्याच्या या सोबत्यांपैकी एकाच्याही मनांत पुढे जाऊन टॉलस्टॉय हा सबंध रशियांतील एक प्रख्यात कादंबरीकार होणार आहे असे आलं नसावं.

पुढे शेतीभातीकडे लक्ष देऊन जमीन जुमाल्याची पीकस्थिति सुधारावी व जमीनदार या नात्याने आपले कर्तव्य बजावावे म्हणून टॉलस्टॉय आपल्या गावी आला. परंतु १८४७ सालीच दुष्काळ पडून लोकांची अन्नान्नदशा झाली. युनिव्हर्सिटीत काळ कंठीत असताना त्यानं जीन जॅक्स रूसो याचे ग्रंथ वाचले होते. साधी राहणी, कामात सचोटी इत्यादी मुद्द्यांवर रूसोच्या मतांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम झालेला होता. या ध्येयाप्राप्त्यर्थ प्रयत्ना करण्यासाठी तो मोठ्या उत्साहानं उद्योगास लागला. परंतु वारंवार येणार्या निराशेच्या लाटांशी झगडण्याइतकं आत्मबल टॉलस्टॉयपाशी अद्यापि आलेले नव्हतं. त्यामुळंच सहा महिन्यापर्यंत स्वतःशीच झगडा करून शेवटी त्यानं या बाबतीतला प्रयत्नं टाकून दिल्यासारखं केलं व अखेर तर त्यानं आपल्या भावाच्या संगतीत शिकार करणं, द्यूत खेळणं वगैरेत वेळ घालवून उच्च विचार पूर्णतः वार्याीवर सोडून दिले. १८५१ साली तो निकोलस नावाच्या आपल्या वडील भावाजवळ जाऊन राहिला व तिथे दरमहा १२ शिलिंग भाड्यानं एक झोपडी घेऊन अत्यंत काटकसरीने तीत राहू लागला. पुढे जाऊन भावासह मोठमोठ्या हुद्द्यांवर असलेल्या नातलगांच्या भिडेपोटी टॉलस्टॉय लष्करांत जाण्यास तयार झाला. टिफिस येथे जाऊन आवश्यक ती परीक्षा पास होऊन त्या वर्षीच्या हिवाळ्यात तो लष्करात सामील झाला. कॉकेशस पर्वतांतील लोकांपासून रशियाला या कालांत अत्यंत त्रास पोहोचत असे. हे लोक वारंवार येऊन पुंडावा करीत व लूट लुटून नेत. तथापि लष्करी काम किंवा खेळ यात टॉलस्टॉयचे मन कधीच पूर्णपणे रमले नाही. मात्र यामुळे एक झालं, त्याच्या ठायी असलेल्या ईश्वरदत्त प्रतिभाशक्तीचा सुप्त प्रभाव जणू जागृत झाला व त्याने लेखणी उचलली. त्याचे सुरस ग्रंथ एकामागून एक बाहेर पडू लागले आणि एका महान साहित्यिकाचा उदय झाला.



~~~~~~~~~~~~~~~~

टॉलस्टॉयचे सुरस ग्रंथ एकामागून एक बाहेर पडू लागले. 'चाइल्डहुड' ('बाल्य') हा त्याचा पहिला ग्रंथ होय. टॉलस्टॉय यावेळीं चोवीस वर्षांचा होता. या ग्रंथानंतर 'लँडलॉर्डस् मॉर्निंग (जमीनदाराचा उष:काल), 'बॉयहुड' ('पौगंडावस्था), 'युथ' (तारुण्य) वगैरे त्याचे ग्रंथ एकामागून एक प्रसिद्ध होऊ लागले. तो आपल्या मित्रांना चरफडून सांगे की, ''बाबांनो, मानवी जीविताचे रहस्य व सुखाचे साधन आपल्यास अजून उमगले नाही. साध्या सृष्टिनियमानुसार चालणार्‍या जीवितक्रमात काय मौज आहे. ती अनुभवून पहा म्हणजे सृष्टीच्या नियमानुसार, त्यात कृत्रिमपणा न आणता वागण्यातच खरे सुख आहे, सृष्टिवैभवाच्या अवलोकनांतच काय ती मौज आहे, सृष्टीशी हितगुज करणे यातच शुद्ध ब्रह्मानंद आहे असे तुमच्या अनुभवास येईल.'' याच वेळेस क्रिमिअन युद्ध सुरू होत होते व टॉलस्टॉयही कंटाळून घरी परत जाऊ इच्छित होता.

टॉलस्टॉय स्वदेशी आला तेव्हा तो अगदींच निराळ्या विचाराचा असा बनून आला. नि:स्वार्थबुद्धीने देशाकरिता शत्रूंशी लढणारे शिपाई व त्यांची कामगिरी स्वतःच्या डोळ्यांनीं पाहून आल्यानंतर, स्वार्थासाठीं धडपडणार्‍या उमरावांकडे पाहिल्याबरोबर त्याला या उमरावांपेक्षा ते सामान्य शिपाईच बरे वाटले. त्याने जे जे प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, गरीब शिपायांचा भावार्थीपणा जो त्याच्या दृष्टीस पडला, त्याच्या योगाने त्याचा परमेश्वरावरील विश्वास वाढत चालला. सेबॅस्टपूल व कॉकेशस येथील गोष्टींच्या वर्णनाने त्याच्या कीर्तीत भर टाकली होती. रशियांत परत आल्यानंतर अधिकारी व सामान्य जनता त्याचे स्वागत करण्यास तयार होती. त्याचे 'चाइल्डहुड' हे पुस्तक ज्या मासिकात प्रथमत: प्रसिद्ध झाले त्याच्या लेखकवर्गांत बरीच मान्यवर मंडळी होती. या ग्रंथकारांच्या ओळीस बसण्याचा मान मिळणे ही मोठीच गोष्ट समजली जात असे. चोहोकडून असा मानमरातबांचा वर्षाव होऊ लागल्यावर त्याची संन्यासप्रिय वृति लुप्त होत चालली होती. तरी एका अर्थी त्या वृत्तीचा विकासही त्याचमुळे झाला असे म्हणावयास हरकत नाही. त्याची मूळची प्रवृत्ती हळूहळू जोरावू लागली व सत्यसंशोधनाकडे त्याचा कल वळला. सोय, गैरसोय व कृत्रिम भौतिक साधने या गोष्टींचे जे भोक्ते होते त्यांचे या निर्भेसळ सत्यसंशोधकाशी वारंवार मतभेद उत्पन्न होऊ लागले.

टॉलस्टॉयला याप्रमाणे आपल्या परिस्थितीचा वीट येत चालला होता. दुसरा अलेक्झांडर गादीवर बसल्यापासून रशियामध्ये ' सोसायटी- समाज' व ' डेव्हलपमेंट - प्रगति' ह्या दोन गोष्टी रशियन लोकांच्या कानाला फार प्रिय वाटत. जर्मनीमध्येहि तीच स्थिति होती. सामाजिक कादंबरी या वाड्मयप्रकारचा उदय जर्मनींतच आरंभिला गेला व तेथून ती लाट रशियांत आली. या जर्मन गोष्टीचा टॉलस्टॉयच्या मनावर कायमचा संस्कार होऊन, आपल्या अंत:करणात गुप्त असलेल्या विचारांचाच प्रतिध्वनी जर्मनीत उमटलेला पाहतांच त्याला आत्मप्रत्यय आला. आजपर्यंत स्वस्थ बसल्याने जणू नजरकैद झालेल्या त्याच्या स्फूर्तीला एकदम चेव येऊन त्याने 'द प्रीझनर ऑफ कॉकेशस' ही कादंबरी लिहिली. शेवटी प्रगती व सुधारणा या गोष्टींनी त्याला भारून टाकले व इतर देशांतील संस्थांचा अभ्यास करण्यासाठी तो १८५७ सालच्या जानेवारी महिन्यात जर्मनीत गेला. टॉलस्टॉयने रशियाची सरहद्द फक्त तीनदा ओलांडली व तीही १८५७ ते १८६१ च्या दरम्यान !

इ. स. १८६१ मध्ये तो परत आला. नंतर त्याने परदेशांत मिळविलेल्या माहितीवर विचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या मनाला चोहोंकडे निराशाच दिसत होती. जर्मनीमधील शिक्षणपद्धती मात्र नाही म्हणावयास त्याला काहीशी आवडली. त्याने जर्मनीत असताना ऑरबॅकची ओळख करून घेतली. ऑरबॅकच्या प्राथमिक शाळांसंबंधाच्या विचारांनी टॉलस्टॉयच्या मनावर बराच पगडा बसविला. फ्रोबेलच्या किंडरगार्टन पद्धतीने तर जवळ जवळ याला भारून टाकले. या पद्धतीवर शाळा काढण्यासाठीं खटपट करून त्याने परवानगी मिळविली; व उत्साहाच्या तडफेबरोबर त्याने एक शिक्षणविषयक नियतकालिक काढण्यास सुरुवात केली. ही शाळा काढण्यास टॉलस्टॉयने वेळ मोठी चांगली पाहिली. कारण रशियात यावेळेस सर्वत्र उदारमतवादीपणाचे वारे संचारले होते, नव्या विचारांना आरंभ झाला होता. टॉलस्टॉयची शाळा सर्वच बाजूंनी 'मोफत' होती. टॉलस्टॉय फी घेत नसे इतकेंच नव्हें तर मुले शाळेत वाटेल तेव्हा येत; वाटेल तेव्हां जात, व वाटेल ते शिकत. ज्या गोष्टीला सक्तीचा नुसता वास येत आहे तिच्यापासून देखील राष्ट्राचें अकल्याण होईल अशी त्याची भावना होती. ''आपल्या अंत:- करणप्रवृत्तीला पटत नाहीं असल्या अभ्यासक्रमाचें जोखड मानेवर घेण्याचे नाकारण्याची परवानगी- इतकी स्वतंत्रता विद्यार्थ्याला असली पाहिजे'' असे त्याचे मत होते. पुढच्या पिढीला काय पाहिजे हे जुन्या लोकांपेक्षा त्यांचे त्यांनांच कळते असे तो म्हणे. अशा तत्त्वांवर टॉलस्टॉयची शाळा त्याच्याच घराशेजारच्या एका घरांत सुरू झाली; टॉलस्टॉय स्वत: चित्रकला, गायन व बायबल शिकवी. 'ओल्ड टेस्टॅमेंट' हें त्याचें आदर्शपुस्तक असून या पुस्तकावांचून कोणतीहि शिक्षणपद्धती पुरेशी नाही, व या पुस्तकाचा कित्ता प्रत्येक पुस्तककर्त्याने घ्यावा असे तो म्हणे.

टॉलस्टॉयची मते सरकारमान्य नसल्यामुळे त्याच्या शाळेकडचा लोकांचा ओढा कमी होत चालला. दुसर्‍या वर्षी त्याला शाळा बंद करावी लागून त्याचें नियतकालिकही थंडावले. या गोष्टीने त्याच्या मनाला एक प्रकारे धक्का बसला. पुढे काही काळाने टॉलस्टॉयने पुन्हा परवानगी मागितली; परंतु, सरकारी अधिकार्‍यांनी उर्मटपणाने ती नाकारली.

टॉलस्टॉयची सामाजिक मते आता पूर्ण विकसित झालेली होती. तो सामान्य जनतेपुढे शिष्ट लोकांना तुच्छ मानी. ''शिष्ट लोकांनीं 'प्रगती' व 'शिक्षण' यांचा अर्थ एकच समजण्यात मोठी चूक केली व म्हणून ह्यांनी सुरू केलेल्या सक्तीच्या शिक्षणाचे घातुक परिणाम झाले. मनुष्याच्या आयुष्यक्रमांत त्याचें शील बनविण्याच्या कामीं लिहिणें व वाचणें या दोन गोष्टींचा उपयोग फार थोडा आहे व मनुष्याची जीवितयात्रा सुखावह करण्याच्या कामीं त्यांची फारशी जरूरी नसते'' असे याचे मत होते. ''हे प्रश्न जनतेवरच सोपविणे बरे, जनतेला काय पाहिजे हे तिचे तिलाच अधिक कळते,'' असा एकंदर टॉलस्टॉयच्या मतांचा मथितार्थ आहे. ''शिष्टंमन्य लोकांपेक्षा सामान्य जनता हीच अधिक बलवान्, अधिक स्वतंत्र विचाराची, अधिक न्यायी असून तिलाच माणुसकीची चाड अधिक आहे. तेव्हा समाजाला सामान्य जनतेचीच जरूर अधिक. सामान्य जनतेने शिष्टंमन्य लोकांच्या शाळांतून जाण्यापेक्षा या लोकांनीच जनतेपासून धडे घेतले पाहिजेत,'' हे टॉलस्टॉयचे विचार फ्रेंच सुधारक रूसोच्या विचारासारखेच आहेत. पुढे टॉलस्टॉय सामाजिक बाबतीत पूर्वींपेक्षा अधिक लक्ष घालू लागला. या अवधीत त्याने 'थ्री डेथस' (तीन मृत्यू, १८५९) व 'कोसाक्स' (१८६३) हे दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. यापैकी कोसाक्स ग्रंथ 'थ्री डेथस' या ग्रंथापूर्वींच दहा वर्षें लिहिला गेला होता. ह्याची मुख्य कल्पना म्हणजे ''सुधारणा-भौतिक सुधारणा-ही खर्‍या सुखाच्या वाटेंतील एक धोंड आहे '' ही होय. यानंतर टॉलस्टॉयचे त्याची जुनी मैत्रीण सोफिया हिच्याशीं लग्न झाले. सोफियाचा बाप एक शौकीन डॉक्टर होता. त्याचा जन्म, शिक्षण वगैरे मॉस्को शहरीच झाले होते. सोफिया ही त्याची दुसरी मुलगी. टॉलस्टॉयला एकंदर १३ अपत्ये झाली; पैकी, पहिल्याचा जन्म १८६३ च्या जूनमध्ये झाला. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतींत तो प्रयोग वगैरे करण्याच्या भानगडीत पडला नाहीं. तो मुलांना शिक्षा फार थोडा वेळ करी. त्याची मुख्य शिक्षा म्हणजे ज्याने काही अपराध केला असेल त्याच्याशीं इतरांनीं अबोला धरावयाचा ही होय; व हा बहिष्कार त्या मुलानें स्वत:चा अपराध कबूल करेपर्यंत काढावयाचा नाही. टॉलस्टॉय आपल्या मुलांत मिसळून खेळे, त्यांच्याशी कसरत वगैरे करी. त्याला स्वत: हाताने श्रमाची कामे करण्याचा नाद होता. त्याच्या शेतीभातीच्या कामाकडे त्या गोष्टीचा चांगला उपयोग होई. हा बाहेर फिरावयास गेला म्हणजे एखाद्या मजुराचे खुरपे किंवा विळा घेऊन मोठ्या आवडीने काम करू लागे.

''वॉर अँड पीस' व ' अ‍ॅना कॅरेनिना' या त्याच्या दोन कादंबर्‍या त्याने या वेळेसच सुरू केल्या. परंतु रशियामधील 'काँझरव्हेटिव्ह' किंवा 'लिबरल, या दोन्ही पक्षांनीं त्याचा फारसा आनंदानें स्वीकार केली नाही. स्वभाववर्णन करण्यांत टॉलस्टॉय हा कुशल असे खरा; परंतु त्याला कादंबरी लिहिण्याकरिता मुद्दाम म्हणून प्रयत्‍न करावा लागे. 'लेखणी घेऊन लिहावयास बसल्याखेरीज स्फूर्ति उत्पन्न होत नाहीं', असे तो म्हणे. टॉलस्टॉयच्या आयुष्यातील इथपर्यंतच्या इतिहासात साधेपणा आणि सच्चेपणा जाणवत असला तरी विचारावर ठाम राहण्याची त्याची प्रवृत्ती त्याच्यातला माणूस आणि लेखक या दोघांचीही जडण घडण करत गेला हे अधिक सत्य होय. किंबहुना हिच तत्वे गांधींसह जगभरातील अनेक विचारवंत तत्वचिंतकांना लागू पडतात. टॉलस्टॉयचं साहित्य का अजरामर ठरलं याचं उत्तर त्याच्या लेखनमूल्याहून तत्कालीन जीवनमूल्यांच्या सच्चा आरेखनात आहे, जे त्यानं सच्चेपणाने शब्दबद्ध केलं. तो हे लिहू शकला कारण हे सर्व तो जगला होता ही गोष्ट सर्वाधिक महत्वाची होय.

~~~~~~~~~~~~~~~~~~~

या कादंबर्‍याच्या संबंधाने टॉलस्टॉय व त्याचा स्नेही फेट यांच्यांत जो पत्रव्यवहार झाला त्यात टॉलस्टॉयच्या शेतकीबद्दल व जमीनदारीबद्दल किरकोळ उल्लेख आहेत. तो म्हणे 'गुमास्ते, मुकादम, वगैरे लोक शेतीच्या कामी अगदी कुचकामाचे होत. त्यांच्यामुळें शेती वाढण्याच्यां ऐवजी कमी मात्र होते. या सर्वांनां हांकून देऊन मालक जरी १०-१० वाजेपर्यंत बिछान्यांत पडून राहिला तरी त्यापासून फारसें नुकसान होणार नाही.''

टॉलस्टॉयनें विश्रांती न घेता कादंबर्‍या लिहिण्याचे काम चालविले होते. परंतु, हे एकदम केलेले श्रम त्याला सहन झाले नाहींत व तो आजारी पडला; व १८७० साली त्याच्या बायकोनें त्याला समर येथें जाण्याची सल्ला दिली. समर येथील डॉक्टरांची पद्धती वगैरे त्याला पसंत होती. तो राहत होता त्या ठिकाणच्या लोकांची रहाणी वगैरे याच्या स्वभावाला अनुरूप अशीच होती. समर येथील या सफरीनें त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला कीं, त्याने लागलीच २००० एकरच्यावर जागा तेथे विकत घेतली. परंतु पुढे लवकरच दुष्काळ वगैरे पडल्याने त्याला त्यापासून व्हावे तितके सुख झाले नाही. टॉलस्टॉयने शोपेनहारच्या तत्त्वज्ञानाचा थोडासा अभ्यास केला व त्याच्या ग्रंथांची भाषांतरे करण्याचा उद्योग त्याने आरंभला.

काही दिवस याप्रमाणें थोडेसे शांततेत गेल्यावर टॉलस्टॉयवर संकटे येऊ लागली. १८७३ सालीं त्याची दोन मुले वारली; व लागलीच त्याची प्रेमळ आत्या एर्ग्लोस्काय हीदेखील वारली. या गोष्टींनी व रूसो-टर्किश युद्धामुळे त्याचे विचार अधिकच प्रौढ बनले. पारमार्थिक विचारांकडे त्याचे मन जास्त जाऊ लागले.

टॉलस्टॉय आता आपल्या आयुष्याच्या तिसर्‍या अवस्थेत होता. त्याने स्वत:च आपल्या मानसिक विकासाच्या तीन अवस्था लिहून ठेवल्या आहेत. पहिली अवस्था म्हणजे आपल्या स्वत:च्या वैयक्तिक सुखाकरिता काळ काढणे ही होय. ह्या अवस्थेत तो वयाच्या ३४ व्या वर्षापर्यंत होता. नंतर, समाजाच्या कार्यार्थ झटणे ही दुसरी अवस्था होय. पण, सर्वांत महत्त्वाची अवस्था म्हणजे तिसरी. या अवस्थेंत 'परमेश्वराची भक्ति' हेच त्याचे अवतारकार्य होऊन बसले होते. धर्मसंबंधाने त्याचीं मतें प्रत्येक अवस्थेतून गेलेलीं होती. लहानपणी तो निमूटपणे देवळातून प्रार्थनेसाठी वगैरे जात असे. तारुण्यांत त्याने धर्माला केव्हांच रजा दिली होती; व पुढे प्रौढावस्थेंत पुन्हा त्याचे विचार आस्तिक्याकडे वळले. परंतु अखेर 'रूसो-टर्किश' युद्धांत 'भिक्षुकवर्ग' शत्रुनाशासाठीं प्रार्थना करताना पाहून त्याची भावार्थबुद्धि नष्ट झाली व तो तत्त्वविषयक विचारांकडे वळला. येणेप्रमाणे कादंबरीकार टॉलस्टॉयचा अखेर तत्त्वज्ञ टॉलस्टॉय बनला. दिवा मालविण्याच्या वेळेस जशी त्याची ज्योत मोठी होते तद्वत् टॉलस्टॉयच्या प्रतिभेने पुन्हा एकदा उचल खाल्ली व 'डेथ ऑफ इव्हान इलिइच' व 'अज्ञानाचा तडाखा' या त्याच्या कादंबर्‍या बाहेर पडल्या. परंतु, या पुढचे त्याचे लेख बहुतेक नीतीविषयक होते. यावेळेस त्याचें वय ५० वर्षाचे होते. त्याचे आयुष्य बाह्यत: दिसण्यांत शांततेचे होते खरे; पण त्याला अनेक प्रकारचा मानसिक त्रास भोगावा लागला होता.

'साधेपणा' हें त्याच्या राहणीचें आद्य तत्त्व होऊन बसले होते. परंतु एवढी खटपट जरी केली तरी टॉलस्टॉयला घरादाराचा त्याग करता आला नाही. टॉलस्टॉयला जरी साधु बनावयाचे होते, तरी मित्रमंडळी व इतर नात्यागोत्याचे लोक यांच्याकडे त्याला अगदीं दुर्लक्षच करता आले नाही. त्याला शहरच्या राहणीचा मनापासून कंटाळा आला होता. ''मनुष्याच्या गरजा जेवढ्या थोड्या तेवढा तो जास्त सुखी'' असे तो म्हणे. या त्याच्या एकंदर विचारामुळे त्याच्या मन:स्थितींत विलक्षण फरक पडला. कॉकेशसमधील 'डॉऊकहॉबरस्' नावाच्या लोकांच्या चळवळींत हा शेवटी शेवटी पडला होता; व 'रिसरेक्शन' नांवाचा आपला ग्रंथ त्याने या लोकांच्या मदतीदाखल लिहिला. या पुस्तकांत त्याने जुन्या धार्मिक लोकांवर टीका केली. त्यामुळें १२ फेब्रुवारी १९०१ रोजीं त्याच्यावर धर्मगुरुंच्या आज्ञेनें बहिष्कार पडला. पुढे पुढे हा सर्व चळवळींत मन घालत असे. परंतु म्हातारपणामुळें त्याच्यानें सर्व गोष्टी झेपत नसत.

''आपण का जगतो ?'' व ''आपण आपले जिणे कसे जगवयाचे ?'' या दोन प्रश्नांचीं समाधानकारक उत्तरे त्याला त्याच्या हयातीत मिळालीच नाहीत. ''मनुष्याचे जिणे म्हणजे एक वेड्याखुळ्यांचा बाजार आहे. व जगावयाचें म्हणजे आहे ते गोड करून रहावयाचे इतकेच''! असे त्याचे मत होते. त्याच्या मते, जर कोणाचे जीवित चांगले व सुखी असेल तर ते शेतकर्‍यांचे व दरिद्री लोकांचे होय. इतर प्राण्यांप्रमाणे अतिशय थोड्या गरजांत आपले काम भागवून राहणें हेंच सुखमय जीवित असे तो म्हणे. परमेश्वराच्या निर्देशाप्रमाणें वागणे म्हणजे सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून सर्वांभूतीं नम्र होऊन सर्वांना उपकारक होईल अशा तर्‍हेने वागणे होय असे टॉलस्टॉय म्हणत असे. या शुद्ध धर्मतत्त्वांखेरीज इतर गोष्टी त्याला अगदीं नापसंत होत्या. म्हणजे थोडक्यांत सांगावयाचे तर टॉलस्टॉय हा नास्तिक नव्हता तर त्याचा ख्रिश्चन आचार विचारांवर विश्वास नसे इतकेच. बायबल वाचून त्याचे असे मत झाले कीं, येशूने पाचच नव्या आज्ञा पाळावयास सांगितल्या आहेत- सर्वांशी गुण्यागोविंदानें राहाणें. अक्रोध, रागशून्यता, हा ख्रिस्तानुयायांचा पहिला गुण होय. एकपत्‍नीव्रताने राहणें. शपथ मुळीच न घेणे (यामध्यें कायद्याच्याकोर्टांतील शपथाहि येतात). पापाचा प्रतिकार न करणे. पाप नाहीसे करण्याचा उपाय, तें होण्याचीं कारणेच नाहीशी करणे हा होय. जबरदस्तीनें दाबून टाकून पापे नाहीशी होत नाहींत. आणि ''आपल्या शत्रूंवरही प्रेम करा'' ही ख्रिस्ताची पाचवी आज्ञा होय. अर्थांत् लढाया वगैरेना ख्रिस्ती धर्माची अनुज्ञा मुळीच नाही.

टॉलस्टॉयचीं मते त्याच्या स्वत:च्या ग्रंथांत जितकी स्पष्टपणें नमूद झालेली आहेत तितकी कोठेही नसतील. 'चाइल्डहुड' , 'बॉयहुड' व 'युथ' हे ग्रंथ जवळ जवळ आत्मचरित्रपरच म्हटले तरी चालतील. या ग्रंथांत कथानक वगैरे फारसे नसून विचारांची उत्क्रान्तीच विशेषत: दाखविलेली आहे. यातील कळकळ व आस्था ही कौतुक करण्यासारखीं आहेत. 'वॉर अँड पीस' (१८६४-६९) या पुस्तकांत त्याने रशियन समाजाचे चित्र रेखाटले आहे. पुरुषांनां कीर्ती मिळविण्याची व सुख भोगण्याची हाव सुटलेली, व बायकांनां गप्पागोष्टी करण्याची हाव सुटलेली होती, असे यात दाखवले आहे. पीटर बेझोचॉव हे चित्र टॉलस्टॉयने फारच सुंदर रंगविले आहे. हा गृहस्थ म्हणजे प्रति टॉलस्टॉयच होय. याच्या नंतरचे पुस्तक म्हणजे 'अ‍ॅना कॅरिनाना' हे होय. यात अलीकडच्या रशियन समाजाचे चित्र रेखिलें असून प्रेमाभावामुळें शुष्क भासणारें वैवाहिक आयुष्य व प्रेमार्द्रतेमुळें सुखमय वाटणारें वैवाहिक आयुष्य यांच्यांतला विरोध मार्मिकपणें दाखविला आहे. १८९० साली याने 'क्रूझर सोनाटा' नावाचे पुस्तक लिहून यांत रशियांतील विवाहसंस्थेवर तडाखे ओढले आहेत. टॉलस्टॉयचे ग्रंथ ज्यांना माहीत नव्हते असले वाचक तर ह्या ग्रंथाने स्तंभितच झाले. जेथे शुद्ध प्रेम आहे असलेच लग्न व तेही केवळ मानववंश चालावा या हेतूने केलेला क्षम्य अपराध आहे. इतर लग्ने नीतिपोषक नसून उलट नीतीचा घात करणारी होत, असें टॉलस्टॉयने यात प्रतिपादले आहे. १८९८ साली 'कला म्हणजे काय?' या विषयावर त्याने पुस्तक लिहून सौदर्यशास्त्राची मीमांसा केली आहे. या भावनेच्या सर्व व्याख्या नापसंत ठरवून कला म्हणजे 'ज्याच्या योगानें एकाच्या मनांतील भावना दुसर्‍याच्या मनांत उद्भूत होते ती होय', असे टॉलस्टॉयने म्हटले आहे. 'देशाभिमान, धर्माभिमान किंवा वैषयिक प्रेम यांपैकी कोणत्याहि गोष्टीचा पगडा न बसता ज्याच्या योगाने मनात प्रेम व आदर उत्पन्न होतो ती कला, तें सौदर्य असते 'असे टॉलस्टॉय म्हणत असे. 'निरभिलाष आनंद ज्यापासून होतो तें सौदर्य', ही कोंटची व्याख्या किंवा शेले व हेगेल यांची 'पूर्णावस्थेची जवळजवळ बरोबरी करणारे ते सौदर्य' ही व्याख्या या सर्व टॉलस्टॉयनें नापसंत ठरविल्या होत्या. या विषयावर विचार करण्यांत त्यानें १५ वर्षें घालविलीं होती.

एकेकाळचा काउन्ट (सरदार) असलेला हा मनस्वी 'लिओ' वयाच्या ब्याऐंशिव्या वर्षी वैफल्यग्रस्त अवस्थेत पहाटेच्या सुमारास घर सोडून निघून गेला आणि अ‍ॅस्टोपोवो रेल्वे स्टेशनवर मृत्यूच्या अधीन झाला. "मला अडवू नका. गरीब शेतकरी कसे जातात.. तसंच जाऊ द्या" असं सांगणाऱ्या टॉलस्टॉयचे अखेरचे शब्द होते- "TRUTH - सत्य" ! जगाला याचे आजही अप्रूप वाटते. २८ ऑक्टोबरपासून अज्ञातवासात निघालेले टॉलस्टॉय २० नोव्हेंबर १९१० रोजी अनंतात विलीन झाले ही गोष्ट मात्र सगळ्या जगाला कळली. त्यांचे जगभरचे चाहते हळहळले. त्यातलं एक नाव होतं दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या जुलमी राजवटीविरुद्ध अहिंसक लढा पुकारणाऱ्या एका वकिलाचं. मोहनदास करमचंद गांधी. पुढे हाच माणूस टॉलस्टॉयचा संदेश घेऊन जगात ‘महात्मा’ म्हणून ख्यातकीर्त झाला होता.

- समीर गायकवाड.

(लेखातील माहिती जालावरून विविध लेखातून संकलित केली आहे)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा