शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

गावाकडचे दिवस ....भावार्थ रामायण .



गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरु असले की अजूनही काही दृश्ये हमखास जशीच्या तशी नजरेस पडतातच. गावातले वातावरण या काळात संपूर्णतः भारलेले असे असते. रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गस्थ सुखच असे. बत्तीच्या उजेडात थोड्याशा उशीरपर्यंत चालणारया या श्रवण सोहळ्याचे अनेक क्षण मनावर कोरलेले अगदी जसेच्या तसे आहेत.
पारायणात रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे याना स्फुरण चढायचे.


दशरथाकडून श्रावण बाळाला बाण लागून तो घायाळ झाल्यावर यांच्याच डोळ्याला अश्रूच्या धारा लागायच्या, तो अध्याय सुरु व्हायच्या वेळेस एखादी भाबडी म्हातारी प्रवचकाला सांगायची, 'महाराज, तेव्हढं दशरथ राजाला बाण नीट चालवायला सांगा आपल्या श्रावण बाळाला बाण लागून तो जखमी होईल !"

कैकेयीला वर देताना गावातल्या आयाबाया ओठाला पदर लावून बारीक आवाजात पुटपुटायच्या, "बाईने शब्द मागितला तर त्येचा वापर नीट करावा अन गड्याने बी अशा शिंदळकीला कशाला शब्द द्यावा गं बाई ?"
सीतेच्या जन्माची कहाणी ऐकताना बळीराजा भान हरपून जात असे, त्याला वाटायचे न जाणो आपल्या जमिनीत नांगरताना आपल्या नांगराच्या फाळाला अशीच एखादी सोनेरी पेटी थडकेल ! तो त्या काळात नांगर जपूनच चालवायचा!
'जनक राजा लई भाग्यवान त्याला मातीने पोरगी दिली'… अशी चर्चा म्हातारे कोतारे तोंडात तंबाखूचा बार भरत पारावर बसून करत.

"कौशल्या अन सुमित्रा बघा कशा भणीवाणी राहत्येत, सवती सवती असून एक्काच घरात एका ताटात सोन्याचा घास खाऊन गुण्या गोविदाने राहत्येत, अन तुमी जावा-जावा असून देकील कस जल्माचं दुश्मन असल्यागत राह्ताव, अग बायानू जरा सुदरा की ! रामायण काय म्हणतय ध्येन दिऊन ऐका !" असा उपदेश घराघरातल्या सासवा आपल्या सूनांना करायच्या. त्यांना वाटायचे की कौशल्या अन सुमित्रा या सवती असूनही एकाच ताटात जेवतात मग आपल्या सूना का भांडतात ? त्या काळी एका एका घरात तीन ते सात आठ सुना असायच्या त्यावरून या उपदेशकर्त्या सासूची मानसिकता लक्षात कशी होती ते कळायचे.
सीता स्वयंवर काळात गावातल्या तरण्या पोराना उधाण आलेलें असायचे, गावातली जाणती माणसे या पोराना म्हणायची, 'अरे तुमच्या काय बरगड्या मोजून घ्यायच्या का रे ? जरा दुध दुभते खात जावा, जरा पोटाला बघत जावा, थोडी तालीम लावा ! नाय तर असल्या मरतुकड्याला कोण जावई करून घेणार ? " विशेष म्हणजे हा ‘वजनदार’ सल्ला धडधाकट पोरानाही दिला जायचा अन बरयाचवेळा सल्ला देणारे मात्र काबाडकष्ट करून पार थकून माकून गेलेले अस्थिपंजर देहाचे असत.


मंथरेने कैकेयीचे कान भरायला सुरुवात केल्यावर बायांच्या तोंडाचा पट्टा चालू व्ह्यायचा मग कळायचं की, आपल्या गावातल्या बाया दिकून भारी श्या देत्यात…कैकेयीला दिलेला वर पूर्ण करताना सगळा गाव असा विचारमग्न वाटायचा. त्यानंतर यायचा तो रामाला वनवासाला जाण्याचा दिवस ! या दिवसांत सगळीकडे अस्वस्थता दिसून येई. जाणत्यांचे कामात ध्यान नसे अन बायकांचे स्वयंपाकात ! सगळ्यांची एकमेकावर चीडचीड चाले. चिल्लर पोरांवर राग निघे. 

रामवनवास जेंव्हा चालू व्हायचा तेंव्हा गावातली काही जाणती मंडळी अन तरणी पोरेठोरे अंगावर पोत्याचे कपडे घालून अन पायाला पायताण न घालता किंवा पायाला पोत्याचे तुकडे गुंडाळून गावाबाहेर जायची. ही गावकरी मंडळीही वनवासाला जायची ! अगदी रामासारखीच जायची, वृत्तीही तीच अन हेतूही तोच असायचा. यात बडेजाव आणि मिरवून घेण्याला वावच नसे. रामाला वनवासाला जावे लागले त्याचे प्रतिकात्मक प्रायश्चित्त म्हणून गावातील भाविक वृत्तीची साधी भोळी निरलस माणसे चौदा दिवसाच्या वनवासाला जायची. खरे तर रामाला चौदा वर्षे वनवासाला जावे लागले म्हणून आपणही चौदा दिवस वनवासाला जायचे ही कल्पनाच अभूतपूर्व अशा सौहार्दतेची अन सृजनशीलतेची आहे…

गावातल्या ज्या ज्या घरातली माणसे वनवासाला जायची केवळ त्याच घरातली नव्हे तर अख्खा गाव वेशीजवळ येऊन त्याना निरोप द्यायचा. या लवाजम्यात एक वीणेकरी अन बाकीचे सर्व टाळकरी असत. पोतडयात निघालेला हा रामभक्तांचा जथ्था साऱ्या रस्त्याने मुखाने जय जय राम कृष्ण हरी चा घोष करत निघायचा. चौदा दिवसाच्या यांच्या या वनवासात वाटेत लागणारी वाड्या, वस्त्या अन गावतली मंडळी त्यांचे पाय धुवायचे अन त्याना हारफुले अर्पण करायचे.

दरम्यान इकडे गावात दशरथ राजाचा मृत्यू ऐकताना म्हातारे कोतारे कासावीस झालेले असत. नंतर मात्र ज्याच्या त्याच्या मुखात भरताचे नाव झालेले. कुणाच्या घरी जमीनीवरून, बांधावरून, झाडाझुडपांवरून, वाटणीवरून वाद सुरु असला की आजूबाजूचे पिकल्या पानाच्या गतीतले म्हातारे तिथल्या जाणत्या माणसाना बोलायचे. "अरे एक एकरापायी भावाच्या जीवावर उठू नगासा, बांधाला बांध लागला म्हणून जीव घ्येयाला मरू नका ! भरतराजाने कसं आपलं समद राज्य रामाच्या पादुका ठेवून केलं ! जरा शिका त्येच्याकडनं !" त्यांचं बोलणं ऐकून आपसात भांडत बसणाऱ्यांची बोलती बंद होई. त्या काळी वडीलधारयांचा तितका धाकच होता ही देखील एक बाजू आहे.

पारायणाचे पुढचे दिवस अगदी तीव्रगतीने जायचे. खरे तर रोज किती पानं वाचायची हे ठरलेले असे. अन त्याबरहुकूमच हे वाचन होई. पण घटना वेगाने घडल्या की वाचन वेगाने झाल्यासारखे वाटे म्हणूनच या काळातले पारायण गतिमान भासे. बघता बघता लक्ष्मण शक्तीचा दिवस यायचा. त्या दिवसापर्यंत बहुत करून गाव सोडून बाहेर वनवासाला गेलेले गावकरी तेंव्हा गावात परत यायचे. वनवाशांच्या या परतीमुळे गावाला उधाण आलेले असायचे. गावात महाप्रसादाची तयारी शिगेला गेलेली असे. कोणी गहू देई, तर कुणी गूळ तर कुणी जळण तर कुणी रोकड देई. बघता बघता स्वयंपाकाचा घमघमाट वाऱ्यावरून गावातल्या प्रत्येक गल्लीत पोहोचता होई. एक मोठी काहिली भरून खीर केलेली असायची. सगळ्या गावाला जेवण असायचे. हे खरे गावजेवण असे कारण त्या दिवशी कुणाच्याच घरी चूल पेटलेली नसे. त्या रात्री गाव अखंड जागा असायचा.

घायाळ झालेल्या लक्ष्मणाला बरं करण्यासाठी मारुतीराया संजीवनी वनस्पती आणण्यासाठी समुद्रापार निघायचा पण नेमकी वनस्पती न कळल्याने तो द्रोणागिरीचा अख्खा पर्वतच उचलून आणायचा हे ऐकताना अंगावर रोमांच यायचे. लहान पोरे तर आनंदाने उड्या मारायची अन 'बजरंगबली की जय'चा घोष अधून मधून होत रहायचा.

दिवस असेच जात रहायचे अन लंकाधिपती दशानन रावणाचा वध करून राम अयोध्येत परत आले की गावाला पुन्हा नवा हुरूप यायचा.
सीतामाई अयोध्या सोडून जाताना बायका हुंदके देऊन रडायच्या अन डोळे पुसत पुसत एकमेकींना म्हणायच्या, ' बाईच्या जल्माचा वनवास कधीच संपत नाही गं बायानो ! जल्माचे भोग आहेत हे समदे, ते आपल्यालाबी भोगलेच पाहिजेत !"

पुढे लवकुशाची कहाणी ऐकताना लेकुरवाळया बायका हरखून जायच्या. 'आपल्या गावात बी कंदीतरी वाल्मिकीरुषि यील पर पोरांनू तुमी अब्यास नीट मन लावून करा' हे बोल ऐकताना खरेच वाल्मिकी ऋषिच्या आश्रमात शिकत असल्यागत वाटायचे. लवकुश अयोध्येत परत आले की लोक खुश व्हायचे. आता सगळं सुखात होणार असं नेहमी वाटायचं पण सीतामाई जमिनीत परत जाताना ऐकताना अख्ख्या गावाच्या जीवाला हुरहूर लागायची, बायका तर हुंदके हमसून हमसून रडायच्या. काहींना तर सांगावं लागायचं की आता बस्स, पुरं करा बायांनो. न्हाईतर वाचायचंच थांबतंय बघा. पारायण अर्ध झालं तर गावाचं नाव वंगाळ हुईल. तवा गुमान बसा. मग त्या भोळ्याभाबड्या बायका मुकाट बसायच्या.

रामायणाचे पारायण पूर्ण झाल्यावर गावातले वातावरण खूप उदास वाटायचे, देवळाजवळून जाताना तर आपले काही तरी हरवले आहे असा भास व्हायचा. गावात रोज सकाळी निघणारी रामटाळी बंद झाल्यावर तर सकाळी सकाळी अवसान गेल्यासारखे वाटायचे.
दिवस असेच निघून जायचे पण देवळाच्या पांढऱ्या भिंतीवरची ओबड धोबड अक्षरे डोक्यात घर करून असत. मुळच्या ठळक अक्षरातली ती सूचना नंतर ऊन पावसाने वाऱ्या वावदानाने फिकट होऊन गेलेली असे. मात्र स्मृतीच्या मोहोळातले रामायणाचे मधुबिंदू त्यांना पाहताच तरतरीत होत असत. 
देवळाच्या भिंतीवर लिहिलेले असे -
"गावात भावार्थ रामायण चालू आहे, वेशीजवळ आणि देवळाजवळ पायात वाहणे घालू नयेत. जय श्रीराम " !
आज जरी अशी सूचना कुठल्याही गावातल्या देवळातल्या भिंतीवर वाचायला मिळाली की हवाहवासा वाटणारा स्मृतींचा कल्लोळ मनात होतो, ज्यात मी नखशिखांत चिंब होऊन जातो.

रामायण हा गावाकडच्या माणसांचा जगण्याचा आधार होता आणि आहे, म्हणूनच ग्रामीण भागातली कौटुंबिक आणि सामाजिक जडणघडण अजूनपर्यंत टिकून आहे असे आजही वाटते.

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा