
हडकुळा, घामटलेला, करपलेल्या चेहऱ्याचा 'तो' रात्र रस्त्यात वितळताच गुहेतून श्वापद बाहेर पडावा तसा पडतो. 'तो' हिशोबात कमजोर आहे, त्याचे हिशोब वेगळे आहेत. मात्र त्याची नजर एकाच वेळी दया यावी अन् भीतीही वाटावी अशी आहे. तो देवाशी बोलतो, कुत्र्यांच्या अंगावर धावून जातो, भिंतींवर ओरखडे काढतो, खिडकीच्या गजांत डोळे भिनवतो, वटवाघळासारखा झोंबाडत राहतो. त्याला चालताना सगळीकडे बुद्धीबळातले पट अंथरावे तसे दोनच रंग दिसतात. काळा आणि पांढरा रंग.
त्याला जमीन, रस्ते सारं काही ह्या काळ्या रंगातच दिसतात. तो यातल्या फक्त काळ्या चौकोनांवरून चालतो ! त्याला वाटते की पांढऱ्यावरून चाललो की आपण आऊट ! मात्र या काळ्या पटातून चालताना मध्ये कुणी आडवा आला तर ? मग मात्र तो त्याचा अडथळा संपवतो पण काही केल्या पांढऱ्यात पाय ठेवत नाही. तो स्वतःला कधी रमण म्हणवतो तर कधी सिंधी दलवाई ! त्याचं रक्त आणि मेंदू कमालीचे थंड आहेत. लोक त्याला मानसिक संतुलन गमावलेला दुर्दैवी माणूस म्हणून बघतात अन् तो लोकांच्या आतड्या कातड्यात आरपार उतरत राहतो, खोल उतरत जातो, काळ्या पांढऱ्याचा खेळ खेळत राहतो. आड येणाऱ्या लोकांना थंड डोक्याने संपवत जातो. तो कुणालाही कसंही मारतो, त्याला त्याची ना खंत ना खेद. तो हे खून का करतो, हे देखील त्याला ठावूक नाही. त्याने सख्ख्या बहिणीवर देखील अत्याचार केलाय. तिचा सारा परिवार खलास केलाय.