Tuesday, November 29, 2016

'ब्लॉग माझा' - एक धक्का सुखाचा ...ब्लॉग'माझा' नव्हे ब्लॉग 'तुम्हा सर्वांचा' - गोष्टीवेल्हाळाची बाराखडी...

तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो की, 'एबीपीमाझा' या वृत्तवाहिनीतर्फे मराठीतील सर्वोत्कृष्ट वाचनीय ब्लॉग निवडीसाठी घेतलेल्या 'ब्लॉगमाझा' ह्या स्पर्धेसाठी माझ्या ब्लॉगची निवड प्रथम क्रमांकासाठी करण्यात आलेली आहे.


खरेतर मी काही लेखक नसून केवळ एक फेस्बुक्या खरडकर आहे. जसे की, आपल्या सर्वांना गायला आवडते अन गायनाची ती हौस आपण अंघोळ करताना भागवतो,अशा रीतीने पण बाथरूम सिंगर होतो ! तसेच काही तरी लिहावे असं सर्वांनाच वाटत असते, त्यातही लेखनाची अतिहौस असली की माणूस फेसबुक वा सोशल मिडीयावर लिहू लागतो, जसा की मी ! त्यामुळे मी लेखक आहे हा समज आधी तुम्हा सर्वांनी डोक्यातून काढून टाकावा ! माझ्या ब्लॉगवर टायटलच आहे - "गोष्टीवेल्हाळाची बाराखडी !' गोष्टींची म्हणजे साहित्याची आवड असणारा स्वभाव आणि त्या प्रांतात जास्ती रमणारा माणूस ही माझी त्रोटक ओळख. कथा, कविता, पुस्तकं, सिनेमा, गाणी आणि काळी माती यांची अपार गोडी ! त्यावर आधारित लेखन सातत्याने केलं. पण माझ्या लेखनाची पोहोच अजूनही 'बाराखडी' इतकीच आहे याची मला जाणीव आहे म्हणून माझे लेखन कोणी फारसे गांभीर्याने घेऊ नये कारण ती एका तद्दन 'गोष्टीवेल्हाळाची बाराखडी' आहे. तिला अजून अक्षरओळख व्हायची आहे !

ब्लॉगचे शीर्षक अर्थातच माझ्या नावाचे आहे कारण स्वतःची ओळख लपवून अन्य काही मार्गाने व्यक्त होणं पटलं नाही. पहिले काही ब्लॉग 'अक्षरगंध' नावाने लिहिले होते पण त्यात रसरशीतपणा वाटला नाही. ब्लॉगलेखनाला आता दिड वर्षे झालीत आणि ब्लॉगवाचन संख्या सहा लाखावर पोहोचली आहे. ४ एप्रिल २०१५ रोजी पहिला ब्लॉग लिहिला. ग्रामीण भागात चोरून छपून वेश्या व्यवसाय करणारया नितळ देखण्या अन निरागस 'शेवंता'च्या कथेवर तो ब्लॉग होता. त्यानंतरच्या दिड वर्षात आजवर मी चारशेहून अधिक ब्लॉग लिहिले आहेत. कथा, कविता, ललित, रिअल लाईफ स्टोरीज, व्यक्तिचित्रण, सिनेसृष्टीवरील लेखन, पुस्तक परिचय, रसग्रहण, समीक्षा, राजकीय, सामाजिक आणि वर्तमान घडामोडी या विषयांवरचे लेखन समाविष्ट आहे.

अनेकदा असे व्हायचे की एक लिहायला बसलो आणि दुसरेच काहीतरी लिहून झाले. बरेच लेखन अर्धवट राहिले. काही लेखन तुटक तुटक काळात पूर्ण होत गेले. कधी एकेक आठवडा एक ओळ लिहून झाली नाही तर कधीकधी एका बैठकीत वीस - पंचवीस पानांचा फडशा पडला. कधी मुद्दे अर्धे राहिल्याने वा संदर्भ साहित्य न मिळाल्यामुळे काही विषयांवर लिहिण्याचे मनसुबे मनातच राहिले. समीर पाटील यांच्या 'मेघदूत प्रकाशन'ने ब्लॉगवरील काही लेखांचे 'पाऊलवाट' हे पुस्तक जूनमध्ये प्रकाशित केले होते. त्याची पहिली आवृत्ती संपली आणि आता पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे. येणारया काळात काही पुस्तके प्रकाशित होतील असे वाटते.

माझ्या सर्व शिक्षकांनी केलेल्या वाचन लेखन संस्कारामुळे मी तोडकं मोडकं का होईना लिहू शकलो. माझ्या खर्डेघाशीस माझ्या आईने प्रेरित केले. प्रौढत्वाकडे झुकलो असलो तरी अजून आईजवळ राहतो त्यामुळे तिचा आग्रह कसा काय मोडणार ? पत्नी सौ. सविताने एखाद्या लाडक्या मुलाचे जीवापाड लाड करावेत तसे माझ्या 'तथाकथित' लेखनाचे चोचले पुरवले. रात्री अपरात्री उठून चहा करून देण्यापासून ते झोपी गेल्यावर डोळ्यावरचा चष्मा काढून घेण्यापर्यंतचे लाड मी करवून घेतले ! सर्व कुटुंबीयांनी, सर्व शाळकरी मित्र विशेषतः राजेश हलकुडे, ललत म्हेत्रस, निरंजन शहा यांनी विशेष प्रोत्साहन दिले. पण माझ्या पाठीवर खरी थाप दिली 'कुबेर'चे संतोषभाऊ लहामगे आणि 'शिळोप्याची ओसरी'चे तात्या उर्फ चंद्रशेखर अभ्यंकर यांनी ! तसेच 'मराठी सृष्टी'चे निनाद प्रधान, 'मराठी फेसबुकर्स'चे कौस्तुभ गुरव - सारंग वैद्य, 'गुलमोहर'चे समीर देवधर, 'प्रतिलिपी'च्या वैशाली शिंदे, 'दामोदर गुरुजी'चे शरद दातार, 'आम्ही साहित्यिक'चे मिलिंद कोतवाल, 'मराठी साहित्य'चे विनायक गाडे यांचेही मनस्वी सहकार्य लाभले.

माझ्या एकंदर लिखाणातील जडणघडणीत दोन नावांचा उल्लेख केला नाही तर तो कृतघ्नपणा ठरेल. पत्रकारितेची चाळीस वर्षे तपस्या करणारे लोकसत्ताचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार प्रवीणजी बर्दापूरकर आणि लेखन कसं असावं याचं आत्यंतिक देखणं शब्दप्रतिक असणारे जयंतजी विद्वांस ! ह्या दोन दिग्गज असामींनी मला अनेकवेळा लेखनधडे दिले आहेत आणि त्यामुळेच अधिक जोमाने अक्षरे गिरवू शकलो.

माझ्या सोलापूरातून प्रसिद्ध होणारया दैनिक 'संचार'चे उपसंपादक प्रशांतजी जोशी यांच्या नावाशिवाय हा लेख अधुरा राहील. 'इंद्रधनू' ह्या साप्ताहिक पुरवणीत 'पानोपानी' ह्या सदरातून दर रविवारी जवळपास वर्षभर मुक्तहस्ते लिहिण्याची अनुमती त्यांनी दिली. तसेच दैनिक सुराज्यमधून ब्लॉगलेखन ठळकपणे प्रसिद्ध करणारे संपादक मित्र राकेशजी टोळ्ये यांचा उल्लेखही अनिवार्य आहे. लेखनावर मन भरून बोलणारया नितीन राणेंच्या उल्लेखाशिवाय हा ब्लॉग अपूर्ण राहील. माझे ओबड धोबड लेखन आपलंसं मानून त्यावर सतत रसिकप्रेमाचा वर्षाव करणारया सर्व वाचकांचा मी सदैव ऋणी आहे. वाचकांच्या आशीर्वादाशिवाय इथवरचा प्रवास शक्य झाला नसता.

देशविदेशातून आलेल्या अनेक नामवंत ब्लॉगमधून 'एबीपी माझा'ने माझ्या ब्लॉगची निवड केल्याबद्दल वाहिनीचे आणि परीक्षकांचे मनस्वी आभार. या उपक्रमात निवड झालेल्या सर्व मान्यवर ब्लॉगलेखकांचे आभार मानतो. खरे तर माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच आहे...


मला मिळालेला हा पहिला वाहिला पुरस्कार माझ्या सर्व वाचकांना अर्पित करतो.

तुम्हा सर्वांचे हात माझ्या पाठीवर सदैव असेच असू द्यात. बस्स अजून काय हवे ?

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment