शनिवार, १७ जून, २०१७

'आनंदयात्री' कवी बा.भ. बोरकर ....



‘स्नेहगाथा’ या पुस्तकामधून बा. भ. बोरकर वेगळ्याच स्वरुपात वाचकांसमोर आले होते. त्यास अनुसरून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याशी अनौपचारिक गप्पाष्टक साकारताना बोरकरांनी आपल्या लेखन प्रयोजनाबद्दल आणि लेखनप्रकृतीबद्दल भाष्य केलं होतं. अगदी तरल मनमोकळ्या शब्दांत ते व्यक्त झाले होते. बोरकर म्हणतात की, "त्याकाळी स्वत:च्या पत्नीशी आणि स्वत:च्या घरातदेखील पांढरपेशा माणसाला मनमोकळेपणानं शृंगार करता येत नसे. एवढंच काय, आपल्या मुलाचा मुकाही वडील माणसांसमोर घेता येत नसे. त्यामुळं या समाजाचा सारा शृंगार चोरूनच व्हायचा. शृंगार- मग तो घरातला असो की घराबाहेरचा असो, त्याबद्दल उघडपणं बोलणं हे अशिष्ट समजलं जात होतं. जो खालचा समाज म्हणून गणला गेलेला होता त्याचं जगणं-वागणं आमच्यासारखं दांभिक नीतीनं ग्रासलेलं नव्हतं. आमच्या मानानं तो समाज कितीतरी मोकळा आणि म्हणूनच धीटही होता. त्यामुळं त्यांच्या लावणी वाङ्मयातला जातिवंत जिवंतपणा आपणाला जिव्या सुपारीसारखा झोंबतो. आमची सुपारी वाळलेली आणि पुटं चढवून मऊ केलेली. त्यामुळं त्यावेळचा आमचा प्रेमकवी राधाकृष्णाचा आडोसा तरी घ्यायचा किंवा प्रेमाच्या शिष्टमान्य कल्पनांचा आपल्या खर्‍या भावनेवर साज चढवून तिचा तोंडवळा कवितेत लपवून टाकायचा. माझ्या विधानाची सत्यता तुम्हाला पडताळून पाहावयाची असेल तर आपल्यातील चांगल्या कवींनी आपल्या पत्नीवर जी मनापासून कवनं लिहिली, ती त्यामानानं किती खरी वाटतात पाहा.
मी फार काळ वाट चुकलो नाही, याला माझ्या मते दोन कारणं घडली. विसाव्या वर्षी माझं लग्न झालं. त्यामुळं प्रणयाचा प्रत्यक्ष अनुभव मिळून माझा संकोच बराचसा चेपला गेला. दुसरं- त्या कालावधीत ख्रिस्ती समाजातलं माझं दळणवळण वाढलं. गोव्यातला ख्रिस्ती समाज बव्हंशी लॅटिन संस्कृतीत वाढलेला असल्यामुळं शृंगाराच्या बाबतीत तो अधिक प्रांजल, सौंदर्यासक्त आणि प्रीतीतल्या धिटाईचं कौतुक करणारा आहे. स्त्रीच्या सहवासात योग्य वेळी चातुर्यानं तिला उद्देशून समुचित Gallantry फेकणं हे त्यांच्यात सुसंस्कृतपणाचं लक्षण समजलं जातं. त्या समाजात वावरल्यामुळं माझी भीड चेपली आणि प्रेमभावना खरी असेल तर तिचा विमुक्त आविष्कार करण्यात कसलाच कमीपणा नसून, उलट पुरुषार्थच आहे असं मला वाटू लागलं. ‘प्रतिभा’ आणि ‘जीवनसंगीत’ यांच्या मधल्या काळातले माझे दोन छोटे हस्तलिखित कवितासंग्रह मी माझ्या गलथान व्यवहारात हरवून बसलो. ते आज हाताशी असते तर त्या काळात माझ्यात घडलेल्या या पालटाची काही प्रभावी प्रात्यक्षिकं तुम्हाला पाहायला सापडली असती."

प्रत्येक माणसाला आपल्या कर्मभूमीचे फार अप्रूप असते, आपल्या मातीची अलौकिक ओढ असते. आपल्या मायभूमीशी प्रत्येकाची नाळ जन्मतःच घट्ट जुळलेली असते. आपण ज्या मातीत जन्मलो वाढलो त्या मातीचे आपण सदैव ऋणी असतो. मात्र हे ऋण सर्वांना शब्दात व्यक्त करणे शक्य होत नाही. कवी मात्र आपल्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर आपल्या मनातले आभाळ मोकळे करत जातात. त्यांनी व्यक्त केलेले भाव वाचून आपल्याला वाटते की आपल्याच मनातील भावनांचा बंध कवीने हुबेहूब उलगडून दाखविला आहे ! अशा भावनांना शब्दबद्ध करणाऱ्या कवीस उच्च अभिरुची, आकलनक्षमतता आणि उत्तुंग प्रतिभाशक्ती यांची उत्कट देणगी लाभल्यास त्याच्या शब्दकळाना इंद्रधनुष्यी रंग चढतात ! कवी बा.भ. बोरकर अशा मोजक्या कवींपैकी एक होते. बालकवी जसे आपल्या सर्वांच्या मनात निसर्गकवी म्हणून रुजले आहेत तसेच बोरकरसुद्धा आपल्या मनात आनंदयात्री म्हणून विराजित आहेत. आपल्या जन्मभूमीचे, मातीचे, निसर्गाचे, ऋतूंचे, ऊनपावसाचे वर्णन करताना त्यांची लेखणी अधिक बहरते हे त्यांच्या कविता वाचताना सातत्याने जाणवत राहते. अनेकविध विषयांवर आशयघन कविता लिहिणारे बोरकर मराठी कवितेस भावोत्कट निसर्गकवी म्हणूनच परिचित आहेत.

सोबत दिलेली त्यांची कविता त्यांच्या मायभूचे गोव्याचे रसाळ वर्णन करते. हे वर्णन चित्रमय शैलीतले आहे, जणू कवी आपल्या शब्दकुंचल्यातून तिथले चित्र रेखाटून दाखवित आहेत असा भास इथे होतो.
माझ्या गोव्याच्या भूमीत ..
माझ्या गोव्याच्या भूमीत

गड्या नारळ मधाचे
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे !!

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फणसाची रास
फ़ुली फळांचे पाझर
फळी फ़ुलांचे सुवास!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले
भोळा भाबडा शालिन
भाव शब्दाविण बोले!!..... ... ... ... ....

आपल्या गोव्याच्या भूमीत काय गुण आहेत, ती भूमी कशी सुजलाम सुफलाम आहे, तिथे ऋतू कशी कुस बदलतात, तिथला निसर्ग कशी विविध रूपे धारण करतो, तिथली पानेफुले कसा श्वास घेतात, तिथल्या नात्यांत मायेची ओल कशी टिकून आहे, तिथली माणसे कशी अगत्यशील आहेत, तिथल्या भूमीत जीवनाची सत्वे कशी रुजून आहेत, तिथल्या भूमीत जन्मच नव्हे तर मृत्यूदेखील एक सोहळा कसा बनून जातो याचं प्रत्ययकारी रसाळ वर्णन बोरकरांनी कवितेत केले आहे.

गोव्यात नारळ मधाच्या कड्या-कपाऱ्यां मधुन दुधाचे घट फ़ुटतात, आंब्या-फणसाची रास फ़ुलून येते, इथल्या चवदार फळांचे पाझर फुलांना येतात आणि या फळांना फुलांचे सुगंध बिलगतात, इथे वनश्रीची अफलातून कारागिरी पहायला मिळते ; पाना-फ़ुलांची बुट्टीदार नक्षी कलाकुसर चक्क पशु-पक्ष्यांच्या पंखी किनारी उमटते. गोव्यातल्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा असतो तर पावसाळा दारापुढे सोन्याचांदीच्या धारा घेऊन येतो. इथे रात्रीच्या निरभ्र आकाशातले शुभ्र चांदणे माहेरवाशिणीसारखे येते अशी हळवी शब्दरचना बोरकरांनी केली आहे. ते म्हणतात की, 'हे चांदणे ओलावल्या नजरेने माहेरवाशिनी सारखे आकाश सागराची भेट घ्यायलाच येते !‘ आपला कल्पनाविलास अधिक खुलवून ते लिहितात की, ‘इथला चाफ़ा पानाविण फुलतो कारण तो भोळा भाबडा व अंगी शालीन भाव असलेला कवीच आहे मात्र त्याला बोलण्यासाठी शब्दांच्या कुबड्या लागत नाहीत !!

माझ्या गोव्याच्या भूमीत पिकणारा आणि इथल्या मातीतच मिळणारा भात आम्ही खातो हे सांगताना ते त्याला नात्यांची ओढ जोडतात. हा भात कुठेही आणि कुणाच्याही हाताने रांधून वाढलेला असला तरी ते हात सोनकेवडयाचे भासतात कारण त्या भातातच असे गुण आहेत की वाढणाऱ्याच्या मनात मातेची ममता जागृत व्हावी. इथली माणसेच केवळ अगत्यशील नाहीत तर इथले समुद्रकिनारेदेखील पाहुणचारासाठी भरून वाहतात, त्यांच्यावर असणारी रुपेरी किनार ही अतिथीगणांच्या आदरातिथ्यासाठी आहे व साऱ्या त्रिभुवनी अगत्याची षडरसाची नांदी असते.

कवितेच्या अखेरीस बोरकर गोव्यातल्या जीवनातील तत्वे उलगडून दाखवतात. इथे जो तो कर्म करत राहतो इथे कुणी पुण्याची मोजणी करत बसत नाही आणि चुकून कुणाच्या हातून काही चुकीचे घडले तर त्या चुकांचे शल्य उरी बाळगून बसण्यापेक्षा सत्कर्म करण्याकडे इथल्या लोकांचा कल आहे असं ते म्हणतात. अधिक सुलभ अर्थ व्यक्तवत ते म्हणतात की इथले जिणे हे जणू गंगौघाचे जल आहे ज्याला कशाचा लागभाग नाही आणि कशाचा पाठलागही नाही ! ते जगाच्या कल्याणासाठी वाहत राहते तशी स्थितप्रज्ञता इथल्या लोकांत आहे. आम्ही फुलांचे परागकणच आहोत. आम्हाला नावगाव नाही, स्वतंत्र अस्तित्व नाही कारण आम्ही निराकार आहोत. आम्ही जणू मेघमल्हार आहोत ज्याचे स्वरूप जीवनपूजेतल्या धूपासारखे आहे, धूप जसा सुगंध देऊन हवेत विरत जातो तसे हे आमचे आयुष्यरुपी निळे मेघ हळूहळू विरत जाणार आहेत. मरण कुणाला चुकलेले नाही, बीजांकुरापासून ते वृक्षापर्यंत झाडांचा प्रवास होतो मात्र झाड वाढत असताना त्यावरील पानेफुले पानगळ आली की गळून जातात. प्रत्येक पिकल्या पानाला कधी न कधी गळून जायचे आहे मात्र आपले गळून जाणे व्यर्थ न होऊ देता आपल्याला प्रभूचरणी अर्पण केले तर आपले मरण हा एक सोहळा होऊन जाते. मग त्या पानाफुलांना निर्माल्याची जी कळा प्राप्त होते ती जीवनाचे सार्थक करणारी असते असं भावोत्कट अंतिम सत्य बोरकर या कवितेत मांडतात. रूपक अलंकाराचा खुबीने वापर करून काहीसे क्लिष्ट वाटणारे अध्यात्म त्यांनी सरल शब्दात मांडले आहे.

बोरकरांच्या कविता पाठ्यपुस्तकातून सर्वांच्या परिचयाच्या होऊन गेल्या आहेत. त्यातील गेयता, तरलता व आशयसमृद्धी यामुळे त्यांच्या कविता अनेकांच्या स्मृतीत कायमच्या कोरल्या गेल्यात.
जीवन त्यांना कळले हो…
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो..... ... ...
उरीच ज्या आढळले हो!
ज्यांचे मीपण गळून गेले, ज्यांचे मन जळापरी निर्मळ होऊन गेले, जे सकळांचे स्नेही होऊन गेले, मायेच्या सप्तसिंधू ज्यांच्या हृदयी उगमल्या, जे दिनदुबळ्यांच्या मदतीस धावून गेले, ज्यांना पाहून षडरिपूंचे दहन झाले, ज्यांच्या सहवासाने पुण्यच उजळून निघाले फार कर्मकांडांचे द्राविडी प्राणायम न करताही सहजतेने परब्रम्ह ज्यांच्या ठायी आढळले त्यांना जीवन कळले असं परखड मार्मिक जीवनवादी विवेचन बोरकर करतात.

गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले
शीतल तनु चपलचरण अनिलगण निधाले॥
धुंद सजल हसित दिशा
तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे घन घनात बघुनि मन निवाले॥
टप टप टप पडति थेंब
मनिंवनिंचे विझति डोंब
वत्सल ये वास भूमि आशीर्वच बोले......जलद भरूनि आले॥
द्रुत चालीत गायली जाणारी ही कविता माहित नाही असं म्हणणारा मराठी माध्यमातील शालेय शिक्षण घेतलेला विद्यार्थी अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेला नाही. गती आणि नाद यांचं एक गडद नातं बोरकरांच्या पावसाळी कवितांमध्ये होतं. पूर्ण भरून आलेले ढग आणि त्यांचा खेळ, वार्याचे भरधाव लोट, डोलणारे माड अशा तृप्त निसर्गाचे चित्र उभं करणारी ही कविता भर वैशाखात देखील वर्षाऋतूचा आभास निर्माण करून जाते.

''दिशा दिशातून आषाढाच्या श्याम घनांना पूर
तृणाप्रमाणे मनेंहि झाली चंचल तृष्णमयूर॥''
बोरकरांनी आषाढाच्या विनवण्या केल्या आहेत. मनाची अवस्था तृणासारखी चंचल झाली आहे, मेघ नुसतेच गोळा होताहेत पण बरसत नाहीत त्यामुळे ही जलतृषा आणखी ताणली जातेय तेंव्हा आणखी अंत न पाहता मेघांनी बरसावं असं आर्जव ते करतात.
त्या विनंतीने मेघ जागीच थांबले आणि मरवा चुरल्यागत तरल हवा मिरमिरु लागली. मग हवेतून हा गारवा चक्क कवेत येऊन थांबला. पण हे कसे शक्य झाले ? यासाठी साक्षात वसुंधरेने मेघांना सांगावा धाडला -
''मंद झाले ऊन, व्योमी सातरंगी सायकाला
लांब गेले पत्रभूचें थांबलेल्या पावसाला
आणि ढग आले- येई घना । अजुन पुन्हा अजुन पुन्हा
चाहूल लागून तुझी। हर्ष वना विहंगजना.''
धरित्रीचा भावगर्भित निरोप जाताच वरुण हेलावून गेला आणि तो भूवरी उतरला -
''चुरल्यागत सखि मरवा। मिरमिरते तरल हवा
ये कवेंत या हवेत। या सम नच ऋतू हिरवा॥'

''लक्ष आंचळांनी दुभे । निळी आकाशाची गाय
भिजणा-या तृप्तीवरी। दाटे संतोषाची साय ॥''
नभांतून पाऊस कसा निर्माण झाला आणि त्याने मनाला संतोष कसा लाभला याचे याहून विलोभनीय वर्णन अन्य कुणी केले नसेल !
जीवाला हुरहूर लावणारी प्रतीक्षा संपुष्टात आणून पावसाच्या जलधारा कोसळू लागल्यावर त्या पावसाचे मनोहारी असे वर्णन बोरकरांनी केले नाही तर ते नवलच !
'झुरूमुरू झुरूमुरू। धारा लागती या झरू
हरपले होते ते ते। पाहे हळूच अंकुरू॥ '
झाले हवेचेंच दहीं। मातीलोण्याहून मऊ।
पाणी होऊनियां दूध। लागे चहूकडे धावू ॥

मात्र जलधारा नेहमीच भैरवीच्या तालात हळुवारपणे येतील असे काही सांगता येत नाही, त्यातल्या त्यात श्रावणात तर त्याचा काही भरवसा नाही. कधी कधी तो शृंगारासाठी इतका आतुर होऊन जातो की एखाद्या धटिंगणासारखी धरणीशी लगट तो करू लागतो. मग ह्या सजल्या सवरल्या नववधूस या सरींचा राग येतो मात्र तोही लटकाच असतो. कारण तिलाही तो हवाच असतो. आपला सारा शृंगार उधळणाऱ्या पावसाच्या ओलेत्या मिठीत ती विसावते.
" धटिंगण पावसाने बाई उच्छाद मांडिला
माझा फुलांचा शृंगार ओली चिखली सांडला. "

''फांदीसारखी झुकते सांज ।
जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन ।
पेंगुळपांगुळ होते जग ॥ '
जांभूळ पिकले की खाली पडते, ढग पिकले की त्यातून मोत्यांचे टपोरे जलबिंदू पडतात आणि पाणी होऊन ते बिंदू मातीवर बिलगतात ! बोरकरांनी केलेली ही अद्भुत कल्पना त्यांच्या रसिकतेचा आरसा आहे.

'समुद्र बिलोरी ऐना' या कवितेत श्रावण म्हणजे सृष्टीला लागलेला पाचवा महिना अशी वेगळीच कल्पना बोरकरांनी केली आहे. ते लिहितात -
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पांचवा म्हैना ॥
कटीस अंजिरी नेसूं। गालात मिस्किल हसू
मयूरपंखी, मधुरडंखी। उडाली गोरटी मैना॥ .... ...

अशा सुंदर मोसमात फुलपाखरांनी नटलेल्या श्रावणदर्शनाच्या आनंदाची प्रचीती घेण्यासाठी एखाद्या वर्षी खरंच तुम्ही गोव्यात याच असे आमंत्रण बोरकर या कवितेत आवर्जून देतात.
बोला कुणा कुणा हवे फुलपांखरांचे थवे
जादुगार श्रावणाच्या कर्णकुंडलीचे दिवे॥
कोणी उन्हेरी चंदेरी कोणी अंजिरी, शेंदरी
मोरपिसापरी कोणी वर्ख ल्यालेले भर्जरी॥ .. ....

पावसाच्या सरी यायला लागल्या की सारे विश्व त्यात दंग होऊन जाते, सकळ धराच नव्हे तर गोपी, कृष्ण देखील देहभान हरपून जातात. चिंब भिजून गेलेले कदंबसुद्धा त्यात हर्षोल्ल्हासाने मोहरून जातात, थरथरू लागतात आणि सकल भूमी जणू गोकुळ होऊन जाते .
'सरीवंर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कांपति कदंब निंब
वेली ऋतूमति झाल्या गं... सरीवर सरी आल्या गं.

या पावसाने सृष्टी आनंदून जाते, दुःख वेदनेत बुडून गेलेला श्रमलेला जीवदेखील निर्धोक होऊन जातो, पहाटेची किरणे गवताच्या पात्यांवर हिरे वेचीत फिरतात आणि वरूणराजाच्या आगमनाने सुखावलेला मोर पिसारा फुलवून नाचू लागतो असं नयनरम्य चित्रदर्शी वर्णन बोरकर या कवितेत करतात.
जोवर हा पाऊस पडतो जगात। वेडा मोर नाचतो वनात॥
पहाटेची किरणें भुलून। हिरे वेचित फिरती तृणांत ॥
तोवर सुखास अंत नाही। माणुसकीला धोका नाही ॥
चंद्रमौळी संसार आपला। दु:खांत देखील ओका नाही॥

जलवर्षावाचा आनंद घेण्यात कोणीच मागे राहत नाही, राजेश्री श्रावणास कसा अवर्णनीय आनंद होतो याचे देखणे वर्णन या कवितेत आहे, मृदगंधाची अंगुली वारा हलकेच गालास लावून गेला असे भावविभोर वर्णन इथे आहे. मग मेघांना हलकेच बाजूला सारून रित्या झालेल्या आकाशाचे नाजूक चुंबन घेत साळीची बालके उभी आहेत असं वाटते. या साळी माथी शिरपेचही लेतात कारण श्रावणात सतत उनपावसाचा खेळ सुरु असतो !
जणू काही जरतारी आंगी। माथा शिरपेंच ल्याली
पाणियाच्या वाक्या- वाळे। पायी घेऊन नाचली
गेला वारा गंधांगुली। त्याच्या गालांना लावून
मेघ सारून आकाशें। त्यांना घेतले चुंबून
त्यांना पाहून फुटलें। हसू राजेश्री श्रावणा
लोणियाने बळावला। त्यांच्या ओठातला दाणा॥

मग हा देखावा आपल्याला दिसावा म्हणून उन्हाने सजलेले छोटेसे गांवही आपला चेहरा पाहण्यासाठी -
उंचावरून झुकें जरासें
निळया तळयाच्या पारज कांठी.....
निरोप घेणाऱ्या श्रावणाची ओढ आणि अपार अप्रूपही इथे दिसते.

या साऱ्या कवितांतून किती देखणे आणि लोभसवाणे वर्णन बोरकरांनी केलंय ना ! जणू ते गाव, तो पाऊस आणि तो चिंब झालेला तृप्त निसर्ग आपल्या मनःचक्षुपुढे उभाच राहतो !
मग या निसर्गाचे ऋण व्यक्तवण्यासाठी ते पुढे होतात. या पानाफुलांची ते पूजाच बांधतात, तिथे मंगलनाद घुमवतात -
हळद लावुनी आलें ऊन। कुंकुमाक्षता फुलांमधून ॥
झाडांमधुनी झडे चौघडा। घुमते पाणी लागून घून ॥

या सोहळ्याने दिग्मूढ होऊन तो(पाऊस) वसुंधरस बोलून जातो -
लावण्याचा लागुन बाण। तृप्तीलाही फुटे तहान ॥
मला खोवू दे तुझ्या कुंतली। एकच यांतिल पान लहान ॥

या अथांग आनंदी जीवनाबद्दल बोरकर कृतज्ञता व्यक्त करत म्हणतात -
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके,
चांदणे ज्यातून वाहे, शुभ पार्यासारखे.
असं विलक्षण देखणं जीवन जगणारे, रसिकमनांना आपल्या काव्यानंदाने तृप्त करून टाकणारे बा.भ. बोरकर खऱ्या अर्थाने आनंदयात्री कवी होत !

बोरकरांच्या संपूर्ण काव्यप्रवासात त्यांची कविता जीवनाच्या गतीनुसार आशयदृष्ट्या समृद्ध होत गेलेली दिसते. ते सौंदर्यलुब्ध मनाचे कवी होते. या सौंदर्यातूनच त्यांना दिव्यत्वाचा, अपार्थिवाचा साक्षात्कार होतो.
दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती,
यज्ञी ज्यांनी देऊनी निज शीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभुमीवर, नाही चिरा नाही पणती,
तेथे कर माझे जुळती.

या कवितेतील मानवतावादामागील सच्चेपणा आपणास आजही भावतो. अतिशय प्रगल्भ व अर्थगर्भ शब्दयोजनेमुळे ही कविता मैलाचा दगड ठरली. ज्ञानदेव गेले तेव्हा, देखणे ते चेहरे, जीवन त्यांना कळले हो अशा एकाहून एक सरस कविता त्यांनी लिहिल्या. स्त्री सौंदर्य आणि प्रेमभावना हेदेखील त्यांच्या कवितांचे प्रमुख विषय होते. तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व नादमयता हा त्यांच्या कवितेचा विशेष आहे. समृद्ध शब्दभांडार, अक्षरगणवृत्ते, मात्रावृत्ते यावरची त्यांची हुकूमत; नाजूक, नादमय व छंदोबद्ध रचना या वैशिष्ट्यांनी नटलेल्या त्यांच्या कवितेने मराठी रसिकांवर पाच दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली. वास्तवाच्या प्रखर आचेतही बोरकरांच्या कवितेने काव्यात्मतेची स्वप्नील धुंदी टिकवून ठेवली. सुंदरतेच्या श्रद्धेतून, श्रुतिमधूर, गीतधर्मी व भावपूर्ण कवितांसाठी आजही ते आदरपूर्वक ओळखले जातात.

बा. भ. बोरकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९१९ रोजी गोव्यामधील कुडचुडे या गावी झाला. त्यांचे मराठी भाषेचे शिक्षण जेमतेम दोन इयत्ता होते. पुढील शिक्षण पोर्तुगीजमधे झाले. पोर्तुगीज टीचर्स ट्रेनिंग प्रमाणपत्र परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या घरात बोलली जाणारी भाषा कोकणी होती. त्यांचे मोठे, एकत्र कुटुंब होते, तसेच घरात आध्यात्मिक वातावरण जास्त होते. सकाळपासूनच भूपाळ्या, स्तोत्रे, पदे, आरत्या असे सुरू असे. संध्याकाळी अभंग, विराण्या, गौळणी, भारुडे, भजन असे विविध काव्यप्रकार तालासुरात म्हटले जात. त्या सर्वांचे त्यांच्या मनावर बालपणापासूनच संस्कार झाले. त्यांच्या घरात भजनाच्या वेळी लहान मुलांनी रोज एक नवा अभंग पाठ करून म्हटला पाहिजे असा दंडक होता. एकदा बोरकर अभंग पाठ करायला विसरले. मग आयत्या वेळी स्वत:च रचलेला एक अभंग त्यांनी म्हणून दाखवला व संतकवींच्या पद्धतीप्रमाणे शेवटच्या चरणात बाकी म्हणे अशी रचना केली. पण घरच्या लोकांना हा अभंग त्यांनी लिहिला असेल हे खरेच वाटेना. तेव्हा अजून एक अभंग त्यांनी तात्काळ रचला आणि म्हणून दाखवला.

साहित्यात चुणूक असणाऱ्या बोरकरांना मॅट्रिकनंतर खर्च झेपणार नाही म्हणून शिक्षण सोडावे लागले. टीचर्स डिप्लोमा घेतल्यामुळे त्यांना पोर्तुगीज मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. नंतरच्या काळात आमचा गोमंतक (१९४८), पोर्जेचो आवाज (१९५५) या पत्रांचे ते संपादक होते. पुढे १ नोव्हेंबर, १९५५ रोजी (पुणे-पणजी) आकाशवाणीवर स्पोकन वर्ड प्रोड्यूसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आकाशवाणीमध्येच १९७० पर्यंत काम करून ते निवृत्त झाले.

१९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा ‘प्रतिमा’ हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदागज यांचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो. निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे अत्यंत देखणं वर्णन त्यांनी केलंय. ते लिहितात – “या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात...” किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य वर्णन आहे हे ! यातल्या प्रत्येक शब्दात जिव्हाळा जाणवतो हे विशेष होय.

बोरकरांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्गभाषा हेच त्यांचे वेगळेपण. बोरकरांनी कथा, कादंबरी, अनुवाद, ललितलेख असे इतरही वाङमयप्रकार हाताळले पण मनाने, वृत्तीने ते कवी म्हणूनच राहिले. कविता हेच त्यांचे खरे सामर्थ्य होते. स्वत:च्या पिंडधर्माशी प्रामाणिक राहून एक प्रकारच्या आत्ममग्न वृत्तीने ते कविता लिहीत.

कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप प्रभाव दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यां साऱ्या विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व व जीवन अधिक समृद्ध झाले.

१९४६ साली त्यांच्या सुस्थिर जीवनामध्ये एकाएकी बदल घडून आला. यावर्षी डॉ. लोहिया यांनी कायदेभंग करून गोव्याच्या राजकीय स्वातंत्र्यसंग्रामाचे रणशिंग फुंकले, आणि क्षणाचाही विचार न करता आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याकरिता या आंदोलनात बोरकरांनी स्वत:ला झोकून दिले. डॉ. लोहियांच्या आंदोलनाची सुरुवात झाली मंगळवारी, त्यावर बोरकरांनी त्रिवार मंगळवार ही कविता लिहिली.
त्रिवार मंगळवार आजला त्रिवार मंगळवार,
स्वातंत्र्याची सिंहगर्जना आता इथे उठणार...
‘गोंयान् लोहिया आयलोरे’ हे त्यांनी लिहिलेले उत्स्फुर्त गीत गोव्याच्या घराघरातील ओठांवर होते. दहा माणसांचा आपला संसार वाऱ्यावर सोडून, सरकारी कायम नोकरीचा त्याग करून बोरकरांनी या आंदोलनात उडी घेतली व आपल्या कवितेने राष्ट्रपेम चेतवण्याचे कार्य केले.

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले पण ते फाळणीचा घाव घालून तेव्हा बोरकर व्यथित झाले. बोरकरांनी मायभूमीच्या चरणी आपले मस्तक ठेवताना त्यांना जाणवलेल्या काही व्यथाही बोलून दाखवल्या आहेत -
‘दुभंग झाली वास्तुदेवता, दुभंग झाली मायाममता,
भावांच्या घावातुनि निघती, नव्या विषाच्या सरी,
घाम आपुल्या शिरी, बापुजी घाव आपुल्या उरी,
स्वातंत्र्याची अशा दिवाळी, कशी करु साजरी...’
या ओळींतून सर्वसाधारण भारतीयांचे दुखावलेले अंत:करण व्यक्त होताना दिसते.

बोरकरांच्या 'भावीण' या कादंबरीला १९५० मध्ये गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या आनंदभैरवी, चित्रवीणा, गितार, आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. १९६७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आले. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या बहुमोल सकिय सहभागाबद्दल भारत सरकारतर्फे १९७४ मध्ये ताम्रपट देण्यात आला. त्यांचे गोव्यावर व कोकणी भाषेवरही अतिशय उत्कट प्रेम होते. कोकणी भाषेतही त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील ‘सासाय’ या कोकणी संगहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

बोरकरांनी लिहिलेल्या उत्कृष्ट कविता निवडून काढायच्या म्हटलं तर त्यातल्या बहुतेक प्रेमकविताच असतील. प्रेमभावनेच्या अनेक छटा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या प्रेमकवितेत शरीर नाकारलेलं नाही. ते धुंद, रंगेल, विलक्षण सुंदर होऊन त्यांच्या प्रेमकवितेतून प्रकट होतं. शरीर अनुभव खोटेपणानं नाकारायचे आणि तथाकथित उच्च अशा प्रेमविषयक कल्पनांभोवती नाटकी गहिवर काढत नि:सत्त्व शब्दांची रुंजी घालीत बसायचं, हा प्रकार त्यांच्या काव्यात कुठंही आढळत नाही. ‘स्मृति’, ‘स्पर्श’, ‘जपानी रमलाची रात्र’ यांसारख्या त्यांच्या कविता मराठीची चिरंतन भूषणं आहेत.
'रतिरत कुक्कुटसा कुंडीवर
आरोहुनि माड
चोंच खुपसुनी फुलवित होता पंखांचे झाड..
..करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पाच उकळती
यांहिं रंगलेले
अभीष्ट त्यांचें चिंतुनि आम्ही भिडवियले कांठ
सुरेहुनी तू गडे भाजिले
ओठांनी ओठ….'
यातली प्रत्येक प्रतिमा कानशिलांच्या तारा झणाणून टाकणार्‍या धुंद वासनेच्या मुशीतून निर्माण झालेली आहे. धाबळीतल्या सोवळ्या अध्यात्माला या ओळींनी धक्का बसेल कदाचित; पण बोरकरांना यात माणसाच्या शरीराचा श्रेष्ठ गौरव आढळतो.

हीच रगेल, धुंद भाषा जेव्हा अबोलात बोलणार्‍या प्रीतीचा अनुभव व्यक्त करू पाहते तेव्हा एका वेगळ्या पातळीवर तेवढीच तरल बनते :
'तुला मला उमगला जिव्हाळा
जन्माचा पट फिटला गं
अन् शब्दांचा प्रपंच सगळा कमळासम हा मिटला गं
तुला पाहता पहाट वाटे ओती कुरणीं मोतीं गं
प्रभेस मिळती कृतार्थ होती अभिलाषांच्या ज्योती गं
..मन तव चंद्रापरि करि सोबत जेथे संचित नेतें गं
चराचरातुन प्रेमळपण तव हासत जवळी येतें गं ….'

पण त्यांची प्रेमकविता खरी खुलते तिच्यात उदासाचा सूर असताना :
'काळवंडली जळें
चिंचही न सळ्सळे
वाटते भयाण सर्व सलत आंत कातरा !'

..अशा कातर सलवणार्‍या क्षणाच्या वेळी. हाच आर्त क्षण ‘स्मृति’ या कवितेत किती हळुवार प्रतिमा धारण करतो. शब्दांनी जे सांगायचं ते सारं सांगून होतं- आणि तरीही सांगूनही न संपणारं खूप काही सारखं जाणवत राहतं :
'सूर ओथंबून कंठी कर्दळी भारावल्या
मुग्ध झाडांच्या तळीं भांबावल्या या सावल्या
स्वैर एकाकी भ्रमे दिङ्मूढ वेडा काजवा
खिन्न झाला दोडकीच्या स्वप्नपुष्पांचा थवा....
अशा वेळी ‘स्वरशृंगाराचा’ सोस त्यांच्या शब्दांना नसतो. तत्त्वज्ञानाच्या बेड्या कवितेच्या पायात अडकलेल्या नसतात.
'खूप खूप बोलायचें येतों मनांत योजून
तुला पाहतां पाहतां जातों सारें विसरून….'
अशी शब्दांची मर्यादा अचानक कळते. आणि म्हणूनच आशयाने भारलेला नि:शब्द बोलका होतो : सूचक प्रतिमांतून उतू जातो !

बोरकर या प्रेमकवितांचे रहस्य उलगडताना म्हणतात की, "माझ्या भाग्यानं विपुल आणि समृद्ध प्रेमजीवन माझ्या वाट्याला आलं. ते मी नि:संकोचपणानं जगलो. प्रांजळपणाने, निरागसपणाने जगलो. अगदी धुंद होऊन आणि सर्व प्रकारचे धोके पत्करून जगलो. त्यावर मी पापाचे शिक्के कधीच मारले नाहीत. उलट, मी ती पुण्यसाधनाच मानली. आपल्या आणि प्रेयसीच्या प्राणाचा ठाव घेण्याच्या या आर्त भक्तीनं प्रेमभावनेच्या शारीर पातळीपासून आत्मिक पातळीपर्यंतच्या तिच्या चढत्या ‘सिंफनीज’ मला उमगत गेल्या. आपल्यावर जिवाभावाने प्रेम करणारी स्त्री ही आपली संरक्षक आणि संजीवन देवता आहे, अशी माझी जन्मजात श्रद्धा आहे. आयुष्याच्या अंतापर्यंत तिची नित्यनूतन स्तोत्रं माझ्या मन:कोषांतून सतत उमलत, विकसत राहावी अशी माझी आकांक्षा आहे. ज्या उदासाच्या सुरामुळे ती विशेष हृद्य होते. त्यालाही कारण आहे. प्रीतीच्या साधनेत प्रेयसीच्या जीवनात दु:ख येऊ देऊ नये म्हणून पुष्कळसं दु:ख आपल्याला धीरानं गिळावं लागतं, तर कधी दिव्य प्रीतीला लौकिकाच्या जगात क्षयाचा शाप आहे, याचा वरचेवर प्रत्यय येऊनही तिच्या ठिकाणची श्रद्धा ढळू नये म्हणून जाळणारी आग आतल्या आत पचवावी लागते. मी या दिव्यातून गेलो आहे. माझ्या प्रेमकवितेच्या यशाचं काही रहस्य असलंच तर ते माझ्या या मनोधारणेत आणि जीवनसरणीत आहे."

'आनंदाने गुरे हांकिली फणसाच्या पानांची
त्यांहि बिचाऱ्या गोडी होती गवताविण कुरणांची…'
अशा समृद्ध पंक्तींनी आपल्या निसर्गकविता सजवणाऱ्या बोरकरांवर बालकवींचा मोठा प्रभाव होता, ‘प्रतिभा’ या काव्यसंग्रहात दिसणारा निसर्ग हा त्या प्रेमकवितांप्रमाणेच कचकडय़ाचा वाटतो. या निसर्गप्रतिमा अनुभवांतून आलेल्या नाहीत; त्या वाचनातून- विशेषत: बालकवींच्या काव्याच्या वाचनातून- आलेल्या आहेत असं वाटते . खरं म्हणजे त्या प्रतिमा नव्हेतच; नुसते शब्द आहेत. निर्झरिणी, राघूमैना, पवनाचा हिंदोल, गगनश्रीच्या मानसांतले कमळ, विपिनें, वनमाला, फुलराणी, हरिणाची बाळे, अष्टदिशांचा गोफ.. ही सर्व मंडळी न चुकता आपली हजेरी लावून जाताना दिसतात. हे सारे बालकवींच्या कवितेतून (मोठ्या प्रेमाने) उचललेले केवळ शब्द आहेत, हे ध्यानात यायला वेळ लागत नाही. बालकवींच्या काव्यातली शक्ती नेमकी कुठं आहे, हे इथं जराही कळलेलं नाही. कळली आहे ती त्यांनी वापरलेल्या प्रतिमांची रेडिमेड यादी. केवळ बोरकरांच्याच नव्हे, ‘मनोरंजना’तून प्रसिद्ध होणाऱ्या त्या काळातल्या बहुतेक कविता अशाच बेगडी होत्या. एक तर या निसर्गप्रतिमा यांत्रिक यादीवजा असत किंवा त्यांचा उपयोग प्रवेशाशी सुतराम् संबंध नसलेल्या नाटकातल्या पडद्यांप्रमाणं नकली, सजावटवजा केला जाई; निसर्गप्रतिमा ही भाववृत्तीचा अपरिहार्य भाग बनलेली नसे.

'झळझळती गवताच्या गंजी
हवेत भ्रमती चतुर किरमिजी
अहा पिसोळी पुष्पदळांसम वाहात भिडति तृणास….'
अशा ओळी लिहिण्यापर्यंतचा आपला प्रवास कसा झाला हे सांगताना बोरकर प्रांजळ कथन करतात. ते म्हणतात - "शरीरानं दुबळं, मनानं कोवळं आणि बुद्धीनं तल्लख असं मी एक उपेक्षित मूल होतो. आमच्या मोठ्या कुटुंबात आई अष्टौप्रहर घरकामांत गुंतलेली असे आणि वडील आपल्या कामधामात. त्यामुळं माझ्या भावनांची नेहमीच उपासमार झाली. घरात वारंवार अन्याय, उपेक्षा, उपहास, विपर्यास, देहदंड आदी शल्यं माझ्या वाट्याला येत आणि ती बोलून दाखवण्याचं विश्वासाचं कोणतंच स्थान मला नव्हतं. मुलांना आपण नेहमी फुलांची उपमा देतो, पण माझ्या लहानपणचा अनुभव अगदी याच्या उलटा आहे. वर्गातल्या अभ्यासात ज्या मुलांना मी वरचढ होतो, ती दणकट मुलं खेळात आणि अन्य वेळी माझ्या दुबळेपणाचा आणि कोमलपणाचा फायदा घेऊन नाना परीने मला छळीत असत आणि रडता रडता माझी पुरेवाट होई. घरात किंवा सवंगड्यांत अशी दु:खं सोसावी लागली म्हणजे घरामागची बकुळ, टेकडीवरची जांभ्या खडकांची कमान, गावच्या नदीचा काठ, बांबूंच्या जाळीतला चंद्र यांच्याशी हितगुजं करीत मी जिवावरचा दु:खांचा भार हलका करीत असे. माणसांइतकंच हे स्थिरचर मला सजीव वाटे आणि माणसांपेक्षाही अधिक स्नेहल वाटे. त्याचमुळं बालकवींच्या निसर्गकवितेनं माझ्या मनाची पूर्णपणं पकड घेतली. निसर्गातले बालकवींचे स्नेहीसोबती मी आपलेसे करून घेऊ लागलो. माझा प्रयत्न कविता लिहिण्याचा नव्हता; या मंडळींशी स्नेह जोडण्याचा होता. निसर्गातल्या आपल्या स्नेह्यांना स्वत:चं सुखदु:ख प्रत्यक्षात सांगावं आणि बालकवींच्या असल्या स्नेह्यांशी कवितेतून नवं नातं जोडावं, असं माझं त्या काळात चाललं होती. १९२६ साली मी धारवाडला गेलो तेव्हा कुठं गोव्यातल्या निसर्गासाठी मी झुरू लागलो होतो. पुढं जेव्हा खर्‍या अर्थानं माझ्यातला कवी जन्माला आला, तेव्हा कलावंताच्या तटस्थ आस्थेनं गोव्यातील निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी मला लाभली. ही दृष्टी, मला वाटतं, मला १९३० नंतर आली. त्यासाठी गोव्याच्या दीर्घकालाच्या वियोगातून मला जावं लागलं. इतके दिवस मी कवितेतून जीवनाचं पोषण मिळवीत होतो. आता आपल्या आंतरिक जीवनाचा आविष्कार करण्याची ऊर्मी माझ्यात जागी झाली. हे सारं नेमकं केव्हा आणि कसं घडलं, हे मला सांगता येत नाही. पण भाऊ बहिणीला फार वर्षांनी भेटावा आणि ती उफाडय़ानं वाढलेली पाहून त्याला तिच्या सौंदर्याची आजवर न झालेली जाणीव अकस्मात प्रत्ययाला यावी, तसं काहीतरी यावेळी घडलं असावं !"

स्वतःच्या लेखनाचे इतके परखड आणि स्पष्ट चिकित्सक मुल्यांकन करणारे कवी आणि इतकं आशयसंपन्न, प्रतिभाशाली लेखन करूनही त्यास केवळ अपूर्ण व निमित्तमात्र प्रकटीकरण असा दर्जा देणारे अभिजात गुणी साहित्यिक आपल्या मायमराठीत होऊन गेले ही आपल्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल.

- समीर गायकवाड

साभार लेखन संदर्भ – रमलरात्रीत रंगलेले बोरकर : ले. मंगेश पाडगावकर

४ टिप्पण्या: