
प्रत्येकाच्या आठवणींना अनेक मुलामे असतात, अनेक कंगोरे असतात. नानाविध घटना आणि घटकांशी त्या निगडीत असतात. आठवणी जशा सुखाच्या दुःखाच्या असतात तशा विविध चवीच्याही असतात. म्हणूनच संभाषणात म्हटले जाते की. आठवणी या कधी कडूगोड असतात तर कधी आंबटगोड असतात. आंबट आठवणींचा विषय निघावा अन त्यात चिंचेचा उल्लेख होत नसावा असे कुठे घडत नाही. या आंबट आठवणी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते प्रेमाच्या आंबटगोड शेवटापर्यंत मनात झिलमिलत असतात. पूर्वी रेडीओवर ‘मधुचंद्र’ चित्रपटातील एक गाणं नेहमी लागायचे त्यात चिंचेच्या झाडाचा वेगळाच उल्लेख होता. “हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नवतरुणी काश्मिरी बघ निळसर पाणी..” अशा काहीशा त्या पंक्ती होत्या. त्यातला नायक सांगतो की हे चिंचेचे झाड त्याला चक्क चिनार वृक्षासारखे दिसते आणि त्यामुळे त्या झाडाखाली उभी असलेली त्याची प्रियतमा ही एखाद्या काश्मिरी नवतरुणीसारखी दिसते आहे.. चिंचेच्या झाडाचे चिनार वृक्षाशी असणारे साधर्म्य याहून देखण्या शब्दात व्यक्त झालेले नाही. असो..