नागपंचमी आणि बांगडया यांचे नाते म्हणजे आई आणि मुलीच्या नात्यासारखे !
मुलगी आईजवळ असली की उजळून निघते, तिला लकाकी चढते.
लेक आईपाशी आली की आईचा जीव आभाळाएव्हढा होतो. तसंच या बांगड्या आणि स्त्रीच्या नात्याचं तत्व आहे ! नागपंचमीला हात बांगडयांनी मढून निघाले की त्या बांगड्यांना निराळेच चैतन्य लाभते.
अन बांगड्या हाती चढल्या की त्या परिधान करणाऱ्या स्त्रीला मुठभर मांस अंगावर चढल्यासारखे वाटते अन तृप्तीची लकेर तिच्या स्मितहास्यात चमकून जाते.
अलीकडे शहरात मोठाले वासे आणून झोके बांधले जातात अन स्त्रिया त्यावर उंच उंच झोके घेतात अन झोके घेतानाच हलकेच आपल्या माहेरच्या नागपंचमीच्या आठवणीत दंग होऊन जातात.
शहरात नागपंचमीला सासूरवाशिनी आपल्या माहेरघरी येतात की नाही हे माहिती नाही पण गावाकडे अजूनही मोठ्या प्रमाणात महिला आपल्या माहेरी एक दिवसाची का होईना हजेरी लावून जातात.
नागपंचमी जवळ आल्याची पहिली बातमी कासाराच्या घरापुढे वाढलेल्या लगबगीने मिळते अन उंच झोक्याने त्या बातमीला पुष्टी मिळते !
नागपंचमी हा सण अगदी मोक्याच्या वेळेवरचा सण आहे, ज्या बहिणीला राखी बांधण्यासाठी प्रत्यक्ष यायला जमत नाही ती नागपंचमीला आपल्या भावाला डोळ्याच्या पंचारतीने ओवाळून सासरी परत जाते. या काळात आसमंतात पाऊस पडत असतो सृष्टी हिरवाईत न्हाऊन निघालेली असते अन सासरच्या उन्हाळयात होरपळून निघालेल्या आपल्या मुलीला जणू निसर्गच हाक देतो ! आषाढातच या मुली माहेरच्या दिशेने डोळे लावून बसतात अन दिवेअमावास्येला त्या माहेरच्या सांगाव्याची आपल्या पतीराजाला आठवण करून देतात. चैत्रात लग्न होऊन गेलेल्या स्त्रीसाठी तर नागपंचमी हा सर्वात मोठा सणच कारण ती या दिवशी माहेरी येऊन रक्षाबंधन करूनच सासरी जाते. माहेरकडून आलेला 'आखाड' या नागपंचमीची ओढ आणखी तीव्र करत जातो अन आईने पाठवलेले तिखट धपाटे गोड होत जातात !
घाल घाल पिंगा वारया असं आर्जवं करत एके काळी वारा हाच या सासूरवाशिनींचा निरोप्या बनून जायचा. त्याची कारणे सुद्धा तशी होती. काही दशकापूर्वीच्या काळात दळणवळणाची साधने अत्यंत त्रोटक होती, आठवण झाली म्हणून लगेच माहेरी जाऊन यावे तर तेंव्हा वाहने अगदी कमी असत. गावाकडच्या भागात तर त्यांची वानवा असे. मग या सासूरवाशिणीचा जीव टांगणीला लागून राही एखादया दिवशी जास्त आठवण झाली की पातेल्यात ठेवलेले दुध तिच्या डोळ्यादेखता उतू जाई अन तिच्या डोळ्याला पाण्याची धार लागून राही. तिची सासू,सासरा, नवरा, नणंद हे लोक जर चांगल्या स्वभावाचे असले की ते ओळखून घेत अन तिच्या नवऱ्याला संध्याकाळी घरी आल्यावर घडला प्रकार कानी घालत. तो तिला एखादे पोस्टकार्ड देई, त्या टिचभर कागदावर ती आपल्या मनातले अवघे आकाश असं काही रिते करून टाकत असे की ते पत्र तिच्या माहेरी पोहोचताच सारयांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागत ! तिची खुशाली कळवणारे ते पहिले पत्र तिच्या माहेरी अनेक भावनांचा कल्लोळ निर्माण करून जाई. त्या काळी आजच्या सारखे मोबाईल नव्हते, एखादया तालेवार माणसाच्या घरी टेलिफोन असायचा ज्याच्यावर ट्रंककॉलची सुविधा असायची पण एका बाजूलाच फोन असून चालते कुठे ? यावर उपाय एकच पत्र लिहून आपले मनामनातले भावबंध गुंफत राहणे. पण पत्रे तरी किती लिहिणार ? शेवटी त्याला सुद्धा मर्यादा असायच्या. कारण टपालपेटी एखादीच असायची, तिच्यासाठी पोस्टमन देखील तोकडेच असत. शिवाय सासरच्या लोकांना 'आपलं हे सारखं पत्र पाठवणे आवडले नाही तर उगाच का त्यांची नाराजी ओढावून घ्यायची' या कारणाने पत्रांचा ओघ हळूहळू कमी होई. मात्र मनातला आठवणींचा आवेग कधीकधी संयमाचा बांध फोडून बाहेर पडे तेंव्हा या नवविवाहितेच्या काळजात चर्र होऊन जाई. ती सैरभैर होई, तिचा ठाव लागत नसे, तिचे चित्त उदास होऊन जाई अन तिच्या मनाला भास होऊ लागत. अशा वेळी ती निसर्गाला आपला निरोप्या बनवी अन आपला माहेरसाठीचा सांगावा त्याच्याकडे मोठ्या जड मनाने सोपवत असे. आता तसे नाही, आता मोबाईलवर एका सेकंदात सगळं विश्व पुढ्यात हजर होतं म्हणूनच की काय कोण जाणे नात्यांची वीण आता उसवत चाललीय. माहेरची ओढ सुद्धा आता फिकी होत चाललीय अन अशा जुन्या सणवारांचे महत्व हळूहळू लोप होत चाललंय. मोकळ्या जागा नाहीत, झाडे नाहीत मग झोके बांधणार कुठे ? जरी द्राविडी प्राणायाम करून झोके बांधले तरी तिथे खेळायला येणार कोण ? इट लुक्स ओल्ड फँशन्ड असे शेरे ऐकावयास मिळतात. 'अगं ती बघ गं गावंढळच दिसत्येय, झोका खेळत्येय !' अशी मुक्ताफळेही ऐकू येतात ! कालाय तस्मे नमः !
माझ्या गावाकडे मात्र आजही घरोघरी हळदओल्या पोरीपासून ते तोंडाचे बोळके झालेल्या स्त्रिया माहेरी हजेरी लावून जातात. कुणी दोन चार दिवस राहतं तर कुणी दोनचार तास का होईना माहेरात थांबून आईच्या डोळ्यातील अश्रुंचे मोती टिपून जातात ! गावाकडे आजच्या दिवशी घरोघरी दाराबाहेर मातीचे नाग केले जातात, त्यांना दुध लाह्या अर्पण केल्या जातात. घरातील सानथोर त्यांच्या पाया पडतात. सापनागांनी मनुष्याच्या शेतीकामात केलेल्या मदतीचे ऋण असे व्यक्त केले जाते. आमराईत झोके बांधले जातात, वडपिंपळ म्हणजे तर उत्तुंग झोके बांधायचे अग्रस्थान !
लहानग्या पोरींना आजच्या दिवशी नुसते उधाण आलेले असते, आदल्या दिवशी रात्री हातभर मेंदी घेऊन त्यांनी घरभर मिरवलेले असते. हाताची दाही बोटे लालभडक नखपॉलिशने रंगलेली असतात. (नेलपेंट म्हटले की राईसप्लेट जेवायला हॉटेलमध्ये बसल्यासारखे वाटते अन नखपॉलिश म्हटले की सारवलेल्या जमिनीवर पाटावर बसून मायबहिणीच्या हातचे गोडधोड खाल्ल्यासारखे वाटते.... मी जरासा ओल्ड फँशन्ड वाटतोय का हा माझाच मला प्रश्न! असो... ) वेण्या बांधून त्यावर लाल गुलाबी रिबीन गुंडाळण्याचे दिवस मात्र आता गावाकडेही राहिले नाहीत. नाकात मोरणी, कानात झुबे नाहीतर मस्त डोलणारी डुलं, केसातल्या नानाविध आकारांच्या विविध रंगाच्या मोहक हेअरपिन्स, कंबरेला लाल शेले, पायात छनछन वाजणारे पैंजण अन आजकाल लिपस्टिक गावातपण येऊन पोहोचली आहे याचा पुरावा देणारे रंगलेले चुटूकले ओठ ! जोडीला नवे कपडे अन अंगात भरलेलं वारं ! मैत्रिणींचा हा मोठा घोळका तयार होऊन इकडून तिकडे नुसता तांडा चाललेला. नागपंचमीच्या दिवशी मला माझ्या डझनाहून अधिक असणाऱ्या सर्व बहिणींचा मनोमन हेवा वाटायचा ! तिकडे त्यांच्या झिम्मा फुगडयांना मात्र अगदी ऊत आलेला असायचा ! खूप छान वाटायचे ते बघताना ! देहभान हरपून खेळणाऱ्या त्या फुलांचा गंध वारा मनसोक्त पिऊन घ्यायचा !
काही लोक नागपंचमी सणाला पौराणिक संदर्भ जोडतात, यात धार्मिक श्रद्धाही गुंफलेल्या असतात. याचा फायदा घेऊन काही लोक खऱ्याखुरया सर्पांचे हाल करतात. गावाकडच्या भोळ्याभाबडया स्त्रियांना विज्ञान फारसं माहिती नसते त्या सापांना दुध पाजण्याचा प्रयत्न करतात.असों ......
नागपंचमी एक दिवसावर आली तेंव्हा काल रात्री मी माझ्या मानसभगिनी ताहेरादीदी शेख यांच्याकडून बांगड्या आणल्या. या ताहेरादीदीं पाच भाऊ होते, त्यातले तीन निवर्तले. राहिलेल्यातला एक रोजंदारीवर काम करतो अन एक अधू होऊन घरी बसलाय. त्यांच्या आई लालबी ह्या मला मुलगा मानायच्या. आजही त्यांचा तो सुरकुतलेला हात 'मेरा राजू बेटा...'असं म्हणत माझ्या गालावरून फिरतोय असे मला वाटते. लालबी प्रदीर्घ आजाराने दोनेक वर्षापूर्वी गेल्या, घरात दोन तरुण मुले आहेत पण व्यसनाधीन आहेत. ताहेरादीदी आता वय झाल्याने घरीच बसून असतात, नोकरी सुटलीय अन गरजा वाढल्यात ! बांगड्याचे छोटेसे खोपटवजा दुकान आहे, त्यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. जगभरातील महिलांना बांगड्या घालणारया ताहेरा लंकेच्या पार्वती झाल्या आहेत. त्यांच्या भविष्याचे सारेच वांदे आहेत. हलक्या हाताने समोरच्या नाजूक हाताना बांगड्या चढवणारा त्यांचा हात आता जड झालाय. माझ्या गावाकडच्या कासारणीचे हाल देखील थोड्याफार फरकाने काही दिवसात असेच होतील का या विचाराने मी सुन्न होतो. माझ्या या गरीब बहिणीकडून आणलेल्या बांगड्या कुठलेही माप न नेता आई आणि बायको, बहिण सर्वांच्या हाती चपखल बसतात ! आहे की नाही मायेची जादू !!
काल मला ताहेरादीदी म्हणाल्या, "आजकल की औरते पहले के जैसे चूडीयां नही पहनती ! लगता हैं, जमाना बदल गया. लेकीन ये बदला हुंवा जमाना हमारे गरीब के पेट पे लाथ मार गया ...." त्यांची विषण्णता त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होती. का कुणास ठाऊक पण माझ्यातली हतबद्धता तेंव्हा उफाळून आली होती.
निघताना मी जेंव्हा त्यांना म्हटले, "ताई आपण फोटो काढूयात !'. त्यांनी आधी आढेवेढे घेतले मात्र जेंव्हा त्या राजी झाल्या तेंव्हा त्यांना 'ताई, जरा हसा !' असे म्हणायचे धाडस देखील माझ्याकडून झाले नाही .....
'जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी' हे जरी खरे असले तरी जुने इतके कालबाह्य होता कामा नये की त्या जुन्यावर जगणारी माणसेच मरावीत ! या लोभस सणाच्या निमित्ताने असे म्हणावे वाटते की माझ्या मायभगिनींच्या हातातल्या या बांगड्या काळाच्या ओघात हरवू नयेत, स्त्रीने आधुनिक जरूर व्हावे मात्र येणाऱ्या पिढीसाठी अशा सणांची थोडीशी का होईना शिदोरी मागे ठेवावी .....
माझ्या सर्व माताभगिनींना नागपंचमी या मनस्वी आनंदी सणाच्या मनापासूनच्या शुभेच्छा...
- समीर गायकवाड.
( सोबतच्या फोटोत बांगडयांच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या उदास चेहऱ्याच्या ताहेरादीदीसोबत माझी गोंधळलेल्या चेहऱ्यातली छबी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा