शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

कट्टरवादयांच्या अराजकाची नांदी ...


बंगालच्या माल्डाहून आलेल्या ४७ वर्षीय मुहम्मद अफराजुल या ठेकेदारास राजस्थानातील राजसमंद येथे आयसीसच्या हत्याऱ्याप्रमाणे आधी गळा चिरून, नंतर मारहाण करून जिवंत जाळून मारले गेले. शंभूलाल रेगर या नराधमाने ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हे निर्घृण कृत्य केले. इतके करून त्याचे समाधान झाले नाही, आपली दहशत बसावी, या घटनेमुळे मुसलमानांनी भ्यावं यासाठी त्याने या कृत्यादरम्यान याचा व्हिडीओ एका अल्पवयीन नातेवाईकास काढायला लावून तो व्हॉट्सअपवर पोस्ट केला. काही क्षणांमध्येच संपूर्ण देशभरात हा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्या व्हॉटस्अप ग्रुपवर तो पोस्ट करण्यात आला, तो भाजपाच्या नेत्याने तयार केलेला होता. त्यामुळे याचे तार भाजपाशी जोडले गेले. या घटनेनंतर भाजपच्या त्या नेत्याने 'शंभूलालशी आपला कसलाही संबंध नाही' अशी भूमिका घेतली.

वास्तवात वसुंधरा राजेंचे सरकार सत्तेत आल्यापासून राजस्थानमध्ये सामाजिक स्वास्थ्य आणि जातीय धार्मिक सलोखा बिघडल्याच्या दार्शनिक असणाऱ्या पुष्कळ घटना मागील काही महिन्यांत घडल्यात ; त्या पार्श्वभूमीवर आणि देशात हिंदुत्ववादाचा, हिंदूराष्ट्राचा अजेंडा राबवू इच्छिणाऱ्या सरकारचा अंमल सुरु झाल्यापासूनच्या एकंदर घटना पाहता या घटनेकडे त्याच नजरेने पाहणे क्रमप्राप्त ठरते. एप्रिल महिन्यात स्वयंघोषित गोरक्षकांनी पेहलू खान या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याची हत्या केली. ही हत्या करणाऱ्या खऱ्या मारेकऱ्यांना अजूनही अटक झालेली नाही आणि ज्या अन्य आरोपींना अटक झाली ते जामीनावर बाहेर आलेत. देशभरात धर्मद्वेषापोटी मारहाण तसेच हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच धर्तीवर केरळात संघस्वयंसेवकांवर होत असणारया हल्ल्याची दुसरी बाजूही दुर्लक्षिता येत नाही, तर याचा प्रतिवाद करताना  मार्क्सिस्टांची हत्या अधिक प्रमाणात झाल्याकडे मार्क्सवादी लक्ष वेधतात. 

देशभरात गायीच्या कथित कत्तलीवरून, गोमांस बाळगल्यावरून, गायीचे चामडे काढल्यावरून वा तत्सम कारणांवरून मागील काही वर्षात अनेक हत्याकांडे घडली आहेत, दंगली घडल्या आहेत, जाळपोळीचे उद्रेक घडलेत. त्याचवेळी याची हिंसक प्रतिक्रिया म्हणून काही ठिकाणी गोरक्षकांवर हल्ले केल्याच्या तुरळक घटनाही घडल्या आहेत. केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून यावर टीकेची तीव्र झोड उठल्यावर मोदींनी गायीला गोंजारावं तसं गोरक्षकांना गोंजारून पाहिलं. या मुद्द्यावर कडक कारवाईची त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून उपयोग नाही, कारण त्यांच्या सरकारची एकंदर ध्येयधोरणे आणि विचारधारा पाहिल्यास पंचगव्यास शिरोधार्ह मानताना अशा घटनाकडे कानाडोळा करत त्यावर तोंडदेखली कारवाई केल्याचा आव आणल्याचे सोंग वठवणे त्यांना भाग आहे.

याची नकळत होणारे परिणामस्वरूप म्हणून आणि हिंसेचा लंबक सगळीकडे झुलत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्रिपुरापासून ते काश्मीरपर्यंत आणि दिल्लीपासून ते केरळपर्यंत एकट्या दुकट्या माणसाला जमावाने वा एका दोघांनी घेरून अमानुष मारहाण करत सार्वजनिक रित्या ठार मारण्याचा हा कसाई ट्रेंड आता आपल्या देशात नकळत रुजलाय. काही वर्षापूर्वी परप्रांतीय मजुरांना चोर ठरवत अमानुष जीवे मारल्याची घटना जेंव्हा मणीपूर येथे घडली होती तेंव्हा सगळ्या देशातील वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाने त्याला मोठी स्पेस दिली होती. आता मात्र अशा हत्या ही नित्याचीच बाब होऊन बसलीय. मिडीयाला यातले स्वारस्य नाही अशातला भाग नाही, मेलेला कुठल्या जातीधर्माचा होता आणि मारणारे कोणत्या जातीधर्माचे आहेत यावरून अशा बातम्यांची स्पेस ठरते आणि तिला किती उचलून धरायचे हे ठरते. हे लोकशाहीसाठी जितके घातक आहे त्याहून अधिक पत्रकारीतेसाठी घातक आहे. याहून वाईट गोष्ट अशी की मारेकरी जमाव हा ज्याला मारत असतो त्याच्या जातधर्माबद्दल त्याला पराकोटीची घृणा असते. काही दशकापूर्वी एकमेकाला भाईचाऱ्याचे आदर्श देणाऱ्या लोकमानसात इतका हिंसात्मक तिरस्कार कोठून आला  याचे उत्तर शोधायला आपल्याला दूर जावे लागणार नाही, आपल्या हातातील मोबाईल, चोवीस तास भडक स्वरूपाचं वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि गरळ ओकणारा सोशल मिडीया हे घटक यासाठी पायाचे दगड ठरले आहेत.           

केंद्र सरकार असो वा राज्य सरकारे असोत कारवाईच्या फाईली अशा वेळी नाचवल्या जातात. महाराष्ट्रातले दाभोलकर, पानसरे हत्याकांड असो वा कर्नाटकातील कलबुर्गी, गौरी लंकेश हत्याकांड असो अशीच क्रूरता आणि तिरस्कार अनुभववास आला. अद्यापही या घटनांचा तपास थंड्या बस्त्यात आहे. विशेष म्हणजे या  दोन्ही ठिकाणी भिन्न पक्षांची सरकारे आहेत. देशभरात या हत्यांचे अराजक कमी अधिक प्रमाणात पण सर्वत्र माजलेले आहे. राजस्थानपुरते बोलायचे झाल्यास मुख्यमंत्री वसुंधरा राजे या घटनांनंतर पुढे येऊन त्याचा निषेध करत असल्या तरी राज्यातील कायदा - सुव्यवस्था कोलमडल्याचेच हे लक्षण आहे. सरकारचा वचक नाहीच. उलट त्यांच्याच समर्थकांची ही लीला असावी अशी शंका यावी असे वातावरण आहे. कारण, या घटनांत गुन्हे नोंदलेल्यांवर कोणतीही जरब न बसता त्यात सातत्याने वाढच होतेय.

ज्या शंभूलाल रेंगरने ही हत्या केली त्याने हत्या केल्यानंतर दाखवण्यासाठीचे प्रक्षोभक व्हिडीओ हत्येपूर्वी काही दिवस आधीच तयार करून ठेवले होते. तो काही कामधंदा करत नव्हता, त्याची पत्नीच पोटापाण्याचे बघत होती. दिवसभर गांजा ओढायचा, मोकाट फिरायचे वा घरी बसून राहिल्यास भावना भडकावणारे व्हिडीओ पहायचे हा त्याचा आवडता उद्योग होता. त्याने बऱ्याच मोठ्या रकमेचे कर्जही घेतले होते याचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. कारण शंभूलालला अटक झाल्यानंतर त्याला धर्मसैनिक ठरवत त्याच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन केले गेले आणि तीन दिवसात अडीच लाख इतकी रक्कम त्याच्या खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शंभूलालने ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्यांचा त्याच्यामागे सारखा तगादा सुरु होता  त्यापासून कशी सुटका मिळवायची आणि पैसेही कसे जुळवायचे याचे उत्तर त्याला मिळत नव्हते. याच दरम्यान त्याच्या डोक्यातील मुसलमान विरोधाने पराकोटीची सीमा गाठली होती. त्याच्या डोक्यात ज्याला मारायचे होते ती व्यक्ती ही नाही हे देखील त्याला कळले नाही इतका द्वेष त्याच्या ठायी साठला होता. व्यक्तीगत द्वेषापायी त्याने अफराजुलची हत्या केली आणि लोकांच्या भावना भडकाव्यात याकरिता त्याला 'लव्ह जिहाद'चा रंग देण्याचा प्रयत्न केला. 

अपेक्षेप्रमाणे पंतप्रधानांनी या घटनेचा निषेध केला नाही. जो पक्ष संसदेपासून ते विविध राज्यांच्य विधानसभेत मुसलमानांनी येऊ नये यासाठी त्यांना उमेदवारी देणेच बंद करत आहे त्या पक्षाकडून अशी अपेक्षा करण्यात काय हशील ? मोदीजी हे भाजपाचे पंतप्रधान नसून देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांचे नायक आहेत याचा विसर पडावा हे खेदजनक आहे. मात्र त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे काही बेलगाम हिंदुत्ववाद्यांना चेव चढतो आणि त्यातून जन्माला येतो तो धर्मविघातक अंधोन्माद. याचीच प्रचीती म्हणजे अफराजुलला न्यायालयात नेत असताना शेकडोंचा जमाव गोळा झाला, काहींनी भगवा ध्वज नाचवत शंभूलाल हाच आपला हिरो असल्याच्या घोषणा दिल्या. यावेळी पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते पण जेंव्हा बघ्यांची संख्या वाढू लागली, रहदारी तुंबू लागली तेंव्हा पोलिसांनी या निदर्शकांच्या म्होरक्यास अटक केली. तो राजस्थान भाजयुमोचा पदाधिकारी निघाला. एका माणसाला बेदम मारून जिवंत जाळले जाते आणि काहीशे लोक त्या मारेकऱ्याच्या समर्थनार्थ गोळा होऊन झुंडशाही करतात आणि प्रशासन कारवाईचा फार्स करत राहते हे सगळेच धक्कादायक आणि असमर्थनिय आहे. 

धर्मद्वेषाची पाळेमुळे खणताना मिडीयाचा पंचनामा अनिवार्य आहे. काही वृत्तवाहिन्यांवरून रोज न चुकता 'आयसीस' या कडव्या इस्लामी मुलतत्ववादी संघटनेकडून केल्या जाणाऱ्या निर्घृण हत्यांचे व्हिडीओ प्रसारित करण्यात कदाचित इस्लामद्वेषाची भावना वाढीस लागावी हाच हेतू असू शकतो. इंटरनेटवर बंदी घातलेले व्हिडीओ देखील आपल्या काही वाहिन्या धूसर करून दाखवतात ! याला प्रत्युत्तर म्हणून त्यांना धडा शिकवण्याची भाषा केली जाते. याचे कर्ते करविते राजकारणी असतात आणि डोक्यात कट्टरतावाद रुजत चाललेले तरुण त्याला बळी पडतात ! परिस्थिती हाताबाहेर गेल्यास सर्वोच्च पदी नेता कोणताही असला तरी गर्दीचे मानसशास्त्र त्याला जुमानत नसते असा आजवरचा इतिहास सांगतो. क्रियेला प्रतिक्रिया म्हणून माणसे मारली जाणार असतील तर आपण 'आयसीस'च्या पुढे जातो आहोत कारण 'आयसीस' जिथे धुमाकूळ घालते आहे तो सैनिकी प्रशासनाचा अंमल असणारा देश आहे आणि आपल्याकडे लोकशाही आहे. हिंदुत्ववादयांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपणच निवडून दिलेले बहुमतातले सरकार डावलून धर्मद्वेषापायी मुसलमानांच्या हत्या कराव्या वाटत असतील, त्या हत्यांचे समर्थन करावेसे वाटत असेल तर  खऱ्या अर्थाने ते हिंदुत्ववादाचे विच्छिन्न रूप असेल.  इस्लामी वा हिंदू दोन्ही धर्मातील धर्मप्रसारकांकडून याला वेसण घालण्यासाठी कोणतेही ठोस उपाय योजले जात नाहीत ही बाबही येथे दुर्लक्षित करता येत नाही. कट्टरतावाद्यांच्या अराजकाची ही नांदी आपल्या नेत्यांना समजत नसेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.  


- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा