
दिवाळीची आम्ही वाट बघतो आपल्या शिवाजी राजांसाठी ! दिवाळीतल्या फराळ फटाक्यापेक्षा राजांचे आगमन जास्त दणक्यात अन अगदी उत्कंठेने साजरे होते ! सिंहासनाधीश राजे दिवाळीच्या आधी किल्ल्यात स्थानापन्न होतात तोच दिवस खरा दिवाळीचा दिवस !! प्रत्येक अंगणात उभे राहतात गडकोट ! छातीचा कोट फुलून यावेत असे देखणे गडकोट !! काळ्या - करड्या मातीतून बनलेले हे किल्ले कधीच भग्नावस्थेतल्या खंडहरासारखे नसतात , ना यांना खिंडारे असतात, ना चिरे ढासळलेले राजवाडे ना पडलेले महाल !! या सर्व किल्ल्यांमध्ये आपल्या राजाचे धगधगते चैतन्य ओसंडून वाहत असते. नवीन आस मनी घेऊन चिमुकल्या हातांनी नव्या उमेदीने जीव लावून बांधलेले ते काळजाचे बुरुजच असतात, त्याला शोभिवंत करण्यासाठी रोशनदाने, मशाली, टेंभे, चिरागदाने, शामदाने ना उंची झुंबरे यापैकी काही लागत नाही ! या किल्ल्यांना प्रकाशमान करण्यासाठी पुरेशा असतात काळजाच्या पणत्या, ज्यात घामाचे तेल असते अन डोळ्याच्या फुलवाती !