आई मी बचावलेय गं,
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !
मला तू पूर्णत्वास येऊ द्यायला पाहिजे होतं,
माझं प्रत्येक अंग रक्ताने अजूनही भरलं गेलं असतं.
माझ्या डोळ्यांना प्रकाशकिरणांनी शिवण्याआधी
काजळाने रेखांकीत केलं असतं.
सट्टा बट्टा करावा तसं मला दिलं घेतलं असतं,
वा ऑनर किलिंगसाठी मी कामी आले असते !
मात्र आता हरेक स्वप्नं अधुरीच राहिलीत ..
मी थोडी मोठी झाली असती तर माझ्या वडिलांचा लौकिक घटला असता,
माझी ओढणी थोडी जरी घसरली असती तर
माझ्या भावाच्या पगडीच्या गर्वाला धक्का बसला असता.
पण तुझी मधुर अंगाई ऐकण्याआधीच,
माझ्या न जन्मलेल्या चिरनिद्रेच्या मी अधीन झाले.
आई, मी एका अज्ञात प्रदेशातून आले होते आणि
आता एका अज्ञात प्रदेशात हरवतेय.
आई मी बचावलेय गं, आई मी बचावलेय गं
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !