कोणताही उत्सव आला की कुठल्याही भागातील रेड लाईट एरियातील
स्त्रियांना थोडीशी धास्तीही वाटते अन काहीसे हायसेही वाटते. कारण येणारा दिवस
कशाचे तोंड बघायला लावतो,
काय घडवतो याची त्यांना धास्ती असते अन
उत्सवामुळे गर्दीत, गिऱ्हाईकात वाढ होऊन कमाईत चार पैशांची वाढ होणार या जाणीवेने
हायसे वाटत असते. खरे तर सण, उत्सव कोणत्याही धर्माचा असो जातीचा असो वा पोटजातीचा असो
त्याच्या कामांचा जास्त ताण त्या त्या वर्गातील स्त्रियांना पडतो. मग त्या
स्त्रिया गरीब वर्गातल्या असोत वा उच्चभ्रू वर्गातील्या असोत, त्यांना ताण हा पडतोच. बहुतांश पुरुष मंडळी त्या त्या सण
उत्सवासाठी लागणारं साहित्य आणून दिलं की आपलं काम संपलं अशा अविर्भावात असतात, सणासुदी दरम्यान लहान मुलांचा वा वृद्ध व्यक्तींचा सहयोग कमी अन
त्रास जास्त असतो. पण बायका त्याबद्दल कधीही तक्रार करत नाहीत. या सणाउत्सवातला
खरा आनंद त्या मिळवतात कारण, त्या आनंद वाटत असतात ! याला रेड लाईट एरियातील स्त्रिया देखील
अपवाद नसतात.
ईद असो वा ख्रिसमस, ओणम,
नवरात्री वा दिवाळी वा गणेशोत्सव असो त्या
मागे हटत नाहीत. इथे आलेल्या निम्म्याहून अधिक बायकांना घरादाराची, गावाची दारे बंद झालेली असतात. कालांतराने या गलिच्छ वस्त्या हीच
त्यांची घरे होतात,
याच त्यांच्या वसाहती होतात. हेच त्यांचे
वर्तमान असते अन कदाचित हेच त्यांचे भविष्य असते. इथल्या स्त्रिया जशा भोग भोगतात
तसेच इथले पुरुषही काहीसा वेगळा भोग भोगतात. जशा अनेक बायकांची दुखणी, गाऱ्हाणी ऐकली तशी काही अंशी पुरुषांची वेदनाही जाणून घेतली
तेंव्हा त्यातही तितकाच टोकदार सल दिसला....
२०१५ च्या गणेशोत्सवात पुण्याच्या रेड लाईट एरियात वेगळेच संकट
उभे राहिले होते ते म्हणजे तिथे केला जाणाऱ्या कंडोम्सच्या पुरवठयात आलेला तुटवडा.
एनजीओज आणि सरकारी यंत्रणांकडून याचा मोफत पुरवठा केला जातो. ऐन उत्सवाच्या
तोंडावर सगळा आटापिटा केला गेला मग थोडीशी आकडेवारी गाठता आली होती. इतरांना ही
बाब किरकोळ वाटू शकते पण इथल्या स्त्रियांच्या जीवांशी खेळणारी ही गोष्ट असते. एका
माहितीनुसार पुण्यात अडीच ते चार हजार महिला या व्यवसायात आहेत तर संपूर्ण मुंबईत
तब्बल दहा ते बारा हजार महिला यात आहेत. एकट्या कामाठीपुऱ्यात काही हजार महिला
आहेत. तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया असणाऱ्या कोलकत्त्याच्या
सोनागाछी या भागात तब्बल सोळा हजार महिला सेक्सवर्करचे काम करतात. सोनागाछीत
नवरात्रीत पाय ठेवायला जागा नसते तर दक्षिण भारतातील बेंगळूरू, चेन्नै,
त्रिची, मेंगलूर,
या शहरात ओणमपासून ते ख्रिसमसपर्यंत सर्व
सणात रौनक असते. असो.
‘सणासुदीत इथे येणारे लोक जास्तीकरून कोण असतात ?’ असं राझियाला विचारलं तेंव्हा तोंडातला माव्याचा लोळ पच्चकन थुकत, माव्याचे-पानाचे लाल डाग पडलेल्या मळकट ओढणीने दाताखाली दाबलेला
ओठ हळूच पुसत ती उत्तरली,
“घरादारापासून लांब राहणारी माणसं असतात ही
...त्यौहार आया तो उनको घर याद आता हैं... इनकी भी बिवी होती है, रखैल होती है या कोई और भी होती है, उसकी याद आती है तो ये खीचे खीचे यहां चले आते है... काहींच्या
घरचे बाईमाणूस घर सोडून गेलेलं असतं, किसीका तलाक होता है तो किसी बदनसीब की औरत चल बसती है...किसीकी
औरत बीमार चलती है,
किसीकी औरत उसे ‘वो’
सुख नही दे पाती ... ही सगळी माणसं त्या
सुखाच्या शोधात इथं येतात तर काही केवळ शरीरासाठीही आलेली असतात तर काही निव्वळ
वासनेचे हैवानही असतात... कुछ ऐसे भी होते है जो वही लम्हे बार बार तलाशते हुये
यहां आते है तो लाखोंमें एक कोई दिलजला भी होता है...” किनऱ्या आवाजात रझिया असलं बोलू लागली की समोरचा मंत्रमुग्ध होऊन
जाई कारण तिचे विलक्षण बोलके डोळे अन आव्हान देणारी देहबोली !
आजमितीला रझियाचं वय अठ्ठावीस तीसच्या दरम्यानचं असेल. तिचा नवरा
रसूल तिला इथं टाकून गेलेला. तो या नरकात तिला सोडून गेला तरीही महिन्या दोन
महिन्याला तो इथे येऊन तिच्याकडून पैसे घेऊन जायचा. तिच्या पोटी जन्मलेल्या
चिमुरडया पोरीचा जीव घेण्याची भीती दाखवून तिला तिथून जाऊ देत नसायचा. पोरगी नफ़ीसा
आपल्याजवळ ठेवली होती त्याने. सहा-सात वर्षे असेच कारनामे चालले. जेंव्हा हातोहाती
मोबाईल दिसू लागले तेंव्हा एका एका ईदला तिने रसूल नशेत असताना त्याच्या
मोबाईलमधून त्याच्या नात्यातील काही लोकांचे नंबर काढून घेतले अन तो तिथून
गेल्यानंतर त्या नंबरवर फोन केले तेंव्हा तिला कळले की, तिच्या पाठीमागे मुलीची आबाळ झाली अन पुढच्याच वर्षी ती
न्युमोनियाने गेली होती. तेंव्हा रझियाच्या डोळ्यापुढे अंधारी आलेली. सगळं आकाश
गरारून तिच्या डोळ्यात गोळा झालेलं अन पोटपिंडऱ्यात गोळे आलेले. त्या दिवसानंतर
पुढच्या खेपेस रसूल तिच्याकडे आला तेंव्हा तिने त्याला चपलेने ठोकून काढला होता अन
‘पुन्हा इथं आला तर सुरा आरपार करीन’ अशी धमकी दिलेली. त्या दिवशी ती जणू दुर्गाच झालेली. तो पुन्हा
आला नाही पण तिनेही बुधवार पेठ सोडली नाही. तिथल्या बायकांत तिने आईबहिण शोधली
होती,
तिथल्या बायापोरीच्या अनौरस पोरीबाळीत आपली
चिमुरडी नफीसा पाहिली होती. आजूबाजूच्या लेकुरवाळया बायाबापडया त्यांच्याकडे ‘गिऱ्हाईक’
आलं की आपला पोटचा गोळा त्या तिच्या हवाली
करत असत. त्या बाईकडे आलेलं गिऱ्हाईक तासापेक्षा जास्त वेळ थांबणारं असलं की ते
तान्हे पोर रडू लागे. मग रझिया हळूच त्याला आपल्या तटतटलेल्या छातीला लावून घेई.
तिच्या कोरड्या वक्षांतून दुध नच पाझरले तरी माया पाझरत राही. पोर रडायचे थांबे अन
तिचे डोळ्याच्या कडा ओल्या होत. रझियाला इथं येऊन आता दशक उलटून गेलंय, बरीच सराईत गिऱ्हाईकं तिला आता चांगलंच ओळखतात. ईमानदारीनं धंदा
करणाऱ्या मोजक्या लोकांतील एक आहे ती.
याउलट तिच्या शेजारच्या अड्ड्यातील बायका होत्या. यात एक होती
नलिनी. तिचं मूळचं नाव कोशीमी. आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यात तिचं गाव. एका साली
ब्रम्हपुत्रेला पुराचा मोठा तडाखा बसला आणि पोरी आणणाऱ्या दलालाला 'घबाड' लागलं. त्यानं एकदम डझनभर पोरी आणल्या तिथून. त्या सगळ्या मुंबईत
विकल्या. पोटापाण्याचे वांदे झालेल्या त्या पोरींनी सुरुवातीला काही काळ दुबळा
प्रतिकार करून पाहिला पण पुढे हाती खूळखूळणारा पैसा अन अंगावर ल्यायला
चांगलाचुंगला कपडा लत्ता मिळू लागला तसे त्यांचा प्रतिकार मूक संमतीत बदलत गेला.
या मुलीतील काही मुली पुण्यात हलवल्या गेल्या. त्यातलीच एक नलिनी होती. सुरुवातीस
असणारी भीड चेपून तिची जागा चापलुशीने कधी घेतली हे तिला स्वतःलाही उमजले नव्हते.
गणेशोत्सवात पुण्यात चांगला ‘सिझन’ मिळतो हे तिच्या कंपूने अचूक ताडले होते. जास्तीत जास्त पैसे
कमवण्यासाठी या सहाजणी एकत्र काम करत. त्या एकमेकीला मदत करत. कुणाकडेही गिऱ्हाईक
आलं की काही मिनिटं होताच शेजारच्या लागून असलेल्या खोलीतील त्यांच्या पैकी एकजण
कधी पोलीस सायरनचा तर कधी एम्ब्यूलन्सचा आवाज मोबाईलमधून काढत. आत अर्धेमुर्धे
कपडे उतरवलेली नलिनी भेदरून गेल्याचा आव आणे. मग ती खोटंच सांगायची, ’शायद पुलिस का रेड हुआ है ! तरी बी तू थांबू शकतो ...” हे ऐकूनच तिचं गिऱ्हाईक गर्भ’गळीत’ होऊन जायचं. पाच मिनिटात त्याला बाहेर काढून नव्या पंटरला त्या आत
घेत आणि त्यालाही तसेच वाटेला लावत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हा नियम इथेही लागू
होतो. हा नियम जसा इथल्या स्त्रियांना लागू होतो तसाच इथल्या पुरुषांनाही लागू
होतो...
बुधवार पेठेत जशी जुनाट बसकी घरे आहेत. तशाच पडायला आलेल्या
चाळवजा इमारतीही आहेत. तर काही अपार्टमेंट वजा बहुमजली इमारती आहेत, ज्यात कोंबडयांच्या खुराडयासारख्या खोल्या आहेत. या सर्व परिसरात
बायकांचा बाजार चोवीस तास भरलेला असतो अन उष्ट्या तोंडाची लाळ गाळत फिरणारी
आशाळभूत पुरुषी गिधाडं सदोदित पाहायला मिळतात. इथल्या काही इमारती तर सारख्या
वाटाव्यात इतके साम्य तिथल्या अवस्थेत असते. इथे जशा वारांगना असतात तसेच त्यांचे
दल्ले. त्यांचे पोसलेले रखवाले तर काही त्यांचे शोषण करणारे नावाला कुंकवाचे धनी
असणारे टोणगेही असतात. या बायकांच्या दारापाशी घुटमळणारे, जिन्यात बसून असणारे किंवा क्वचित त्यांच्या व्हरांडयात स्टूल – बाकावर बसून असणारे हे लोक म्हणजे इथल्या जळवा असतात. मी इथं एकदा
विलास नावाचा एक वृद्धत्वाकडे झुकलेल्या इसमास भेटलो होतो. श्रीनाथपासून पुढे आत
आले की आफताब मंझीलमध्ये राहायचा तो. त्याच्या सगळ्या अंगावर तेलकट धुळीची पुटं
चढलेली,
कपडे फाटून त्याची लक्तरे झालेली, हातापायाची पिवळी नखे वाढून वाकडीतिकडी झालेली, तळव्यांना मातीचे चिकट थर चिकटलेले, डोळ्याच्या पापण्या नेहमी अर्ध्या मिटलेल्या अन डोळ्याखाली मोठाली
काळीवर्तुळे,
चेहऱ्यावर पांढरी पिवळी दाढी वाढलेली अन
डोक्यावर विस्कटलेले राठ कोरडे केस, काळ्या शुष्क ओठांना भेगा पडलेल्या, गालफाडे आत गेलेली अन समोरचे दात पडल्याने जबडे ढिले झालेले अशा
चिंधूकलेल्या अवस्थेत एका जीर्ण फाटक्या सतरंजीच्या तुकडयावर तो पोटात पाय दुमडून
पडलेला असे. विलासच्या देहाची वळकटी जिथे असे तिथेच एक काळपट जर्मनचा वाडगा
त्याच्यासारखाच निपचित पडून असे. बुधवारातल्या इतर इमारतींप्रमाणेच ही इमारतही
गलिच्छ होती,
कोंदट - अरुंद होती, कळकटून गेली होती. इमारतीचा रंग इथल्या बायकांसारखा विटून गेलेला
अन इथ येणाऱ्या बाजारू लोकांची अंधाऱ्या अस्वच्छ गल्ल्यातली घाण साऱ्या इमारतीच्या
व्हरांडयात पडलेली असे. सर्व इमारतींच्या खिडक्यांची तावदाने फुटलेली अन त्यावर
लटकणारी- वाळत घातलेली तिथली रंगबेरंगी परकर, पोलकी,
साडया असं नित्याचं दृश्य तिथं दिसत असे.
तिथल्या सर्वच इमारतींचे जिने पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगून विटकरी लाल रंगात
परावर्तीत झालेले असत,
जोडीला त्यांचे पोपडे निघालेले अन मावा
गुटखा खाऊन कोपऱ्या कोपऱ्यात थुंकलेले असायचे. जिन्यांच्या डोक्यावरच्या भागात भली
मोठी कोळीष्टके असत अन एखाद दुसरी जाड पिवळी पाल तिथे चिकटून बसलेली असायचीच, भक्ष्याच्या प्रतिक्षेत ! रात्र झाली की इथला अंधार बायकांची
लुगडी शोधत येतो अन भींतीवरच्या याच पाली कोन्याकपारीत दडून बसतात !
पन्नाशीच्या वयातल्या विलासला डाव्या पायाने जास्ती चालता येत
नव्हते,
भल्या सकाळी उठून आपली सकाळ हलकी करून
यायचा. त्याच्या सर्वांगाला एक उग्र दर्प यायचा त्यामुळे त्याला कुणी जवळ उभे करून
घेत नसे. त्याच्या समोरच्या वाडग्यात कुणी पैसे टाकले तर ती त्याच्या बिडीकाडीची
तजवीज होई. दिवसातून दोनेक वेळा त्याच्या पुढयात तिथलीच एक कंबरेत वाकलेली
म्हातारी कधी डाळभात तर कधी रस्साचपाती आणून देई. त्याची तहान भुकेची गरज अशी भागत
असे. धुळीने माखलेल्या हाताने तो जेवायचा तेंव्हा त्याच्या ओठातून ओघळ बाहेर पडत.
आफताबमध्ये जिन्यातून वर चढणारी माणसे हे दृश्य बघून तोंड वेडेवाकडे करून पुढे
निघून जात किंवा एखाददुसरा माजलेला तिथेच पच्चकन थकून जाई. दिनवाण्या चेहऱ्याने
विलास त्याच्याकडे बघत राही अन तो पुढे निघून गेल्याची खात्री होताच शिव्यांची
पुटपुट करत तोदेखील थुकत असे. एखादया दिवशी त्याला ती म्हातारी लालपिवळी चपटी आणून
देई,
त्या दिवशी मात्र त्याच्या चेहऱ्यावर अनेक
भावनांचे कल्लोळ बघायला मिळत. ही मदिरा त्याच्या खोल गेलेल्या आतड्यात उतरली की
काही वेळाने तो एका पायावरच जिन्याजवळच्या खिडकीपाशी उभा राहून रस्त्याच्या पलीकडे
टक लावून बघत राही. त्याच्या पायाला रग लागली की मग तो खाली बसे. मात्र तिथून नजर हटताच त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या उष्म धारा वाहत
अन त्याच्या गालावरून ओघळून फाटक्या कपड्यात मिसळून जात. या विलासची देखभाल करणारी
ती म्हातारी म्हणजे त्याची बायकोच होती. नाझनीन तिचं नाव. हे दोघंही चातकासारखी
गणेशोत्सवाची वाट बघत राहायचे. या काळात त्यांना सहा महिने पुरतील इतके पैसे मिळत.
लोकांनी फेकलेल्या चुरगळलेल्या नोटाही त्याला गवसत. रिकाम्या बाटल्या गोळा केल्या
तरी बरेच पैसे सुटत. फक्त सांज होण्याचा अवकाश असे त्याचा जीव शेवरीच्या
कापसासारखा तरंगत राही. या सिझनमध्ये सगळीकडच्या बायका ‘एंगेज’
राहत आणी नाझनीनला धुणी भांडी करण्याची
भरपूर कामे मिळत. काही जुन्या बायका तिला बक्षिसीही देत तर एखादं अगदीच हातघाईला
आलेलं थोराड गिऱ्हाईक तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करून छोट्या नोटा तिच्या हाती
टेकवे. काही कस्टमर लोकं तिथल्या बायकांच्या पदरात गोडधोड टाकून जात. तेच गोडधोड
त्या बायका नाझनीनसारख्यांच्या हवाली करत. त्यांचे दहा वीस दिवस चांगलंचुंगलं
खाण्यात जात ! नाझनीनची या सगळ्याबद्दल तक्रार नव्हती. तिला हे नशिबाचे भोग वाटत. ‘भगवान किसी भी धरम का हो, वो किसीका बुरा नही
करता. तकदीर तो अपनी खराब होती है जिसे खुदा भी सुधर नही सकता’ असले थक्क करणारे विचार ती मांडे....
इथे संध्याकाळ झाली की अधाशी मोगरे बायकांच्या केसात विळखे घालून
बसतात. बाजार बुणग्यांची,
चरशांची, दारुडयांची, पिसाटांची गर्दी वाढू लागते. या गर्दीला वय नसते की चेहरा नसतो.
नुकतीच कोवळी मिशीची लव आलेला मुसमुसलेला पोरगाही त्यात असतो अन तोंडात कवळी
बसवलेला डोक्याची चांदी झालेला जरठही असतो. थुंकीत चिखलात बरबटलेल्या वाहणा या
दारातून त्या दारात झिजवत फिरतात. स्वतः काळाबिंद्रा असला तरी अल्मोस्ट
प्रत्येकाला गोरी गोमटी लुसलुशीत बाई हवी असते. त्यातही प्रत्येकाच्या आवडीनिवडी
निराळया असतात,
वेगळे चोचले असतात. आता तर मोबाईलचं प्रस्थ
वाढल्यापासून तर यातल्या काहींना ‘ते’ दृश्य कॅमेऱ्यात उतरवून घ्यायचं असतं ! फाटक्या चपला पायात
असणाऱ्या पासून ते नायकेचे शूज वापरणारे सगळ्या क्लास आणि मासचं पब्लिक या
रस्त्याला असतं. कुणी तोंडावर रुमाल बांधून ओळख लपवून फिरत असतो तर कुणी बेलाशकपणे
प्रत्येक खोलीत डोकावून बघणारा असतो. जणूकाही सोयरिक करून बायको करायला आलेला
असावा इतक्या चौकशाही काहीजण करत असतात. धंद्याच्या वक्ताला आलेल्या अशा भेजाफ्राय
गिऱ्हाईकाची अब्रू कशी काढायची हे इथल्या बायकांना चांगलेच ठाऊक असते. कोण कसा
वागतो त्यानुसार बायका त्याला तशी ट्रिटमेंट देतात. हा सगळा एक रुक्ष व्यवहार
असतो. आधी भाव ठरतो,
मग लगेच पैसे घेतले जातात कारण आपला ‘कार्यभाग’
उरकला की आपल्या काखा वर करण्याकडे
अनेकांचा कल असतो. आपल्या खऱ्याखुऱ्या घामाचा पैसा या बायका कधी सोडत नसतात.
एरव्ही त्यांच्या मनात आलं आणि एखाद्या गिऱ्हाईकाशी सलगी झाली तर मात्र गंगा उलटी
वाहते,
या बायकाच त्याला अडीअडचणीच्या काळात पैसे
देतात. इथले जग बाहेरच्या जगापेक्षा निश्चितच वेगळे आहे पण लोक समजतात तसे सगळे
लुटमारीचे अन लबाडीचेही नाही. इथेही हाडामासाचीच माणसे आहेत. या बायकांनाही मने
आहेत,
यांनाही भावना आहेत. एक गोष्टीची खंत नेहमी
जाणवते की या बायका सगळ्या पुरुषजातीच्या वासनेची सोय लावून देण्यासाठी वापरल्या
जातात पण यांच्या मनात कधी देहधर्म असतो-नसतो याची जाणीव कधी कोणाला होते का ? उत्सव काळात वापरल्या जाणाऱ्या या देहरुपी पणत्या आहेत. एक गेली की
दुसरी येतेच आपला देह कापूरागत जाळायला !
- समीर गायकवाड.
( लेखातील व्यक्ती आणि स्थळांची मूळ नावे बदलली आहेत. जातधर्मा पलीकडे जाऊन माणुसकी आणि भावना यांचा जिथं विचार करावा वाटतो अशा उपेक्षित, शोषित घटकांची बाजू समाजापुढे यावी या हेतूने हे लेखन केलेले आहे. लेखावर कोणाच्याही धार्मिक. जातीय भावना दुखावतील अशा प्रकारच्या कॉमेंटस करून नयेत ही कळकळीची विनंती)
( लेखातील व्यक्ती आणि स्थळांची मूळ नावे बदलली आहेत. जातधर्मा पलीकडे जाऊन माणुसकी आणि भावना यांचा जिथं विचार करावा वाटतो अशा उपेक्षित, शोषित घटकांची बाजू समाजापुढे यावी या हेतूने हे लेखन केलेले आहे. लेखावर कोणाच्याही धार्मिक. जातीय भावना दुखावतील अशा प्रकारच्या कॉमेंटस करून नयेत ही कळकळीची विनंती)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा