Saturday, November 19, 2016

सदाबहार 'वक्त' आणि 'आगे भी जाने ना तू'ची रंजक कथा ......'आगे भी जाने ना तू ..' हे गाणं होतं बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’मध्ये. साठीच्या दशकात आलेला वक्त अनेकार्थाने महत्त्वपूर्ण चित्रपट होता. व्यवसायाच्या दृष्टीने तर तो खूप यशस्वी ठरलाच; पण सुनील दत्त, शशी कपूर, राजकुमार, बलराज सहानी, साधना, शर्मिला टागोर, अचला सचदेव अशी मोठी नावे असलेल्या वक्तने मल्टीस्टार चित्रपटांचा ट्रेंडही स्थिर केला. शिवाय काळाच्या तडाख्याने कुटुंबाची ताटातूट होणे आणि त्याच काळाच्या कृपेने कुटुंब पुन्हा एकत्र येणो या जुन्याच फॉर्म्युल्याचेही पुनरुज्जीवन केले. पुढे अनेक वर्षे त्यावर अनेक बरेवाईट चित्रपट येत गेले. पण 'वक्त'चे वेगळेपण तेवढय़ापुरतेच मर्यादित नाही.
नेहरूप्रणीत आधुनिक, समाजवादी आणि उपभोगविरोधी विचारांच्या पार्श्वभूमीवर 'वक्त'ने नशिबाला मुख्य भूमिका देणारे आणि भोगविलासाला अपराधगंड न बाळगता स्वीकारणारे श्रीमंती नाटय़ मांडले. असे चित्रपट यापूर्वी येतच नव्हते असे नाही. पण 'वक्त'ने त्याला मल्टीस्टार प्रतिष्ठा दिली, यश दिले.

'वक्त'मधील ‘आगे भी जाने ना तू, पिछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है’ हे गाणं चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू आहे ! संथ लयीतील पण ठाम सुरातलं हे गाणं खूप प्रेक्षणीयही आहे. 'भूतकाळाला निरर्थक आणि भविष्याला केवळ ओढ ठरवत फक्त वर्तमानातच जगा' असा उच्चरवाने संदेश देते. वर्तमानही अगदी क्षणांच्याच मापाने तोला असेही सांगते. गत व आगामी काळापासून तोडून, कालचक्र नाकारून फक्त वर्तमानावरच विश्वास ठेवणारे आणि वर्तमानाला फक्त क्षणापुरते मर्यादित करून नियतीकडे बघण्याचा, तिचे समर्थन करण्याचा एक नवा दृष्टिकोन ह्या गाण्याने दिला.

गाणे सुरु होतानाच्या दृश्यात एका कमानीमधून चकाकत्या तलम काळ्या साडीमधली, देखणी केशभूषा केलेली मीना(साधना) पार्टीच्या ठिकाणी येते तर तिच्या विरुद्ध दिशेने असणारया कमानीतून काळ्या सूटमध्ये उठून दिसणारा भारदस्त व्यक्तिमत्वाचा राजा (राजकुमार) तिला पाहत उभा असतो. त्याच्या मनात मीनाच्या प्रेमाची ओढ लागून असते. तो चोरून तिला न्याहाळत उभा असताना त्याच्या मागे सिगारेट शिलगावत, धुराची वलये हवेत उडवणारा, चापून चोपून तेलकट केसांचा सरळ रेषेत भांग पाडलेला, सुटाबुटातला, खानदानी अमीर शोभावा अशा व्यक्तिमत्वाचा चिनॉयसेठ (रेहमान) येऊन उभा राहतो. राजाच्या चेहऱ्यावरची प्रेमाची ख़ुशी चिनॉयसेठ ओळखून असतो. मात्र राजाने या विषयावर त्याला काही सांगण्याआधी पार्टीत त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या 'हात की सफाई' वाल्या कामाची तो आठवण करून देतो. 'आधी आपले काम पुरं कर मग तुझे काम कर..' असा मानभावी सल्ला दयायलाही चिनॉयसेठ विसरत नाही. पार्टीच्या या संपूर्ण परिसरात नयनरम्य रोषणाई करण्यात आलेली असते, थुईथुई नाचणारे कारंजे तिथल्या सौंदर्यात भर घालतात, चोरपावलाने दाखल झालेली सांज अधिक गडद होत जाते, आसमंतातून चंद्र जणू इथेच डोकावतोय असे वाटते. उंची वस्त्रे ल्यालेल्या शहरातील सर्व बड्या आसामी तिथं गोळा झालेल्या असतात. विंचवाचे विष झिंगलेल्या देहात हळूहळू भिनत जावे तशी ती पार्टी हळूहळू रंगत चाललेली असते. दरम्यान आत गेलेली मीना तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरण्याबांड देखण्या रवि (सुनील दत्त) जवळ जाऊन त्याच्या हाती आपला हात देऊन उभी राहते. मीना आणि रवि आपसातील प्रेमाची उत्कटता अनुभवत असतानाच त्यांच्या प्रेमाच्या भविष्याबद्दल चिंतित होतात. तेव्हा रवि म्हणतो, "तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझे तुझ्यावर. बस्स, मग बाकी सारे नियतीवर सोड !"

या संवादातील नियतीचा हाच धागा उचलत आशाच्या उंच चढत जाणाऱ्या सुरांमध्ये पार्टी सिंगर गाणे सुरू करते- "आगे भी जाने ना तू.... ‘‘क्षणभंगूर असणारया या जीवनात फक्त चालू क्षणाला महत्त्व दे. तो आकंठ उपभोग. आधी काय झाले ते आता महत्वाचे नाही नंतर काय होईल हे गौण आहे. तेव्हा जो क्षण तुझ्या हातात आहे तोच खरा. तोच पूर्णांशाने जग’’ असा संदेश देणारी अतिशय सुंदर शब्दकळा साहिर लुधियानवीने या गाण्यातून उभी केली आहे.

इतकीच ह्या गाण्याची कथा नाही. राजाला जेंव्हा चिनॉयसेठ त्याच्यावर सोपवलेल्या कामाची आठवण करून देतो तेंव्हा, सराईतपणे राजा पुढे जातो आणि मैफिलीची रोनक असलेल्या प्रिन्सेस (शशिकला) पाशी जातो आणि तिला बॉल डान्ससाठी साथ देण्याची विनंती करतो. पार्टीच्या डान्सफ्लोअरवर ते दोघे येतात, नखशिखांत शुभ्र चमकत्या साडीत असणाऱ्या प्रिन्सेसच्या गळ्यात महागडा हिऱ्यांचा हार असतो. तो हार चिनॉयसेठला राजाकडून लंपास करून हवा असतो. शुभ्रवस्त्रा प्रिन्सेस आणि काळ्या सूटमधला राजा एकमेकाच्या बाहुपाशात स्थिरावतात आणि संथ लयीत नृत्य सुरु होतं. पार्श्वभूमीत आगे भी जाने ना तू चे गिटारमधले ध्वनीतरंग कानी पडतात. दरम्यान इकडे रवी आणि मीना आपसात बोलत असतात. तो तिला विचारतो तुझे जर माझ्यावर प्रेम असेल तर सगळी चिंता सोड आणि प्रेमाचा हा क्षण जग..

संपूर्ण गाण्यात कुठलाही लाऊड साउंड नाही की शे दोनशेचे माकडउड्या मारणारे कोरस बॅकडान्सर नाहीत. हळू हळू गाणं चढत्या स्वराने टिपेला जातं पण संगीत त्याच संथ अन शांत लयीत आहे.
आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू
जो भी है, बस यही एक पल है
अन्जाने सायों का राहों में डेरा है
अन्देखी बाहों ने हम सबको घेरा है
ये पल उजाला है बाक़ी अंधेरा है
ये पल गँवाना न ये पल ही तेरा है
जीनेवाले सोच ले यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू
आगे भी ..

लोक हळूहळू गाण्यावर डोलायला लागतात, पार्टीचा कैफ सर्वांवर खुलू लागतो. पार्टीच्या बाहेरचे जग मात्र भकास आणि समस्यांनी ग्रस्त असते. त्याच उदास जगातल्या लोकांपैकी एक आहे विजय (शशी कपूर). तो चिनॉयसेठच्या गाडीवर ड्रायव्हर असतो. खरे तर ग्रेज्युएशन केलेल्या विजयला चांगली नोकरी हवी असते पण आईच्या कर्करोगाच्या निदानामुळे हाती येईल ती नोकरी पत्करताना त्याने ड्रायव्हरची ड्युटी स्वीकारलेली असते. पार्टीच्या रात्री तो आपल्या मालकाच्या अलिशान कारपाशी पडलेल्या चेहऱ्याने उभा असतो. त्याच्या चेहऱ्यावर आईची चिंता व्यापून असते. गाणं मध्यावर येतं आणि तितक्यात एक माणूस विजयला शोधत तिथे येतो. त्याच्या आईला झटका येऊन तिची प्रकृती अचानक खालावल्याचे तो सांगतो. विजय तत्काळ तिथून घराकडे धाव घेतो. दरम्यान इकडे पार्टीत तपकिरी साडीतली लाजरी बुजरी रेणू (शर्मिला टागोर) दाखल झालेली असते. तिला प्रतिक्षा असते ती फक्त विजयचीच ! तिचे कॉलेज लाईफ पासून त्याच्यावर प्रेम असते पण त्याबद्दल घरी सांगण्याची तिची हिंमत नसते. तोवर घराकडे धाव घेतलेला विजय घरी येऊन पाहतो तर त्याची आई लक्ष्मी (अचला सचदेव) ही अत्यवस्थ झालेली असते. तिला तातडीच्या उपचारांची निकड असल्याचे त्याच्या लक्षात येते. तो पार्टीच्या ठिकाणी परत येतो आणि चिनॉयसेठजवळ जाऊन "आजारी आईला दवाखान्यात नेण्यासाठी काही काळासाठी गाडी मिळेल का ?"असं विचारतो. कुठलेही आढेवेढे न घेता चिनॉयसेठ त्याला गाडी नेण्याची परवानगी देतात. धास्तावलेला विजय गाडी घेऊन तिथून जातो. 

आता पार्टीला पुरता रंग चढलेला असतो. राजा प्रिन्सेसच्या गळ्यात हात घालून नाचत असला तरी त्याच्या कामाचा त्याला विसर पडलेला असतो. त्याचे चित्त स्थिर नसते. कारण राजा जरी मीनावर प्रेम करत असला तरी मीनाचे रविवर प्रेम असल्याचे त्याला कळलेले असते. त्यामुळे पार्टीच्या आदल्या रात्री तो रविची हत्या करायला त्याच्या घरी जातो तर तिथल्या फोटोवरून त्याच्या लक्षात येतं की एकेकाळी आपल्यापासून ताटातूट झालेल्या आपल्या भावंडापैकी एक हा रवीच आहे. त्याला रविशी आपल्या आईवडिलांबद्दल बोलायचे असते पण आपली चोरीची पार्श्वभूमी कळली तर त्याला काय वाटेल या विचाराने तो गप्प बसलेला असतो. पार्टीत नाचताना त्याच्या ह्याच विचारांनी त्याच्या डोक्यात थैमान घातल्यामुळे 'हाताची कमाल' दाखवण्यात त्याला उशीर होऊ लागतो, शेवटी सिगार पाईप ओढणारा चिनॉय सेठ त्याच्या जवळ येऊन थंड नजरेने जणू त्याला रागे भरतो. ठरलेल्या कामाची आठवण करून देतो...इकडे गाणे सुरूच असते...
इस पल की जलवों ने महफ़िल संवारी है
इस पल की गर्मी ने धड़कन उभारी है
इस पल के होने से दुनिया हमारी है
ये पल जो देखो तो सदियों पे वारि है
जीनेवाले सोच ले यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू
आगे भी ...
राजाचा हात प्रिन्सेसच्या मानेभोवती फिरू लागतो, जणू एखाद्या झाडाच्या फांदीशी सापाने चाळवण्या कराव्यात तशी त्याची सलगी सुरु होते...

पार्टी पुढे जारी राहते. फक्त गप्पांनी पोट भरणार नाही तर पोटात काही तरी घालावे लागेल ह्या न्यायाने भूकेलेल्या मीनासाठी पार्टीमधून खाण्याची चीजवस्तू आणावी म्हणून रवि तिथून किचनच्या दिशेने निघून जातो. दरम्यान चिनॉयसेठ पार्टीला आलेल्या पाहुण्याची खातिरदारी करत उभा असतो. तेव्हढ्यात बलबीर हा त्याचा एक हस्तक दारू पिऊन तर्र होऊन झिंगत झिंगत तिथे दाखल होतो. तो इतकी दारू पिलेला असतो की त्याचा तोल जातो आणि थेट चिनॉयसेठला धडकतो. त्यांच्या हातातील पेग त्यांच्या सूटवर सांडतो. सूट खराब होतो. चिनॉय सेठ त्याला रागावतात. तिथून निघून जाण्यास सांगतात. तिथून निघालेला बलबीर बाहेर पडण्याऐवजी डिनरप्लेटस आणावयास गेलेल्या रविची वाट बघत उभ्या असणारया मीनाजवळ जातो. तिची छेड काढण्याचा प्रयत्न करू लागतो. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागतो. दुरून मीनावर लक्ष्य ठेवून असणारा राजा संतापून तिथे येतो. बलबीरला दोन फटके लगावतो. चिडलेला बलबीर राजाला मारण्यासाठी चाकू बाहेर काढतो. राजाची अन बलबीरची भर पार्टीत मोठी झटापट होते. 'मीनाची छेड काढल्याबद्दल त्याचा जीव घेण्यास देखील मागेपुढे पाहणार नाही' असं राजा सर्वाना ओरडून सांगतो अन इकडे गाणे संपते ... 

इस पल के साए में अपना ठिकाना है
इस पल की आगे की हर शय फ़साना है
कल किसने देखा है कल किसने जाना है
इस पल से पाएगा जो तुझको पाना है
जीनेवाले सोच ले यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू
आगे भी ...
पार्टी संपल्यानंतर काही वेळातच बलबीरचा खून झाल्याचे उघड होते. खुनाचा आळ राजावर येतो. राजा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तो पळून जात असताना रस्त्यावर त्याचे वडील लाला केदारनाथ (बलराज साहनी) त्याला पकडतात आणि पोलिसांच्या हवाली करतात. आपण पकडून दिलेला तरुण म्हणजे एकेकाळी आपल्यापासून ताटातूट होऊन दुरावलेला आपलाच मुलगा आहे हे त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नसते. मीनाची इभ्रत वाचवण्यासाठी राजा मध्ये पडल्याचे समजून रवि त्याचा खटला लढतो. तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या विजयचा चिनॉयसेठ या खटल्यात साक्षीदारीचे हत्यार म्हणून वापर करतात. पुढे जबरदस्त कोर्टरूम ड्रामा होतो आणि शेवटी सत्य बाहेर पडते. राजा, रवी, विजय ही तिन्ही मुले लाला आणि लक्ष्मीचीच असतात आणि न्यायालयात शेवटी सगळयांचे मिलन होते. प्रेक्षक आनंदाने थियेटरबाहेर पडतात. 'वक्त'हा ब्लॉकबस्टर मुव्ही ठरला होता... 

रवि यांनी संगीत दिलेल्या 'वक्त'मधील इतरही गाणी गाजली. वयाच्या बंधनातून मोकळे करत सरत्या वयातही रोमॅण्टिक प्रेमाला स्थान देणारे ‘ए मेरी जोहरा जबी’ गाणे तर आजही तितकेच लोकप्रिय आहे. पण या सारयांवर मात करीत लक्षात राहते ते ‘आगे भी जाने ना तू’. एकतर हे गाणे आशाने विलक्षण तन्मयतेने गायले आहे. खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही पट्टय़ांमध्ये लिलया फिरणा:या सुरांतून आशाने या गाण्यातले क्षणभंगुरतेचे आणि उपभोगाचे प्रभावीपण पोहचविले आहे. श्रीमंती पार्टीचा माहोल, उच्चभ्रूंचा वावर, मदन, मदिरा आणि मदिराक्षींचा संगम, वातावरणातील उत्कटता वाढविणारे पाश्चात्त्य पार्टीसंगीत अशा साऱ्या पार्श्वभूमीवर हे गाणे येते. उपदेशवजा, सुभाषितवजा ओळी पेरत हे गाणे ‘यही वक्त है कर ले पुरी आरजू’ हाच संदेश वारंवार देत राहते. विशेष म्हणजे वक्तच्या सहा वर्षे आधी आलेल्या ‘कागज के फूल’मध्ये साहिरनेच ‘वक्त है मेहरबाँ, आरजू है जवाँ, फिक्र कल की करे इतनी फुर्सत कहाँ’ अशा शब्दांत क्षणभंगुर उपभोगामध्ये रमणा:या, भविष्याविषयी बेफिकीर असणा:या मानसिकतेवरही टीका केली होती.

खरे तर सिनेमा हा कल्पनाशक्तीचा उत्कृष्ट आविष्कार असला तरी ती कथाकल्पना वास्तवाच्या पायावर उभी राहणे आवश्यक असते. प्रेक्षकांना, अगदी मुलांनासुद्धा माहीत असते की, आपण जे पडद्यावर पाहत आहोत ते सर्व खोटे व काल्पनिक आहे तरीसुद्धा काही काळ का होईना, प्रेक्षक त्या विश्वात रममाण होतो, त्याला आपले मानतो. हे असेच घडले असेल यावर विश्वास ठेवतो. प्रेक्षकांना असे वाटण्यातच त्या सिनेमाचे यश सामावलेले असते. काळाचा अगाध महिमा दर्शविणाऱ्या ‘वक्त’ची कथा मिर्जानी लिहिली होती. मिर्जाचे फाळणीपूर्वीचे आयुष्य पाकिस्तानच्या सरहद्दीवरच्या क्वेट्टा शहरात गेले होते. त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात 'केदारनाथ अ‍ॅण्ड सन्स' नावाची काप्रेट तयार करणारी मोठी फर्म होती व क्वेट्टाच्या भूकंपाच्या तडाख्यात इतर अनेक कुटुंबांसारखी यांचीही वाताहत झाली होती. पुढे अनेक वर्षांनी, योगायोगाने त्या कुटुंबातील सदस्य परत एकत्र आले होते. या घटनेवरच ‘वक्त’च्या कथेची त्यांनी उभारणी केली होती. चोप्रांचे बालपणही लाहोरला गेले असल्यामुळे, त्यांना या कथाविषयात विलक्षण रुची निर्माण झाली. ‘वक्त’च्या कथेवर बिग मल्टिकास्ट घेऊन, भव्यदिव्य अशा रंगीत चित्रपटाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरविले. ‘वक्त’च्या कथेला त्यांनी कोर्टरूम नाटय़, खुनाचे रहस्य व दैववादाची जोड दिली. पटकथा व संवाद अमजद खानचे सासरे अख्तर उल इमान यांचे होते.

पृथ्वीराज कपूर त्यांचे फार वर्षांपासूनचे मित्र होते. तेव्हा त्यांनाच लाला केदारनाथची मध्यवर्ती भूमिका देऊन, त्यांच्या तीन मुलांना घेऊन ‘वक्त’ची निर्मिती करण्याच्या विचारात चोप्रा होते. यासाठी ते पृथ्वीराजजी व शम्मी कपूरला भेटूनही आले. त्या काळातील नामवंत निर्माते मेहबूब खान, राज कपूर, के. आसिफ, विमल राय, स्वत: चोप्रा धंद्यामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी त्या सर्वामध्ये मित्रत्वाचे संबंध होते. ते नेहमी एकमेकांची मदत, सल्ला घेत असत. त्यामध्ये कधी कुणाला कमीपणा वाटत नसे. त्यांचे विविध विषयांवरचे चित्रपट एकाच वेळी प्रदíशत होऊन सिल्व्हर ज्युबिली साजरी करीत असत. ‘वक्त’ची कथा चोप्रांनी विमल रॉयना वाचून दाखविली होती.

एका सकाळी बिमल रायचा चोप्रांना फोन आला. ‘सुना है आपने, वक्त में लाला केदारनाथ के रोल के लिये पृथ्वीराजजी को लिया है और साथ में उनके तीनों लडम्के भी काम कर रहे हैं. मंने आपकी स्टोरी सुनी है, मुझे नहीं लगता कि दर्शक कभी विश्वास करें कि कपूर बाप-बेटे या भाई-भाई, आमने सामने आने पर एक दुसरे को पहचान नहीं पाते है. ये तो सरासर गलत होगा.’ चोप्रांना आपली चूक ताबडतोब उमगली. त्यांनी बिमल रायचे आभार मानले व पृथ्वीराजजींना हा मुद्दा समजावून सांगितला. त्यांनाही ते पटले. अशा रीतीने कपूर कुटुंबीयांना घेऊन ‘वक्त’ करण्याचे रहित करण्यात आले.

बलराज साहनी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयात चोप्रांचे सहअध्यायी होते. बलराजजी शेवटच्या वर्षांला, तर चोप्रा पहिल्या वर्षांला होते. पुढे अनेक वर्षांनी पंजाब असोसिएशनच्या दिल्लीतील एका कार्यक्रमात त्या दोघांची परत एकत्र गाठ पडली. बलराज साहनींनी हसत हसत विचारले, ‘क्या भाई आज कल आप अच्छी अच्छी फिल्मे बना रहा है. क्या आप अपने कॉलेज के पुराने दोस्त को भूल गये? क्या आपकी पिक्चर में मेरे लिए कोई भी रोल नहीं?’ बलराजजींचा हा प्रश्न ऐकून चोप्रा क्षणभर गांगरले, स्वत:ला सावरत म्हणाले, ‘नहीं, नहीं, ऐसी कोई बात नहीं. कॉलेज में आप मेरे सीनिअर थे और फिल्मों में भी आपने बडी सफलता हासिल की है. मेरे दिल में ये बात जरूर थी, बल्कि मं आपसे अनुरोध करने के लिये कतरता था. क्या आप मेरी ‘वक्त’ फिल्म में लाला केदारनाथ की भूमिका अदा करेंगे?’ बलराज सहानी यांनी खुशीने होकार दिला. चोप्रांनी विचारले, ‘इस भूमिका के लिये आपको कितने पसे देने पडेंगे?’ सहानी म्हणाले, ‘यार तू भी क्या पूछता है? तुझे जो देना है, दे दे. मं तेरी पिक्चर में जरूर काम करूंगा.’ अशा प्रकारे लाला केदारनाथची भूमिका त्यांनी बलराज सहानींना दिली.

राजकुमारला तर चोप्रा तो पोलीस ऑफिसर असल्यापासून ओळखत होते. त्याच्या हट्टी व हेकेखोर स्वभावामुळे त्यांनी ‘धूल का फूल’मध्ये राजकुमार ऐवजी राजेंद्रकुमारला घेतले होते. राजकुमारला आपली चूक उमगल्यामुळे तोही निवळला होता. ‘वक्त’मधील राजाच्या भूमिकेसाठी चोप्रांना राजकुमारच अगदी योग्य वाटत होता. वास्तविक राजाचा रोल करण्याची धर्मेद्रची इच्छा होती. तोही पंजाबातील असल्याने चोप्रांचे नि त्याचे जवळचे संबंध होते. परंतु का कोणास ठाऊक, राजाच्या व्यक्तिरेखेला धर्मेद्र उचित न्याय देऊ शकणार नाही असे चोप्रांना वाटले. त्यांनी आपल्या पुढच्या चित्रपटात, ‘आदमी और इन्सान’मध्ये धर्मेद्रला संधी दिली व राजकुमारची ‘वक्त’साठी निवड केली. सुनील दत्त, शशी कपूरविषयी प्रश्नच नव्हता. त्यांनी पूर्वी बीआरच्या बॅनरखाली काम केले होते. बाकी जीवन, मनमोहन कृष्ण, रहमान, शशिकला वगरे त्यांची जुनीच टीम होती. ‘वक्त’चे निर्देशन त्यांनी आपल्या छोटय़ा भावाकडे - यश चोप्रांकडे - सोपविले व सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी धरम चोप्रांना घेतले. साहिर लुधियानवी व रवी ही जोडी ‘वक्त’मध्येही होती.

‘वक्त’ची जोरात तयारी चालू झाली. एक दिवस सकाळी बी. आर. चोप्रा धरम चोप्रांच्या हातात काही फोटो देत म्हणाले, ‘ये साधना है, इस फोटो में कैसी सुंदर लगती है. अपने पिक्चर में भी वो ऐसी ही लगनी चाहिए.’ (‘मेरे मेहबूब’च्या यशामुळे साधनाचे बरेच नाव झाले होते. ‘वक्त’च्या नायिकेच्या भूमिकेसाठी तिचा विचार सुरू झाला होता.) चोप्रांची ती सूचना ऐकून धरमजी मनातल्या मनात हसले. वास्तविक साधनाचे ते सर्व फोटो धरमजींनीच काढले होते. चोप्रा ‘वक्त’ची निर्मिती करतात हे ऐकल्यावर स्वत: साधना धरमजींना भेटायला आली होती. धरमजींनी तिला नम्रपणे सांगितले, ‘आर्टस्टि का सिलेक्शन तो मेरे बडे भाई बलदेवजी करते हैं. मं तो सिर्फ सिनेमॅटोग्राफर हूं. आप यदि चाहे तो मं आपकी स्क्रीन टेस्ट करा सकता हूं.’ तिने धरमजींकडून फोटो काढून घेतले व तेच फोटो चोप्रांना दाखविले. वास्तविक यापूर्वी धरमजींनी कधीही रंगीत चित्रपट केला नव्हता. त्यांनी चोप्रांना पदोपदी विनवून सांगितले, तुम्ही दुसरा कुणीतरी अनुभवी सिनेमॅटोग्राफर घ्या, मी त्यांचा साहाय्यक बनतो. परंतु चोप्रा त्यांचे काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते म्हणाले, ‘तुला काळाप्रमाणे बदलावे लागेल! कधीतरी तुला रंगीत चित्रपट बनवायचा आहेच ना, मग हाच का नको? ‘वक्त’ची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल’ धरमजींनी ते मुकाटय़ाने मान्य केले.

‘वक्त’च्या प्रत्येक फ्रेममध्ये चोप्रा बंधूंचा परीसस्पर्श जाणवतो. मग ती लाला केदारनाथची जुन्या काळातील, सलवार, कुडता, जाकीट, फेटा व टाय अशी खानदानी, पारंपरिक वेषभूषा असो की ‘राजा’ची एन्ट्री असो. अभिनेता राजकुमारला फिल्मी उद्योगात ‘राजकुमारचा दर्जा’ मिळवून देणारे पहिले निर्माते, निर्देशक कोण असतील तर ते चोप्रा बंधू. ‘वक्त’च्या आधी जवळजवळ दहा वष्रे फिल्मी दुनियेत असूनही राजकुमार कुठेही आपला वेगळा ठसा उमटवू शकला नव्हता. नायिकेबरोबर संवाद बोलताना तो बावरलेला वाटायचा, प्रणयदृश्यात तर तो जोकर वाटायचा, त्याला पडद्यावर नाचताना पाहून डोळे बंद करून घेण्याचा मोह व्हायचा. त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत भूमिका त्याला मिळत गेल्याने कदाचित असे घडत असावे. जसा ‘तुमसा नहीं देखा’मध्ये शम्मीचा झाला, तसा ‘वक्त’मध्ये राजकुमारचा पुनर्जन्म झाला. त्याला आवाजाची नैसर्गिक देणगी होती. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, आवाजाचा योग्य उपयोग करून हीरोचा उपमर्द न होता प्रत्येक फ्रेममध्ये, राजकुमारच्या बेजोड अभिनयाचा ठसाही उमटला पाहिजे हे तंत्र चोप्रांनी ‘वक्त’मध्ये यशस्वीरीत्या राबविले. प्रेक्षकांना बंडखोर व्यक्तिमत्त्व नेहमीच भुरळ पाडीत आले आहे.

'वक्त'मध्ये अनाथाश्रमाचा संचालक (जीवन) छोटय़ा राजाचा अनन्वित छळ करतो. त्याच्या जुलमांनी छोटा राजा दबून न जाता उलटा बेडर बनतो. दुसऱ्याविषयीचा त्याला आदरभाव नष्ट होतो. तो उर्मट बनतो. निर्देशन करताना चोप्रांनी राजकुमारला त्याची व्यक्तिरेखा नीट समजावून सांगितली. ‘तू टेढा आदमी है. आदमी की पहचान उसकी चाल से होती है. टेढे आदमी की चाल भी टेढी होनी चाहिए, मै तुम्हारी अ‍ॅिक्टग नहीं बल्कि चाल पहले देखूंगा. उसमें हमें कॉन्फिडन्स दिखना चाहिए. आप शहर के जानेमाने चिनॉय सेठ से टक्कर ले रहे हो. आपकी पहचान आप के जूतों से होगी.’ सतत एक महिना त्यांनी राजकुमारला चालायला व बोलायला शिकविले व पहिला शॉट त्याच्या नेहमीच्या स्टायलिश सफेद ‘जूत्यांवर’ घेतला.

चित्रपटाच्या यशस्वितेसाठी मागील काही दशकापासू संवादाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. या आधी सलीम-जावेद कथा-पटकथा लिहून एखाद्या स्टारपेक्षाही मोठे झाले. परंतु तसे पाहिले गेल्यास ‘वक्त’नेच सर्वात आधी डायलॉगला इतके महत्त्व प्राप्त करून दिले. राजकुमारचा निधडय़ा छातीचा बेडरपणा, एखाद्या बाणासारखी, समोरच्या सराईत बदमाशाला घायाळ करणारी, खर्जातली संथ आवाजाची, परंतु भेदक शब्दफेक ऐकताना मी मी म्हणणारेसुद्धा थंडगार पडत असत. त्या आवाजामध्ये मग्रुरी, आत्मविश्वास व नसíगक बेडरपणा यांचे विलोभनीय मिश्रण होते.

‘वक्त’मध्ये सुरुवातीलाच चिनॉय सेठ बरोबर त्याचा खटका उडतो. बाजूला त्याचा गुंड साथीदार मदनपुरी उभा असतो. मदनपुरी खिशातून चाकू काढून राजकुमारला धमकाविण्याचा प्रयत्न करतो. (आजच्यासारखा त्या काळी पिस्तुलांचा जमाना नव्हता.) राजकुमार उपरोधिकपणे फक्त हसतो व त्याच्याजवळ जाऊन हातातील उघडा चाकू काढून घेत म्हणतो, ‘ये चाकू है, बच्चों की खेलने की चीज नहीं, हाथ कट जाय तो खून निकल आता है.’ चाकू हवेत उडवितो, एक तुच्छतापूर्वक नेत्रकटाक्ष टाकतो व रुबाबात निघून जातो. दुसऱ्या एका दृश्यात तो चिनॉय सेठला सुनावतो, ‘जिनके अपने घर शीशों के हो वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते.’ पुढे चिनॉय सेठ राजाला खुनाच्या केसमध्ये गुंतवितो. तेव्हा कोर्टात बचावासाठी आता वकील कोण करायचा ते ठरविताना नायिका साधनाला तो सहजगत्या म्हणून जातो, ‘वैसे तो आज तक मं अपनी जिंदगी में जुआ ही खेलते आया हूं, चलो ये एक दांव और सहीं, लेकिन रवी अगर ये मुकदमा जीत जाए तो नामी वकील बन सकता है ना?’ राजकुमारचा या चित्रपटात निगेटिव्ह रोल असूनही या डायलॉगने तो एका रात्रीत हीरो झाला. ‘वक्त’च्या यशात गीत व संगीताचा मोठा वाटा होता.

‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’ फॉम्र्युल्यावर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली असली तरी चोप्रांचा ‘वक्त’ कायमचा स्मरणात राहतो. १९६६ मध्ये ‘वक्त’ला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट निर्देशक यश चोप्रा, साहाय्यक अभिनेता राजकुमार, कथा एफ. ए. मिर्जा असे तीन मानाचे पुरस्कार मिळाले. 'वक्त'च्या शेवटच्या सीनमध्ये सगळी मुख्य स्टारकास्ट पडद्यावर दिसते आणि त्यांच्या मागे असणारया दुकानावर लाला केदारनाथ अ‍ॅण्ड सन्स असा बोर्ड झळकताना दिसतो. तिथला संवाद फार रंजक आहे.
लाला - आज फिर से लाला केदारनाथ पहले की तरह खडा हुआ.
राजा - ये तो कुछ भी नहीं पिताजी, आगे देखिए हम तीनों भाई इसे क्या आलिशान बना देते हैं.
लाला - ऐसे नहीं कहना बेटे! वक्त बडी चीज है! वक्त ही सबकुछ है! वही बनाता है, वही बिगाडता है. एक बार मंने भी ऐसे ही कहा था! ‘वक्त’ने वो तमाचा मारा मेरे मुंहपर, सब तिनका तिनका करके बिखेर दिया. आज उन्हीं तिनकों को इकट्टा करके मं अपनी नयी जिंदगी शुरू कर रहा हूं.
राजा - ठीक है पिताजी!
लाला - अरे लक्ष्मी! (पत्नीला उद्देशून) देख अपना मुन्ना कैसा गबरू जवान बन गया है. (सर्वजण खळखळून हसतात) भगवान ने मुझेसे जो लिया था, सूद समेत वापस दिया. बेटों के साथ बहुएं भी दे दी !'..... ग्रुपची फोटोफ्रेम स्थिर होत जाते आणि पडद्यावर ‘दि एण्ड’ची अक्षरे येतात. त्यानंतर इट्स बी. आर. चोप्रा फिल्म्स प्रॉडक्शन अशी अक्षरे झळकतात जी आपल्या मनावर एम्बॉसड होऊन जातात....

अजूनही कोणत्याही वाहिनीवर 'वक्त' लागला की हातातील कामे बाजूला सारून मी त्या गोल्डन एराच्या मास्टरपीस सिनेमाचा मनसोक्त आनंद घेतो. कारण ह्यामुळे दरवेळेस वर्तमानात जगण्याची नवी उर्मी मिळत राहते....

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment