'बालपण देगा देवा’ असं सर्वचजण म्हणत असतात पण बालपण काही केल्या परत मिळत नसते. मात्र आयुष्यात काही क्षण असे येतात की आपल्याला बालपणाचा आनंद पुन्हा लुटता येतो. हे क्षण आपल्याला पुन्हा त्या वयातील आठवणींचा पुनर्प्रत्यय देतात, त्या आनंदाची तशीच पुनरावृत्ती होते. आपणही त्या क्षणांत हरखून जातो. प्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंग, काही घटना आणि काही आठवणी अशा असतात की मनाच्या गाभाऱ्यात त्या चिरंतन टिकून असतात, त्यातही शैशवाच्या गोड स्मृतींना उजाळा देण्याचं काम हे क्षण करत राहतात. अशा चैतन्यदायी क्षणांची अख्खी शृंखला आपल्यासमोर साकारण्याचे काम रंगपंचमी करायची.
रंगपंचमीचा आनंद बालपणापासून ते मन तरुण असेपर्यंत वयाच्या कुठल्याही टप्प्यावर त्याच निखळ प्रेमळ पद्धतीने घेतला जाई. आपले बालपणातील सवंगडी, तेंव्हाचा परिसर, तेंव्हाची आपली परिस्थिती आणि त्या काळातील आपले आप्तस्वकीय या साऱ्यांच्या आठवणींचा एक चित्रपट आपल्या नजरेपुढे साकारण्याचे काम रंगपंचमी करत असे. दरवर्षी येणारा हा सण त्या हरवून गेलेल्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी नक्कीच समर्थ आहे. पण मोबाईल आणि संगणकांच्या बेजान दुनियेत हरवत चाललेल्या गोष्टींच्या यादीत आता रंगपंचमीचा समावेश होतो की काय अशी भीती मनी दाटून येतेय. रंगपंचमीच्या माझ्या आठवणीही इतरांसारख्याच आहेत. आठवणींचे ते दिवस मंतरलेले होते, ती दुनियाच वेगळी होती.
पूर्वी रंगपंचमीच्या दिवशी घालण्यासाठी एखादा जुना शर्ट जुनीविजार आई बाजूला काढून ठेवत असे. हे जुने कपडे बोहारणीकडे जाण्याऐवजी गाठोड्यात हातपाय मुडपून पडून राहत. रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच हे गाठोडे उघडले जाई अन आई ताकीद देई, ' उद्या हेच कपडे घालून रंग खेळायचा, बरं का ?"...तिच्या पुढे जाण्याची कुणाची बिशाद असणं शक्यच नव्हतं कारण आईच्या या इशारयामागे वडिलांचा धाक असे...
चुरगाळून गेलेले ते कपडे अंगावर एकदम दाटून बसत कारण ते किमान एकदोन वर्षाआधीचे असल्यामुळे मापात फरक पडलेला असे, हे कपडे अंगाला टोचत असत. कारण धुऊन झाल्यावर ते तसेच गाठोडयात कोबलेले असल्याने त्यातले धाग्यांचे रेषे बाहेर आलेले असत. हे आव्वळ चिव्वळ कपडे घालून रंगपंचमीला जो आनंद येई तो नव्या कपड्यात देखील येत नसे.केसांत रंग घट्ट झिरपू नये म्हणून आई डोक्याला आणि अंगाला खोबरेल तेल लावीत असे.
आदल्या दिवशीच वडिलांनी आणलेल्या रंगांचे पुडे रात्रभर डोळ्यापुढे तरळत. नंतर या पुड्यांचे टिनपाटाचे डबे झाले अन परत प्लास्टिकच्या पिशव्या आल्या. जुन्या पिचकारीचे अवयव धडधाकट असले तर तिच्यावरच हौस भागवावी लागे. पिचकारी बिघडली असेल तर आम्ही भावंडे नवी पिचकारी मागण्या आधी वडील तिच्या दुरुस्तीचा खटाटोप करत तेंव्हा मनातल्या मनात वाटे की ह्या बंद पडक्या पिचकारया दुरुस्त होऊ नयेत असे वाटे. कधी नव्या तर कधी जुन्या पिचकारया वाटेला येत मात्र रंगपंचमीला येणारी बहर तशीच असे, त्यात फरक पडत नसे..
रंगपंचमीच्या दिवशीच्या सकाळी थोडा अभ्यास हा माथी पक्का ठरलेला असे. वडील म्हणत, ‘दिवसभर अभ्यासाच्या नावाने बोंब असणार आहे तेंव्हा तासभर तरी वह्या पुस्तकाला हात लावा ! अति रंग खेळणे वाईटच नाहीतर उत्तरपत्रिका कोरी रहायची !' काही मिनिटंच हा अभ्यास चालायचा तरीही तो अगदी जीवघेणा वाटायचा. कारण आम्ही अभ्यासाला बसलेले असू तेंव्हा बाहेर पोरांचा कालवा वाढलेला असायचा. माझं तर सारं लक्ष त्या गलक्याकडे असे. कोण काय करतंय, कोण कोणाला रंग लावतंय, कोण चिंब ओला झालाय आणि कोण अजूनही लपून बसलेला आहे याची इत्थंभूत माहिती त्यातून येई. हातातल्या वहीतली अक्षरे रंगीबेरंगी वाटू लागत आणि पुस्तकांतील आकृत्यात पिचकाऱ्यांचे विविध आकार तरळू लागत. आपणही रंग खेळत असल्याचे भास होत आणि अभ्यासात तीळमात्र ध्यान लागत नसे. आमचे हे ‘रंग’ आई अचूक ओळखत असे. मग वडिलांनी लावलेली अभ्यासाची संचारबंदी ती शिताफीने शिथिल करून देई आणि आम्ही भावंडे हरणागत उड्या मारत घराबाहेर धूम ठोकत असू.
सुरुवातीला टमरेल भरून रंग तयार झालेला असे, पुढे तो बादलीभर होई, गल्लीच्या कोपरयावर मात्र लोखंडी टिपाड भरून रंग तयार असे. आधी मित्रांबरोबर लाजत लाजत थोडा थोडा रंग लागे, मग सगळे अंग रंगात भरून निघे ! मग एकेक करून सारी पोरे त्या टिपाडात बुचकळून काढली जात असत. सकाळी चढलेला रंग दुपारी सूर्य डोक्यावर आला की शांत होऊन जाई. मग पावले घराकडे वळत, पोटात कावळ्यांचा जाम कोलाहल सुरु झालेला असे. जाम भूक लागून जाई. पण अंगाखांद्यावर तोंडावर चढलेला रंग जोवर फिका होत नसे तोवर ताट पुढ्यात येत नसे. आम्ही भावंडे वडीलांना टरकून असू. त्यांच्या धाकापाई अंग खरडून खरडून घासले जाई, अंगाची आगआग होऊन जाई अन भूक आणखी वाढायची. केस अर्धेओले असतानाच जेवणास सुरुवात होई. जठराग्नी तृप्त झाला की थोडा वेळ गप्पाटप्पात जाई, हळूहळू संध्याकाळ येई अन चोरपावलाने मागच्या दाराने कुणी ना कुणी येऊन रंगाची बादली अंगावर पालथी करून जाई ! यावेळेस जितका आनंद वाटायचा तितकाच वैताग यायचा कारण घरात रंग सांडला की रंगपंचमीच्या रामायणापेक्षा साफसफाईचे महाभारत मोठे घडत असे !
संध्याकाळी अशा प्रकारे तोंड रंगूनदेखील नाहीनाही म्हणत रंगाचा आणखी एक राउंड होऊन जाई. यावेळी बहुत करून आमच्याकडील रंगाचा साठा संपत आलेला असायचा. मग रंगाचा पडीक साठा कुठे हाती लागतो का याची शोधमोहीम सुरु होई. त्या साठी जुने गाठोडे अन पोटमाळा धुंडाळला जाई. इतकं करूनही हाती रंग आलाच नाही तर रंगाची उसनवारीही होई ! काहीही करून रंग लावलाच जाई. मग पुन्हा घरी आल्यावर साग्रसंगीत अंघोळ उरकावी लागे. दिवसभर उन्हातान्हात रंग खेळत मोकाट हिंडल्यामुळे रात्री अंग टेकल्यावर जाणवायचे की, आज आपण खूप थकलेलो आहोत. अवघ्या काही क्षणात निद्रादेवी तिच्या कुशीत घेई. दिवसभर उनाडक्या केल्याने आणि नको तितकी धावपळ केल्याने अंगातील सर्व हाडे ठणकत असत याची हलकी जाणीव झोपी जाताना होई. त्या आधी बळजबरीने जेवायला लावी. या जेवणात मुळीच लक्ष लागत नसे. पण आईच्या प्रेमापोटी आणि वडिलांच्या धाकापायी ते जेवण आपसूक घशाखाली उतरत असे. खरे तर हे दोन घास पोटात ढकलतानाच डोळ्यांवर पेंग येत असे. आमची जेवणे उरकली की आई राहिलेली साफसफाईची कामे पुरी करायची, स्वच्छतेची आणि टापटिपेची कमालीची आवड असणारे वडील रंगाच्या बादल्या लखलखीत निर्मळ स्वच्छ करून उपड्या करून ठेवत असत. बादल्यांपाठोपाठ दिवसभर आम्ही तलवार वागवावी तशा सोबत बाळगलेल्या पिचकाऱ्यांचा क्रम येई. त्या सर्व पिचकाऱ्या आधी नेटनेटक्या दुरुस्त केल्या जात आणि नंतर स्वच्छ धुवून पुसून एका जुनेर कापडात गुंडाळून ठेवूनच ते झोपी जायचे. आम्ही भावंडे मात्र अगदी बिनसुध पडून राहत असू. कालमानानुसार दर साली रंगपंचमी यायची अन जायची मात्र तिचा आनंद हळूहळू तिच्या रंगासारखाच फिकट होत गेला.
आता माझे मोठे बंधू नोकरीनिमित्त मुंबईत असतात तर लहान भाऊ देखील नोकरीच्या निमित्ताने दिल्लीत असतात. माझ्या वडीलांना सगळं घरदार तात्यांच्या नावाने ओळखायचे. ते देहाने आज आमच्यात नाहीत. तात्यांची अपघातानंतरची दोनेक वर्षे दवाखान्यात अन आजारपणात गेली. त्यांना जाऊन आता दोनेक वर्षे होतील. मी लहानपणा पासून ते आजपर्यंत आईजवळच राहतो. ती माझ्या जगण्याचा आधार ,विचार आहे ! माझा मुलगा मल्हार आता नववीत आहे. त्याला रंगपंचमीची ओढ तशी आताच्या पिढीप्रमाणे कमीच आहे. त्याला जशी समज आली त्या वर्षापासून रंगपंचमीच्या दिवशी तो सकाळपासून घरात टीव्ही बघत वा काहीतरी वाचन करत बसून असतो. चेहऱ्यावर कोरडा रंग लावलेल्या, थोडेफार कपडे ओले झालेल्या अवस्थेतील त्याचे काही मित्र घरासमोर गोळा होऊन त्याला आवाज देतात पण बराच वेळ तो नुसता हाकांना केवळ प्रतिसाद देतो. काही केल्या लवकर बाहेर जात नाही. त्याच्या बहिणीही तशाच बसून असतात, रंग किती वेळ खेळायचा हे ठरवूनच ही भावंडे रंग खेळतात. थोडा वेळ रंग खेळून झालं की पुन्हा अभ्यासाला लागतात किंवा मोबाईलच्या बेगडी विश्वात रममाण होऊन जातात.
रस्त्यावर चित्रविचित्र तोंडे रंगवलेली पोरे आता पूर्वीच्या मानाने कमी झालीत. त्या ऐवजी सोनेरी, चंदेरी वा बीभत्स काळपट रंगाने भीतीदायक क्लेशकारक पद्धतीने तोंड रंगवून काही मुले फिरत असतात. काही ठिकाणी फुग्यात रंग नाहीतर पाणी भरून ते फुगे फेकून मारायची अनिष्ट पद्धत रुळू लागलीय. तर काही ठिकाणी अंडी फोडणे, घाण टाकणे असे गलिच्छ प्रकारही बाळसे धरु लागले आहेत. रंग न खेळता नुसती व्यसनाधीनता अंगीकारणे हा ही एक नवा पायंडा आता पडू पाहतोय. रंगपंचमीच्या निमित्ताने महिलांच्या अंगचटीस जाणे, अर्वाच्च शब्द उच्चारणे, धिंगाणा घालणे अशा कुप्रथांनी या सणाला गालबोट लागू लागलेय. काही ठिकाणी कर्णकर्कश्य आवाजात डॉल्बी साऊंडस लावले जातात त्याच्या तालावर रंग 'उधळले' जातात. आपल्या अशा वागण्याचा इतरांना काही त्रास होतो का याची विचार करण्याची क्षमता जणू काही लोकांनी गमावली आहे. त्यामुळे अनेकजण आजकाल या सणाला बोटे मोडताना आढळून येतात. पूर्वीच्या काळी काही ठिकाणी रंग खेळून झाल्यावर अंगावरचे कपडे फाडून टाकत, तिथला रंग आता ओसरलाय, तिथली मिजास आता उतरणीला लागलीय. गल्लीत आता आधीसारखा टिपाड भरून रंग आता केला जात नाही. आता पूर्वीच्या सारखे मुबलक पाणीही उपलब्ध नसते. सर्वत्र प्यायला पाणी वेळेवर मिळत नाही त्यामुळे पाण्याची ही नासाडी परवडत नाही अन योग्यही नाही, मागच्या दोनेक पिढ्यांनी पाण्याचे नियोजन नीट न केल्याने आताची रंगपंचमी खरोखर कोरडी झालीय, तिच्यात रंगाच्या स्नेहाचा ओलावाही नाही अन निखळ आनंदाचा तो झराही नाही.
रंगपंचमी एक आठवडयावर आली म्हणून आज जरा पुढाकार घ्यायचे ठरवले आणि काही वेळापूर्वी सहज म्हणून माळा उघडून पाहिला अन काळजात धस्स झाले. रंगपंचमीच्या दिवशी सर्वांच्या हातात हसत खेळत रमणाऱ्या लाल पिवळ्या पोपटी नारिंगी रंगाच्या, विविध आकारांच्या काही जुन्या तर काही नव्या पिचकाऱ्या घरातल्या बाथरूमच्या माळ्यावर खिन्न चेहऱ्याने पडून होत्या. लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या, केशरी रंगाचे गच्च भरलेले डबे हिरमुसून कावरे बावरे होऊन बसून होते. एके काळी फक्त गुलाबी रंगच मिळायचा, तेंव्हा इतर रंगांचा फार हेवा वाटायचा. आता सर्व रंगांचे डबे हाताशी असतात पण डब्यांपर्यंत हात जात नाहीत. लपूनछपून रंग कालवण्यासाठी परसदारातल्या बादलीला आता कुणी हळूच उचलून नेत नाही. रंगपंचमी येण्याआधी जशी तयारी केली जायची तशी तयारीही आजकाल केली जात नाही. काळाच्या मुठीतून अलगद निसटून गेलेली रंग 'हरवलेली' रंगपंचमी हळुवारपणे माझ्या डोळ्यातून ओघळत राहिली. ते दिवस हरवत चालल्याची ही चाहूल काळजात काहूर माजवून गेली..
चार वर्षापूर्वी वडील गेले आणि यंदाच्या वर्षी तर आईही नाही. ती गेली आणि आम्हा भावंडांची दुनियाच जणू बेरंग झाली ...….
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा