शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

कवितेचे बंड - ज्योती लांजेवार


‘घर काळोखात उभे
आत तान्हुला रडतो
देह सजवी माऊली
पान्हा चोळीत गळतो’
स्त्रियांचे नेहमीच शोषण होत गेले पण स्त्रियांनी त्यामुळे आपला स्त्रीत्वाचा धर्म कधीही सोडला नाही. स्त्रियांनी आपल्या अंगभूत कर्तव्यांशी कधी बेईमानी केली नाही, प्रसंगी शील विकले पण आपल्या कर्तव्यांना त्या सन्मुख राहिल्या. मनाला स्पर्श करणाऱ्या मोजक्याच पण हळव्या शब्दात स्त्रीत्वाचे दुःख आणि स्त्रीची कर्तव्य सापेक्षता या कवितेत समोर येते. कवयित्री प्रा. डॉं.ज्योती लांजेवार यांची ही कविता.

"स्त्रियांना संरक्षण तीस टक्के आरक्षण
एक क्रांतिकारी पाऊल आहे-
भ्रष्टाचाराच्या जंगलात चोरांची चाहूल आहे. .... "
आपलं म्हणणं मांडताना ते थेट लक्ष्यावर घाव घालणारे मर्मभेदी असलं पाहिजे याची पुरेपूर जाणीव कवयित्री लांजेवार यांना आहे. दलितांच्या आरक्षणाबद्दल आणि हक्काबद्दल तर अगदी आक्रमक व अभ्यासू पद्धतीने त्या आपले म्हणणे मांडतातच. खेरीज महिलांच्या हक्काबद्दलही त्या सजग आहेत. स्त्रीत्वाचा हुंकार त्या गर्जनेच्या स्वरुपात देतात, त्यात उपेक्षित भिक्षुकीच्या छटा न येऊ देता आपला मुलभूत हक्काचा रेटा उतरवतात. स्त्रियांच्या आरक्षणाची जी काही टक्केवारी आहे त्यावर भाष्य करताना या तरतुदीतून निर्माण झालेल्या समस्येवर त्या अचूक बोट ठेवतात. स्त्रियांच्या आरक्षणाची ही योजना निश्चितच क्रांतिकारी आहे हे मान्य करून त्यातली उणीव पुढच्याच पंक्तीत अधोरेखित करतात. कारण या स्त्री आरक्षणाच्या आडून पुरुषच पत्ते पिसतात आणि त्यातून सोयीस्कर लोकांची वर्णी हव्या त्या जागी लावून भ्रष्टाचाराची नवी कुरणे निर्माण करतात.

"हे आवाज कसले येत आहेत ?
पाण्यातले मासे तर रडत नाहीत
की लाटांनीच हुंदका दिला ?.....
....चांदण्याच्या शोधात.
हलणाऱ्या पाण्यासोबत हलणारे मन
उगाच पेटते आहे.
चल ! बुडुन जाऊ
या समोरच्या पाण्यात."
'दिशा' कवितासंग्रहामधील या कवितेत ज्योती लांजेवार आपल्या मनात चाललेलं द्वंद्वयुद्ध विलक्षण रूपक वापरून आपल्यासमोर मांडतात. त्यांची घालमेल इथे स्पष्ट जाणवते. आपण लढू शकत नसलो तर असं लाचारीचे जिणे जगू शकत नाही, प्रसंगी आपण यात बुडून जाऊ असं इथे सुचवले आहे.

'माझ्या अस्तित्वाचं मढं पेटून
राख झालंय केंव्हाच ;
या अमानुषांच्या वस्तीत
आणि मला बर्बाद करून
ही हवाही पालटली आहे त्यांच्याच दिशेनं,
आता चिवचिवणारी सकाळ
माझ्यासाठी उगवतच नाही,
रात्रभर ऐकत असते मी
कावळे ओरडण्याचा आवाज,
रात्रीच्या भयाण शांततेत बघते
भुकेच्या भुतांचा नाच..
अंधाराच्या आडोशाला सतीत्व विकणारं
एक बेबस तारुण्य...."
'एकीकडे जीवन जगण्यात आलेली अगतिकता, ह्ताशता आणि दुसरीकडे सहस्त्रकांपासून आपल्यावर होणारा अमानुष अत्याचार याला कधीच अंत नाही का ?' असा प्रश्न विचारत या कवितेच्या अंती त्या असा आशावाद व्यक्त करतात की या गर्वाचं डोकं फोडायला आणि श्रीमंताच्या हवेल्या ढेर करायला इवल्याशा मुठी त्वेषाने आवळीत क्रांतीदूत म्हणून जन्माला आलेल्या बाळाने आता नुकतेच डोळे उघडले आहेत. आणि हा क्रांतीसूर्य त्या कभिन्न अंधाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही !

'अनामिकास' या कवितेत लांजेवार यांनी शब्दांच्या शस्त्रांना आत्मतेजाने धार लावली आहे. या कवितेत त्यांच्यातली बंडखोर स्त्री प्रतिशोधाचा नारा बुलंद करताना दिसून येते. विद्रोहाकरिता नुसती शब्दचलाखी करून भागणार नाही तर त्यासाठी लढाच पुकारावा लागतो असे त्या म्हणतात.
'इथे भीक मागून काहीच मिळत नसते
दया आणि माया,
अन्यायासाठी दावे करावे लागतात,
आसवांची नसते किंमत तेंव्हा
पाण्यासाठी लढे दयावे लागतात,
विझलेला धूर लपेटलेला नसतो,
निखाऱ्यांची ऊब पेरावी शरीरात
तोतया नावाचा कधी चमकतो काजवा
अशा वेळेस श्वासांना फुलवायसाठी
दयावी लागते हवा. ...'
'काळ्या रामाचा' आणि 'चवदार तळ्या'चा वेदना इतिहास इथे मनामनावर कोरलेला आहे. जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी इथल्या पाण्यावर आता शब्दांची नक्षी मने रिझवण्यासाठी काढली गेली तरी त्यावर 'इंद्रायणी' तरणार नाही असं सूचक वक्तव्य या कवितेत पुढे लांजेवार करतात. समृद्ध आणि वास्तववादी शब्दजाणिवांनी भेदक आशयास त्या अधिक धारदार बनवतात.

पुरुष लेखकांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रीला न्याय दिला नाही असा आक्षेप नोंदवत आयुष्यभर आपल्या लेखणीतून स्त्रियांचे, विशेषतः दलित स्त्रियांचे विविध पैलू व समस्या ज्योती लांजेवार यांनी मांडल्या होत्या. यासाठी त्यांना प्रस्थापितांशी टक्कर द्यावी लागली होती. बहुधा त्यामुळेच त्यांनी नेहमीच स्त्रीला आपल्या साहित्यातून, लेखनातून आणि समीक्षकाच्या भूमिकेतून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू प्रामुख्याने दलित स्त्रिया, स्त्रियांची चळवळ हाच राहिल्याने चळवळीत काम करणारऱ्या स्त्रियांसाठी आणि चळवळीसाठीही त्यांचे लेखन आजही मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरते आहे.

नागपूरच्या बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या डॉ. लांजेवार पुरोगामी चळवळीतील खमक्या कार्यकर्त्या म्हणून परिचित होत्या. पण हीच त्यांची ओळख नव्हती, तर त्या उत्तम शिक्षिका, लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि विचारवंतही होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रेरणांमधूनच त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यात वाहून घेतले. रिपब्लिकन पक्षाची शकले त्यांना सतत सलत होती. त्यामुळेच चळवळीत काम करताना रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आंबेडकरी चळवळीत वैचारिक मतभेदांचे पेव फुटले आहे. परंतु 'हे मतभेद मांडताना आंबेडकरी विचारप्रवाहाला धक्का लागणार नाही, याची तसदी घेण्याची गरज आहे' असे आवाहन त्यांनी अनेक वेळा केले होते.

लांजेवार यांच्या साहित्यात स्त्रीत्वाच्या आणि दलितांच्या व्यथावेदनांचा पट उलगडताना प्रस्थापित विचार, रूढीनियम यांविरूद्ध आग ओकणारा विद्रोह जागोजागी दिसून येतो. त्यांच्या साहित्यात ही तगमग कुठून आली? जाचक पुरुषप्रधान संस्कृती विरुद्धचा राग कुठून उद्भवला ? हा आक्रोश कुठून आला ? परित्यक्ता स्त्री, पोरकी मुलं दिसताच त्यांच्या डोळ्यात मायेचे अश्रू का दाटून येतात ? पोरक्या मुलांना पाहून अनामिक बेचैनी त्यांच्यात कुठून येते ? याचा शोध घेतल्यावर उमगते की त्यांनी भोगलेले दुःख वेदना जेंव्हा इतरत्र पाहण्यात आल्या तेंव्हा त्यातील व्यथेचा समान धागा कुठे तरी त्या व्यक्तीच्या जवळ घेऊन जात होता. ज्योतीताईंचंही असंच काहीसं झालेलं होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात भोगलेली दुःखे, वेदना आणि उपेक्षा जेंव्हा इतरांच्या वाटयास आली तेंव्हा तेंव्हा त्यांच्यातल्या कवयित्रीने त्या व्यथांना शब्दबद्ध केले. त्यातूनच एक अस्सल धगधगते काव्य प्रसवले !

आपल्या वंचितपणाचा डांगोरा न पिटता, त्यातले सत्य सांगताना बऱ्याच वेळा जाणती माणसंदेखील भरकटतात. मग अतिरंजित अवास्तव दुःख उपेक्षांचे भरजरी शाब्दिक वस्त्र विणत बसतात. मात्र लांजेवार याला अपवाद आहेत. त्यांना जिथे सापत्नभाव वाटला नाही त्याबद्दल त्या स्पष्टपणे तसेच लिहितात. सगळ्या दलित स्त्रियांची जी ओरड असते, त्यामानाने आपली ओरड कमी असल्याचं त्या स्वतः सांगत. आपल्याला दलितत्वाचा फारसा त्रास झाला नाही मात्र बहुजन-उच्चवर्णीयांचे बरेच संस्कार झाले असं त्या लिहितात. त्यांना जातीवरून लहानपणी फारसं कुणी धुत्कारलं नाही. एक अतिशय जीवघेणा खोल व्रण त्यांच्या मनावर उमटला होता आणि तो प्रत्यक्ष त्यांच्या जन्मदात्या पित्याकडूनच. ज्योतीताईंच्या बालपणी त्यांचे वडील त्यांना व त्यांच्या आईला सोडून दुसरीकडे गेल्यामुळे समकालीन मित्रमैत्रिणी त्यांना ‘बिना बापाची’ म्हणून चिडवायच्या. आपला काहीही दोष नसताना हा शब्द आपल्या माथी ज्या पित्यामुळं लागला त्यामुळं आणि ज्यानं आईचा अनन्वित छळ केला, भर थंडीचं घरातून काढून टाकलं, त्या बापाला आयुष्यात त्यांना कधीच माफ केलं नाही. त्यांच्या पित्याने स्वत:च्या उत्तरायुष्यात मने जुळवण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र लांजेवारांनी त्यांना कधीच स्वत:च्या जवळ येऊ दिलं नाही.

आयुष्यात त्यांच्यावर संस्कार झाले, ते त्यांची माय माऊली शुद्धमती बोंधाटे यांचे आणि मॉडेल मिल मध्ये सधन कामगार असूनही चळवळीत अग्रेसर असणाऱ्या कांबळे आजोबांचे. लहानपणापासून ज्योतीना वाचनाची आवड होती. त्यांचं बालपण इमामवाडय़ात गेलं होतं. ज्याच्याशेजारी हरिबुवा मेंढे यांचा रद्दीचा व्यापार चालायचा. या दुकानात रोज रद्दीचे ढीग येऊन पडत. या ढिगात बालकुमारांसाठी असलेली ‘चांदोबा’, ‘कुमार’, ‘अमृत’ अशी मासिकं असायची. या रद्दीतून ही मासिकं काढून तिथेच ज्योती रद्दीच्या ढिगाऱ्यावार बसून वाचन करायच्या. वाचताना शाळेच्या वेळेचं भानही त्यांना नसायचं. मग आईचे रागे भरणे व्हायचे कधीकधी मार पडायचा तरीही त्या वाचन सोडत नसत. ज्योतींच्या आई वाचनाच्या विरोधात होत्या असे नव्हे, त्यांची तर इच्छा होती की मुलीने खूप शिकावे, शिस्तीत वाढावे. त्या स्वत: भिडे कन्या विद्यालयात शिक्षिका होत्या. डॉक्टरेट मिळवून प्राध्यापिका झालेल्या ज्योतींना डॉक्टर व्हायचे होते पण आठवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर शास्त्र विषय असल्याशिवाय मेडिकलची कवाडे उघडत नाहीत याचे ज्ञानच त्यावेळी त्यांना नव्हतं. धिरन कन्या शाळेवरच त्यांचे एवढं प्रेम होतं की ती शाळा सोडून शास्त्र शाखेच्या अन्य शाळेत जाणं त्यांना मान्यच नव्हतं. परिणामी वैद्यकीय शास्त्रातली डॉक्टरची पदवी जरी त्या घेऊ शकल्या नाहीत, तरी त्यांनी वाङ्मयातली ‘आचार्य’ ही पदवी मिळवून आपल्या नावामागे ‘डॉ.’ लावण्याचं स्वप्न मात्र पूर्ण केलंच.

बालवयातच कवितेच्या विश्वात रमणाऱ्या ज्योती लांजेवार कॉलेजमध्ये असताना कथाकथन, कवितांच्या स्पर्धेतही भाग घेत. नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या अनेक नाट्यछटा सादर झाल्या होत्या. प्रकृती साथ देत नसतानाही अखेरपर्यंत त्या सतत ४० वर्षे लिहीत होत्या. त्यांचा पहिला कवितासंग्रह 'दिशा' साहित्य संस्कृती महामंडळाने प्रकाशित केला होता. त्यानंतर त्यांचे 'शब्द निळे आभाळ', 'अजून वादळ उठले नाही', 'एका झाडाचे आक्रंदन' हे काव्यसंग्रह आले. 'आजची सावित्री', 'पक्षीण' आणि 'चक्रव्यूह' हे कथासंग्रह लिहिले. 'फुले आंबेडकर स्त्री मुक्ती चळवळ', 'दलित साहित्य समीक्षा', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य' आणि 'शौरीचा गोंधळ', 'समकालिन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह', 'भारतीय समाज आणि स्त्री' असे वैचारिक व समीक्षापर विपुल लेखन व संपादनही त्यांनी केले. याशिवाय 'आजची सावित्री' (दीर्घ कथा) व 'माझा जर्मनीचा प्रवास' (प्रवास वर्णन) अशी विविध अंगाची त्यांची साहित्य संपदा आहे.

"आई अशी नि:शब्द साद येताच
कावरीबावरी होते
भोवतालच्या चेहेऱ्यात
तुझा शोध घेते..... "
ही कविता वाचताना आपण हळवे होऊन जातो. पण, लांजेवारांचं काव्यसामर्थ्य इथे पणाला लागलं आहे त्याचे कारण वेगळे आहे. पुत्रवियोगाच्या दु:खानं त्यांचे मन उन्मळून पडले होते मात्र त्याचा त्यांनी उद्रेक होऊ दिला नाही. संयत शब्दात आपलं गोठलेलं दुःख त्या प्रकट करत गेल्या. आपल्या आक्रोशाला रुदनाचे स्वरूप त्यांनी येऊ दिले नाही. विद्रोह आणि कसदार आशय यांची कास कधीही त्यांनी सोडली नाही. आपली अभिरुची आणि अभिव्यक्ती यांचे टोकदार प्रकटन त्यांनी वास्तवतेच्या आधीन राहून मांडले. साहित्याशी आणि स्वतःच्या विचाराशी प्रतारणा न करण्याच्या त्यांच्या प्रांजळपणामुळेच ‘दलित कवयित्री’चा शिक्का मारून त्यांची साहित्यिक चौकट एका जातविचाराशी निगडीत सीमांमध्ये पक्की करणं अयोग्य ठरते. वास्तवात त्यांनी ही चौकट कधीच मोडीत काढली होती. लिखाणातून वैचारिक क्रांती सुरू असतानाच त्यांच्या वाट्याला पुत्रशोक आला होता, त्यांचा मुलगा निखिल याचे अपघाती निधन झाले होते. या घटनेने त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या. याने खचून न जाता त्यांनी जिद्दीने कुटुंब सावरले आणि लिखाण सुरू ठेवले. मुलाच्या मृत्यूविषयीचे आक्रंदन त्यांच्या लिखाणात झळकत राहिले. 'एका झाडाचे आक्रंदन' या कवितासंग्रहात तरुण मुलाच्या निधनाने व्यथित झालेली त्यांच्यातली आई ठळक जाणवते.

आपल्या लेखनाचे स्वमुल्यांकन करता येणे हे लेखनाइतकेच महत्वाचे असते. लांजेवार याला अपवाद नव्हत्या, त्या स्वतःच्या लेखनाबद्दल आणि मराठी भाषेबद्दल मत मांडताना विचारवंताचा आव न आणता प्रांजळ कथन करतात. त्या म्हणतात की, "मराठी साहित्यात मग ते काव्यवाचन, कविता, कथा आणि कादंबरी असो, या सर्व प्रकारात भाषेचे खूप महत्त्व आहे. मराठी विषयच आपण शिकवित असल्याने याचा फायदा माझ्या लेखनात झाला तसेच शाळेत असल्यापासून मी कविता करीत होते. मात्र शाळेत असताना लिहिलेल्या कविता या नक्कीच बाळबोध होत्या. पुढे कॉलेजमध्ये कविता लिहित असताना भाषेची समज येत गेली, पुढे-पुढे भाषा कळत होती. त्यामुळे त्याचा उपयोग नक्कीच झाला आणि मराठी भाषेमुळे लेखनात निश्चितच प्रगल्भता आली, असे मी म्हणेन.

मिल मजदूर चळवळीत भाग घेणाऱ्या स्त्रियांचे अनुभव त्यांनी 'दिशा' या काव्यसंग्रहात मांडले. ‘माझा जर्मनीचा प्रवास’ ह्या प्रवासवर्णनपर पुस्तकाची पार्श्वभूमीही साहित्यिक क्षेत्राशी निगडीत आहे. २००६ मध्ये त्यांना मोठय़ा साहित्यिकांबरोबर जर्मनीला एका पुस्तक महोत्सवासाठी जाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी साधारणपणे दीड महिना त्या तेथे राहिल्या होत्या. या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिले आहेत.

आंबेडकरी चळवळीतील योगदानासाठी व लिखाणासाठी अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी आणि पदांनी त्यांना गौरविण्यात आले. विदर्भ साहित्य संघाचे संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला. काही वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनातील त्यांची प्रकट मुलाखत विशेष गाजली होती. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा येथील ६०व्या साहित्य संमेलनाच्याही त्या अध्यक्ष होत्या. इंग्रजी, रशियन, जर्मनी आणि स्वीडीश भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्यामुळे अनेक कविताचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झुरिच आदी देशांमधील विद्यापीठात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

डॉं. ज्योती लांजेवार यांच्या साहित्याची समीक्षा करताना प्रा. पुष्पा भावे म्हणतात की, "आंबेडकरी विचारांची पोत जपत जातीनिर्मूलनाची चळवळ राबविण्याचे काम दिवंगत डॉ. ज्योती लांजेवार यांनी केले. एखाद्या संमेलनात ज्योती लांजेवार असल्या की बोलणारी पुरुष मंडळी चूप बसायची. आंबेडकरी चळवळीतील समाजकारण-राजकारणाला अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व पुरविणाऱ्या त्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. अरुण शौरी यांनी बाबासाहेबांच्या विरोधात केलेल्या उल्लेखाला संयमानं आणि मुद्देसूदपणे उत्तर देण्याचे काम ज्योती लांजेवार यांनी केले होते. लांजेवार या स्त्रीत्वाचा हुंकार शब्दसामर्थ्यात प्रकट करणाऱ्या विद्रोही तरीही अभिनव कवयित्री होत्या."

आंबेडकरी चळवळीतील आपले कार्य आणि सामाजिक जाणिवांच्या सापेक्षतेने केलेले लेखन यातून समाजात परिवर्तन व्हावे, दलित समाजाचा उद्धार व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयुष्यभर वाटचाल करणाऱ्या डॉ. ज्योती लांजेवार यांचे लेखन आंबेडकरी आणि महिलांविषयक चळवळीतील स्त्रियांना नेहमीच मार्गदर्शक ठरत राहील, यात शंका नाही.

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा