बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

नावाची 'जन्म'कथा.....



घटना फार जुनी नाही. माझ्या एका मित्राला मुलगी झाली अन त्याने विचारले की माझ्या चिमुकल्या डिअर डॉटरसाठी काही नाव सुचवशील का ?
मी काहीच बोललो नाही मात्र थोडा विचारात पडलो. थोडा मागे भूतकाळात गेलो ….
खरे तर आजकालची नावे काहीशी क्लिष्ट, अगम्य, दुर्बोध तर असतातच पण त्यातलं मराठीपण हरवत चालले आहे. शिवाय भावंडांना हाक मारण्यासाठी दादा, ताई, अक्का, जिजी, माई, भाऊ अशी संबोधनेही वेगाने लोप पावताना दिसताहेत. आईबाबांच्या ऐवजी मॉम डयाडची ब्याद कमी होती की काय म्हणून ड्यूड, ब्रो, सिस, बेबी याचं फॅड सगळीकडे वाढलंय ! या आंग्लाळलेल्या संबोधनात भर घालण्याचे काम प्रेमीयुगुलंही नेटाने करताहेत. वानगीदाखल बोलायचे झाले तर काही मुली दिवसभरातून (चार वेगवेगळ्या) मित्रांना माझं पिलू, माझं कोकरू असल्या नावाने आळवत असतात. तर मुलंही मागे नसतात तेही अनेकींना एकाच वेळी सनम, जानम, जानू, पाखरू अशा नावांनी आळवत असतात. सखी आणि मित्रही हरवले आहेत. तिथे रुक्ष फ्रेंड आलेय.

कधीकधी तर हे शब्दही गिळले जातात आणि त्याऐवजी भावनादर्शक उद्गार येतात. उदा. सोशल मिडीयात काही जण कॉमेंटमध्ये म्हशीने आमुणे खाताना किंवा वासराला बघून ओरडावे तसे हम्म्मां म्हणून स्टेट्स टाकतात. तर काहींना इंग्रजी बोलण्याची अगदी तुफान माइंड ब्लोइंग क्रेझ (!) असते. देहबोलीतल्या अंगविक्षेपात चाळयातही कालानुरूप बदल घडू लागलेत. पायाच्या अंगठयाने माती टोकरणे आता बंद झालेय. आजूबाजूला बघत, इतरांचे लक्ष वेधून घेत 'ही माझी कझिन युएस वरून आलीय, ती आल्वेज एब्रोडला असते' असं काही नवयौवना लडिवाळपणे सांगत असतात. याच वेळी त्या आपल्या कपाळावर येऊ घातलेल्या बटा तीनदा हळूच मागं सारल्यासारखं करत राहतात. काही मुली असे चाळे मुद्दाम करत राहतात तेंव्हा त्यांची फार दया येते अन त्यांना एखादी गंजलेली का असेना पण हेअरपिन द्यावीशी वाटते, नाही तर तिला सांगावे वाटते की, 'बाई गं हे केस पुढेच राहू देत ना ! का उगाच फुकाचा चाळा करत्येस ?' तिचं ते केस मागे पुढे करणे त्या एब्रोडच्या कझिनऐवजी आजूबाजूला उभ्या असणा-या नव्या कोऱ्या पिलुसाठी सुरु असते हे वेगळे सांगायची गरज नाही…

हे सर्व लिहिण्यामागचा हेतू हा की आपण आता मॉड झालो आहोत हे अनेकांना जगाला दाखवायचे असते, जुनं तकलादू बिगरस्टाईलचं कळा खाणारं शेळपट जिणं आजकाल बऱ्याच जणांना पचनी पडत नाही. आधुनिक होतना जुन्याची कास न सोडता त्याची योग्य गुंफण घालण्याची कला आपण जाणीवपूर्वक विसरून जात आहोत…. असो..
हां तर आपण बोलत होतो मुलीच्या नावाबद्दल… गावाकडं एखाद्या घरात मुलगी जन्माला आली तर सुरुवातीला बहुत करून त्या घरात नुकतेच निवर्तलेल्या एखाद्या वैकुंठवासी स्त्रीच्या नावानेच तिला हाक मारली जाते.
"कुठं गेल्ता वो धोंडाबाई, आमाला सोडून कसं राह्यला वो बया ?" असं म्हणत त्या मुलीला आपल्या मांडीवर खेळवणारया धोंडाबाईच्या सुनेने प्रत्यक्षात धोंडाबाई 'गेल्या'वर सुटकेचा निश्वास सोडलेला असे. कारण धोंडाबाई आपल्या सुनेला एक मिनिटसुद्धा निवांत बसू देत नसायची, सुनेला घाण्याच्या बैलासारखं सतत कामाला जुपलेले असायचे. समजा धोंडाबाईची आठवण काढणारी तिची मुलगी असली की तिच्या भावना वेगळ्याच असत. ती म्हणे, " आवं धोंडाई, लेकीचा संसार बघाया आलाव का ? आता आरामात ऱ्हावा हिथं, बरं का गं माझी माय गं तू !" मुलगा जन्मलेला असेल तर धोंडाबाईच्या ऐवजी एखादे हरीनाना अवतीर्ण झालेले असत.
समजा त्या बाळाला मांडीवर घेऊन बसलेली शेजारची एखादी सुंदराबाई असली की ती अगदी खोचक बोलणार ! ती बरोबर काडी घालून जाणारच.
"आता पुन्ना सुनंला कामाला जुपाया आलाव का वं ? आता जरा बारीक दळून घ्या ! खिखि खिखि… " असं म्हणत आपलं बोळकं आवरत ती सुंदराबाई हळूच निघून जाई.

नात्यातले दुसरे कुणी बाळाला बघायला आले की वेगळीच चर्चा सुरु होई. 'प्वार आईवर गेलीय का बा वर गेलीय याची.' कुणी काय म्हणे तर कुणी काय म्हणे, कुणी 'चुलत्यावर गेली' असं सांगे तर कुणी म्हणे 'मावळणीवर गेली' ! तर कुणी, वर गेलेल्या एखाद्या शकुंतलाबाईचा सादमूद नग पुन्हा अवतरल्याची भाबडी आशा व्यक्त करे. त्या मुलीच्या चेहऱ्यात कुणाला काय दिसेल याचा नेम नसे. एखादी भोचक बाई सांगे, "शालन तुझी प्वार लई भारी बग, आपली पारावरची अंबाबाईच बग !"असं म्हटलं की शालनची जागेवरच दातखिळी बसावी कारण गावातल्या पारावरची अंबाबाई कुणाला धरती तर कुणाला सोडत्यी म्हणून गावभर बभ्रा झालेली देवी !

असं करता करता अखेर जास्तीत जास्त माणसं जिचे किंवा ज्याचे नाव घेत त्याप्रमाणे मुलगी त्याच्यावर वा तिच्यावर गेली या मुद्द्यावर शिक्कामोर्तब होई. मग सुरु होई तिच्या बारशाची तयारी. शक्यतो या काळापर्यंत बाळंत आई अन तिचं अपत्य माहेरीच असत. दवाखान्यात तिचं बाळंतपण झालेलं असले की सगळी रिकामटेकडी काका, काकी, मामा, मामी, मावशी, आत्या, दोन्हीकडचे आजी आजोबा, शेजार पाजारचे लोक, जवळचे नातलग दवाखान्यातच भेटून येत. भेटायला येणाऱ्यात एखादी का होईना चवचाल भामाबाई आलेली असे. इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर हळूच मानेला झटके देत, पदराचा कोपरा तोंडाशी लावत ती अगदी ठसक्यात सांगे, "आमच्या इमलच्या दुसऱ्या डिलोरीला तुमचं कोण बी आलं नवतं, पण मी म्हटलं जावू दे बापडीचं, आपण आप्ला धर्म पाळायचा ! म्हणूनशान आले बगा !" मग पुढे हिच्या इमल उर्फ विमल हिची किती बाळंतपणे झाली अन त्याला कोण आलं अन कोण आलं न्हाई याची साग्रसंगीत चर्चा होई. अर्थातच ही चर्चा अगदी दबक्या आवाजात काही तरी सिक्रेट शेअर केल्याच्या अविर्भावात होई. दोनेक तास तिथं बसल्यानंतर भामाबाईच्या चर्चेचा शेवट असा झालेला असे की, 'इमलचा नवरा आता काडीमोड करून दुसरीकडे राहतो पण इमलने डाव साधून घर आपल्या ताब्यात ठेवलंय. अन आता दुसरा नवरा करून ती पुन्हा गरोदर आहे. निदान तेंव्हाच्या टायमाला तरी समद्यांनी इमलला भेटायला दवाखान्यात यायचे !'

बाळ - बाळंतीण दवाखान्यात असतानाच बाळाचा 'कर्तबगार' बाप तिला बघायला दवाखान्यात येऊन जाई. जन्मलेली पहिली मुलगी असेल तर तिथं उपस्थित असलेला कुणी तरी आगंतुक अगदी खेटराने मारल्याच्या अविर्भावातच कुचकेपणाने हसत त्याला ऐकवे, 'पहिली बेटी धनाची पेटी ! मग काय जावईबापू, बर्फी कधी वाटणार ?'
दुसऱ्यांदा जन्मलेलीही मुलगी असली की "दुसरी बेटी तूप रोटी' असं तो उद्गारे. पण हे सांगताना त्याच्या तोंडावरचे भाव सात जन्माच्या उपाशी माणसासारखे असत. आजकाल जावई नव्या विचाराचा असला की तो अशा फुकट चंबू बाबुरावला चांगलेच सोलून काढतो. मग तो साळसूद मग हळूच म्हणतो की, "आता मुले काय किंव्वा मुली काय सगळं सारखंच वो ! आमचंच बग्घा की आम्हाला चार पोरं. पण आम्ही राहतो लेकीकडे !" हे सांगताना मात्र त्या गृहस्थांचा चेहरा केविलवाणा झालेला असतो.

चिमुकलीचे बाबा, काका, आजोबा तिला बघून गेल्यावर ती आईसोबत काही दिवस आजोळी राहते. आणि तिच्या बारशाची तयारी जोर धरते. तारीख पक्की होते. सगळीकडे सांगावे धाडले जातात. दारात मंडप पडतो. सडासंमार्जन होते, रांगोळ्या काढल्या जातात. पाळणा फुलांनी सजवला जातो अन गावाकडच्या माझ्या माय भगिनी त्यांच्या ओबडधोबड स्वरात अत्यंत मन लावून गाऊ लागतात - 'पहिल्या दिवशी पहिला प्रकार' इथून जे बारशाचे गाणे सुरु होते ते बाराव्या दिवसाच्या आख्यानापर्यंत हे पाळणा गीत चालते. बारा बायका एकेक करून हे गीत गातात अन गाणाऱ्या स्त्रीच्या मागे बाकीच्या कोरसमध्ये गातात. त्याचवेळी स्वयंपाकाचा वास पुरुष मंडळींचा जीव अगदी कासावीस करून टाकत असतो. इकडे कुणी सीता घ्या कुणी कौसल्या द्या किंवा कुणी राधा घ्या - कुणी यश्वदा द्या हे सुरु झालेलं असते. एव्हाना त्या चिमुकलीचा जीव अक्षरशः कापूस झालेला असतो.

शहरी वातावरणात वाढलेल्या एखाद्या नवविचाराच्या आधुनिक नारीने जर हे सोपस्कार थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न तिच्याच अंगाशी येतो अन जगबुडी झाल्यागत अनेक बायका तिच्यावर तुटून पडतात. यावेळी झडणारे संवाद अगदी खुमासदार असतात. सांगयचेच झाले तर,
"कोण गं ती फोडावणी ? लई टेगार मिरवती जणू ! चार बुकं शिकली म्हून काय जालं ? तिला काय धावकान्यातच बिगर बारशाचं नाव ठिवलं होतं का?"
"आपल्या म्हवनची ही पुण्यातली भैन (बाळीचे वडील मोहन यांच्या त्या भगिनी असतात), सदानकदा नाकानं कांदं सोलत्ये जणू !"
"म्हानंदा हिचं नाव, सारखं म्हायेरात पडून असती मनं, आदीच नांदायचा कटाळा अन त्यात म्हायेरचा सांगावा ! त्येच्याने मशीन बिगडलंय" (मशीन बिगडलंय हे सांगताना त्या बाईने अर्थातच डोक्याला हात लावून स्क्रू ढील्ला असल्याची खुण केलेली असते !)
"बरी जिरव्लीस, नाचणगौरी सारखी हिकडून तिकडं उड्या मारत होती, लई मिरवत हुती, जणू हीलाच हळद लागायची !"हा संवाद झडताना तिथल्या सर्व भगिनींच्या चेहरयावर अलौकिक तृप्तता असे.


अखेर बायकांचा हा कालवा ऐकून कुणी तरी थोराड माणूस इंजिन तापावं तसं गरम होऊन पुढे येई आणि म्हणे "आरं आवला की बायानो, का उगा त्या माईकात कन्हाया कुथाया लागलायसा ? कान कावलं की लोकास्निचं ?" त्यानं असं म्हणताच गाणाऱ्या बायका तोंडात येसुर गेल्यागत हाश्श हुश्श करत एकदाच्या बाजूला सरकत.
बेगीनं बाळाची आत्या पुढे येई अन पाळण्यापाशी वाकून ती बाळाच्या कानात तिचे नाव सांगे. यावेळी आत्याचा रुबाब पाहण्याजोगा असे, त्याचबरोबर तिची एखादी जुनी मागणी असली तर ती देखील रेटून न्यायची नामी संधी ती खुबीने वापरून घेई ! आत्याने बाळाच्या कानात कुर्रर आवाज करत नाव सांगितले की जमलेल्या समवयीन बायका त्या आत्याबाईच्या पाठीवर चांगले धबुके घालीत. मग प्रश्न विचारला जाई, "आत्याबाई काय नाव ठेवलं भाचीचं !"

मग आत्या अगदी भाव खात नाव सांगे. जमलेल्या बायका एकमेकात कुजबुजत, 'नाव छान हाये', 'आमच्या छबीच्या नंदेच्या चुलतबहिणीच्या दुसऱ्या पोरीचे हेच नाव हाये जणू', 'आजकाल काय बी वंगाळ नावं ठिवत्येत बाई' (डोक्यावरचा पदर घट्ट हातात धरून हे वाक्य बोलणारया भागीरथी आज्जीच्या तोंडाचे पार बोळके झालेलं असे, त्या अगदी तोऱ्यात हे बोलत), 'यमे तुझ्या पोरीचे नाव बापाच्या नावापास्न सुरु झालं की गं, आन ती तुज्यापेक्षा वरचढ होणार बघ !' (सौ. यमुना ही त्या बालिकेची आई अन तिच्या पतीचे नाव मोहन असं होतं तर त्याच्या आद्याक्षरापासून सुरु झालेलं पण यमुनेला वरचढ ठरणारं नाव होतं मंदाकिनी), 'पोरीची आत्या जरा आगावच दिसत्ये, तिने मुद्दामशान हे नाव ठिवलं, आपल्या भावजयीला बरोबर खाली वढलं !'.

मुलीचे नाव ठेवून झालं की सोयीनुसार त्याच दिवशी किंवा दोनेक दिवसात यमुना आपल्या मंदाकिनीला घेऊन आपल्या घरी रवाना होई. इकडे तिचे आजोळ सुने होई. तिची आजी, म्हणजे यमुनाची आई डोळ्याला पदर लावत म्हणे - "माजी यमुना लई गुणी पोर. पांडुरंगा तिला सासरी सुखात ठेव रे बाबा !' तिनं असं म्हणून मुळूमुळू रडू लागताच यमुनेचे वडील म्हणत -"अगं आपली पोर सुखातच हाये. तू सुनेला पोरीसारखी जप्त्येस ना ? मग देव तुज्या पोरीला का मून छळल बरं !"

इकडे यमुना तिच्या सासरी आल्यावर आई वडिलांनी किंवा तिच्या भावाने, वाहिनीने सुचवलेल्या एखाद्या गोड नावाने तिला हाका मारायला सुरवात करे. वैजयंता, वंदना, चंद्रभागा, भीमा, कृष्णा. कावेरी असलंच काही ते नाव असे. अन या कृष्णा कावेरीचे वडील जे नाव ठरवत ते तिच्या शाळेच्या दाखल्यावर येई. शिवाय घरात लाडाने आमची छकुली, सोनुली, बाहुली, चिमणी असं अवीट गोडीचं मस्त नाव तिला असे.

आजकाल कुणाला वेळ नाहीये त्यामुळे लोकांनी आपल्या सोयीसाठी हे सोहळे आऊउटडेटेड करून टाकलेत. पूर्वी नकोशा, दगडाबाई, धोंडाबाई, काळाई, कडूबाई अशी वाईटसाईट चुकीची नावे ठेवली जायची त्याची कारणेही तशी पुरुषप्रधान गुलामगिरीच्या मानसिकतेची होती. पण आता तो काळ मागे पडतोय. मात्र आपण खूप मॉड आहोत हे दाखवण्याच्या अट्टाहासापायी कसलीही चित्रविचित्र नावे ठेवलेली दिसून येतात. शेवटी ज्यांची मुले असतात त्यांचाच तो अधिकार असतो. नावात काय असतं असं म्हणणारया शेक्सपिअरला माझ्या मराठीची आणि तिच्यातल्या अमृताहून गोड नावांची माहिती असती तर त्याने हे वाक्य कदाचित लिहिले नसते…….

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा