शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

गावाकडची रम्य सकाळ ....


वर्षभरातला कोणताही ऋतू असला तरी गावाकडच्या दिनमानात फारसे बदल होत नसतात. त्यातही सकाळचे दृश्य कधी बदलत नाही. राज्यातील कोणत्याही खेड्यात कोणत्याही ऋतूमानात गेलं तरी एक सुखद प्रभातचित्र सृष्टीने साकारलेले असते. हे प्रभातचित्र ज्याला बघायला मिळते तो व्यक्ती नशीबवानच. आणि ज्या लोकांना हे सुख प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ते खरे भाग्यवंत होत. गावाकडची सकाळ खरं तर नेमक्या शब्दात चितारणे अशक्य आहे कारण तिला अनेक पैलू आहेत, अनेक रंगढंग आहेत. नानाविध पदर आहेत. मातीवर जीव असणाऱ्या प्रत्येक सृजनास वाटते की आपण आपल्या परीने हे चित्र रंगवावे, ते पूर्णत्वास जात नाही याची माहिती असूनही हा प्रयत्न अनेकांनी केला आहे. 


अंधार ओसरून उजेडाची आभा आसमंतात पसरू लागते आणि सकाळ होऊ लागल्याची दवंडी सृष्टी आपल्या परीने देऊ लागते. रम्य सकाळी हवेत उडणारे फुलांचे परागकण. शिवारात हलकेच वाहणारे शीतल वारे अन पुरवाईचा मातीत उतरणारी लालिमा. तांबडफुटीला चाललेला पक्षांचा गलका, कडब्याच्या गंजीवर बसलेल्या पाकोळ्यांचे फडफडणे. झाडांच्या ढोलीला आलेली इवल्याशा चोचीची जाग, गोठ्यातून येणारा घंटांचा आवाज. बांधा-बांधावरल्या झाडांच्या पानांची अद्भुत सळसळ, पारव्यांचे घुमणे अन भोरड्यांचा गवतावर उडालेला गलका सगळं कसं ओसंडून उचंबळून आल्यागत घडत असतं.  आकाशातल्या घारींचे वेगाने सूर मारणे सुरु झालेले असतं. वाफ्यांमधून वाहणारे पाणी आपल्याच तालात पुढे पळत असतं, सकाळीच पाणी पिऊन रोपं तरतरीत होतात अन वारयावर डोलू लागतात.  गुरं धूवून काढण्यापासून गोठ्याची सुरुवात होते अन धारा काढण्यात सकाळचे सत्र समाप्त होते. मातकट पातेल्यातला लज्जतदार चहा दिवसभर उपाशी राहिले तरी चालेल इतकी उर्जा देऊन जातो. मुठीतले पाणी कधी ओघळून जाते हे जसं कळत नाही तसं शिवारातली सकाळ कधी येऊन गेली तेच कळत नाही.

गावात मात्र पूर्वेला काळसर तांबडे असताना गावकुसाच्या वेशीजवळील देवळात लगबग ऐन रंगात आलेली असते. पांढरे जुनेच पण स्वच्छ धुतलेले धोतर सदरे नेसलेले काही पोक्त टाळकरी तर काही तरणी पोरे पकवाजाच्या आवाजावर दंग झालेली असतात… टाळ गर्जत असतात,आत गाभारयात उभा असणारा पांडुरंग रुक्मिणीच्या साक्षीने प्रसन्न चित्ताने हसत असतो. गाणारया टाळकरयाचा आवाज टिपेला जातो,त्यात आडावर वाजणारी नव विवाहित महिलांची कुजुबुज मिसळू लागते दूर कुठे तरी मोटेवर दिली जाणारी ललकार मिसळू लागते. पाखराना देखील एव्हाना जाग येऊ लागते. घराघरातल्या दारासमोर सडे पडायला सुरु झालेले असतात. चुलीमध्ये हलका आर पेटवला जाऊ लागतो, फुकारीतून फुकत फुकतच चुलीवर मातीने सारवलेल्या भांड्यात पाणी चढवले जाते. तोवर इकडे शेतातली शिवारे आणि बैलगोठेही टक्क जागे झालेले असतात. रेशमी अंगाच्या गायीचे आपल्या वासराला चाटून झालेले असते. शेतातल्या समाधीवर विहिरीतले दोन तांबे थंड पाणी चढवून चाफ्याची सोनफुले चढलेली असतात. लेकुरवाळ्या बायका तान्हुल्याना उराशी धरून हळूच बाजूला करून पदर खोचून पुढच्या तयारीला लागतात.

गावातल्या देवळात देखील बरीच वर्दळ वाढलेली असते. कराकरा आवाज करणारया पायताणाला पायरीपासून बऱ्याच अंतरावर ठेवून सारे जन हळूहळू आतल्या ओसरीवर भावमग्न होत आता आरतीची वाट बघू लागतात. गुरव आरती सुरु करतो. आरती होते. सारे जन पांडूरंगाच्या पाया पडतात. चिरमुरे फुटाणे वाटून होतात . निघताना टाळकरी वीणेवाल्याच्या पाया पडतात. कंबरेत वाकलेले म्हातारे कोतारे मात्र थेट गाभाऱ्यात जाऊन थरथरत्या हाताने विठू रुक्माईशी दबक्या आवाजात काही तरी हितगुज करून बाहेर येतात,बाहेर येताना त्यांचे डोळे किंचित पाणवलेले असतात. स्वच्छ गणवेश घालून शाळेकडे निघालेल्या पोरांचा गलका अन शिवाराकडे चाललेल्या गाडीवानांनी बैलांना मारलेल्या लडिवाळ हाका यांना बाजूला सारत रिकामी माणसे मंदिराच्या पायरयाशी बसून येणारया जाणारयाचा कानोसा घेत राहतात. सकाळी पार आळसावलेला असतो, तिथली झाडे अजून पेंगेत असतात. गावातल्या सर्व आळ्या मात्र सडा संमार्जनाने उजळून गेलेल्या असतात.जुन्याच पण स्वच्छ कपड्यातून घराघरातून बाहेर पडणारी कपाळावर अष्टगंध ल्यालेली माणसे कामासाठी बाहेर पडत असतात. तळ्यावरच्या पाण्याला जाग आलेली असते अन आडावर पाणी भरायला येणारयांची गर्दी कमी होऊ लागली की ओळखायचे की गावातली सकाळ आता सरत आलेली आहे...

शेतशिवारातली, गावातली ही सकाळ म्हणजे बाळमुखातून बोलणारा अन शिवारातून डोलणारा देवच जणू ! इथेच काशी अन इथेच रामेश्वर आहे, बहरून आलेल्या या पूर्वेच्या अपूर्वाईला जोवर आपण हृदयातून बघत नाही तोवर इथले चैतन्य जाणवणार नाही. स्वर्ग आणखी कसा असतो ? देव अजून कुठे वास करतो ? निसर्ग याहून अधिक कुठे कळतो ? मनातला खरा भाव इथे जास्त चांगला कळू शकतो. इथे नांगर चालवून अन काळ्याभोर मातीच्या कुशीतून कोवळे हिरवे कंच अंकुर फुलवून जे कळणार आहे ते गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून अन भस्म लेऊन देखील कळणार नाही. त्यासाठी हे अंतरीचे सूर जागवणारे हे क्षण संधी मिळताच जगायला पाहिजेत, नाहीतर आयुष्यातले काही अर्थ अन संज्ञा आपल्याला कधी कळणारच नाहीत...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा