Tuesday, April 11, 2017

मैत्र जीवांचे .....


शाळा म्हणजे फक्त बहुमजली इमारती नसतात,
नक्षीदार आकाराच्या रंगीबेरंगी ढंगाच्या इमारतीदेखील शाळा नसतात..
शाळा म्हणजे नुसत्या खोल्या आणि मुले- माणसे नसतात, न केवळ मोठे प्रवेशद्वार अन शिस्तबद्ध आवाज ! शाळा असतात तरी काय ?
पोपडे उडालेल्या,जागोजागी गिरवागिरवी केलेल्या,विटक्या रंगाच्या वर्गाच्या चौकोनी भिंती !
अन त्यावर लटकणारे वेगवेगळ्या चित्रांचे फळांचे, फुलांचे अन विज्ञानाचे गोल चौकोनी तक्ते.
फुटक्या तावदानांच्या खिडक्या अन कडी कोयंडे तुटून गेलेले दरवाजे,
कपचे उडालेला काळपट राखाडी फळा त्याच्या अवती भोवती तरंगणारे खडूचे शुभ्र कण.
फळ्याच्या कोपऱ्यात वळणदार अक्षरात लिहिलेली हजेरी अन रंगी बेरंगी खडूने लिहिलेले सुविचार !
फळ्याला लागुनच असणारे डगमगणारे लाकडी टेबल,
आणि चार पायापैकी एक पाय किंचित मोडलेली चुईटया उडालेली लाकडी खुर्ची,
टेबलाच्या ड्रोवरमध्ये पहुडलेला पिवळा डस्टर आणि त्याच्या पांढुरक्या 'राठ' स्पंजचा हवाहवासा मुलायम स्पर्श..
टोकदार कर्कटकाने लाकडी डेस्कवर काढलेली अनामिक 'गुहाचित्रे'.
प्रत्येक तासाला प्राण कानात आणून ऐकलेला घंटेचा आवाज,
अन मधल्या सुटीत अंगत पंगत करून खाल्लेला डबा,
शाळेच्या गेटजवळची आवळा सुपारी, बोरे, शेंगा चिक्की आणि रसरशीत बर्फगोळा !
वर्गाबाहेर पायाचे अंगठे धरून वाकून राहिल्याने भरून येणारी पाठ अन
जिन्याच्या कठडयावरची घसरगुंडी आणि पायरयांवरची शर्यत.
खेळाच्या तासाला केलेली मस्ती आणि 'पीटी'च्या तासाला केलेल्या खोडया,
ग्रंथालयात चांदोबा वाचताना स्वप्नांच्या तारांगणात हरखून गेलेले मन.
प्रयोगशाळेत देहभान हरपून केलेले प्रयोग अन नवनिर्मितीचे अनुभव,
नव्या वह्यांच्या पानाचा वास अन रंगीबेरंगी खोडरबर पेन्सिलचे तुकडे .
कंपॉसची जादुई दुनिया अन चित्रकलेच्या वहीतले न पाहिलेल्या डोंगराआडून वाहणाऱ्या नागमोड्या वळणाच्या नदीचे रेखीव चित्र ..
गंधित पुस्तकांना चढवलेले कुरकुरीत कव्हर अन पुस्तकातील फोटोंना काढलेल्या दाढीमिशा!
वहीच्या पानात ठेवलेले रेषांचे जाळे वागवणारे पिंपळपान, फुलाच्या पाकळ्या अन चॉकलेटची वेष्टने,
दोनेक दिवसांत मळून जाणारा तो अनोख्या वासाचा कधी हवासा तर कधी नकोसा असा गणवेश !
गुरुजींनी उजव्या हातावर छड्या मारताना गच्च झाकलेले डोळे अन आवळून धरलेली डाव्या हाताची मूठ !
आजारी पडल्याची चिठ्ठी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन देताना मनावर आलेले मणामणाचे ओझे !
रविवारची आशा दाखवणारा अलौकिक शनिवार आणि रविवारच्या हिंदोळ्यावर तरंगणारा अस्वस्थ सोमवार.
जगाच्या पाठीवरील कोणत्याही प्रवासापेक्षा अद्भुत वाटणारा सहलीचा खेळीमेळीचा प्रवास,
झेंडावंदनाच्या वेळेस ताठ होणारी मान आणि प्रतिज्ञा म्हणताना येणारा आळस !
राष्ट्रगीत गाताना चढत्या चालीतला 'जय हे. जय हे. जय जय हे' चा रोमांचकारी जयघोष !
मित्राबरोबर केलेली भांडणे अन निरागस कट्टी फू नंतरचा मनमोकळा दोस्ताना !
शाळा सुटल्यावर घरी जाताना वाटेतल्या वृद्ध भिकाऱ्याच्या पुढ्यात रिकामा केलेला डबा अन आपल्या डोळ्यात कोरले गेलेले त्याचे अश्रूयुक्त तृप्तीचे स्मित ..
दिवाळीच्या सुटीनंतर मनाला नवा हुरूप देणारे दिवस ..
परीक्षा आणि अभ्यासाची धास्ती देत राहणारे नोटीसबोर्ड !
अकस्मात सुटीच्या सूचनेचा कागद गुरुजींनी वाचताच जगज्जेत्या सिकंदरासारखा होणारा तो आनंद !
प्रगतीपुस्तकाची हळवी प्रतिक्षा अन उन्हाळ्याच्या स्वप्नवत सुट्यांचे केलेले अंदाज.
दहावीच्या शेवटच्या दिवशी 'सेंडऑफ'च्या दिवशी हळवे होऊन चष्मा काढण्याचा बहाणा करून अलगद डोळे पुसणारे गुरुजी अन मिठी मारणारे शिपाई काका !
पाया पडण्याआधीच आशीर्वाद देणारी ती देवमाणसं !
शाळा एक अनमोल संस्कार, शाळा एक जीवाभावाचा मैत्र, शाळा एक आयुष्यभराची शिदोरी, शाळा एक अखंड शिक्षणाची शीतल ज्योत .......... !

आठवणीची सय दाटून आले की डोळ्याच्या कडा ओल्या करणारी अशी ही शाळा कधी संपत नसते,
तिथले वर्ग कधी सुटत नसतात,
आपले 'दप्तर' बदलत राहते आपणही बदलत राहतो.
शाळा मात्र नव्या दोस्तांसोबत तिथंच उभी असते अगदी स्थितप्रज्ञाच्या भूमिकेत !
आपण जरी तिथं नसलो तरी शाळा मात्र आपल्या काळजात खोल खोल रुतून बसलेली असते.
शाळा म्हणजे तुमचा आमचा गतजन्मीचा पुण्यसंचय जो या जन्मात शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याची प्रेरणा देतो ...
म्हणूनच ही शाळा कधी सुटत नाही अन आपली पाटी कधी फुटत नाही ...त्या शाळेची आणि तिथल्या मित्रांची ही ब्लॉगपोस्ट ! यावर कसे लिहावे आणि किती लिहावे उमजत नाही. सुरुवात कुठून करावी अन शेवट कसा करावा हेही समजत नाही.

लाकूडतोडयाची गोष्ट सर्वांना माहिती आहेच. लाकूडतोडयाची कुऱ्हाड विहिरीत पडते. विहिरीतला देव त्याची परीक्षा घेतो.
तो आधी तांब्याची, चांदीची आणि शेवटी सोन्याची कुऱ्हाड पाण्यातून बाहेर काढून त्याला दाखवतो. तो त्या नाकारतो.
देव त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन त्याच्या कुऱ्हाडीसह आधी काढून दाखवलेल्या कुऱ्हाडी त्याला भेट म्हणून देतो.
गोष्ट ही गोष्ट असते. त्यातले सार शिकावे म्हणून अशा कथा रचल्या जातात. पण वास्तवात असे घडते का ? माहिती नाही किंवा व्यक्तीपरत्वे वेगळे उत्तर येईल.
पण आपल्या लाकूडतोडया मित्राची कुऱ्हाड गहाळ झाली आणि त्याच्यावर उपासमारीचे संकट ओढवले तर स्वतःची कुऱ्हाड देऊन त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा एकच व्यक्ती जगात असतो.
तो म्हणजे मित्र !

आपली रक्ताची नाती आपल्याला जन्मासोबत येतात, त्यात आपण काही बदल करू शकत नाही.
मित्र आणि आयुष्याचा साथीदार ही दोनच नाती आपण आपल्या मर्जीनुसार निवडू शकतो.
बालवयात एका ताटात जेवण्यापासून ते मरताना पाणी पाजण्यापर्यंत मित्र सोबतीला असतात, हे भाग्य जोडीदाराच्या वाट्यास येत नाही कारण जीवनाचा जोडीदार आपण तारुण्यात निवडलेला असतो तर मित्र बालपणापासूनचे असतात.
माझ्या प्राथमिक शाळेपासूनच्या मित्रांचा एक वर्ग आजही भरतो आणि त्याचा मी एक घटक आहे. सगळे बालपणीचे यारदोस्त, एकमेकाला मनापासून ओळखणारे आणि एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणारे !
जीवनात आईवडील आणि शिक्षकांच्या इतकंच महत्वाचे स्थान मित्रांचे असते.
याची जाणीव असणारे आम्ही मैत्र दर दोन वर्षाला एकत्र जमतो. दोनेक दिवस एकत्र राहतो. गप्पाष्टकं झडतात.
गप्पात कुठलाही विषय वर्ज्य राहत नाही.
अनुभव शेअर केले जातात. मनातलं आभाळ रितं होतं. नाचगाणं होतं.
चर्चासत्र झडतं. टीकाटिप्पणी होते, सूचना केल्या जातात.
नवनव्या संकल्पना राबवल्या जातात.
आता या भेटींना मित्रभेटींचे स्वरूप न राहता भरतभेटीचे स्वरूप आले आहे. देशभरात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले मित्र यासाठी आवर्जून वेळ काढून येतात तर दर वेळेस एकदोघे तरी विदेशाहून खास याच कारणासाठी येतात.
बालपण, कुमारवय, पौगंडावस्था, तारुण्य, गद्धेपंचविशी, प्रौढत्व आणि आता आलेली परिपक्वता या सर्व टप्प्यांचे प्रतिबिंब या भेटींत शिगोशिग पडलले असते.
मुलाबाळांची चौकशी होते.
एखाद्याच्या घरचे पिकले पान गळून पडलेले असते त्याच्या भावनांचा बांध मोकळा करून दिला जातो.
आम्हा सर्वांचे प्राथमिक - माध्यमिक शिक्षण सोलापुरातील ज्या श्रीसिद्धेश्वर प्रशालेत झालं तिथल्या रम्य आठवणींना तर नेहमीच उजाळा दिला जातो.
पुन्हा भेटण्याच्या अटीवर गळाभेटी होतात जड पावलांनी सगळे जण आपापल्या घरी रवाना होतात.
अधूनमधून कुणी भेटले तर त्याच्या वार्ता एकमेकांना शेअर केल्या जातात.
नैमित्तिक भेटीगाठीही होत राहतात.
ऋतूचक्र सुरूच राहते. दिवस पुढे जात राहतात आणि काळजातले मैत्रीचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत राहते .....

मैत्रीचे नितांतसुंदर नातं निर्माण करणाऱ्या निर्मिकाचे आभार मानावेत तेव्हढे कमीच आहेत आणि
माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या शाळकरी मित्रांचे ऋण मानावे तितके कमीच आहे ...
हसरतो की निगाहो पे सक्त पहरा है
न जाने किस उम्मीद पर दिल ठहरा है
तेरी चाहतो की कसम ऐ दोस्त,
अपनी दोस्ती का रिश्ता तो प्यार से भी गहरा है....

- समीर गायकवाड.

(सोबतच्या छायाचित्रात शाळकरी मित्रांसोबत अस्मादिक)