Wednesday, September 21, 2016

मला उमगलेला 'मराठयांचा मूकमोर्चा'....


शिवरायांना बाह्य शत्रूंनी जितका त्रास दिला तितकाच त्रास अंतर्गत शत्रूंनी दिला. भाऊबंदकीच्या शापाने शिवरायांनाही त्रास झाला आणि संभाजीराजांना त्याची अधिक झळ पोहोचली. इतिहासावर चिंतन करताना हा मुद्दा अनेक वेळा माझ्यासारख्या अनेक शिवप्रेमींचा मानसिक छळ करतो. शिवछत्रपतींनी अनेक वेळा आपल्या नातलगांना, आप्तेष्टांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भाऊबंदकी मिटावी म्हणून प्रयत्न केला, पण वैरभाव संपला नाही. सर्वच शिवप्रेमींना या गोष्टीची खंत वाटते की आपला समाज राजांच्या हाकेस ओ देऊन एकीने का सामोरा गेला नाही. आज हे परिवर्तन घडत्येय. निमित्त कोपर्डीच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे झाले आहे. त्यातून लाखोंच्या मनात खदखदणारा असंतोष म्हणा वा माझ्यासारख्या सामान्य माणसासारख्यांची ही जुनी नासूर होऊन छळणारी खंत बाहेर पडते आहे. जे काम शिवरायांच्या काळात होऊ शकले नाही ते आज होतेय असे होत असताना निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन बसणे योग्य वाटत नाही. कारण एकीकडे खंत व्यक्त करायची की मराठे कधीच एकत्र येत नाहीत, मराठे एकमेकाला सदैव पाण्यात बघतात, मराठे म्हणजे एकमेकाच्या अंगावर चढणारे खेकडे आहेत म्हणून हिणवायचे आणि प्रत्यक्ष अशी एकत्रित होण्याची पहिलीच ऐतिहासिक वेळ आल्यानंतर त्यातील दोष शोधत बसणे हा दुटप्पीपणा ठरतो.आपसात बोलताना किंवा नातलगात मिरवताना 'अकरामाशी' वा 'बारामाशी' किंवा 'शहाण्णव कुळी' म्हणून एकमेकाला हिणवणारा हा समाज गेली कित्येक शतके खोटया जहागिरदारीच्या भ्रमात वावरत गेला आणि तळाशी असणारा समाजबांधव अधिक रसातळाला जात गेला. या मोर्च्यात जाणारे पिचलेले चेहरे आणि खंगलेले देह बघितले की कोणीही सांगेल की हा अल्पभूधारक शेतकरी आहे. एकमेकाला मदत न करणारा, सदैव वैरभाव जोपासणारा मराठा या प्रतिमेतून या समाजाचे मोठे नुकसान होत गेले. आज हे सगळे लोक कुळांचे आणि तथाकथित 'तोळ्या माशांचे' भेदभाव बाजूला ठेवून हे लोक एकत्र येताहेत ही बदलाची नांदी आहे. लग्न जुळवताना नात्यांतून 'पदर लागतो का पहा' असं सांगणारा ग्रामीण भागातला मराठा या निमित्ताने का होईना एकत्र येतोय आणि त्याच्या मनातली एकमेकाविषयीची अढी दूर होण्यास यातून सुरुवात तरी होईल अशी आशा या मोर्च्याच्या निमित्ताने दृष्टीपथात आली आहे.

मोठ्या प्रमाणात मोर्च्यात सामील होणारा महिलावर्ग आपल्या भाऊबंदासोबत जेंव्हा रस्त्या रस्त्यातून चालत जातो तेंव्हा महिलांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवण्याची मानसिकता त्यातून तयार होऊ शकते. शिवाय स्वतःला  एकटे समजून आपल्यावरील अन्याय अत्याचार सहन करणारया महिलांना आपल्या पाठीशी इतक्या मोठ्या संख्येने समाजबांधव उभे राहतात या गोष्टीने उभारी येईल. 'आपल्या सोबत इतके लोक आहेत आपण एकटे नाही' ही जाणीव किती समाधानकारक असते याचा अंदाज घ्यायचा असेल तर 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे'ची अनुभूती घ्यावी लागते. वर्षानुवर्षे ग्रामीण असो वा शहरी असो महिलांवर अत्याचार झाल्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांचा कल वेगळाच असतो- 'लोक काय म्हणतील', 'समाज काय म्हणेल', 'भावकी काय म्हणेल', 'आपल्या पाठीशी कोणी आहे का ?', 'मग मिटवून टाकू' किंवा 'थोडंसं गप्प राहू' या विचारांकडे त्यांचा कल असतो. झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकडे फारसा कल नसतो. या मोर्च्याने महिलांमध्ये आणि सर्वच कुटुंबात ते धारिष्ट्य येण्याची सुरुवात होईल. शिवाय महिलांकडे वाईट नजरांनी बघणारया अपराधी तत्वांना जरब बसवण्यास काही अंशी का होईना सुरुवात होईल. महिलांच्या आत्मविश्वासास पूरक अशा या ऐतिहासिक एकत्रीकरणासाठी एका निष्पाप कळीला अमानुषपणे अकाली खुरडले जावे लागले ही बाब येथे नजरेआड करून चालणार नाही. 


मराठा शेतमजूर आणि कष्टकरी वर्ग जो आजवर नागवला गेला. ज्याचे भयंकर शोषण झाले. ज्याला ठाऊक आहे की, 'आजवरच्या काळात सर्वच राज्यकर्ते आपल्याला फसवत गेले आपल्याला जातीच्या प्रलोभनाच्या आधारे मत मागत गेले आणि त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांना आपण भुलत गेलो. आपल्याला कोणी त्राता नाही' हे त्याने आज ताडले आहे म्हणूनच तो आज रस्त्यावर उतरला आहे. यामुळेच की काय या मोर्च्याच्या मागे अमुक एक राजकीय पक्ष, संघटना वा राजकीय व्यक्ती आहे हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. भलेमोठे राजकीय प्रकांडपंडित देखील यात डोकावून पाहताहेत आणि आपापला अंदाज बांधून ते ज्यांच्या दावणीला बांधलेले असतात त्याप्रमाणे पोपटपंची करून आपला पोकळ अंदाज व्यक्त करताना आढळून येताहेत. सकल समाज बांधव जो आजवर अनेक खोट्या भ्रमात होता की आपणच सत्तधारी आहोत त्याने आज ओळखले आहे की, 'आपल्यापैकी काही मुठभर लोक पुढे गेले आपण आधी होतो तिथेच आहोत.' कित्येक दशकांपासून निद्रिस्त असलेल्या या समाजात ही जागृती येणे आणि त्या अनुषंगाने त्याचे एकत्र येणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. 


लोकांनी पदरमोड करून मोठा निधी उभा करून काढलेले लाखोंच्या संख्येचे हे मोर्चे त्यांच्या मनातली धग जाणवून देतात. जो समाज आपसातच कुणी 'अरे' म्हटले की निमिषार्धात त्याला 'कारे' म्हणतो तो समाज इतक्या शांततेने एकत्र येतोय ही देखील एक अनोखी घटना आहे. कारण भडक डोक्याचे, संतापाने सरकलेले, गुढघ्यात मेंदू असलेले, क्रोधिष्ट अशी मराठा समाजाची प्रतिमा आजही आहे. त्या समजाला आज आरपार छेद देणारा सर्वव्यापक बदल घडत असताना त्याकडे बघ्याच्या दृष्टीकोनातून पाहणे खचितच योग्य नव्हे. समाजमनाची ठेवण बदलण्यास सुरुवात करणारा हा मोर्चा या अर्थाने मला जास्त क्रांतिकारी वाटतो. कारण 'बांधावरच्या भांडणापायी आपल्या आप्तेष्टांचा बळी घेणारा मराठा'च लोकांना माहिती आहे, पंचवीस लाखांवर लोकं जमूनही खाली मान घालून चालणारा मराठा लोकांना पहिल्यांदाच पहायला मिळतोय हा अमुलाग्र बदल क्रांतीच्या बीजांची पेरणी नव्हे का ?


मराठयांची देवस्थाने असो लग्नकार्ये असो एक अजागळपणा, बेशिस्तपणा आणि अस्वच्छता यांचा त्यातून प्रत्यय येत राहतो. या मोर्च्याच्या निमित्ताने शिस्त, शांतता आणि स्वच्छता याचे पाठ हा समाज जगाला घालून देतोय ही नवलाची बाब आहे. या बाबी मराठयांच्या अंगी रुजल्या तर त्यांच्या सार्वजनिक जीवनात देखील मोठे बदल घडू शकतील. हा मोर्चा झाला की लगेच अनेक स्तरांवर क्रांतिकारी बदल घडतील आणि मराठा लगेच बदलून जाईल असे मी म्हणत नाही. कारण या गोष्टी वैयक्तिक सामाजिक व प्रादेशिक स्थित्यंतराच्या आहेत त्या एका रात्रीतून घडणारया नाहीत. मात्र त्यांची कधी कुठेच सुरुवात झाली नव्हती ती या मोर्च्याच्या निमित्ताने होते आहे. हा बदल चांगलाच आहे. 


या मोर्च्यात आजवर कुठलीही नुकसानी वा हानी झालेली नाही. आजवरचे मोर्चे पाहता भविष्यातील मोर्चे देखील शांततेतच पार पडतील असा अंदाज व्यक्तवण्यास कुणा ज्योतिष्याची गरज पडणार नाही. 'या आधी मी अनेक हिंसक मोर्चे आंदोलनात भाग घेतला होता. आजच्या मोर्च्यात जाण्याबद्दल मी जितका विचार करतोय तेंव्हाच्या मोर्च्यात जाताना तितकाच विचार केला होता का ?' हा प्रश्न मोर्च्यात जाऊ का नको अशी शंका असणारया प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावा त्याला उत्तर सकारात्मकच मिळेल. ज्या मोर्च्यांनी कुठलेही नुकसान हानी न होता अनेक लहान मोठे बदल एका निद्रिस्त समाजात घडायला सुरुवात होणार आहे, त्या मोर्च्यात सामील झाल्याने राज्याचे, देशाचे कुठले नुकसान होणार नसेल तर त्यात सामील व्हायला हरकत नसावी.  


मोर्च्यातील अनेक मागण्या संसद व न्याययंत्रणेशी संलग्न आहेत, काही मागण्या न पटणारया आहेत. काही मागण्या एकाच बाजूने योग्य वाटतात. तर एखादी दुसरी मागणी पूर्णतः पटते देखील. यातील काही मागण्या मनाला पटणारया नाहीत या गोष्टीची खंत मोर्च्यातून सुरु होणारया सकारात्मक बदलांच्या व्याप्तीपुढे थिटी पडते. मागणी योग्य का अयोग्य याचा अर्थ लावत बसण्याच्या नादात मराठा समाजातील क्रांतीकारी बदलांची नांदी ठरणारा आणि ज्या गोष्टीची शिवकालापासून प्रतीक्षा होती ती गोष्ट समोर घडत असताना त्यात सामील न होणे मला तर तर्कसुसंगत वाटत नाही. शिवाय हा मोर्चा कोणा एका जात धर्माविरुद्धही नाही असे असताना त्याला विविध कसोटया लावून त्याची अतिचिकित्सा करत बसणे सुज्ञता नव्हे. सकल मराठा समाजाच्या मोर्च्यात गेल्याने माझे काही मित्र मला जातीयवादी म्हणाले तरी मला फरक पडणार नाही कारण समाजात इतक्या मोठ्या परिवर्तनीय घटकांची लाट आलेली असताना त्यांचे मनोबल वाढवणे मी माझे कर्तव्य समजतो. शिवाय मी कसा आहे आणि माझ्या राजकीय, सामाजिक भूमिका काय आहेत याची धारणा पक्की आहे. ज्यांचा माझ्यावर विश्वास असेल ते माझ्या विचारांवर विश्वास ठेवतील. ज्यांना आज माझे विचार पटत नाहीत त्यांना ते नंतर तरी पटतील. 


राजकीय,सामाजिक आणि वैयक्तिक बदल गावपातळीच्या मराठयापासून ते महानगरातल्या मराठयापर्यंत हळूहळू जेंव्हा घडत जातील तेंव्हा या मोर्च्याचे फलित आणखी उत्तम वाटेल. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे' असे संतांनी सांगितलेले आहे.  शिवाय आज ज्यांना माझे म्हणणे पटत नसेल त्यांना नंतर कालमानानुसार ते सुसंगत आणि योग्य वाटेल म्हणून मी सकल मराठा समाजाच्या मोर्च्यात सामील होणार आहे. लाखोंच्या मराठयांच्या सुनामीतून त्यांच्या मनात दडलेले असंतोष, त्यांचे पिचलेले दुःख, त्यांच्या व्यथा यांचे काही थेंब जमलेच तर मनात साठवून ठेवणार आहे...

- समीर गायकवाड.