२० ऑगस्ट २०१३ ला पुण्यात नरेंद्र दाभोलकरांच्या रूपाने
महाराष्ट्राच्या विवेकवादाची दिवसाढवळ्या निर्घृणहत्या करण्यात आली. त्या घटनेला
आज चार वर्षे पूर्ण झाली. अत्यंत भ्याड हल्ला करून या दिवशी त्यागवादी सजगतेवर
नियोजनपूर्वक घाला घातला गेला. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सनातनी विचारांना वंदनीय
मानणाऱ्यांनीच केल्याचा कयास त्या दिवसापासूनच उभ्या महाराष्ट्राने व्यक्त केलाय.
ही हत्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वसनांवरचा रक्तरंजित डाग आहे ज्याचे
सद्य स्थितीत तर कोणत्याच राजकीय पक्षाला कसलेच सोयरसुतक दिसून येत नाही.गांधीवादी
विचारांवर श्रद्धा ठेवून आपली चळवळ शांततेच्या मार्गाने पुढे नेणाऱ्या, वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका निशस्त्र व्यक्तीस मारलं गेलं
तेंव्हा राज्यभर नव्हे तर देशभर त्याबद्दल निषेध व्यक्त केला गेला,सर्वत्र एकच कोलाहल माजला तरी तपास यंत्रणांच्या कानात जू रेंगली
नाही की कोणा राजकारण्याला याचा खंतखेद वाटला नाही. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना
अटक व्हावी,
तपास जलदगतीने व्हावा म्हणून
राज्यातील विरोधी पक्ष लाजेकाजेने का होईना अधूनमधूनक्षीण आवाज उठवताना दिसतात.
त्यांचा आवाज असा क्षीण का आहे याला विविध कारणांची 'भगवी','हिरवी', 'निळी' झालर आहे.
विरोधी पक्षांनी सरकारला याचा जाबविचारण्याचा प्रयत्न केल्यास आज सत्तेत असणारी सेनाभाजपाचे सरकार नेहमीच युक्तिवाद करते की, दाभोलकरांची हत्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेली असल्याने त्यांनी कायदा व सुव्यस्थेचं ज्ञान आम्हाला शिकवू नये. मात्र त्यांना याचा सोयीस्कर विसर पडतो की दाभोलकरांच्या हत्येनंतर तपास जलदगतीने व्हावा म्हणून तेंव्हा जीवापाड कांगावा करणारेच आता मुख्यमंत्रीपदी आरूढ आहेत ! आता सरकारच त्यांचे आहे, मग तपास का पूर्ण होत नाही ? मारेकऱ्यांना कोण पदराखाली घेते आहे हे का जनतेला ओळखू येत नाही ! याविषयीच्या भावना मनमोकळेपणे व्यक्त करण्याचे धाडसही फारसं कुणी दाखवत नाही हे महाराष्ट्राच्या निर्भीड, निस्पृह बाणेदार परंपरेला धरून नाही हे नक्की. मिडीयात कुणी यावर बोलायला गेलं की त्यांचा 'निखील वागळे' होतो ! राज्यात आजवर अनेक हत्याकांडे झाली, दंगली झाल्या, निर्घृण खून झाले पण त्यापायी सर्व राजकीय पक्षांना तोंड लपवायची अशी पाळी कधी आली नव्हती. आजवर अशी मोजकीच माणसं होऊन गेलीत की ज्यांनी समाजसेवेची अनवट पायवाट आपली हाडेकाडे झिजवून मळली. स्वातंत्र्यपूर्व काळात अशा समाजधुरीणांना जो सन्मान मिळत होता तो आता का नाहीसा झाला याचे उत्तर मागील काही दशकात होत असलेल्या जातीधर्माच्या ध्रुवीकरणातून मिळते.....
राष्ट्रसेवा दलातल्या कामापासून नरेंद्र दाभोलकरांचा ओढा
सामाजिक कार्याकडे तरुण वयापासूनच होता.त्यात त्यांच्या सत्यशोधक वृत्तीला चालना
मिळत गेली. आत्मचिंतनातून त्यांना प्रकर्षाने जाणवत राहिलं की, ‘भौतिक साधनांचा परिवर्तनीय विकास हा वरवरचा असून लोकांमधील
विवेक लोप पावत जाण्याची प्रक्रिया अखंडीतच राहिलीय, यात मोलाचा वाटा आहेतो समाजाच्या मनावर असलेल्या
अंधश्रद्धांचा पगडा आणि रूढी परंपरांकडे वाढत चाललेल्या कलाचा.’ भारतीय समाजाचे मनोबल वाढण्यात, सर्वंकष जडणघडणीत रूढीप्रथांचे जोखड नेहमीच वरचढ राहिले.
मागील सह्स्त्रकांचा इतिहास जरी अभ्यासला तर हेच चित्र अधिक गडद होताना दिसते. या
सर्व घटकांचा अभ्यास केल्यावर दाभोलकरांनी त्याविरुद्ध दंड थोपटले. कष्टाने अर्जित
केलेली एम.बी.बी.एस.ची चांगली अर्थार्जन करून देईल अशी पदवी हाती असूनही सहज सुकर
आयुष्य त्यांनी नाकारलं. समाजातील विवेकाचा वाढता ऱ्हास आणि कालबाह्य रुढी-परंपरा
व अंधश्रध्दांच्या वाढत्या घोराने अस्वस्थ झालेल्या दाभोलकरांना जेपींच्या 'कुछ बनो'या
शब्दांनी ध्येयासक्त केले. सोपी आव्हाने बाजूला सारून समाजमनाचा रोष अंगावर येईल
अशा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात ते आधीन झाले. त्यांनी स्वतःची सुखे त्यागताना
कौटुंबिक आनंदावरही पाणी सोडले.
यातून दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांचे नाते इतके
दृढ झाले की,
राज्यभरात कुठेही अंधश्रद्धेची
अप्रिय घटना घडली की लोक लगेच प्रश्न विचारत, "आता कुठे गेले ते दाभोलकर ?" या पृच्छेमागे प्रश्नकर्त्याचा एक कुत्सितपणा असायचा, हे राज्याच्या पुरोगामित्वाचे ढळढळीत अपयश होय. कारण
बहुतांश करून कट्टरतावादीच हा सवाल करत असत. हिंदुत्ववाद्यांनी तर दाभोलकरांवर एक
आरोप सातत्याने केला की,
त्यांनी केवळ हिंदू धर्मातील अनिष्ट
रूढी प्रथा परंपरावर प्रहार केला. हा आरोप एक धादांत षडयंत्र होते जे 'कुजबुज मोहिमे'तून
राबवले गेले होते ज्याला सामान्य जनताकाही अंशी बळी पडली होती. दाभोलकरांनी आपला
वसा जारी ठेवताना जातधर्मभेदाचे छद्म कधीही अवलंबले नाही. त्यांनी सर्व धर्मांत
असलेल्या अंधश्रद्धांवर तितक्याच समान ताकदीने वज्राघात केले. खरे तर कुठेही अशी
घटना घडताच त्यांचं नाव निघणे हे त्यांच्या कार्याच्या यशस्वितेचे दार्शनिक होते. ‘आपल्याला स्वच्छता मोहीम हाती घ्यायची असेल तर सुरुवात
आपल्या घरापासून केली पाहिजे म्हणून मी माझ्या समाजापासून या मोहिमेची सुरुवात
केली’
असे ते मोठ्या निष्ठेने आणि
आत्मीयतेने सांगत. त्यात चूक काय होते हे कोणीही सांगू शकले नाही मात्र त्यांच्या
कार्यावर भेदाचा आरोप व्यर्थ लावला गेला. त्यांना भीक न घालता दाभोलकरांची वाटचाल
देशव्यापी चळवळीच्यादिशेने सुरु होती. ज्याचा पोटशूळ अनेक कट्टर धर्मांधांना
उठलेला होता व या चळवळीतून होणाऱ्या जनप्रबोधनातून आपले दुकान बंद होत आहे हेही
त्यांना ध्यानात आले होते. याने धास्तावलेला एक वर्ग त्यांच्यावर चिडून होता.
यातून प्रसवलेल्या अविचारातूनच दाभोलकरांची निर्मम हत्या झाली असावी. नरेंद्र
दाभोलकरांच्या पश्चात त्यांचे अख्खे कुटुंबच या कामी राबत असल्याचे चित्र आज दिसून
येतेय. 'आम्ही सारे दाभोलकर' असा घोष करत तरुणाई देखील त्यांच्या कार्यात हिरीरीने
उतरली असल्याचे दिसतेय.
दाभोलकरांच्या खूनानंतर सरकारने तपासाच्या नावाखाली
अक्षरशः कायद्याची टवाळकी केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आधी स्थानिक पोलिस, मग विशेष तपास पथके, सीआयडी ते सीबीआय असा प्रवास आणि त्यासाठी दाभोलकरांच्या
अनुयायांना झिजवावे लागलेले
उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे उंबरठे हे सर्वच संतापजनक होतं पण सरकारे गेंड्याच्या
कातडीची निघाली. हायकोर्टाने या प्रकरणी जवळपास प्रत्येक सुनावणीत ताशेरे मारूनही
काहीच फरक पडलेला नाही अन काही विशेष प्रगतीही झालेली नाही. उलट दाभोलकरांच्या
हत्येनंतर आधी ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे
यांची दाभोलकरांशी मिळत्याजुळत्या पद्धतीने हत्या केली गेली. त्या नंतर विख्यात विद्रोही
विचारवंत,
तत्ववादी अभ्यासक एम.एम. कलबुर्गी
यांचीही हत्या अशाच मोडस ऑपरंडीतून झाली. एका पाठोपाठ एक अशा तीन हत्यांनी देशभरात
खळबळ उडाली पण कायद्याच्या दलालांनी यात पुरती खबरदारी आधीच घेतली असल्याचे दिसून
येते. ज्या 'सनातन प्रभात'च्या
तथाकथित साधकांवर याविषयीचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे तीच संस्था याविषयी हात
झटकताना आढळते. हे तेच लोक आहेत जे गांधीजींच्या हत्येचं वर्णन गांधीवध अशा शब्दात
बेदिक्कतपणे करतात. यातील फरार संशयित आरोपी असणाऱ्या साधकांची माहिती संस्थेला
माहिती नाही असं त्यांचं म्हणणं वारंवार मांडण्यात येतं. सोबतच ते निर्दोष सिद्ध
होतील अशी पुस्तीही न चुकता जोडली जाते. किमान त्यासाठी तरी त्यांनी न्यायालयात
आलं पाहिजे हे का त्यांना कळत नसेल काय ? विशेष बाब म्हणजे 'सनातन'चे साधक त्यांचे संस्थापक जयंत आठवले यांना श्रीकृष्णाचा
अवतार मानतात. मग या कृष्णांस काही साधकांचा पत्ता कसा उमगत नसावा हा प्रश्न
कुणालाच कसा पडत नाही ?
दाभोलकरांच्या नंतरची चार वर्षे त्यांच्या खून खटल्याच्या
तपासाच्या दृष्टीने असमाधानकारक आहेत आणि भोवतालच्या घडामोडीही औदासिन्य आणणाऱ्या
अशाच आहेत. देशभरात कर्मठवाद्यांनी डोके वर काढलेले आहे, टाकून दिलेल्या जुन्या विचारधारांकडे (?) लोक वळताहेत, कर्मकांडाचे स्तोम वाढताना दिसतेय, ज्या कायद्यासाठी दाभोलकरांनी जीवाचे रान केले होते त्याला
पंगुत्व आलेल्या स्वरुपाचा आकार देण्यात आला जेणेकरून अनेक घटक त्याच्या कक्षेतून
सुटून मोकाट राहिलेत,
रूढी परंपरा पाळणे हा आता अस्मितेचा
भाग बनू लागलाय,
इतकेच नव्हे तर पुराणातील वांगी
बाहेर काढून त्याला दैवस्वरूप देण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना त्याला अतार्किक
वैज्ञानिक मुलामाही चढवला जातोय. मुलभूत विज्ञानाला प्रोत्साहन देण्याऐवजी छद्म
विज्ञान म्हणजेच अवैज्ञानिक विचारसरणी प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून
देशपातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. या विरोधात मुंबईतील नामांकित विज्ञान
संस्था आणि वैज्ञानिक यांच्यावतीने निषेध मोर्चाचे काही दिवसांपूर्वीच आयोजन
करण्यात आले होते. विज्ञानावरील निधीत कपात करून शेणामूतातील दिव्यत्व शोधून
काढण्यावर भर दिला जातोय. अशा घटना घडत असतानाच एकीकडे ‘तुमचा दाभोलकर केला जाईल’ अशी टॅगलाईन उजळ माथ्याने मिरवणारे लोक आजकाल गौरवले
जाताहेत तर दुसरीकडे प्रलंबित तपासात खोटी जान आणण्यासाठी दहा लाखांचे बक्षीस
जाहीर करण्यापलीकडे मजल गेलेली नाही ! या घडामोडींचे वैषम्य शासकांना वाटत नाही.
आपल्या देशातील जनतेचे तर्कटही अजब चालते, ज्या हिंदुत्ववादयांना आपल्या धर्मातील दाभोलकरांसारख्या
सुधारकांचा तिटकारा वाटतो त्यांना इस्लाममधील विद्रोही विचारवंत तस्लिमा नसरीन आणि
सलमान रश्दी वंदनीय वाटतात हे विशेष ! तर ज्या इस्लामी कट्टरवादयांना हमीद दलवाई
आणि रश्दी,
तस्लिमांचे वावडे आहे त्यांना
दाभोळकर,
पानसरे, कलबुर्गी यांच्याप्रती आस्था वाटते. हे सगळे पुढारलेपणाचे
ढोंग आहे,
प्रत्यक्षात आपण प्रचंड वेगाने मागे
जात आहोत ज्याची फिकीर ना धर्मांधतेकडे झुकत चाललेल्या भोळसट जनतेला ना धर्मवादाचा
छुपा गजर करणाऱ्या सरकारला ! यामुळेच दाभोलकरांच्या पश्चातची चार वर्षे बहुआयामी
अधोगतीचीच झालीत असे म्हणावेसे वाटते.
- समीर गायकवाड.
(१९ ऑगस्टच्या दैनिक दिव्य मराठीत हा लेख प्रसिद्ध झाला आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा