शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

शुक्रतारा - मंगेश पाडगावकर


'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडूनआठवते बालपण जेव्हां होतो मी खेळत
होतो बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवते अजूनहि होतो रंगत मी किती !
पण अकस्मात होतो जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून.........

घर असूनहि आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावे ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून...'

सर्वांच्या मनामनात एक अवखळ, निष्पाप निरागस असं शैशव दडून बसलेलं असतं, प्रत्येकाला अखेरपर्यंत ते जाणवतं मात्र ते कधी व्यक्त करता येत नाही. जनमानसाच्या मनातील भावनांच्या प्रकटीकरणाचं हे काम कवी मंडळी करतात. सर्वच कवींना हे जमतं असं नाही. काही कवी ते वैयक्तिक अनुभव म्हणून मांडतात मग तो त्यांच्यापुरता मर्यादित होऊन जातो. मात्र अद्वितीय प्रतिभा लाभलेला एखादा कवी अगदी सहजतेने, उत्कटतेने अशा काही शैलीत हा अक्षरगंध रेखाटतो की त्या भावना वैयक्तिक कवीपुरत्या सीमित न राहता सर्वंकष स्वरूप धारण करतात. ते काव्य वाचताच रसिक उद्गारतात की नेमके माझ्या मनातले भावच कवींनी मांडले आहेत. ही किमया करतानाच जर त्या कवींनी बालकवितांपासून प्रेमकविता, गूढकविता, निसर्गकविता, सामाजिक आशयाच्या कविता, बडबडगीते, विरहगीते, चित्रपटगीते, भावगीते अशा सर्व प्रकारचे विपुल काव्यलेखनातून एक अलौकिक श्रेष्ठ दर्जाची साहित्यनिर्मिती केली असेल तर त्या कवीला कविश्रेष्ठच म्हटले पाहिजे. कवी मंगेश पाडगावकर यांचे नाव यामुळेच मराठी साहित्यात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे.

पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात एक जिप्सी लपून बसलेला असतो. मानवी जीवनात बालपणीचे विश्व मोठेपणी राहत नाही. ती निरागसता, सालसता आणि अवखळपणा वय वाढेल तसतसा कमी होत जातो. काळाच्या ओघात माणूस ते निष्पाप, हळवे भावविश्व हरवून बसतो. शाळेतले रम्य दिवस मागे पडतात. पंतोजी पद्धतीच्या वरवर कठोर वाटणाऱ्या पण आतून मायाळू असणाऱ्या शिक्षकांपासून ते शाळेच्या खिडकीतून दिसणाऱ्या खारूताई पर्यंतच्या सर्व गोष्टी मनाच्या कोपऱ्यात जतन असतात.
‘घर असूनही आता घर राहिलेले नाही चार भिंतीची जिप्सीला ओढ राहिलेली नाही’ असं सांगताना ते पुढे लिहितात की, सुस्थिरपणाची घडी विस्कटावी हा गतजन्माच्या कर्मांचा शाप असावा ज्यामुळे इप्सित साध्य होत नाही. जे आधी होते ते पुढे राहत नाही, कुठूनही पळून गेले तरी कर्म पिच्छा सोडत नाही. अशा वेळेस मनाच्या खोल कप्प्यात दडून राहिलेला जिप्सी साद घालत राहतो आणि जगणे सुकर होते. जिप्सी या शब्दाचा अत्यंत चपखल असा प्रतिमालंकार म्हणून पाडगावकरांनी कवितेत बेमालूमपणे वापर केला आहे. त्यामुळे एका वेगळ्याच उंचीवर ही कविता जाते. या कवितेला पाच दशके उलटून गेलीत मात्र आजही त्यातला आशय आणि मांडणी प्रफुल्लित आहे कारण त्यातले काव्यविचार आणि सहजता. पुढे जाऊन ही कविता पाडगावकरांची ओळख बनून गेली.

आपल्या आयुष्यभरात आपली सोबत करणारा हा जिप्सी पाडगावकरांनी अगदी आस्थेने जतन करून ठेवल्याचे त्यांच्या समग्र कवितात जाणवत राहते. किंबहुना जिप्सीचे विचारस्वातंत्र्य, विविधता आणि संपन्नता त्यांच्या कवितांची प्रेरणा बनून राहिली असावी असे त्यांचे काव्य वाचताना ठायी ठायी जाणवत राहते. या जिप्सीच्या आधारे ते जीवनाचा शोध घेतात. आयुष्य जगताना अंतर्मनाच्या नंतर सर्वात जास्त महत्वाची ठरतात ती व्यक्तीची नाती. ह्या नात्यांवर ते अगदी मार्मिक भाष्य करतात. ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्यामुळे आपण हे विश्व बघू शकलो त्यांची सोबत देखील कितीही वर्षांची असली तरी ती दोन दिसाची वाटते. त्यांच्यानंतर त्यांच्या पाठीमागे उरतात त्या केवळ स्मृती, ज्याच्या आधारे आपण जगत राहतो.

'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ...'
सुधीर फडके यांच्या जादुई आवाजात हे गीत यशवंत देव यांनी स्वरबद्ध करून घेतले आणि मंगेश पाडगावकर हे भावगीताच्या विश्वातील एक बिनीचे कवी म्हणून नावारूपास आले, इतकी लोकप्रियता या गीतास मिळाली. विशेष म्हणजे या गीताचे शब्द, चाल आणि गायन याची जादू अशी आहे की सुरांच्या आधाराविना केवळ गद्यवाचन पद्धतीने वाचलं वा ऐकलं तर त्यातले मर्म पूर्णतः उलगडत नाही.

नात्यांमध्ये आई वडिलांच्या नंतर येते ते प्रेमाचे नाते. आपला कलिजा खलास करणाऱ्या बालांविषयी ते अगदी लडिवाळपणे लिहून जातात आणि आपण अगदी ठेका धरून ते गाऊ लागतो -
'जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌
बघणार्या माणसाच्या जिवाचे हाल्‌ !
लाडाने वळून बघायची खोड्‌
नाजूक नखर्याबला नाही या तोड्‌
डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल्‌ !'

इतके करूनही आपण शेवटी फसतो आणि तिच्यासाठी स्तुतीसुमने उधळू लागतो. तिच्यावर आसक्त झालेले आपले मन तिलाच रिझवू लागते...
'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
स्वप्नासत गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे...' अशी समजूत ते पुढे घालतात.

माणूस प्रेमात आकंठ बुडून जातो नी मग त्याला तिचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडू लागतात. हे भाव पाडगावकर अगदी सार्थपणे व्यक्तवत लिहितात.
'जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा माझा न राहतो मी हरवून हा किनारा
आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी !'

एकदाचे दोहोंचे मनोमिलन होते आणि मग भेटीगाठींचा सिलसिला सुरु होतो. प्रेमाच्या भेटी होताना निसर्ग देखील त्यांच्या प्रेमात बुडून जातो आणि शुक्रतारा मंद वारा असं अप्रतिम गाणं कवी त्याच्यासाठी लिहून जातात. कवितेच्या शेवटी लडिवाळ आर्जवही करतात की, तू अशी जवळी रहा !!
'शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्नद वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा...'

या भेटी गाठी वाढत जातात. प्रेमाच्या आणाभाका घेताना ते एकमेकात गुंफत जातात.
'तु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
अन मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे'
सुकुमार नवथर देखण्या शब्दात ते प्रियकराचे गहिरे भाव मांडतात.

खरे तर त्याच्या प्रियतमेची अवस्थाही फार काही वेगळी नसते. जेंव्हा त्यांच्या भेटी राहून जातात तेंव्हा अथांग रात्रीच्या आकाशात दिसणारा चंद्र पाहून तिला आपल्या सजनाचे नसणे जाणवत राहते. 'जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे..' असं लाघवी वर्णन पाडगावकर करतात.

प्रेमाची ही भावना कुणा एकाच्याच मनात नसून ती प्रत्येकाच्या मनात असते हे सांगताना पाडगावकरांनी लिहिलेल्या पंक्ती अप्रतिम आहेत...
'नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो…
तिच्या चेहऱ्याला चन्द्र म्हणण्याची त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही त्याने जिद्द सोडलेली नसते...'

पण हे प्रेम कधी कधी एकतर्फीच राहून जाते आणि त्यातून मग येते ती सांजवेळेची मनाची लपाछपी. मग कधी अश्रू गाली येतात काही कळतच नाही कारण उरलेला असतो तो केवळ भासांचा खेळ !
'मी फुले ही वेचताना सांज झाली, दूर रानातून त्याची हाक आली.......
टाकुनी सारी फुले ही धावले मी, चांदण्याचा थेंब माझ्या एक गाली'

याहीपुढे जाऊन कधी कधी प्रेमात त्याग करावा लागतो आणि त्यासाठी आधारही द्यावा लागतो, सावरावे लागते. या उत्कट भावना व्यक्त करणारी हृद्य कविता पाडगावकरांनी लिहिली आहे -
'सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला ?'

एव्हढे सारे प्रेमाचे आर्जव गाऊनही शेवटी विभक्त होण्याची वेळ आली तर काळजावर पत्थर ठेऊन हसत हसत म्हणावे लागते की,
'तू कुठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे
गीत माझे घेउनी जा, प्राण माझा त्यात आहे..'

यातून मग प्रेमाचेच नव्हे तर आयुष्याचे डाव मोडतात. हे अधुरे राहिलेले डाव जीवनाच्या सारीपाटावर जसेच्या तसे मांडणे अशक्य होऊन बसते. हे सांगताना पाडगावकरांनी लिहिलेली विराणी अजरामर होऊन गेलीय.
'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी....
वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी.

मग पुढे राहतात त्या आठवणी. मग त्या भेटींच्या आठवणी काढून आयुष्य कंठावे लागते..
'भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची…'

प्रेमात आयुष्य घालवून हाती काही लागत नाही तेंव्हा कुठे काय चुकले याचा ठोकताळा मांडताना पाडगावकर जे लिहितात ते मनाला खोलवर भिडणारं आहे.
'अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती..'

जीवनात केवळ प्रेम आणि उपदेश यांना महत्व दिले म्हणजे तो संत होत नाही असंही ते एका कवितेत सुचवतात. अगदी सहजतेने ते लिहितात की
'भाषेच्या चर्हा्टाला कधीही अंत नसतो !
सारखी बडबड करणारा चुकूनही संत नसतो !'

'दार उघड दार उघड चिऊताई...' जुन्या चिऊताईची नव्या युगातल्या चिमणीत स्थित्यंतर करून तिची गाणीदेखील अगदी सहजतेने मंगेश पाडगावकरांनी लिहिली आहेत.
'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?' असा अवखळ प्रश्न विचारणारे त्यांचे बालगीत जवळजवळ प्रत्येकाने आपल्या बालपणी गायलेले असतेच.
'कोंबडीच्यां अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू ;
अगदी होतं छोटं आणि उंचीलाही टिल्लूब !' असं अल्लड बडबडगीतही ते लीलया लिहितात.
'चांदोमामा, चांदोमामा..... भागलास काय ?
घरचा अभ्यास केलास काय ?
चांदोमामा, चांदोमामा..... लपलास काय ?'
त्यांचे हे गाणे तर प्रत्येक बालमनावर असं काही कोरलेले आहे की ते कधीच पुसले जाऊ शकणार नाही.
पूर्वी आपल्या तान्हुल्याला झोपी लावताना माय माऊली ज्या अंगाईचा आसरा घेत असे त्यात पाडगावकरांचीही अंगाई अगदी प्रसिद्ध होती.
'नीज माझ्या नंदलाला,
नंदलाला रे झोपल्या गोठ्यात गाई .....'

जन्माला येताना ईश्वराने दिलेले खूप काही असते आपणच करंटे असतो की ते घेण्यासाठी आपले हात कमी पडतात अन ओंजळी रित्या ठरतात. असं ते सहज लिहितात,
'दान तुझे हे घेण्यासाठी फुटल्यावाचुन हात कुठे ?
या भरलेल्या रित्या ओंजळीत हिरवा हिरवा जन्म फुटे...'

आयुष्य सरताना प्रत्येकजण आपल्या जोडीदाराप्रती हळवा होतो याचे नेमके वर्णन ते करतात,
'डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी'

म्हणून जीवनातलं चैतन्य अनुभवत असतानाच जर निसर्गाचा आनंद घेतला तर अंतर्यामीचा सूर नक्की गवसतो असा आशावाद ते आरसपानी शब्दात व्यक्त करतात.
'श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा.....
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा'

जीवनात कितीही अंधार झाला तरी अंतर्यामी प्रज्वलित असणारी ज्योती तेवती ठेवली की विश्वनियंत्याचा आशीर्वाद मिळून प्रकाशाची पहाट उजाडेल असं ते लिहितात,
'आज सारें भय सरे उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल आतां उजाडेल !'

सारं काही आलबेल असूनही कधी कधी मनासारखे काहीच घडत नाही त्यावर प्रश्नचिन्ह लावताना ते अगदी मार्मिक प्रश्न विचारतात की,
'सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत ?
तुम्हीचं ठरवा !
पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं !
पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीचं ठरवा ! '

अशा गोंधळलेल्या प्रसंगी कामी येते ती ईश्वराची निस्सीम भक्ती, ती देखील पाडगावकरांनी सहज व्यक्त केली आहे.
'भावभोळ्या भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी
काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी !'

पण नुसतेच देव देव करूनही चालत नाही तर त्यासाठी अंतर्मनातला सदाचाराचा आणि सदविवेकबुद्धीचा ईश्वर आधी जागृत ठेवला पाहिजे असंही ते रोखठोकपणे बजावतात -
'कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी....
अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी.'

ज्ञानेश्वरांचे पसायदान हे जगासाठी ईश्वराकडे केलेलं एक मागणं म्हणून जसे विश्वविख्यात आहे तद्वत पाडगावकरांची ही कविता म्हणजे मराठी मातीतल्या जीवनमरणाचे निर्मिकाकडे मागितलेले एक दान आहे. ही मनीषा आहे प्रत्येक मराठी माणसाची ! या कवितेला आणि तिच्यातल्या आशयाला तोड नाही..
'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या ओठांनी चुंबुन घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे....'

अशा या कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांचेही देवाकडे एक मागणे आहे की,
'तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे !'
मराठी साहित्यातील व्यापक, विविधांगी, आशयघन आणि आखीव रेखीव साहित्यकृतींचे निर्मिक असलेले मंगेश पाडगावकर आजही रसिकांच्या मनात अढळस्थानावर विराजमान झालेले दिसतात.

कवी मंगेश पाडगावकरांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन ‘एम.ए’ झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्षे महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काम केले होते. १९५३ ते १९५५ ही दोन वर्षे पाडगावकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम केले. मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले. युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस - युसीस येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर १९८९ मध्ये ते निवृत्त झाले. ६० आणि ७० च्या दशकात पाडगावकर, ‘ज्ञानपीठ’ विजेते कवी विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी झाले. पाडगावकर यांनी लिहिलेली ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ ही गाणीही खूप गाजली. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविताही विशेष गाजली होती.

‘धारानृत्य’हा पाडगावकर यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात पाडगावकर यांच्या कवितेवर ज्येष्ठ कवीवर्य बा. भ. बोरकर यांचा ठसा होता. नंतर त्यांनी भावकाव्य शैलीत आणि स्वतंत्रपणे काव्यलेखन सुरु केले. ‘जिप्सी’ (१९५२), ‘छोरी’ (१९५४), ‘उत्सव’ (१९६२), ‘विदुषक’ (१९६६), ‘सलाम’ (१९७८), ‘गझल’ (१९८३), ‘भटके पक्षी’ (१९८४), ‘बोलगाणी’ (१९९०) हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

पाडगावकर यांनी ‘गझल’, ‘विदुषक’, ‘सलाम’ या काव्यसंग्रहातून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता केली. सत्तेच्या संपर्कात राहणाऱ्या वर्गातील लोकांनी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील माणसांचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांमध्ये आलेली लाचारी, दांभिकता याबद्दल पाडगावकर यांच्या मनात संताप होता तो या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला. १९६० नंतरच्या वास्तवावर भेदकपणे प्रकाश टाकणारी पाडगावकर यांची कविता नवसमृद्ध वर्गाची, त्याच्या संवेदनाहिन मनाची चिरफाड करुन वाचकांना अंतर्मुख करते.

१९५३ मध्ये पाडगावकर यांचा ‘निंबोणीच्या झाडामागे’हा ललितलेख निबंधसंग्रह प्रकाशित झाला होता. ‘बोरकरांची कविता’, ‘विंदा करंदीकर यांची निवडक कविता’ हे त्यांनी संपादित केलेले काही महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. ‘जिप्सी’, ‘छोरी’, ‘उत्सव’ या काव्यसंग्रहातील कवितांमधू्न दिसणारा निसर्ग व प्रेम त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या सारख्या भावगीतांमधून अधिक तरलपणे व्यक्त झाला होता. काही वर्षांपूर्वी पाडगावकर यांनी ’बायबल’ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता.

‘बोलगाणी’ हा पाडगावकर यांनी काव्यरचनेवर केलेला एक वेगळा प्रयोग आहे. मीरा, कबीर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवादही पाडगावकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले होते. पाडगावकर यांनी ‘भोलानाथ, ‘बबलगम’, ‘चांदोमामा’ हे त्यांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
१९६४ मध्ये प्रकाशित झालेला ‘वात्रटिका’हा त्यांचा कवितासंग्रह पाडगावकर यांची एक वेगळी ओळख करुन देणारा ठरला आहे. ‘सलाम’ या काव्यसंग्रहासाठी १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार त्यांना मिळाले होते.

कवी मंगेश पाडगावकरांविषयी व्यक्त व्हायला सांगितलं तर प्रत्येक मराठी रसिक - वाचक पाडगावकरांच्याच शब्दात म्हणेल की -
'इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला !
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला ! '

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा