'शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ?..
..आम्हाला वगळा, गतप्रभी झणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा, विकेल कवडीमोलावरी हे जिणे !'
असं म्हणायला दुर्दम्य आत्मविश्वास असावा लागतो, उत्तुंग आयुष्य जगावं लागतं अन कालातीत कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे लागते. कवी केशवसुत या वर्णनात चपखल बसणारे व्यक्ती होते. त्यांनी निर्मिलेले काव्य अजरामर झाले. मराठी कवितेचे दालन भरून पावले.
कृष्णाजी केशव दामले उपाख्य केशवसुत यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी रत्नागिरीजवळील मालगुंड या गावी झाला. केशवपंत दामले मूळ दापोलीचे. ते शिक्षक म्हणून मालगुंडच्या शाळेत दाखल झाले आणि फडके कुटुंबीयांच्या घरात भाडयाने वास्तव्यास राहिले. याच घरात १५ मार्च १८६६ साली केशवसुतांचा जन्म झाला. त्यांना एकूण बारा अपत्य, सहा मुले व सहा मुली. कृष्णाजी हे त्यांचे चवथे अपत्य. कोकणात खेड गावी प्रार्थमिक शिक्षण घेत असतांना कृष्णाजींना प्राचीन साहित्य वाचण्याचा छंद लागला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १८८४ला त्यांनी दाखल केले होते. तेव्हा देशभक्त बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर शिक्षक असलेली ही शाळा आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. मात्र देशसेवेचे बाळकडू इथेच त्यांना मिळाले. सामाजिक अन्यायावर आपल्या कवितांमधून घणाघाती प्रहार करताना त्यांच्यातील ‘आगरकरांचा शिष्य ’आपणास ठायी ठायी जाणवतो.