|
|
प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.
ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !
वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !
आईची महती सांगणारी ही कविता आहे कवी माधव ज्यूलियन यांची. आईची गाथा आपल्या कवितेतून अनेकांनी गायली आहे, प्रत्येक कवीने आपल्या प्रतिभाशक्तीचा वापर करून आपले भाव व्यक्त केले आहेत. 'आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी' ही कवी यशवंतांची कविता असो वा 'आई म्हणजे काय असते' ही फ.मु.शिंदे यांची कविता असो किंवा 'ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..' ही कवी ग्रेस यांची कविता असो, 'आई'ची थोरवी शब्दबद्ध असलेल्या सकळ कविता सर्व वयाच्या, सर्व वर्गाच्या आणि सर्व प्रांतातील लोकांना भावल्या. आजही या कवितांचा वाचकवर्ग या कवितांना आठवून हळवा होतो. या कवितांतून आपल्याच मनातील भावना कवी शब्दबद्ध करतात अशी भावना रसिक वाचकांमध्ये असते. माधव ज्युलियन यांच्या या कवितेस आता पाचेक दशके उलटून गेलीत पण ही कविता आजही अनेकांना तोंडपाठ आहे ! यातील आशय आणि शब्दांची निवड एकमेकाशी इतके एकरूप झाले की ही कविता माधवरावांची ओळख बनून गेली.