शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

'ट्रोलभैरवां'चे समर्थक...


सध्याच्या काळात सोशल मिडीया हे अनेकार्थाने एक प्रभावी अस्त्र झाले आहे. सहज सोप्या पद्धतीने हवे तसे व्यक्त होण्याची संधी विनासायास मिळत असल्याने दिवसेंदिवस सोशल मिडिया वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढतेच आहे. राजकीय हेतूने यात सामील झालेल्यांनी आपापल्या पक्षांची, लाडक्या नेत्यांची भलावण करताना आपल्याच विचारांचा उदोउदो करत विरोधी विचारधारांची निंदानालस्तीही सुरु केली. नावडत्या नेत्यांचेचरित्रहनन करत त्यांची मॉर्फ केलेली, प्रतिमोध्वस्त चित्रे वापरणे, मनगढंत कहाण्यातून खोटा मजकूर लिहिणे, बोगस डाटा देणे, अश्लील भाषा वापरून महिलांची मानहानी करणे, इतरांच्या नावाने पोस्ट लिहून व्हायरल करणे अशी नितीभ्रष्ट प्रकटने अहोरात्र होत आहेत. यासाठी ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटसऍप यांचा वापर प्रामुख्याने होतोय.
आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ काहीच द्यायचे नाही व आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पोस्टवर जाऊन त्यांना आडवं लावणे, मुद्द्यापासून पोस्ट भरकटवणे, पोस्टकर्त्यावर हीन दर्जाची टीकाटिप्पणी करणे, कॉमेंट करणारया लोकांशी अकारण वाद घालणे यांना ऊत आलाय. असे उद्योग करणारे लोक सोशल मिडीयात ‘ट्रोल’ म्हणून कुख्यात आहेत. कहर म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी पगारी (पेड) ट्रोल आता आपल्या पदरी बाळगलेत. परिणामी याला अधिक बीभत्स, ओंगळवाणे, हिंस्त्र स्वरूप आलेय. यामुळे दंगली घडल्यात, जातधर्मीय सलोखा धोक्यात येऊ लागलाय. हे सर्व घडत असताना काही ठिकाणी पोलिसात तक्रारी दाखल झाल्यात तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. काही ट्रोल फेक अकाउंटद्वारे कार्यरत असतात. वाईट बाब अशी की ट्रोल्सना आवर घालून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम राजकारणी करताना दिसत नाहीत, यात नाव घ्यावे असा अपवादही नाही ही शरमेची बाब आहे.

आपल्याला जे जाहीर रित्या बोलता येत नाही त्याची वदवणूक ट्रोल्सकडून करून घेण्याचा धंदा फार लपून राहिला नाही. कारण सोशल मिडीयावर कोण कोणाला फॉलो - अनफॉलो करतं, फ्रेंडशिप स्वीकारतं, ब्लॉक – अनब्लॉक करतं याचा उहापोह आपसूक होतो कारण या माध्यमात ती पारदर्शकता अद्यापही आहे. ट्रोल्स जी गरळ ओकतात त्याचा विकृत आनंद काही लोक घेत असतात, यात त्यांचे ‘आका’ देखील सामील असतात. आपल्यावर रास्त टीका करणारया, न्याय्य मागण्या मांडणारया, दोषउणीवा समोर आणत आग्रही मते मांडणारया लोकांच्या प्रतिमा डागाळण्यासाठी ट्रोल्स वापरणे आता नित्याचे झाले आहे. सामान्य माणूस जो प्रत्येक गोष्टीच्या कधीच खोलात जात नाही, ज्याला सर्वंकष माहितीची वानवा आहे तो हे सगळं खरं समजून फॉरवर्ड करतोय. राजकीय पक्षांच्या पाळीव संघटनांनी, त्यांच्या समर्थकांनी या आगीत वेळोवेळी तेल ओतलेय. ट्रोल्सनी सोशल मिडीया अभद्र करून टाकलाय. नेटाने प्रयत्न केले तर ट्रोल्सना टाळता येतं आणि त्यांचं मुस्काटही फोडता येतं पण त्यासाठी प्रचंड वेळ आणि उर्जा वाया घालवण्याची तयारी हवी. याच अनुषंगाने भाजपाच्या डिजिटल आर्मीचा मुखवटा फाडत स्वाती चतुर्वेदी लिखित ‘येस आय एम ए ट्रोल’ या पुस्तकात ट्रोल्सचा मुखभंग केलाय.

कट्टर, कडवट, हेकट विचारसरणीच्या लोकांना हे अस्त्र अधिक उपयोगी पडते कारण सार्वजनिक जीवनात वावरताना सभ्यतेचा मुखवटा घालून फिरावं लागलं तरी सोशल मिडीयाच्या आभासी जगात हा मुखवटा फेकून देत आपला हिंस्त्र चेहरा त्यांना जोपासता येतो. अमेरीकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी पदावर विराजमान होण्याआधी व नंतरही याचा भेदक वापर केलाय. ट्रम्प यांनी वापरलेली भाषा आणि शेरेबाजी यामुळे अमेरीकन जनतेत त्यांच्याविरुद्ध नाराजीही आहे तर त्यांच्या मोकाट समर्थकांत मात्र त्याचा उन्माद आहे. त्यांच्या सोशल बदफैलीला कंटाळून माजी सीआयए एजंट व्हेलेरी विल्सन यांनी २१ ऑगस्ट २०१७ रोजी चक्क ‘बाय ट्विटर अँड बॅन ट्रम्प’ या नावाचे कॉज सुरु करून त्यासाठी क्राऊडफंडिंग सुरु केले. लोकांनीही त्यांना प्रतिसाद द्यायला सुरुवात करताच ट्रम्प बावचळून गेले आणि जेरी ट्रेव्हन या ट्रम्पभक्ताने केलेल्या उपद्व्यापास आपल्या ट्विटमध्ये स्थान दिलं. या ट्रोलने ओबामांचे मॉर्फ केलेलं, फोटोशॉप्ड छायाचित्र वापरून आपल्या परीने विष ओकलं. यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांत घमासान मिडीयावॉर झाले. मूळ मुद्दे बाजूलाच राहिले. ट्विटरवर ट्रम्प फक्त ४५ जणांना फॉलो करतात त्यात ‘ड्रज रिपोर्ट’ नावाचे उठवळ बातम्या देणारे संकेतस्थळ आणि ‘डायमंड अँड सिल्क’ नावाचे टवाळकी करणारे ट्रोल अकाउंटही आहे. अल कैदा, आयसीसचे ट्विटर हॅण्डल जेंव्हा सुरु होते त्याला फॉलो करणारे नेतेगणदेखील होते. इंडोनेशियन पीएम जोको विदोदो हे ५९ लोकांना फॉलो करतात त्यात असे डझनभर महाभाग आहेत. ह्या यादीत अनेक देशांच्या नेत्यांची नावे घेता येतील. आपल्याकडेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक विविधपक्षीय नेत्यांनी ही कसर भरून काढलीय.

ट्रम्प यांच्या खालोखाल ट्विटरवर सर्वात जास्त लाखो फॉलोअर्स असणारे नेते म्हणून मोदी प्रसिद्ध आहेत. स्वतः मोदी मात्र १०२४ लोकांना फॉलो करतात. मोदी ज्यांना फॉलो करतात त्यात भाजपच्या राज्य शाखा, केंद्रीय मंत्री, मंत्रालये, काही राज्यांचे मुख्यमंत्री, कलावंत, विधिज्ञ, शास्त्रज्ञ, जागतिक पातळीवरील व्यक्ती असे विविध लोक आहेत. या व्यतिरिक्त एक मोठी ट्रोल्सची टोळी आहे जिला मोदी फॉलो करतात. मोदी एक सामान्य राजकारणी वा नागरिक असते तर त्यांनी कुणाला फॉलो केले यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नव्हते पण देशाच्या पंतप्रधानपदी असणारी व्यक्ती जेंव्हा अशा लोकांना फॉलो करते तेंव्हा त्याचा अर्थ काय घ्यावा ? ज्या लोकांचे सामाजिक योगदान शून्य आहे, ज्यांची विध्वंसक मुस्लीमद्वेष्टि वृत्ती आहे, ज्यांची भाषा आक्षेपार्ह आहे अशांनाही मोदी फॉलो करतात. जर पंतप्रधानांना यात वावगे वाटत नसेल तर त्यांच्या नेत्यांना. समर्थकांना त्यात वावगे कसे वाटेल ? हा कसला आदर्श ?

भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार नितिशकुमार यांच्या वक्तव्यातील मोजकी वाक्ये निवडून त्याला वेगळे हेडींग देऊन संभ्रम करण्याचा प्रयत्न केला होता. निखील दधीच नावाच्या माथेफिरू विकृताने पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ‘एक कुतिया क्या मर गयी सारे पिल्ले बिलबिला उठे’ असं घृणास्पद ट्विट केलं होतं. ही यांची भाषा. बरखादत्त, राणा अय्युब, सागरिका घोष, शेहला रशीद, नेहा दीक्षित, मुग्धा कर्णिक, गुरमेहर कौर या महिलांना या लोकांनी लांच्छनास्पद रित्या टार्गेट केलं होतं. यातल्या काहीजणी यांना पुरून उरल्यात ही बाब वेगळी. राहुल कौशिक या व्यक्तीने थेट उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ भाषा वापरली. निकुंज साहू या पोराने केजरीवालांवर केलेली असभ्य टिप्पणी वाचवत नाही. ‘नमोमॅनिया’ या नावाने महावीर ही व्यक्ती अकाउंट चालवत होती त्यावरील शिव्यागाळ शब्दातीत आहे, हे हॅण्डल ट्विटरने सस्पेंड केल्यावर भाजप नेते गिरीराजसिंह यांनी ट्विटरविरुद्धच मोहीम छेडली होती.

सेक्स ऍब्युजिव्ह भाषा वापरणारया, अफवा– द्वेष पसरवणाऱ्या या लोकांना मोदींनी अनफॉलो करावं म्हणून मोहिमा राबवून झाल्या पण मोदी अजून तरी बधले नाहीत. डॉ.ज्वाला गुरुनाथ या महिलेला पूर्वी मोदी फॉलो करत होते, भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांच्याशी तिचे वाद झाले. त्याचे पडसाद मिडीयात उमटले. या महिलेने बग्गा यांच्याविषयी तक्रार केली, बग्गांना काही झाले नाही पण मोदींनी तिला अनफॉलो केले. न्याय मागणाऱ्या महिलेला मोदी अनफॉलो करू शकतात तर महिलांना अर्वाच्च शिव्या देणाऱ्या, दमदाटीची भाषा वापरणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या अन सामाजिक मूल्यहीन लोकांना ते का अनफॉलो करत नाहीत ? मोदी ज्यांना फॉलो करतात त्यांनी काय लिहिलं याबद्दल मोदींना दोषी मानता येणार नाही हे नक्की. मात्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ते कोणा एका धर्माचे, पंथाचे, पक्षाचे, विचारधारेचे वा अश्लाघ्य टोळीचे पंतप्रधान नाहीत. या लोकांना फॉलो करण्यासाठी त्यांची निवड त्यांनी स्वतःच केली आहे. त्यामुळे त्यांना अनफॉलो करून उचित आदर्श घालून देणे हे त्यांचेच काम आहे. जनतेचा भरभरून कौल लाभलेल्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीने ‘ट्रोलभैरवां’चे फॉलोअर होणे नैतिकतेच्या कोणत्या चौकटीत बसते याचा विचार ते करतील काय ?

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा