Tuesday, September 20, 2016

'हमें तुमसे प्यार कितना'ची रसाळ 'कुदरत' ....७०-८० चे दशक हे अमिताभचे एकहाती दशक होते, वनमेन इंडस्ट्रीचा अनुभव बॉलीवूड घेत होते. अमिताभच्या आधीचा सुपरस्टार राजेशखन्ना बरयापैकी पिछाडीवर पडला होता. त्याला इंडस्ट्रीत अस्तित्व टिकवण्यासाठी एका हिट सिनेमाची प्रचंड गरज होती पण त्याचे सिनेमे त्याला साथ देत नव्हते.महबूबा, त्याग, पलकों की छाँव में, नौकरी, जनता हवलदार, चक्रव्यूह,बंडलबाज असे अनेक सिनेमे दणकून आपटले होते, नाही म्हणायला ७९मध्ये आलेल्या अमरदिपने थोडाफार व्यवसाय केला होता. पण त्याची धडपड सफल झाली आणि १९८१ मध्ये चेतन आनंदने दिग्दर्शित केलेल्या 'कुदरत'ने त्याला तारले व पुढे काकाने अनेक बरयापैकी हिट सिनेमे देऊन आपली पत शाबूत राखली...१९८१ साली आलेल्या 'कुदरत' मधे राजकुमार,राजेश खन्ना,हेमा मालिनी,विनोद खन्ना,प्रिया राजवंश,अरुणा इराणी अशा तगडया कलाकारांचा भरणा होता. हिमाचलच्या निसर्गरम्य वातावरणात घडलेल्या पुनर्जन्माच्या कथेवर आधारित हा सिनेमा होता. कथालेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी चेतन आनंद यांनी तर संगीताची बाजू राहुल देव बर्मन यांनी सांभाळलेली. किशोरदांचे 'हमें तुमसे प्यार कितना' हे प्रसिद्ध गीत शस्त्रीय गायिका परवीन सुलताना यांच्या आवाजातही आहे.या गाण्याला लाभलेला त्यांच्या आवाजाचा स्पर्श हे ही या चित्रपटाचं वैशिष्ठ्य ठरावे.

तरुण,सुंदर चंद्रमुखी ( हेमामालिनी ) आपल्या पालकांसोबत सिमल्याला येते पण तिथं गेल्यापासून अशा काही घटना घडू लागतात की तिला असं वाटू लागतं की या प्रदेशाशी आपलं काही तरी नातं आहे, हा भाग आपल्या परिचयाचा आहे. तिथे तिची भेट डॉक्टर नरेश गुप्ताशी (विनोद खन्ना ) होते आणि पहिल्याच भेटीत तो तिच्याकडे आकर्षित होतो. दोघांचे कुटुंबीय त्यांच्या विवाहाची प्राथमिक बोलणी करतात. त्याचवेळेस या परिसरात राहणारे जनकसिंह चौधरी ( राजकुमार) जे एक मोठे जमीनदार आणि तालेवार व्यक्ती आहेत, त्याना भेटायला मोहन कपूर(राजेश खन्ना ) येतो. मोहन कपूर हा एक नवोदित पण हुशार वकील आहे, त्याच्यासाठी जनकसिंह हे केवळ आश्रयदाते नसून त्याचं सर्वस्व आहेत. जनकसिंहाना देखील त्याच्यावर पूर्ण भरोसा आहे आणि त्यासाठी ते आपली पेशाने वकिल असणारी देखणी मुलगी करुणा (प्रिया राजवंश) हिच्याशी त्याचा विवाह व्हावा अशी मनीषा बाळगून असतात. मोहन या विवाहाला राजी आहे त्याला जनकसिंहाच्या उपकारातून उतराई होण्याची ही एक संधी वाटत असते.पण नियतीच्या मनात वेगळेच असते....

एके दिवशी चंद्रमुखी आणि मोहन हे सरस्वतीदेवी (अरुणा इराणी) यांच्या गायनाच्या कार्यक्रमात अपघाताने समोरासमोर येतात तेंव्हा त्याना एकमेकाला पाहून काहीतरी वेगळंच वाटू लागत जणूकाही आपसात कसली तरी बंधने असल्याचा भास होतो. या कार्यक्रमात सरस्वतीदेवी तीस वर्षांपूर्वी गायलेलं एक अप्रतिम गाणं पेश करते. ते म्हणजे "हमे तुमसे प्यार कितना ...." ख्यातनाम गायिका परवीन सुलताना यांच्या गळ्यातून साक्षात सरस्वती गातेय असं वाटावं इतकं सुरेल गाणं आहे हे.गाणं ऐकताना चंद्रमुखीचेही सगळे लक्ष समोर बसलेल्या मोहनकडे असते.गाण्याचा कार्यक्रम झाल्यावर घरी परतल्यानंतर तिला वेगवेगळी स्वप्न पडू लागतात, भास होऊ लागतात.आणि एक क्षण असा येतो की तिला तिचा गतजन्म आठवतो आणि तिचा भूतकाळ तिच्यापुढे एक मोठे प्रश्नचिन्ह घेऊन उभा ठाकतो. ती गतजन्मी पारो(हेमा मालिनी ) नावाची एक अल्लड तरुणी असते. तिचे वडील(सत्येन कप्पू ) चौधरीजींच्या हवेलीत माळ्याचे काम करत असतात तर तिथलाच माधव( राजेश खन्ना ) हा तरुण तिचा प्रियकर आहे. त्याची एक सत्तो नावाची बहिण आणि तो असे दोघे त्यांच गावात राहत असतात. तिथल्या पर्वतरांगांना साक्षीला ठेवून त्यांचं एकमेकावरचं प्रेम फुलतं..'तुने ओ रंगीले हे...' रसाळ गोड गाणं यांच सिच्युएशनला आहे. एखाद्या परीसारखी दिसणारी हेमा आणि मदनबाण राजेश खन्ना यांची नितांतसुंदर जोडी अन मनोरम्य परिसर यामुळे हे गाणं ऐकण्याइतकंच नयनसुख देणारंही आहे... मोहन आणि चंद्रमुखी जेंव्हाजेंव्हा भेटतात तेंव्हा तेंव्हा तिला काही तरी नवीन आठवत राहतं....

पुढे मोहनलाही एका भेटीत सर्व आठवू लागतं आणि तो सर्वप्रथम सत्तोचा शोध घेतो. सत्तो म्हणजेच सरस्वतीदेवी असते, ती त्याला सर्व कहाणी कथन करते. जनकसिंह हाच खरा अपराधी असून त्याने चंद्रमुखीचा बलात्कार केल्याचे ती सागते. पुढे मोहन करुणाबरोबरचं भावी पती पत्नीचं नातं नाकारतो. ती त्याच्यावरील प्रेमापोटी त्याच्याशी सहमती दर्शवते. पारोच्या खुनाच्या आरोपावरून मोहन जनकसिंहाना न्यायालयात खेचतो. करुणाला ही सर्व वडिलांच्या बदनामीची मोहनची खेळी वाटते आणि ती वडिलांच्या बाजूने न्यायालयात उतरते. खरे तर जनकसिंहाला झाल्या कृत्याबद्दल वाईट वाटत असते, भावना अनावर झाल्याने त्याच्याकडून बळजबरी केली जाते आणि त्यातून पुढे अनवधानाने तिचा खून होतो, मरण्यापूर्वी काही क्षण आधी ती जनकसिंहाला तळतळून शाप देते की, 'माझ्या माधवचा जीव तुझ्यामुळे गेला आहे एकेदिवशी ही कुदरतच ( सृष्टी ) तुझी सर्वात प्रिय वस्तू तुझ्याकडून अशीच काढून घेईल आणि तु बघत राहशील.' तिचे प्रेत नष्ट करण्यासाठी तिचे कलेवर तो बेलीराम (ए.के.हंगल ) या गवंड्याच्या मदतीने हवेलीच्या भिंतीत चिणून टाकतो. पारोच्या घटनेमुळे धक्का बसलेला माधव उंच हिमकड्यावरुन उडी मारून आत्महत्त्या करतो. या दोघांच्या मृत्यूचे दुःख जनकसिंहाला वाईट वाटते पण प्रतिष्ठेपायी तो काहीही चव्हाट्यावर येऊ देत नाही. पुढे जबरदस्त कोर्टरूम ड्रामा होतो जो केवळ थियेटरमध्ये बसून पहावा असा आहे. शेवटी बेलीरामच ती भिंत दाखवतो आणि भिंत फोडल्यावर आत दडवलेला सांगाडा बाहेर पडतो. आपल्या वडिलांचे सत्य कळाल्यावर करुणा हताश होते आणि जुनी हवेली पेटवून देते व स्वतः आत पियानो वाजवत बसून राहते. आगीत हवेली भस्मसात होऊन जाते, करुणाचा मृत्यू होतो. कुदरत आपला न्याय देते. न्यायलयात मोहन खटला परत घेण्याची विनंती करतो पण निसर्गाच्या न्यायापुढे हतबल झालेला जनकसिंह उन्मळून पडतो व सर्व गुन्हे कबुल करतो.

न्यायाधीश जनकसिंहाला उम्रकैदेची शिक्षा देतात, सजा ऐकून बाहेर येणारया जनकसिंहाची आणि चंद्रमुखीची नजरानजर होते तेंव्हा त्याला पारोने दिलेला शाप डोळ्यापुढून तरळतो. शेवटी मोहन व चंद्रमुखीचे मिलन होते अन नरेश अमेरिकेला रवाना होतो.

सिनेमा संपतो पण 'हमे तुमसे प्यार कितना ये हम नाही जानते ...' हे गाणं काही डोक्यातून जात नाही. पस्तीसेक वर्षे झालीयेत या गाण्याला पण कालपरवा ऐकल्यासारखे सदैव टवटवीत प्रफुल्लीत असं हे गाणं घुमत राहतं..प्रेम ही भावनाच मुळात इतकी अथांग आहे की त्याचं मोजमाप करणं तर अशक्यच. हीच अथांगता,हेच गहिरेपण या दोघांच्या डोळ्यांमधे घर करून असते. या ऋणानुबंधाच्या भावना व्यक्त करताना त्याचे प्रकटीकरण तितक्याच समर्थपणे झाले तर त्या प्रेमातला अर्थ थेट काळजाला भिडून जातो. त्याचं एकदम अस्सल शब्दरूप म्हणजे शब्दप्रभू गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी लिहीलेलं हे गाणं होय.

आरडी बर्मन यांच्या कर्णमधुर संगीताने सजलेल्या या गाण्याला किशोरदांनी आपल्या मधाळ आवाजाने अजरामर केले आहे.गाण्यातील काही शब्दांवर जोर देऊन आवाजात असा काही जीवघेणा चढउतार त्यांनी केला आहे की काही ठिकाणी घेतलेले बारीक पॉझेस देखील श्वास रोखून धरतात... प्रेम का कशात मोजता येतं पण ते किती आहे हे शब्दातून व्यक्त करायचे झाल्यास याहून सरस शब्दार्थात अशक्य आहे...

हमें तुमसे प्यार कितना,ये हम नहीं जानते
मगर जी नही सकते,तुम्हारे बिना
हमें तुमसे प्यार…
सुना गम जुदाई का उठाते है लोग
जाने ज़िंदगी कैसे बिताते है लोग
दिन भी यहाँ तो लगे बरस के समान
हमे इंतेज़ार कितना ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुमसे प्यार....

विरहाचे दुःख लोक सहन करून आयुष्य कसं घालवत असतील याची कल्पना नाही इथे तर एकेक दिवस एका वर्षासारखा मोठा वाटतोय, तुझ्या प्रेमाची प्रतीक्षा अनंताची आहे की आणखी कशी आहे हे माहिती नाही पण तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही...

तुझ्या प्रेमात आकंठ बुडाल्याने तुला दुसरया कोणी पाहिले तर काळजात वणवा पेटतो आणि मग अशा धगधगत्या मनाला सावरायला वेळ लागतो, त्यासाठी मला काय काय कसरती कराव्या लागतात आणि किती आठवणी साठवून ठेवाव्या लागतात याचा तुला कधीच सुगावा लागणार नाही.तुझ्या प्रेमात माझं हृदय किती अधीर आणि हळवं झालंय याची तुला कल्पना नाही पण मी एक निश्चित सांगू शकतो की मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही, भले माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे जरी सांगता येत नसले तरी तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही हे मात्र नक्की सांगू शकतो....
तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल
बड़ी मुश्किलो से फिर सम्हलता है दिल
क्या क्या जतन करते है तुम्हे क्या पता
ये दिल बेकरार कितना,ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुमसे प्यार...

सिनेमा सुपरहिट झाला, गाणी हिट झाली.१९८१ चे सर्वोत्कृष्ठ कथेचं आणि सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार या सिनेमाला मिळाले. इतकेच नव्हे तर अत्यंत नयनरम्य अशा सिनेमेटोग्राफीसाठीचे फिल्मफेंअर देखील 'कुदरत'ला मिळाले.

वाईट एकाच गोष्टीचे वाटते, किशोरजींनी गायिलेल्या 'हमे तुमसे प्यार कितना..'ला जी लोकप्रियता मिळाली ती लोकप्रियता परवीनजींनी गायलेल्या गाण्याला मिळाली नाही. दोन्हीही गाण्यातले बोल वेगेवेगळे आहेत तरीदेखील असं का घडलं असावं हा प्रश्न तसाच राहतो. कदाचित गाण्याची सिच्युयेशन व वृद्ध सरस्वतीवर चित्रित केले गेलेले बैठकीच्या मैफिलीसारखे चित्रीकरण यामूळे गाण्यातले अपील निघून गेले असावे.


त्यांच बरोबरीने रहस्य उलगडण्यासाठी या गाण्याचा वापर केला गेल्याने त्यातला इफेक्ट डार्क साईडला जाऊन गाणं दुर्लक्षित झालं असावं.एकच गाणं मेल आणि फिमेल व्हर्जन मध्ये एकाचे चालीवर गाऊनदेखील त्याला समान लोकप्रियता मिळत नाही हे हिंदी सिनेमात अनेकदा सिद्ध झालेय. पण परवीन सुल्ताना सारख्या सिने पार्श्वगायनासाठी क्वचित आवाज देणारया गानसरस्वतीने हे गाणं म्हणून देखील त्याची लोकप्रियता तुलनेने कमी राहिली याची खंत तशीच राहून जाते.

आजच्या पिढीतला युवावर्ग देखील हे गाणं गुणगुणतो तेंव्हा ते सोनेरी दिवस आठवल्याशिवाय राहत नाहीत....

- समीर गायकवाड.
sameerbapu@gmail.com

No comments:

Post a Comment