मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

'लांड्या' विचारांचा मुखभंग ...


पंधरा ऑगस्टच्या एक दिवस आधी आपल्या लोकांच्या मेंदूपासून ते बुडख्यापर्यंत राष्ट्रप्रेमाचे झरे वाहत असतात. हा साथीचा आजार फक्त तीन दिवसच असतो. आता तर व्हॉटसएपचे बिनडोक फॉरवर्डछाप पब्लिक देशभरात प्रसरण पावलेलं असल्याने याचे पेव गल्लोगल्ली आढळते. कुणी कच्चा हरभरा खाल्ला तरी त्याचा गंध त्याच्या सोशलमिडीयातून इतरांच्या मोबाईलमध्ये पसरतो. असो. आवड ज्याची त्याची..
तर पंधरा ऑगस्टला आलेल्या देशप्रेमाच्या भरतीत पाण्यात उभं राहून तिरंग्याला सलाम करणारी मुले आणि त्यांचे शिक्षक हा फोटो देशभरात व्हायरल वगैरे झाला. अनेकांनी त्यांना सलाम, त्रिवार वंदन, कडक कुर्निसात, सेल्युटही केला. अनेकांनी त्यासोबत आपल्या बद्धकोष्टी कवितादेखील पोष्टून आपलं काव्योदर साफ करून घेतलं. असो ज्याचं त्याचं पोट...

काही दिवसापूर्वीच्या या फोटोमागची दुर्दैवी कहाणी समोर येऊ लागली तशी ही पोरे आणि त्यांचा शिक्षक काहींचा नावडता झाला. त्यांची आणखी माहिती पुढे आणण्यात हशील नाही हे काही धूर्त देशप्रेमी कावळ्यांच्या ध्यानी आले. आधी जितकी प्रसिद्धी मिळाली त्याच्या एक शतांश प्रसिद्धी खऱ्या वस्तूस्थितीला मिळाली नाही हीच सध्याची शोकांतिका आहे जी पूर्वनियोजित आहे.

हा फोटो पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचाच होता. लोअर आसाममधील धुबरी जिल्ह्यातील फकीरगंज परगण्यामधील नस्करा गावातील हा फोटो होता. ज्यात शिक्षक आणि दोन मुले पाण्यात उभं राहून ध्वजवंदना देत होते. शिक्षकांच्या कंबरेइतकं पाणी होतं तर मुलांच्या छातीवर पाणी होतं. लोकांनी हा फोटो पाहिला आणि रानटी उन्मादातलं माकड जसं हावऱ्यासारखं हे खाऊ का ते खाऊ करतं तसे हे फोटो वाट्टेल त्या कॅप्शनखाली छाती फुगवू फुगवू शेअर केले. काय होती वस्तूस्थिती याचा मर्मभेद कोणाला करून घ्यावा वाटला नाही !

आसाममध्ये यंदा झेंडावंदनासाठी एक फतवा (!) शिक्षण विभागाने जारी केला होता. (आसाममध्ये सरकार कुणाचे आहे हे विचारू नका) प्रत्येक शाळेने झेंडावंदन करायचं आणि त्याचे ध्वजसलामीचे फोटो संबंधित विभागीय शिक्षण खात्याकडे पाठवून द्यायचे. फोटो त्याचदिवशी अपलोड न केल्यास कारवाईचा बडगा दाखवण्यात आला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयापासून आसामला पूराने महाकाय विळखा घातलेला असताना हा आदेश काढला गेला हेच खरे राष्ट्रप्रेम (तुमचं माझं देशप्रेम बेगडी आहे  !)

या फतव्याने चौदा ऑगस्टला शिक्षकांना प्रश्न पडला की आता पोरांचा जीव धोक्यात घालायचा की आणखी काही आगळीक करायची ? शेवटी त्यांनी मधला मार्ग काढला. सगळ्या मुलांना शाळेत येणं त्यांनी अनिवार्य केलं. सगळी मुलं पंधरा ऑगस्टला शाळेत आली. कल्पना करा भल्या सकाळी पुराच्या लोंढ्यातून  छातीभर पाण्यातून आपल्या घरापासून ती मुलं कशी चाल्रत आली असतील ! मुलं प्रांगणात जमा होताच शिक्षकांनी नामी शक्कल लढवली. त्यांनी पट्टीचं पोहणारी इयत्ता तिसरीतील दोन मुले पाण्याच्या मुख्य प्रवाहात घेतली आणि बाकी मुलं बाजूच्या सडकेवर पाण्यात उभी केली. वेळेवर तिरंगा फडकला. शिक्षकांनी आणि पोरांनी ओल्या अंगाने छातीभर पाण्यात राष्ट्रगीतही गायले, वंदेमातरमही गायले. (उगाच का कुणाचा रोष घ्यावा ! बिचारे बापुडवाणे)

आता पुढची नावे पहा. या नस्कारा लोअर प्रायमरी स्कूलचे हेडमास्तर आहेत तझिम सिकदर आणि मुलांना पाण्यात घेऊन उभे असलेले शिक्षक आहेत मिझनुर रहमान. ( या मिझनुर रहमानचा अर्थ खूप सुंदर आहे - परमदयाळू ईश्वराचा संतुलित विचारप्रवर्तक !!) शाळेतील नव्वद टक्के मुलं मुस्लीम आहेत. मिझनुर रहमान यांनी पंधरा ऑगस्टच्या फतव्यानुसार फोटो काढले आणि क्लस्टर रिसोर्स सेंटरचे कॉर्डीनेटर आमीर हमजा (अरेच्चा पुन्हा मुसलमानच !!) यांना पाठवले. त्यांच्याकडून ते बीडीओकडे पाठवले गेले. फोटोंच्या या प्रवासातच ते व्हायरल झाले आणि ते पाहून अनेकांना देशप्रेमाचे भरते आले.

त्या दिवशी पूराच्या घाण पाण्यात जिथे साप विंचवाचे साम्राज्य होते तेंव्हा दोन्ही मुलं (वय वर्षे आठ) जीव मुठीत घेऊन उभी होती. जीव धोक्यात घालून इतर सगळी मुलं शाळेत आली होती कारण शिक्षकांचा दम तसाच होता. फोटो काढून पाठवले नसते तर त्यांची नोकरी गेली असती सबब हा सगळा द्राविडी प्राणायम करणे भाग होते. झेंडावंदनाचा हा सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर काही तासातच मिझनुर रहमान यांचा अठरा वर्षीय चुलत भाऊ रशिदुल इस्लाम (पुन्हा एकदा मुसलमान !) याच जागेवर पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला आणि काही तासात त्याचे शव हाती लागले. रशिदुल हा झेंडावंदनाच्या वेळेस तिथे आला होता की नव्हता याविषयी नेमकी माहिती मिळाली नाही. मिझनुर रहमान दुःखी कष्टी झाले, पण संध्याकाळ होताच त्यांनी तशा मानसिक अवस्थेतही त्याच पाण्यात त्याच ठिकाणी जाऊन झेंडा उतरवून घेतला.

बांग्लादेशच्या सीमेवर असलेल्या धुबरी जिल्ह्यातील लोकसंख्येत ७५ टक्के मुस्लिम राहतात. तिथल्या एका शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि हेडमास्तर सगळेच मुस्लीम असले तर त्यात नवल ते काय ? तिरंगा सर्वांचाच आहे, सर्वांनाच त्याचे प्रेम आहे पण काही विशिष्ट धर्मभेदी लोक वारंवार देशातील सकल मुस्लिमांच्या हेतूवर शंका घेऊन तशी विधाने करत असतात. त्यांचे बिनडोक समर्थक त्यांच्या प्रक्षोभक विधानांना भडक अन सवंग प्रसिद्धी देऊन वातावरण आणखी दुषित करत असतात. काही तासात ज्याचा भाऊ पाण्यात बुडून मेला त्या मिझनुर रहमानची इस्लामिक आयडेंटीटी व नंतर घडलेली दुर्घटना यांचा थोडाफार उहापोह होऊ लागताच या धर्मभेदयांच्या कानाला दडे पडले आणि या माहितीस रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होऊ लागला. त्या वेळी ती शाळकरी मुलं पाण्यात बुडून मेली असती तर त्याची जबाबदारी ह्या व्हॉटसएपी देशभक्तांनी घेतली असती का ? सक्ती कशाची असावी ?  देशप्रेमाचे नेमके संकेत बनवायचे अधिकार कोणाला आणि कसे मिळाले ? खंडीभर इस्लामविरोधी पौ टाकणाऱ्या मिडीयाला वस्तूस्थिती कळल्यानंतर यावर प्रकाश टाकावा असे का वाटले नाही ? पूरस्थितीचे नियंत्रण हाताबाहेर गेले असताना प्राधान्य कशाला द्यायला हवे याचे भान सरकारला असायला हवे की नाही ? देशप्रेम हे असे दाखवलेच पाहिजे का ? नुसताच भूप्रदेश हवाय की त्यातली सगळी हाडामासाची माणसंही आपल्याला सोबत हवीत ? समजा पाणी आणखी वर चढले असते तर त्या शिक्षकांनी वा विद्यार्थ्यांनी कोणती कृती करणे अपेक्षित होतं ? असो...

असे प्रश्न विचारायचे नसतात. कारण, आपल्याकडे असे प्रश्न विचारले की एक उन्मत्त टोळधाड अंगावर येते आणि ती प्रश्नकर्त्याची टवाळी करू लागते. एरव्ही सोशल मिडीयावर आपआपल्या सिक्रेट कंपूत मुस्लिमांना लांडया म्हणणारे या पोस्टवर येऊन मुस्लिमांचे तोंडदेखले कौतुक करून जातील पण मित्रांनो लक्षात ठेवा, देश सर्वांचा आहे आणि सर्वांचे त्यावर प्रेम आहे. खरे देशद्रोही तर ते आहेत ज्यांचे विचार लांडे आहेत. धुबरीमधली ही घटना म्हणजे अशा लांडया विचारांचा मुखभंगच होय...   

- समीर गायकवाड. 

( या पोस्टमुळे मुस्लीम बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागतो पण माझा हेतू भावना दुखावणे नसून वस्तुस्थिती समोर आणणे हा आहे, त्यासाठीच पोस्टमध्ये काही अपमानजनक शब्द वापरावे लागले)       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा