
पेशवाईत साडेतीन शहाणे होते. त्यातला एक 'पूर्ण शहाणा' माणूस इतका पाताळयंत्री आणि छद्मी होता की कुणी त्याला मारूही शकले नाही अन टाळूही शकले नाही. काही माणसं असून अडचण नसून खोळंबा असतात. तर काहींची नुसती अडचण असते असे नव्हे तर त्यांचा प्रचंड उपद्व्यापही असूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येत नाही. पेशवाईत असाच एक मुत्सद्दी होऊन गेला, सखाराम बापू बोकील त्यांचं नाव. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांपासून ते माधवराव अन अखेरीस नारायणराव पेशवे या सर्वांच्या काळात खऱ्या अर्थाने खलपुरुष जर कोण असतील तर ते सखाराम बापू होत. रामायणात जी भूमिका मंथरेने निभावली तशा आशयाची भूमिका सखारामबापूंनी पेशवाईत बजावली.
एक उचापतखोर, कुरापतखोर, कपट कारस्थानी आणि भ्रष्ट माणूस अशी त्यांची इतिहासात प्रतिमा आहेच पण या जोडीला असणारी पराकोटीची छद्म बुद्धी, कुशाग्र कूटनीती आणि तल्लख बुद्धिमत्ता ही त्यांची गुणवैशिष्टये होती. त्यांचे पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हे हिंवर्याचा कुलकर्णी होते. त्यांचे पूर्वज पणतोजी गोपीनाथ कुलकर्णी यांना १६५९ मध्ये शिवरायांकडून हिंवरें गांव इनाम मिळालेले होते.