शब्दाचे रुपांतर अणकुचीदार बाणात आणि आशयाचे रुपांतर ज्वालामुखीच्या उद्रेकात झाले तर निर्माण होणारे काव्य कोणत्या प्रकारचे असेल असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचे निसंशय उत्तर दलित साहित्य असेच असेल ! त्यातही नेमके पृथक्करण करायचे झाले तर विद्रोही दलित कवितांचे नाव घ्यावे लागेल.
‘एक दिवस मी परमेश्वगराला
आईवरून शिवी दिली :
तो लेकाचा फक्कन हसला.
शेजारचा जन्मजात बोरुबहाद्दर उगीचच हिरमुसला,
एरंडेली चेहरा करून मला म्हणाला :
"तु असा रे कसा, त्या निर्गुण निराकार
अनाथ जगन्नाथाला काहीतरीच बोलतोस ?
शब्दांच्या फासात त्याचा धर्मफणा धरतोस ?"
पुन्हा एकदा मी कचकून शिवी दिली,
विद्यापीठाची इमारत कमरेपर्यंत खचली,
माणसाला राग का येतो या विषयावर
आता तेथे संशोधन सुरु आहे,
उदबत्तीच्या घमघमाटात भरल्या पोटाने
भावविव्हळ चर्चा झाली,
माझ्या वाढदिवशी मी परमेश्वराला शिवी दिली..
शिवी दिली,शिव्या दिल्या, लाटांसारखे
शब्दाचे फटकारे मारीत मी म्हटले,
‘साल्या! तुकडाभर भाकरीसाठी
गाडीभर लाकडं फोडशील काय?
चिंधुक नेसल्या आईच्या पटकुराने
घामेजले हाडके शरीर पुसशील काय?
बापाच्या बिडीकाडीसाठी
भावाबहिणीची हाडके झिजवशील ?
त्याच्या दारूसाठी भडवेगिरी करशील ?
बाप्पा रे,देवबाप्पा रे ! तुला हे जमणार नाही,
त्यासाठी पाहिजे अपमानित
मातीत राबणारी,
प्रेम करणारी मायमाऊली.......'
एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली.
महाराष्ट्रात जेंव्हा औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे नाव द्यावे यासाठी नामांतर चळवळ सुरु होती त्या काळात लिहिली गेलेली ही कविता आहे. ही चळवळ सार्वजनिक वा व्यक्तिगत अशा ठराविक साचेबद्ध प्रोटो टाईपची नव्हती. ती कुठे मोर्चाच्या रुपात होती, कुठे सत्याग्रहाच्या रुपात होती, कुठे एकदिवसीय बंद वा धरणे आंदोलनाच्या परिघात होती तर कुठे ती रौद्र हिंसक होती. या चळवळीच्या ठिणग्यांना आपल्या शब्दांची फुंकर घालून विद्रोहाची, हक्काची आग धगधगती ठेवण्याचे काम करत होते दलित साहित्यिक ! अशा साहित्यिकांच्या पेटत्या लिखाणाचा तो एक तेजस्वी काळ होता. किसन फागु बनसोड यांच्यापासून ते महाकवी वामनदादा कर्डक आणि नामदेव ढसाळांपासून ते आजच्या वैभव छायाच्या नवविद्रोहापर्यंतच्या लेखनात एकच धागा समान आणि मुख्य आहे तो म्हणजे मुळापासून बंडखोरी ! प्रस्थापितांचे सर्व संकेत पायदळी तुडवून तिच्या चिंधड्या उडवत ही कविता साहित्याच्या बेगड्या मेरूदंडाचे तुकडे करते आणि आपली स्वतःची रेष मोठी करत ती आपलं एक वलयांकित वज्रभेदी शब्दास्त्र परजते !! ती कुठल्या राग बंदिशीची मौताज नाही ना तिला कुठल्या लय-छंदाचे बंधन ना तिला कुठल्या वृत्ताची तमा ! विद्रोही कविता ही स्वयंसिद्धा आहे. तिला अधिष्ठान आहे ते सहस्त्रावधी वर्षाच्या उपेक्षितांनी सोसलेल्या अन्यायाचे. शेकडो शतकापासून गावकुसाबाहेरच्या मानवी कोंडवाड्यातल्या बंद दरवाजांत कुढत काढलेल्या खंगलेल्या आयुष्याचे संदर्भ तिला आहेत. त्यामुळे तिच्यात जो अस्सलपणा आहे, तिच्यात जी धग आहे, तिच्यात जी रग आहे आणि संतापाचा जो बारूद तिच्यात ठासून भरला आहे त्यातील सत्वाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही.
माणूस जेंव्हा अत्याचार, अन्याय यांच्या सर्व सीमा पार करतो आणि त्याची सहनशक्ती संपुष्टात येते तेंव्हा तो आधी आपल्या विरुद्ध असणाऱ्या तथाकथित दृश्य अदृश्य सकल स्वरूपातील शक्तिमान घटकांविरुद्ध एल्गार पुकारतो. म्हणून केशव मेश्राम कवितेच्या सुरुवातीस ज्या ईश्वराचे नाव घेऊन ही स्पृश्य अस्पृश्यता मांडली गेली, ज्याच्या आधारे धर्मंमार्तंडांनी गावोगावच्या दलित वस्त्या मोठ्या अहंकाराने आणि उन्मत्ततेने जोपासल्या त्या ईश्वराच्या पाखंडीपणावर वज्रमुठीचा तडिताघात करतात. ते म्हणतात एक दिवशी मी परमेश्वरालाच आईवरून शिवी दिली ! देवाचे अस्तित्व आणि त्याची अनाठायी भीती या दोन्ही गोष्टींना विटाळलेले मन आणखी काय करू शकते ? असा प्रतीसवाल यातून ध्वनित होतो. जर देव आहे तर त्याने हजारो वर्षे केवळ जातीच्या आधारे इतक्या लोकाची घोर पिळवणूक होत असताना डोळे का मिटले असावेत, त्यापेक्षा त्यालाच आव्हान दिले की त्याचे बगलबच्चे आपोआप तालावर यावेत हा गर्भितार्थ या पंक्तीत आहे.
परमेश्वराला शिवी दिल्याबरोबर त्याच्या नावावर जीव असणारा आणि त्याच्या जीवावर जगणारा कथित उच्चवर्णीय सवर्ण ज्याला मेश्राम जन्मजात बोरुबहाद्दर असं मार्मिक विशेषण लावतात, तो लगेच मेश्रामांना पृच्छा करतो की, "शब्दांच्या जाळ्यात देवाला ओढून त्या निर्गुण निराकार ईश्वराला का ओढतोस ?"
त्याच्या प्रश्नावर मेश्राम आणखी एकदा शिवी हासडतात.
या शिव्या ऐकणारी विद्यापीठाची इमारत जी शोषकांचे प्रतीक म्हणून कवींनी वापरली आहे ती इमारत कंबरेपर्यंत खचते. माणूस जेव्हा पुरता दुभंगतो, हताश होतो त्याच्यातले त्राण संपते तेंव्हा तो कंबरेपर्यंत खचला असं म्हटले जाते. त्या अर्थाने मेश्राम लिहितात की या कानठळ्या बसवणाऱ्या आक्रोशाने आणि शब्ददुन्दुभीने ती इमारत कंबरेपर्यंत खचली. नुसत्या आवाजाने हा परिणाम झालाय, आघाताने काय अवस्था होईल याचा काही अंदाज बांधता येईल का असं मेश्रामांना सुचवायचे आहे.
त्यापुढे विडंबन शैलीत मेश्राम लिहितात की, जिथं इमारत खचली तिथं आता तेथे संशोधन सुरु आहे, आणि हे संशोधन कसं आहे तर उदबत्तीच्या घमघमाटात भरल्या पोटाने सुरु आहे ! इथे नुसत्या वायफळ आणि भावविव्हळ चर्चाच होणार आहेत. त्याचे फलित शून्य असणार आहे. त्याची परिणामकारकता आणि उपयोगिता कुचकामी आहे. कारण ज्यांनी जे भोगलेच नाही ते यावर काय मार्ग काढू शकतील असा रोकडा सवाल ते करतात. या संतापाच्या उद्रेकाची पार्श्वभूमी ज्याला कधी उमगलीच नाही तो त्याच्या मुळाशी जाऊच शकणार नाही. कारण ‘जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे’ हेच खरे. त्यामुळे परमेश्वरावरील मेश्रामांचा राग किती संयुक्तिक आहे किंवा योग्य नाही याचे मूल्यमापन करणाऱ्या लोकांनी आधी यामागचे सर्व भोग भोगले पाहिजेत मग त्यांना त्यातील व्यथा आणि संताप यांचा काहीसा अंदाज येऊ शकेल अन्यथा ती एक नुसतीच कोरडी सहानुभूती असणारी वायफळ चर्चा ठरेल.
देव कुणासाठी काय करतो आणि त्याची रूपे कशी तारक आहेत यावर प्रश्नचिन्ह लावताना मेश्राम देवालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. कारण समाजात विषमतेचे जे काही विष पसरवले गेले आहे त्याला देवाच्या अधिष्ठानाचे बळ वापरण्यात आले आहे आणि देवाच्या आडून माणसानेच माणसाशी असा घोर छळवादाचा दावा मांडला असल्याने कवी जाणीवपुर्वक देवाच्या आडून छुपे जातधर्माचे द्यूत खेळणाऱ्या मानवी चेहऱ्यांचे बुरखे टराटरा फाडण्यासाठी आधी त्याची मनस्वी ताकद असणाऱ्या परमेश्वरी संकल्पनेवर अत्यंत कठोर प्रहार करतात.
एव्हढेच नव्हे तर देवाला ते प्रश्न करतात आणि निरुत्तर देखील करतात. ते विचारतात, ‘साल्या ! तुकडाभर भाकरीसाठी गाडीभर लाकडं फोडशील काय? चिंधुक नेसल्या आईच्या पटकुराने घामेजले हाडके शरीर पुसशील काय? बापाच्या बिडीकाडीसाठी भावाबहिणीची हाडके झिजवशील ? त्याच्या दारूसाठी भडवेगिरी करशील ? बाप्पा रे,देवबाप्पा रे ! तुला हे जमणार नाही !" साल्या असं विशेषण ते वापरतात ते आधी काहीना खटकू शकते पण त्यांच्या प्रश्नातील दाहकता, त्यातील दबलेल्या वेदनांचा सहस्त्रावधी वर्षांचा हुंकार आणि देवधर्माआडून शोषकानी मांडलेला छळवाद हा जेंव्हा लाव्हा उफाळल्या सारखा समोर येतो तेंव्हा साल्या म्हटल्यानंतर खटकल्यागत वाटणं एकदम खुजे वाटू लागते. कारण उपेक्षितांच्या दुःखापुढे हे खटकणे कणभर देखील नाही. म्हणूनच मेश्राम समोरच्याला निरुत्तर करतात.
या कवितेत केशव मेश्राम यांनी एक कमालीचं उत्तुंग उत्कट जीवनतत्व मांडलं आहे. ते देवापेक्षाही आपल्या मातेला श्रेष्ठत्व आपसूकपणे बहाल करतात. त्याद्वारे ते कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. परमेश्वराला विचारलेले प्रश्न आणि बोरूबहाद्दर मित्राला केलेले सवाल यांना छेद देत तेच यावर उत्तर देतात.
ते म्हणतात, 'बाप्पा रे, देवबाप्पा रे ! तुला हे जमणार नाही, त्यासाठी पाहिजे अपमानित मातीत राबणारी, प्रेम करणारी मायमाऊली." आपल्या आईशिवाय हे कुणासही हे जमणार नाही हे मेश्रामांना पक्कं ठाऊक आहे. त्या माऊलीला जे जमते ते परमेश्वराला देखील जमणार नाही असा दावा करून मेश्राम शेवटी परत फिरून उल्लेख करतात की, 'एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली.'
इथे प्रश्न आईवरून शिवी देण्याइतकाच मर्यादित नसून बेगडी परमेश्वरापेक्षा पोटच्या पोराबाळासाठी अशक्य ते सर्व करणाऱ्या मायमाऊलीच्या श्रेष्ठत्वाचादेखील आहे. केशव मेश्राम त्यात पुरेपूर यशस्वी ठरतात.
ही कविता कवी केशव मेश्रामांच्या विद्रोही कवितेची ओळख बनून राहिली. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा लेखक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते. त्यात प्रा.केशव मेश्रामांचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे. कवी, कादंबरीकार, आणि समीक्षक म्हणून त्यांची ओळख साहित्य वाचकांना नवी नाही. 'अस्मितादर्श' या नियतकालिकाच्या मेळाव्यापासून चळवळीचे आणि साहित्यामधून उपेक्षितांच्या जीवनाचे चित्रण आपल्या लेखनातून त्यांनी मांडले. विद्रोही कवितांविषयी ते म्हणतात की, 'स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उदयाला आलेली विद्रोही कविता दारिद्र्य, अन्याय, शोषण, अपमान यामुळे घायाळ झालेल्या दारुण जीवनातून जन्माला आलेली आहे. ती संतप्त नसेल तरच नवल. अमानुष रुढींविरुद्ध लढण्यासाठी तिने चार्वाक, बुद्ध, फुले, आंबेडकरांप्रमाणे मार्क्स, लेनिन आणि निग्रो कवींपासूनही काही आशय घेतला आहे. तिचे सांगणे एवढेच आहे की या भूमीत पशूप्रमाणे जीवन कंठणाऱ्या माणसाला, माणूस म्हणून सन्मानाने जगता आलेच पाहिजे.'
केशव मेश्राम यांच्या ‘उत्खनन’ ह्या पॉप्युलर प्रकाशनद्वारे प्रकाशित कवितासंग्रहातील पहिल्याच कवितेत स्वत:च्या अक्षरदुःखात गोंदवलेल्या शब्दांनी मरगळलेल्या दिशांना त्यांनी नव्या वाटा दाखवल्या.
‘सगळ्या नजरा रोखलेल्या आकुंचित माझ्यावर,
अविश्वासाने धावरे ढग त्यांच्या त्यांच्या डोळ्यात गच्च भरलेले
मी पेटवली लालबुंद मने : सळसळती दाट अरण्ये
माझे मन उन्मन खळखळले कितीकांच्या ओठातून
... ... त्यांच्या जुनाट वाड्यांचे अजस्र दरवाजे
करकरत बंद होताहेत... अडसर लागताहेत
माझ्या हाकांना मोकळे आहे रान...
शब्दातील ताकद काय असते यावर ते मार्मिक भाष्य करतात, आक्रस्ताळेपणा न करता नेमक्या शब्दात आशय व्यक्तवतात.
‘‘- शब्दांची बियाणीच निराळी,
कवितेच्या ओळी : दंगलीतील बुलंद गोळ्या
अक्षय वणव्यातल्या ज्वाळाच निळ्याजांभळ्या,
विराट पोकळीतल्या मेघमाला निराकार साकळलेल्या
... .. कुठल्याही क्षणी बिथरणारी शब्दांची टोळी
वेळेतील ... वेळी अवेळी ... कवितेच्या ओळी...."
केशव मेश्राम यांनी कवी म्हणून जो संवाद साधला, त्यात सामाजिक जाणीव मोठी आहे म्हणूनच त्यांची कविता महत्त्वाची ठरते. कवीला कविता सुचते तेव्हाही गावाबाहेरची ‘परित्यक्त, एकली, भयाणभोर झाडे’ दिसतात, ‘पाखरांचा थवा’ दिसतो आणि या विरोधाभासातूनच तर ‘शब्द उशापायथ्याशी मनाजोगते घेतले...’ तरी ‘कधी जुळणार काठ?’ असा प्रश्नही पडतो. ही जाणीव आत्ममग्न नाही, तर जीवनमग्न जातकुळीची आहे.
‘शब्द मोडके तोडके, माझे माझेच उरावे’ ही स्वत्व जाण म्हणून मोलाची ठरते. ‘असे फुलावे कळीने’ असे म्हणत मेश्राम ‘बाभळीच्या फुलांवर’ ओथंबून येतात. त्याची आत्ममग्नता मेश्रामांना नवध्यास मग्न करते आहे.
‘असे फुलावे कळीने तिचे कळू नये तिला
... ... मंद वार्याची अंगाई जोजविते आकाशाला
अशा वेळी मला यावी धून धुकेबनातून
बाभळीच्या फुलांवर माझे ओथंबावे मन.’
आपलं हळवं मन ते इतक्या सहजपणे मोकळं करून जातात. त्यात कृत्रिमतेचा लवलेशही नाही.
‘पावसात जळताना नाव घेतले तुझे
निर्मनुष्य वाटांवर गाव लागले तुझे
शब्द बोललो असे लुळेलुळेच जाहले
जलाशयात वाहत्या विरूप मी न्याहाळिले...’
मेश्रामांचे समाजभान किती उत्तुंग स्वरूपाचे आहे हे इथे लक्षात येतं.
‘सवयीनेच होत असतात भेटी अटळ आभाळछत्रा सारख्या
एका क्षणासाठी असतात मागल्या जागा भुक्यासुक्या,
भेटींचे बीज असे : ते रुजतच असते मनोमनात,
भेटींचा शेवट असतो भेटींच्याच अथांग समुद्रात.’
भेटीची अशी आभाळमाया सांगताना ते अधिक गंभीर होतात. आठवणी, नाती आणि मन यांची सांगड घालू पाहतात.
... ... ... क्रमाक्रमाने सरकली
आयुष्याची दिनमाळ
... मी जीभच कापून टाकली माझी...
असं म्हणत स्वतःवर प्रश्नचिन्ह लावत आपलं अपराधीपण प्रांजळतेने कबूल करतात.
मेश्रामांना कधीकधी आपले अस्तित्व हे ‘घातपातासारखे’ वाटते, मग अपराधी वाटू वागते. कधी चालत्या पावलांवर ‘तारे विझत गेले’ हे जाणवते. ‘कडवटपणाचे असह्य कर्ज’ डोक्यावर बसते, लाचखोरी, वशिलेबाजी जोर करताना पाहिली की अंतरंगात वणवा पेटतो. ‘पाश’सारख्या कवितेत ‘जालिम जहराची भाषा’ येते आणि संवेदनशीलताही जागी होते.
‘नको डहुळाया काही क्षितिजाचे खोल पाणी,
नाही संपता संपत एका कळीची कहाणी’
असं लिहिणारे मेश्राम आयुष्याच्या अंती शब्दसखेच कसे धीर देतात हे उलगडून दाखवतात.
‘स्वत:वरचा, जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो
माऊलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात
लाजिरवाणे असे जिणे अपमानाचे ओढत जातो :
प्राण चुंबून घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात.’
स्वप्नांच्या भेटीसाठी आयुष्याचा डाव खेळावा लागतो आणि मग कुठे कळते की, आपल्याला थाराच नाही, आपला आरसा कोरा आहे. फक्त आपल्या ‘बांधल्या पाठीवरती काळोखाच्या गाठी.’ असं कडवं सत्य मेश्राम सांगतात.
‘‘आयुष्याचा डाव उधळला एका स्वप्नासाठी
थेंब न उरला त्याचाही पण पूर्ण आरसा कोरा
मला न उरला मनात माझ्या माझ्यासाठी थारा
तरी बांधल्या पाठीवरती काळोखाच्या गाठी
... ... ... जगणे आता स्वप्नांसाठी स्वप्नांच्या काठांशी
व्यवहाराच्या मैदानातून मिटून डोळे जाणे
मिटल्या डोळी देहामध्ये सहज एकरूप होणे
असे थबकले स्वप्न अनोखे शब्दांच्या ओठांशी’’
साहित्य ललित असते, पण ते दलित कधी असते का ? साहित्य उत्तम किंवा सामान्य असते पण ते 'दलित' कसे असेल ? साहित्य वैचारिक, राजकीय, धार्मिक किंवा पंथीय असेल, पण, ते 'दलित' असणार नाही. असतच नाही. या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे देतांना अक्षर भाकिते या स्वरुप प्रकाशनच्या पुस्तकात केशम मेश्राम यांनी मर्मभेदी चिकित्सा केली आहे. ते लिहितात - "दलित साहित्य ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने जागरूक झालेल्या, अस्मितेच्या शोधाने सर्व घातक धर्म, विचार, रुढी, संकल्पना, उक्ती, ग्रंथ, रुढी यांना नकार देणाऱ्यांच्या आणि नवसंस्कृतीच्या निर्माणाची, समतायुक्त सम्यक वाटचाल करणाऱ्यांच्या संघर्षातून अस्तित्वात आलेली, राजरस्ता होऊ पाहणारी ठळक पायवाट असेच म्हणावे लागेल."
दलित साहित्य जेंव्हा त्वेषाने प्रकट झाले तेंव्हा मराठी सारस्वतांच्या दुनियेत एकच कल्लोळ झाला, नवसाहित्य चळवळीसकट मराठीतील कोणत्याही साहित्यिक चळवळीने उडाली नसेल इतकी वादाची खळबळ दलित साहित्याने उडाली. नवसाहित्याच्या चळवळीची धार त्वरेने सौम्य झाली आणि ती स्थिरावून गेली. परंतु आरंभीच्या काळात दलित साहित्यामुळे उठणारी तीव्र आक्रमक प्रतिक्रिया आता उठत नसली तरी तिला अजूनही पुरते स्वीकारलेले नाही. दरम्यान अनेक दलितेतर चिकित्सक आता याचा धांडोळा घेताहेत. दलित साहित्यातील वेदना आणि अत्त्याचार यांच्या अक्षररुदनाने मराठी साहित्यास छुप्या वर्गवादी वर्चस्वातून बंधमुक्त करून विषमतेच्या अरण्यकातली हिंस्त्र श्वापदांचे अस्सल स्वरूप दर्शवण्यास भाग पाडले. कधी विवेकी तर कधी बेभान झालेल्या क्रोधाच्या तप्त लाटावर स्वार झालेले हे साहित्य कविता, कथा आणि कादंबरी यातूनही प्रकट झाले. मात्र या साहित्याचा आत्मा राहिला तो आत्मचरित्र हा साहित्यप्रकार.
दलित कवितेतही आत्मचरित्त्राचे रसायन विरघळलेले आढळते. दलित कवींचे सर्वच साहित्य मात्र विद्रोही नाही हे मेश्रामांच्याही काही कवितांतून प्रतीत होते. सामाजिक आत्मनिष्ठतेचे भान राखून वैयक्तिक उत्कटता देखील ते तितक्याच ताकदीने मांडतात. यशवंत मनोहर, दया पवार, अर्जुन डांगळे आणि अर्थातच नामदेव ढसाळ हे देखील याच वर्गवारीतले आहेत. भडक अतिरंजित वाटणारी आत्मचरित्रे दलितत्व आणि वेदनांचे साचलेले उद्रेक याचे उस्फुर्त ज्वालाग्राही अर्क आहेत. प्र. ई. सोनकांबळे, बाबुराव बागुल, माधव कोंडविलकर, शंकरराव खरात, दया पवार. ज्योती लांजेवार अशी अनेक नावे या साहित्य चळवळीत घेता येतील ज्यांनी वाचकांना विचार करायला आणि आत्मचिंतन करायला भाग पाडले. या लेखनाच्या प्रभावामुळे एकुण साहित्यिक वातावरणातही काही बदल झाला. केवळ दलितांच्या संमेलनांतून नव्हे तर इतर साहित्य मेळाव्यांतून देखील दलित साहित्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली जाऊ लागली. अनेक विद्यापीठांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये दलित साहित्यातील विविध लेखन प्रकारांना स्थान मिळाले आहे. मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहावर दलित साहित्य चळवळीचे विविध प्रभाव परिणाम झाले आहेत. लाक्षणिक जीवनात जी अस्पृश्यता पाळली जात होती तीच भावना काही आशय, विषय, शब्दवेदना, उच्चारण, भाषाशैली आणि शिवराळपणा या बद्दल काहीएक आकस असणारा पारंपारिक दृष्टीकोन बासनात गुंडाळण्यास दलित साहित्याने भाग पाडले. सत्यातील कटुतेच्या जवळ जाताना भिडस्ततेवर कठीण प्रहार करताना त्याचे जिवंत चित्रण करताना अनेक संकेत आणि गृहिते यांच्या सीमा निखळून पडल्या. मराठी साहित्यात आलेल्या रसरशीत कसदारपणाचे श्रेय दलित साहित्यालाच जाते. अशा या नवयुगाच्या वेदनेच्या साक्षात्कारी लेखकांत कवी केशव मेश्राम हे बिनीचे शिलेदार होते.
अष्ट्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणारे केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९३७ रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. घरीदारी अगदी विपरीत स्थिती असूनही शिक्षणावर अपार श्रद्धा असल्यामुळे मेश्राम जिद्दीने शिकत राहिले. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे त्यांनी एम. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या कार्यालयीन सेवेत ते सहा वर्षे होते. त्यानंतर महाड येथील महाविद्यालयात तसेच मुंबई येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीच्या वेळेस मुंबई विद्यापीठात प्राभारी विभाग प्रमुख म्हणून ते काम पहात होते.
'उत्खनन' 'जुगलबंदी' 'अकस्मात'' चरित' हे त्यांचे काव्यसंग्रह. 'पोखरण' 'हकीकत आणि जटायु 'या कादंब-या. नंतर 'खरवड' 'कोळीष्टके' 'मरणमाळा 'आणि असे बरेचसे लेखन आहे. यातील विषयाचे केलेले विवेचन संशोधनाच्या दृष्टीने केवळ दलित नव्हे, तर अगदी दलितेतर विषयाकडे खुलेपणाने पाहण्याचा त्यांचा कल होता. ग्रामीण आणि शहरी दलितांची गुंतागुंत, साहित्याची वैचारिक स्थित्यंतरे, गुन्हेगारीकडे झुकलेल्या पिढीचे चित्रण, असे विविध विषय त्यांनी हाताळले. खरवड, पत्रावळ, धगाडा, गाळ आणि आभाळ, मरणमाळा, आमने-सामने, कोळिष्टकी, ज्वालाकल्लोळ इत्यादी कथासंग्रहातून न्याय-अन्याय, समता-विषमता, दलितांच्या जीवनाचे वास्तव, गुन्हेगारी, बकालपणा इत्यादी जीवनानुभव त्यांनी हाताळले आहे. समन्वय, शब्दांगण, लोकवाचन, बहुमुखी हे समीक्षात्मक ग्रंथ ही प्रकाशित झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ (१९९३) यांचे संपादन मेश्राम यांनी केले. ‘छायाबन’ हा ललित निबंधाचा संग्रह त्यांच्या लेखणीची वेगळी धाटणी दर्शविते. ‘विद्रोही कविता’ या निवडक दलित कवितासंग्रहाचे त्यांनी केलेले संपादन आणि प्रस्तावना एक विचार देऊन जाते. ! २००७ च्या नोव्हेंबरमध्ये दलित साहित्यातील हा ज्वालामुखी निमाला...
सामाजिक विषमतेच्या 'मरणमाळां'च्या अभिनिवेशी 'उत्खनका'चे कार्य निश्चितच गौरवशाली आणि प्रेरणादायी आहे ! मानवतेच्या नव्या व्याख्या रुजवणाऱ्या दलित साहित्यात मेश्रामांचे नाव नेहमीच सन्मानाने आणि आदराने घेतले जाईल.
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा