बुधवार, १९ एप्रिल, २०१७

वियोगकविता ...



लढाईवर गेलेल्या एका तरण्याबांड वीराचा मृतदेह घरी आणलाय आणि त्याच्या पाठी आता त्या घरात त्याची तरूण विधवा पत्नी व तान्हुले मूल मागे राहिले आहेत. आपल्या पतीच्या कलेवराकडे शोकमग्न अवस्थेत दग्ध झालेली ती स्त्री स्तब्ध झाली आहे. तिने आपले दुःखावेग मोकळे करावेत मनातले अश्रुंचे बांध फुटू द्यावेत यासाठी तिचे स्वकीय प्रयत्न करताहेत. काहीही केले तरी अतीव दुःखामुळे समाधिस्त स्तब्धतेत गेलेली ती स्त्री काही बोलत नाही. हे पाहून तिथे असणारी एक वृद्धा उठते अन त्या वीरपत्नीच्या मांडीवर तिचे तान्हुले ठेवते. तिच्या मांडीवर ते तान्हुले येताच तिला वास्तवाचे भान येते आणि तिच्या अश्रूंचा बांध आता फुटतो. कवी लॉर्ड टेनिसन यांच्या 'Home they Brought her Warrior Dead' या वियोगकवितेतली ही काव्यकथा आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या करते...
'Home they brought her warrior dead:
She nor swooned, nor uttered cry:
All her maidens, watching, said,
'She must weep or she will die.....

...Rose a nurse of ninety years,
Set his child upon her knee--
Like summer tempest came her tears--
'Sweet my child, I live for thee.'

असं म्हणतात की प्रेमाचे विरहगीत गाण्यापूर्वी बुलबुल पक्षी आपले हृदय टोकदार काटयाने घायाळ करून घेतो आणि मगच गातो. विरहकविता किंवा वियोगकवितांत एक विलक्षण ताकद असते ज्यादवारे मनात साचलेले गढूळ विचार असोत वा मेंदूत घोंघावणारे वादळ असो वा हृदयाचे मूक रुदन असो सर्व भावभावनांचे प्रकटन अवघ्या काही शब्दांत, पंक्तीत करता येते अन मणामणाचे ओझे एका क्षणात हलके होते. वर उल्लेखिलेली लॉर्ड टेनिसनची एक महान वियोगकविता आहे जी आपल्याला अंतर्मुख करून जाते. अशाच आशयाच्या काही मोजक्या वियोग कवितांचा हा आलेख.

कवी सुर्यकांत त्रिपाठी 'निराला' हिंदीतले भावूक आणि विचारी कवी होते. निरालांनी १९३५ मध्ये त्यांच्या सरोज या १८ वर्षाच्या तरुण मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर 'सरोजस्मृती' ही आर्त शोककविता लिहिली होती. हिंदी कवितेत या कवितेचे स्थान अत्युच्च असे आहे.

'सरोजस्मृती' या दीर्घ शोककवितेचे अंतिम चरण इथे खाली दिले आहे. यातील कवीचे विरहवेदनेचे दुःख काळजाला भिडणारे आहे. सहज सोपी, ओघवती अन प्रवाही सुलभ शैलीतली ही कविता मोठमोठाल्या उपमा अलंकारांपासून दूर आहे, तिच्यात गेयता आहे. एका पित्याचे दुःख जसेच्या तसे आपल्यासमोर मांडताना त्यात जडता नाहीये, कमी शब्दांच्या पंक्तीत जास्त आशय सामावला आहे. कवितेच्या अंतिम पंक्तीत कवी म्हणजे एक बाप आपल्या मृत मुलीस आवाहन करतो की, माझ्या गतकर्मांचे हे फळ असून त्याचा स्वीकार करून मी तुझे तर्पण करतोय. कृपा करून त्याचा तू स्वीकार कर. माझ्या जीवनाची कथा ही केवळ दुःखाने भरलेली असल्याने मी तुला ऐकवू शकलो नाही पण मी माझ्या वेदना तुझ्यापासून लपवल्याच्या कर्मावरच म्हणजेच माझ्यावर वज्रपात होणं साहजिक होतं. एक प्रकारची पित्याची असहायता, अगतिकता या कवितेचा आत्मा आहे. हिंदी भाषेतली ही वियोगकविता मनातले अश्रुंचे बांध मोकळे करण्यास मदत करते.

'सरोजस्मृती'-
.....मुझ भाग्यहीन की तू सम्बल,
युग वर्ष बाद जब हुई विकल,
दु:ख ही जीवन की कथा रही,
क्या कहूँ आज, जो नहीं कही!
हो इसी कर्म पर वज्रपात
यदि धर्म, रहे नत सदा माथ
इस पथ पर, मेरे कार्य सकल
हों भ्रष्ट शीत के-से शतदल!
कन्ये, गत कर्मों का अर्पण
कर, करता मैं तेरा तर्पण!

हिंदीतल्या या कवितेसारखा घटनाधार असणारी एक कविता मराठीत लिहिली गेली आहे. 'राजहंस माझा निजला' ही ती कविता होय. गोविंदाग्रजांनी जुलै १९१२ मध्ये ही कविता लिहिली आहे. ह्या कवितेचा परिचय करुन देताना गोविंदाग्रज लिहितात, " पतिनिधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एक मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही का? " एका तरुण विधवा स्त्रीच्या चिमूरडया मुलाचे अकाली निधन झाल्यावर तिच्या मनाची जी घालमेल होते ती गोविंदाग्रजांनी शब्दात जिवंत केली आहे.

'राजहंस माझा निजला' -
.....''बोलेल कोण या बोला। राजहंस माझा निजला !''
मग माता पुत्रांवरि त्या। तरु गाळिती कोमल पाने।
ढाळिती लता निज सुमने। पशुपक्षिही रडति गानें ।
दशदिशा दगडही कढती। मन दुभंगुनि शोकाने।

दुमदुमतें स्थळ ते अजुनिही,
त्या एकच करुणागानीं,
जा जाउनि ऐका कानी !
ऐकाल याच बोलाला - ' राजहंस माझा निजला !'

कविवर्य सुरेश भटांचे तरुण आहे रात्र अजुनी हे गीत देखील अशाच पार्श्वभूमीवर लिहिलेलं आहे. आपल्या तरुण पतीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीच्या मनात दाटून आलेले भाव सुरेश भटांनी आपल्या शब्दकुंचल्याद्वारे जणू कुशल चित्रच रेखाटले आहे. आपल्या पतीच्या कलेवराकडे बघत ती मंद स्वरात विचारते की अजुनी खूप रात्र बाकी आहे आणि तू इतक्या लवकर कसा काय निजलास ? इतक्यात तू अशी कूस बदलायला नको होती ! अरे, त्या तारांगणातील तारकापुंज अजूनही गतप्रभ झालेले नाहीत. त्यांच्या दीपमाला अजूनही चेतलेल्या आहेत. मी सुद्धा चैतन्यमय आहे अन तू असा अकस्मात कसा काय विझलास ? असे का केलेस ? तुझ्या ओठाच्या पाकळ्या अजुनी बंदच आहेत, तुझे श्वास मंद झालेले आहेत. आपली ही शेजरातच आहे अन तू या रातीला फुलांनी आच्छादिलेल्या बिछान्यावर असा निश्चल पडून राहिला आहेस. तू असे कसे करू शकतोस ? सुरेश भटांनी या कवितेला आणि कवितेतील प्रेमाच्या आशयाला जी उंची प्राप्त करून दिलीय त्याला तोड नाही.

'तरुण आहे रात्र अजुनी' -
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ....
ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?...

या कवितेसारखीच आणखी एक श्रेष्ठ वियोगकविता कवीवर्य अनिल यांनी लिहिली आहे. आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूनंतर शोकमग्न अवस्थेत असताना आपली हळवी अन असहाय अवस्था 'रुसवा..' या कवितेत त्यांनी अप्रतिम रचनेतून मांडली आहे. वयाच्या मध्यात एकाएकी निघून गेलेल्या पत्नीच्या अचेतन देहाकडे बघून त्यांनी ही कविता रचली होती. 'रुसवा' -

अजुनी रुसून आहे,... खुलता कळी खुले ना...
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना..

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।...
.....की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा