Saturday, April 22, 2017

'जिंदगी प्यार का गीत है..' - गाण्याची दुसरी बाजू...


१९८२ चा सुमार असावा. फिल्मसिटीत राजेशखन्नाच्या 'सौतन'चे शुटींग चालू होते. आपली लाडकी पत्नी रुकू (टीना मुनीम) हिच्यापासून दुरावला गेलेला श्याम सैरभैर होऊन जातो आणि मनातले वादळ शांत करण्यासाठी त्याच्या ऑफिसमधले स्टेनो असणाऱ्या गोपाल काकांच्या (श्रीराम लागू) घरी त्यांच्या मुलीला राधाला (पद्मिनी कोल्हापुरे) भेटायला येतो असा सीन शूट होत होता. काही केल्या राजेशला तो सीन देता येत नव्हता. सलग तीन दिवस त्याने त्या सीनसाठी घालवले. दिग्दर्शक सावनकुमार टाक नाराज झाले. चौथ्या दिवशी ते राजेशच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले तर त्याने तिथेच हलका 'डोस' लावायला सुरुवात केली होती. सावनकुमारनी त्याला स्वतःला सावरायला सांगितलं. काही वेळ निशब्द शांततेत गेले. त्याचे डोळे गच्च भरून आले होते, चेहरा विमनस्क झाला होता, केस अस्ताव्यस्त झाले होते. तो हलकेच उठला आणि सावनकुमारना काही कळण्याआधी त्यांना घट्ट मिठी मारली आणि तो लहान मुलांसारखा ढसाढसा रडला. त्याला शांत व्हायला बराच वेळ लागला. त्या नंतर काही मिनिटांत तो बाहेर आला आणि एका फटक्यात त्याने शॉट ओके केला आणि कुणाशीही न बोलता सेटवरून तडकाफडकी निघून गेला....या छोट्याशा सीननंतर स्क्रीनप्लेतले दृश्य असे होते की, श्याम बाहेरून दार वाजवतो आणि राधा दाराआड असूनही दार उघडत नाही. श्याम खूप गयावया करतो, "आज माझ्या मनातले वादळ शांत झाले नाही तर माझ्या आयुष्याची नौका कधी तरणार नाही" असं रडवेल्या स्वरात आर्जव करतो पण रुकू आपल्यावर रागावेल आणि आपल्यामुळे श्यामचा संसार उध्वस्त होईल म्हणून राधा काळजावर दगड ठेवते. ओलेत्या डोळ्याने थिजून उभी राहते पण काही केल्या दार उघडत नाही. पुढच्या तीन सीनमध्ये श्याम तिथेच घराभोवती फिरत राहतो असे दृश्य होते...

या नंतर दोन दिवसांनी सावनकुमारनी फक्त तीन दिवसात या सीन सिक्वेन्सला जोडून असणारं संपूर्ण गाणं कोणतेही रिटेक न होता शूट केलं. या गाण्याचे शुटींग सुरु असताना राजेश खूप अस्वस्थ होता, त्याला सीननंतर काही सुचत नव्हते. तो एकदम अबोल होऊन जायचा. स्वतःत मग्न होऊन राहायचा. त्याची ड्रेसिंग रूम शुटींगच्या ब्रेक टाईममध्ये धुराडयात कन्व्हर्ट होऊन जायची....

काही महिन्यांनी 'सौतन' पूर्ण झाला. ३ जून १९८३ ला रिलीज झाला. सिनेमा सुपरहिट झाला पण राजेशखन्नाला याचा फारसा फरक पडला नव्हता. यामागचे कारणच तसे होते. तो या काळात प्रचंड तणावाखाली होता. त्याचे आणि डिम्पलचे नाते उसवले होते आणि त्याचे सिनेमे पडत होते. त्याला सुपरस्टारडमची फिकीर नव्हती पण त्याला मायेचा आधार हवा होता. त्याला डोकं टेकवायला छाती हवी होती, हिट सिनेमे नसले तरी चालेल पण हक्काचं माणूस जवळ हवं होतं. या दरम्यानच्या तारखा सांगतात की १९८२ मध्येच अनिता आडवाणी त्याच्या अत्यंत निकट आली. राजेश तिच्यासोबत 'आशीर्वाद'मधे राहू लागला आणि डिम्पलने वेगळी चूल मांडली. पुढे १९८३मध्ये तिने इंडस्ट्रीत कमबॅकदेखील केले. 'सौतन'मध्ये जे सिनेमात दाखवले गेले होते ते त्याच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने प्रत्यक्षात घडले होते. नेमके तेच त्याला सहन होत नव्हते. आणि ज्या सीनला तो अडखळत होता कारण त्यानंतरचे जे गाणे होते ते त्याच्या काळजावर वार करून गेले होते. किशोरदांनी गायिलेले ते अजरामर गीत होतं -
"ज़िन्दगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पड़ेगा,
ज़िन्दगी ग़म का सागर भी है हँस के उस पार जाना पड़ेगा....."

या गाण्यातील प्रत्येक शब्दातून हजारो काटे त्याच्या अन्तःकरणाला डसत होते, त्यामुळे खचून गेलेल्या राजेशकडून सॉंगसिक्वेन्सच्या आधीचा हा सीन काही केल्या नीट होतच नव्हता. पण ज्या दिवशी त्याने सावनकुमारला मिठी मारली त्यादिवशी त्याच्या मनातले मळभ दूर झाले. त्याच्या मनातील ओझे थोडेफार का होईना पण कमी झाले. मग तो उर्वरित शुटींगला आत्मविश्वासाने सामोरा गेला......

एकटेपण वाईट असतं. आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्यासाठी किमान एक तरी जवळचं माणूस प्रत्येकाजवळ अखेरपर्यंत असावं. राजेशखन्नाकडे हे भाग्य नव्हते. त्याचा एकांतवास हाच त्याचा सर्वात मोठा मित्र झाला होता. राजेशच्या अखेरच्या दिवसात डिम्पल त्याच्या जवळ आली खरी पण मने इतकी दुभंगली होती की, त्याने अनिताला आपल्या आयुष्यातून बाहेर काढले नाही आणि डिम्पलला काळजाच्या उंबरठा पुन्हा ओलांडून आत येऊ दिले नाही. १९६९ ला ‘आराधना’ ब्लॉकबस्टर हिट झाला आणि त्यानंतर हा देखणा गुणी अभिनेता एकांताच्या जीवघेण्या सापशिडीतून कसा खाली येत गेला हे कोणाला कळलेच नाही.

२०११ मध्ये त्याने हेवेल्स पंख्याची जाहिरात खास त्या जाहिरात एजन्सीतील लोकांच्या जुन्या ऋणापोटी केली आणि त्याचा खंगलेला देह जगापुढे आला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. (काही दिवसापूर्वी विनोदखन्नाचेही असेच आजारी असलेले छायाचित्र कुणा एका हरामी व्यक्तीने प्रसिद्ध केले होते आणि अनेकांनी कोरडा आक्रोश केला होता) त्याच्या आजारपणाच्या आणि एकटेपणाच्या बातम्या सगळीकडे येऊ लागल्या आणि डिम्पल त्याच्याकडे परतली. पण तोवर सगळे संपले होते.... त्याचे मन मरून गेले होते. उरला होता तो त्याचा जराजर्जर देह जो दारू सिगारेटच्या आधीन झाला होता.... शेवटच्या काही वर्षात तर तो महिनोनमहिने अनिताशिवाय कुणाशीही बोलत नव्हता, कुणाला भेटत नव्हता....एक सुपरस्टार भिंतींशी बोलायचा आणि अलिशान बेडवर सताड उघड्या डोळ्यांनी सुन्न होऊन छताकडे बघत पडून राहायचा....

राजेशची ही दास्तान आठवली तरी ‘सौतन’मधले त्याचेच गाणे आठवते जिथे तो अडखळला होता. एकटेपणाच्या भयाण भीतीने कोलमडला होता आणि त्याची ती भीती दुर्दैवाने खरी ठरली होती ....‘जिंदगी प्यार का गीत है..’ हे तर खरेच आहे पण 
त्याहून अधिक
"ज़िन्दगी एक अहसास है, टूटे दिल की कोई आस है,
ज़िन्दगी एक बनवास है काट कर सबको जाना पड़ेगा ..."
हे जास्ती खरे आहे ....

- समीर गायकवाड.

संदर्भ - 'द लोन्लीनेस ऑफ बिइंग राजेशखन्ना' - ले.गौतम चिंतामणी.

No comments:

Post a Comment