
काही काळापूर्वी अभिनेता रजनीकांतचा एक किस्सा वाचनात आला होता. रजनीकांत मंदिराबाहेर थांबलेला असताना एका महिलेने त्याला भिकारी समजून दहा रुपये दिले आणि त्याने ते भीक म्हणून स्वीकारले ! असाच किस्सा लिओ टॉलस्टॉय यांच्याबाबतीत पूर्वी घडलाय. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होता. तो आपल्या काही सैनिकांची मॉस्को स्टेशनवर वाट पाहत होता. मॉस्कोत नेहमीच रक्त गोठवणारी थंडी असते त्यामुळे अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच उमगत नव्हतं. तेव्हढ्यात एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ हमाल आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय गोंधळला. पण पुढच्याच क्षणी त्यानं ते सगळं सामान उतरवलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना ! हे सैनिक एका हमालाला का सॅल्यूट मारतायत ? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्यावर बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर उभ्या असलेल्या सार्वकालीन महान कादंबरीकाराने आपलं सामानही उतरवून दिलं या कृतीनं बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनंच त्यांचे आभार मानले, ते तिने दिलेल्या कामाबद्दल. हमालाला देय असलेली रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.