
बैलगाडीच्या वाटा म्हणजे गाडीवानाच्या मनावरचे एक गारुड असते, या वाटा म्हणजे बैल आणि माती यांच्या अबोल नात्याचे अस्सल प्रतिक असतात. फुफुटयाने भरलेल्या मातकट रस्त्यावरून जाताना बैल माती हुंगत चालतात अन त्यांच्या तोंडातून गळणारी लाळेची तार मातीत विरघळत जाते. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराच्या आवाजावर वाटेच्या दुतर्फा असणारी पिवळी रानफुले मस्त डुलत असतात तर गाडीच्या एका लयीत येणारया आवाजावर आजूबाजूची दगडफुले अन मातकट झालेली पाने धुंद होऊन जातात. सारया रस्त्याने बैल खाली वाकून मातीशी हितगुज करत असतात अन माती मुक्याने त्यांच्याशी बोलत बोलत बैलांच्या दमलेल्या थकलेल्या खुरांना मातीने न्हाऊ घालते, मातीनेच मालिश करते, बैलांचे पाय जितके मातकट होतात तितके त्यांचे श्रम हलके होतात . रस्त्याने जाताना ओझे ओढणारे बैल त्यांच्या वाड वडलांचे क्षेम कुशल तर मातीला विचारत नसावेत ना ? हा प्रश्न माझ्या डोळ्यात हलकेच पाणी आणून जातो....