ज्या देशात आईने बाळाला दुध पाजताना कोण्या पुरुषाने तिच्या त्या मातृवत्सल स्तनाकडे पाहिल्यावर त्याची वासना जागृत होते याची घृणास्पद भीती बाळगून तिच्यासाठी बंदिस्त जागा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आटापिटा केला जातो आणि मूळ पुरुषी वासनाउत्पत्तीच्या किड्याची लोभस रुपात जोपासना केली जाते तिथे 'बेगमजान'ला 'फक्त प्रौढासाठी'चे ए प्रमाणपत्र मिळणे साहजिक होते. हे कमी होते की काय म्हणून कित्येक क्रिटीक्सने देखील हा सिनेमा एकत्र कुटुंबासाठी नाहीये अशी मल्लीनाथी केली आहे. यातील अनेक दृश्ये आणि द्विअर्थी संवाद सेन्सॉरने कट केले आहेत, तरीही क्रिटीक्सना असे वाटावे याचे आश्चर्य वाटते. अशा समीक्षकांना कामाठीपुऱ्यात नेऊन तिथे किती वर्षाची मुलगी धंदा करते आणि येणाऱ्याचे वय किती मोठया अंतरात डिव्हाईड झाले आहे याची आकडेवारी तोंडावर फेकावी वाटते. किती दिवस काय काय झाकून ठेवणार आहोत आपण आणि कशासाठी ही झाकाझाकी ?..... असो... विषय 'बेगमजान'चा आहे...
मूळ बंगाली चित्रपटाप्रमाणे आजही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद, बीरभूम, पश्चिम दिनाजपूर, मालदा आणि चोबीस परगणाच्या डीप इंटेरीयर भागात मोठाले बनारसी कोठे चालतात. यातल्या मुली बहुतांश बांग्लादेशी असतात आणि यांची 'मां' मात्र बंगाली असते तर 'गुरुमां' मोस्टली युपीची असते. खुद्द पश्चिम बंगालमधील मुली मात्र सगळ्या भारतभर डान्सबार मध्ये आढळतात पण इथल्या कोठ्यांत त्या नाचगाणं करताना खूप कमी आढळतात याचं कारण म्हणजे बांग्लादेशी मुलींचं सहज आणि कमी पैशात अव्हेलेबल होणं. आजघडीला भारतातील सर्व मोठ्या शहरातील वेश्यावस्ती चेक केल्या तर त्यात बांग्लादेशी मुली मोठ्या संख्येत आढळतात. या मुलींना कुणी किती मारझोड केली तरी त्या सहन करतात आणि एक ना एक दिवस त्या गिऱ्हाईकाला त्या सुतासारखं सरळ करतात हे नक्की. दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जीचा 'बेगमजान' पाहिला आणि अशा अनेक आठवणींनी काहूर माजवलं..
सध्याच्या घडीला विद्या बालन ही एकच अभिनेत्री अशी आहे की ती एकाच वेळी प्रचंड सोज्वळ वाटते आणि दुसऱ्याच क्षणाला उफाणलेली मदिराक्षी वाटते. दोन विरुद्ध टोकाचे किलर लुक्स ती लीलया देऊ शकते. ती शिडशिडीत बांध्यातही खुलून दिसते आणि अगदी चीनी मातीच्या बरणीगत टचटचीत भरल्या फिगरमध्येही जालिम वाटते. विद्याने 'बेगमजान'च्या आधी 'डर्टी पिक्चर' मध्ये उठवळ आणि भावना उद्युक्त करणारी सिल्क स्मिता साकारली होती आणि 'ईश्कीया'मध्ये प्रेमाला आसुसलेली रखेल साकारली होती. 'डर्टी..'मध्ये तिने सिल्कची घुसमट देखील टेरिफिक प्ले केली होती. आता 'बेगमजान'साठी तिने पुन्हा वजन वाढवले आहे. यातला तिचा लुक देखील एकदम खंग्री आहे, तिची हुक्का पिण्याची स्टाईल असो वा उठण्या बसण्याची ढब असो वा संवादफेकीचा लेहजा या सर्वात एक कोठेवाली डोकावते. विद्या एक अभिनेत्री असून तिनं हे कॅरेक्टर साकारलंय याचा आपल्याला विसर पडतो आणि आपण काही तास त्या बेगमजानला खरी मानू लागतो हे तिचे यश.
"पहले वो एक औरत है फिर कोठेवाली है" असं रग्गील स्वरात सांगणारी बेगमजान पाहून सादत हसन मंटोच्या तौबा टेक सिंगची आठवण येते. गुरूदत्तचा प्यासा डोळ्यापुढे तरळतो, पाकिस्तानी लेखक गुलाम अब्बास यांच्या लघुकथेवर आधारलेल्या श्याम बेनेगलांच्या 'मंडी' अन् 'गरम हवा'ची असोशीने आठवण होते. दोन वर्षापूर्वी श्रीजीत मुखर्जीने श्याम बेनेगल यांच्या १९७० सालच्या 'मंडी'च्या कथेशी पॅरेलल स्टोरी प्लॉट असणारा 'राजकहिनी' हा बांग्ला चित्रपट बनवला होता. बॉक्स ऑफिसवर त्याने धुमाकूळ घातला होता. तेंव्हा यातील मुख्य भूमिकेसाठी त्याने विद्याला विचारणा केली होती, पण पर्सनल शेड्युलपायी तिने ती नाकारली होती. मागच्या वर्षी महेशभट्टनी मात्र त्यातले पोटेंशियल ओळखून त्याला हिंदीत आणण्याची ऑफर श्रीजीतला दिली. यावेळी विद्याला नकार देता आला नाही आणि पडद्यावर 'बेगमजान' अवतीर्ण झाली.
भारताची फाळणी करून पंजाबच्या सीमेवर रक्तरेषेतुन पाकिस्तान आखला गेला त्या रेषेवर बेगमजानचा कोठा आहे. ती मात्र याला कोठी म्हणते. तिच्या कोठ्यावर दहाएक मुली आहेत. बेगमजानहुन वयस्क अशी दादीमाँही (ईला अरुण) आहे. गौहर खान, पल्लवी शारदा, रविजा चौहान आणि मिष्ठी यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या स्त्रिया आहेत. बेगमचा हा कोठा बहुढंगी बायकांनी भरलेला आहे. कधी तो शिसारी आणणारा वाटतो, तर कधी वासनेचे भुयार वाटतो, तर कधी निव्वळ करमणुकीचे पांचट स्थळ वाटतो तर कधी त्यांची आपल्याला इतकी दया येते की नकळत आपल्या पापण्या ओलावतात. या सगळ्यात एक कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे यांचा रासवटपणा. या सगळ्या वेगवेगळ्या वेळी हिंस्त्र होतात, त्यातही बेगम अधिक ! तिचं आपल्या बाईपणावर प्रेम आहे आणि आपल्या धंद्यावर प्रेम आहे. बाकी मुलुख, आजादी आणि पार्टीशन या गोष्टी तिला नगण्य आहेत.
तिचा कोठा हटवल्याशिवाय पार्टिशनलाईनवर फेन्सिंग पूर्ण होऊ शकत नाही हे ध्यानात आल्यावर दिल्लीपासून तिच्या कोठ्याविरुद्ध कागदपत्रे निघतात. बेगमसह तिच्या सर्व बायकापोरींना मात्र राजाजीवर (नसिरुद्धीन शाह) भरवसा आहे. ते आपल्यासाठी काही ना काही मार्ग काढतील याची त्यांना खात्री असते. कारण राजाजीचा बेगमवर जीव असतो. त्याच्या वरदहस्तामुळे बराच काळ बेगमकडे कुणी वक्रदृष्टीने पाहत नाही. मात्र या खेपेस राजाजी काही करू शकत नाही, तो फार तर आजचं मरण उद्यावर टाळतो. आपल्या परीने तो शर्थीचे प्रयत्न करतो पण ज्या दिवशी तो बेगमला सांगतो की आता तुला कोठा खाली करावा लागेल तेंव्हा बेगम काही क्षण उन्मळून पडते पण पुढच्याच क्षणी तिच्यातली वाघीण जागी होते. रात्री उलटली की तिथं अय्याशीला येणारा कोतवाल (राजेश शर्मा) आणि तिथला मुखिया देखील या निर्णयाने हवालदिल होतात.
या निर्णयाने बेगमजान विस्कटते पण विमनस्क होत नाही हे विद्याने जे साकारले आहे ते अप्रतिम आहे. तिच्या कोठ्यावर तिचे स्वतःचे कायदेकानून आहेत. प्रसंगी ती इतकी निर्मम होते की पोरींना मारझोड करून धंद्याला बसवते आणि पोराबाळांचा विषय आला की मेणासारखी पघळते. त्यांच्या दुःखात मात्र ती पूर्णतः सामील होते. ह्या प्रांतातील सीमाआखणी आणि जागा ताब्यात घेण्याचे काम करणारे दोन सरकारी अधिकारी इलियास (रजत कपूर) आणि श्रीवास्तवजी (आशिष विद्यार्थी) हे देखील इथल्या बायकांच्या तऱ्हेवाईकपणापुढे कधी हतबल होतात तर कधी कनवाळू होतात. शेवटी हा कोठा खाली करण्याची जबाबदारी कबीर (चंकी पांडे) नामक अट्टल गुंडावर सोपवली जाते. कबीर, प्रशासन, स्थानिक लोक आणि पार्टीशनची घाई झालेले सरकार यांच्याशी बेगमजान पहाड बनून टक्कर देते. पण कोठा खाली करत नाही. तिचा कोठा हेच तिचे सर्वस्व आहे, त्यात तिचा जीव गुंतलेला आहे. आणि आपल्याशी इतकं कडवट वागणाऱ्या अन तितकाच जीव लावणाऱ्या बेगमवर तिथल्या सगळ्या बायापोरी जीव ओवाळून टाकतात. पुढे काय होते ते पडद्यावर बघणे इष्ट.
थोडी अस्ताव्यस्त पसरलेली तरीही बंदिस्त वाटणारी पटकथा, काहीशी मुद्देसूद मांडणी, अप्रतिम लोकेशन, परफेक्ट स्टारकास्ट, सर्व कास्टने जीव तोडून केलेला अभिनय आणि सुरेख दिग्दर्शन या 'बेगमजान'च्या जमेच्या बाजू आहेत. पूर्वार्ध खूपच स्लो वाटणारा आहे. आणि कथाबीजात सुरुवातीच्या सहा रीळात सांगण्यासारखं काही नसल्यामुळे हा चित्रपट विद्याला अक्षरशः ओढावा लागला आहे आणि तिने हे दिव्य पार पाडले आहे. काहीवेळा उपकथानकांचे जोड विस्कळीत वाटतात. कथा नीट बांधली असती तर ते सुसह्य वाटले असते. त्यात सलगता हवी होती जी बंगाली सिनेमात आहे. 'बेगम'च्या दुनियेचे अनेक कंगोरे आणखी उठावदार दाखवता आले असते आणि अनावश्यक पात्रे टाळली असती तर चित्रपट आणखी रंगला असता. काही सीन्समध्ये ओव्हररेटेड आक्रस्ताळेपणा आहे तो ही टाळायला हवा होता. हे या सिनेमाचे निगेटिव्ह पॉइंटस आहेत. सेटस आणि वातावरणनिर्मिती मस्त जमली आहे. फिल्मला बऱ्याच काळ डार्कग्रे शेड दिली आहे तीही खटकत नाही. कथेला अनुरूप काही लॉंग हॉटसीन्स आहेत तर काही शॉर्टसीन्स रुखरुख वाढवणारे आहेत. काही शिवराळ शब्द आहेत, द्विअर्थी संवाद आहेत. असे संवाद कुणाच्या आयुष्यात कधी ऐकले जाऊ नयेत हे सेन्सॉरचं बौद्धिक दिवाळखोरीचं मत फालतूपणाचे लक्षण आहे. इंटरनेट आणि सोशलमीडियातून वाट्टेल त्या स्तराचे पॉर्न दाखवले जाते ज्याला आजतागायत कोणी पूर्णतः रोखलेले नाही मात्र 'चद्दरबदली' दुनियेचे नागडे वास्तव दाखवताना सेन्सॉरची कात्री उद्दीपित होते हा मूर्खपणा आहे.श्रीजीत मुखर्जीने याला श्याम बेनेगलांच्या एंगलने प्रोजेक्ट केले असते तर चित्रपट अधिक खुलून दिसला असता व त्याचे भडक अंगावर येण्यासारखं वाटणे टळले असते.
श्रीजीतने 'बेगमजान'साठी खूप मेहनत घेतली आहे. आपल्या वाट्यास आलेल्या लहानमोठ्या भूमिकांना सर्व कलाकारांनी पुरेपूर न्याय दिला आहे. नसीरचा राजाजी खूप प्रभावशाली वठला आहे. 'बेगम'बद्दल अनेक क्रिटीक्सनी असं म्हटलं आहे की, श्रीजीतने यातले हॉट सीन्स टाळायला हवे होते त्यामुळे तो मोठ्या पब्लिकक्लासला मुकला आहे. मी असं म्हणेन की, असं करणे म्हणजे चित्रपटाचा आत्मा हिरावून घेण्यासारखं आहे. बेगम ही काही आरत्या निरंजनं घेऊन उभी असलेली स्त्री नाही, ती आपल्या विरोधातील लोकांना पायाखाली रगडणारी आणि अंथरुणात घेऊन झोपणारी आहे याचा विसर या लोकांना का पडावा याचे आश्चर्य वाटते. अनेक संवाद आणि सीन्स कट केल्यामुळे काही ठिकाणी लिंक तुटते. श्रीजीतने क्लासिकल म्युझिक मस्त वापरलं आहे, त्यात त्याला आणखी काही करता आलं असतं ही त्रुटी चांगलीच जाणवते. आझादीयां श्रवणीय आणि प्रेक्षणीय झालंय. या सनेमात बऱ्याच काळानंतर विवेक मुश्रन ('सौदागर'वाला) दिसला आहे.
जे संस्कृतीचे रताळे कुरवाळत बसतात त्यांनी हा सिनेमा न पाहिलेला बरा तर ज्यांना सभ्यतेचे भंपक बुरखे टराटरा फाडता येतात त्यांनी हा सिनेमा कथाविषय झेपत असेल तर पाहावा. जे विद्याचे चाहते आहेत त्यांनी तर बिल्कुल मिस करू नये. ज्यांना 'बाई' झाकलेली आवडते पण एकट्याने असताना तिला निर्वस्त्र करावीशी वाटते त्यांनी चित्रपट पाहावा की न पाहावा याचा कोणताही सल्ला मी देत नाही. चित्रपट पुरेपूर न रंगवल्याबद्दल माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी तीन गुण. श्रीजीत मुखर्जीकडून येणारया काळात मोठ्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही केस मोकळे सोडून बसलेली, मासुळी डोळ्यात काजळ घालून आरपार नजर भिडवणारी, भारदस्त अंगाची, बंदूक टेकवलेल्या खुर्चीवर हुक्का पीत अनवाणी पायाने रेलून बसलेली दिलकश बेगम विद्या बालन डोळ्यापुढे तरळत राहते हे विद्याचे यश आहे की बेगमच्या पत्राचे हे कळत नाही....
बेगमहून अधिक देखण्या आणि तितक्याच सुरेल गळ्याच्या शेकडो 'बेगमजान' आपल्या देशात अनेक कोठ्यात सडतकुजत पडल्या आहेत आणि आपण फक्त तमाशबीन बनून बघत राहण्यापलीकडे काही करू शकत नाही. आपण फारतर एखाद दुसरा सुस्कारा फिल्मी 'बेगमजान'साठी सोडतो आणि आपली जबाबदारी पुरी करतो हे ही कमी नाही....
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा