मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

अनुसरणीय वाटेवरची 'माध्यमातील ती' ...


लग्नाआधी नोकरी करणाऱ्या स्त्रिया लग्न झाले की थोड्याशा धास्तावतात. मातृत्व स्वीकारताना त्यांच्या मनात आणखी घालमेल सुरु होते. तर प्रसूतीपश्चात येणाऱ्या कोंडमारयाच्या दिवसात तिला नोकरीविषयक निर्णय घेणं खूप कठीण वाटू लागतं. नोकरी करावी की नोकरी सोडून दयावी ह्या विचारांच्या चक्रात त्या पुरत्या गुरफटल्या जातात. काही स्त्रिया हल्ली सरकारने उपलब्ध करून दिलेल्या गरोदरपणातील हक्काची रजा वापरून वेळ मारून नेतात पण पुढे काय करायचे याचे नेमके उत्तर त्यांच्याकडेही नसते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते तिथे कर्त्या पुरुषासोबत घरातील स्त्रीला नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नसते. तिथे स्त्रियांकडे कुठलाच पर्याय उरत नाही. तर कधी विपरीत परिस्थिती असते. काही स्त्रियांना विश्रांती हवी असते, सध्याची नोकरी सोडून संसाराकडे लक्ष दयावे असा त्यांच्या अंतरात्म्याचा सूर असतो. पण त्या हुंकाराला त्या आतच दाबतात. तर काही स्त्रिया अशाही असतात की ज्यांना लग्नाआधीही नोकरी करण्याची इच्छा असते मात्र माहेरच्या प्रतिगामी लोकांनी काहीशी आडकाठी केलेली असते त्यामुळे त्या माहेरी असताना नोकरी करू शकत नाहीत.

सासरी आल्यावर त्या चूल - मुल यात गुंतून पडतात. तिथेही त्यांचे मन मारले जाते. तर काही स्त्रियांना नोकरी करू दिली जाती पण त्यांच्या आवडीच्या प्रांताऐवजी ठराविक चाकोरीतील जागी तिला डकवले जाते. अशा विविध वर्गात स्त्रियांची वर्गवारी करता येते. या सर्व स्त्रिया कुटुंबवत्सल, कर्तव्यसन्मुख आणि सहनशील स्वभावाच्या असतात. तर काही स्त्रियांना नोकरी करू दिली जाती पण तिच्या आवडीच्या प्रांताऐवजी ठराविक चाकोरीतील छापील जागी तिला डकवले जाते.

या उलट जी स्त्री बंडखोर विचारांची वा विद्रोहाची कास धरणारी असते ती तिच्या पूर्वनिश्चित केलेल्या वाटेवरूनच आपली वाटचाल करते. बहुतांश स्त्रिया संसाराच्या चक्रव्युहात अडकलेल्या असतात. यातीलच काही जणी संसाराच्या विविध वळणांवर नोकरी सोडतात. एकीकडे काही जणी आपल्या मनातील नोकरीचा विचारच बोलून दाखवत नाहीत. तर दुसरीकडे ज्यांना नोकरी सोडावीशी वाटत असते त्या अर्थार्जनाखातर आपलं संसारात रमणारं मन मारून मुकाटपणे नोकरी करत राहतात. मुले बऱ्यापैकी मोठी होतात त्या टप्प्यावर ह्या स्त्रिया पुन्हा गोंधळतात ! कारण त्यांच्या पुढ्यात रिकामा वेळ आ वासून उभा राहतो. ह्या स्पेअर टाईमचे काय करायचे ह्या विचाराचे कोडे त्यांना सुटत नाही. अशा वेळी काही जणी आपल्या परीने सामाजिक वा कौटुंबिक पसारा वाढवतात अन त्यात मन रमवण्याचा प्रयत्न करतात. ज्यांनी नोकरी सोडलेली असते त्यांना या काळात बऱ्यापैकी पश्चाताप होऊ लागतो.

दुसरीकडे विवाहपश्चात बऱ्याच पुरुषांची कालमानानुसार पदोन्नती होते, स्टेट्स वाढते. मात्र वाग्दत्त वधू म्हणून ज्या स्त्रीने आपलं माहेर, गाव- शहर सोडलेले असते, आपल्या इच्छा आकांक्षा मारलेल्या असतात, आपले कर्तृत्व मातृत्वाच्या पोलादी भिंतीत चिणलेले असते तिला राहून राहून जुन्या उर्मी उफाळून येऊ लागतात. अशा वेळी काही कुटुंबात पती पत्नीत संघर्ष देखील होतो परंतू बहुतांश ठिकाणी इथेही स्त्रीच गप्प बसते. एकूणच सर्व वळणावर, सर्व आघाडयांवर स्त्रीलाच त्याग करत राहावे लागते. हे सर्व हाताळत असताना तिला स्त्रीत्वाची अनेक रूपे जगावी लागतात.

अनेक अडचणींवर मात करून जरी स्त्रीला नोकरीची अनुमती मिळाली तरी समोरचे पर्याय खुंटत गेलेले असतात. स्वयंरोजगार निर्मिती एकटया स्त्रीला विचारसुलभ वाटत नाही. अशा वेळी तिने काय करावे याच्या सूचना मग आधी नवरोबा, मग कुटुंबीय आणि शेवटी मित्रमैत्रीणीत त्याची चर्चा सुरु होते. फिरून फिरून तेच बेगडी ऑप्शन्स तिच्यापुढे कळत नकळत जाणीवपूर्वक मांडले जातात, जेणेकरून तिच्या मनातील बेतच रद्द व्हावा. आपल्याकडे समाजाने जुनाट समजुती डोक्यात फिट्ट बसवून काही क्षेत्रातील दारे स्त्रियांसाठी जवळपास बंदच करून ठेवली आहेत. पण कालमानानुसार अनेक बदल जगभरात घडत आहेत. आपला देशही त्याला अपवाद नाही. महिलांनी केले नाही असे काम आजच्या घडीला तर शिल्लक नाही. तरीही वयाच्या कुठ्ल्याही टप्प्यावर अनेक महिला जेंव्हा नोकरी करिअरचा विषय येतो तेंव्हा साचेबंद पद्धतीने आपले पर्याय निवडतात, काहींच्या मनात वेगळे काही तरी करून दाखवण्याची इच्छा असते पण ती ओठावर येतच नाही. महिलांसाठीच्या अडगळीत टाकलेल्या पर्यायात पत्रकारितेचा समावेश होतो. पण आता काळ बदलला आहे. महिलांचा पत्रकारितेतील सहभाग थक्क करणारा आहे. प्रिंट मिडीयापासून ते इलेक्ट्रॉनिक मिडीयापर्यंत महिला मोठ्या आत्मविश्वासाने ह्या क्षेत्रात वावरताना दिसून येत आहेत. या क्षेत्रात महिलांना करिअरच्या संधी आहेत आणि वयाच्या कुठल्याही वळणावर यात दाखल होता येते हे याचे वैशिष्ट्य. ह्याच पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारया महिलांच्या एकत्रित परिचयाची पर्वणी 'माध्यमातील ती' ह्या देखण्या विशेषांकाने दिली आहे. पत्रकारितेच्या अथांग क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या चोवीस महिलांचा नेटका परिचय या विशेषांकातून करून देण्यात आलाय.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या उत्तुंग अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून अभिनेत्री स्मिता पाटीलने तिच्या बाळंतपणात अकाली एक्झिट केली. स्मिताला जाऊन तीस वर्ष होताहेत. पण तिचा ठसा पुसलं जाणं अशक्य असल्याचे दरसाली अधिक ठळकपणे जाणवते आहे. तिच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरातील गिरीश गांधी गेल्या तीस वर्षांपासून 'स्मिता-स्मृती' हा वार्षिक अंक काढतात. हा एक गौरवास्पद व अनुकरणीय उपक्रम आहे कारण, या अंकाच्या माध्यमातून दरवर्षी स्त्रीविषयक विविध जाणिवांचा बहुपेडी परामर्श मांडला गेलाय. यंदाच्या वर्षी 'स्मिता-स्मृती २०१६' द्वारा पत्रकारितेत आपलं करिअर करणारया स्त्रियांच्या जीवनाचा धांडोळा घेण्यात आला आहे. यातील काही जणी पत्रकारितेतील महत्वाच्या प्रयोगाच्या साक्षीदार आहेत वा एखाद्या महत्वपूर्ण उपक्रमाच्या भागीदार आहेत. ह्या सर्वांची पार्श्वभूमी आणि कर्तृत्व वेगवेगळे आहे, या सर्व महिला एका अर्थाने ट्रेड सेटर आहेत. रूढार्थाने हा आडवळणाचा मार्ग असूनही हा अंक विविधरंगी शब्दफुलांचा ओरिगामीचा गुच्छच झाला आहे. हा केवळ माध्यम जगताचा प्रवास नसून त्यातून बदलत्या समाज जीवनावर आणि माध्यमांवर महिलांनी निर्माण केलेल्या प्रभावावरही थोडक्यात भाष्य केलं गेलंय.

कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरु केलेल्या 'दिनबंधू' या वृत्तपत्राचं संपादकपद १९०६ ते १९१२ या काळात तानुबाई बिर्जे यांनी सांभाळले होते. तानुबाई ह्या केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिल्या संपादिका ठरल्या होत्या. ज्या काळात चूल आणि मूल यापलीकडे पाहिले जात नव्हते अशा काळात तानूबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. तानुबाईपासून सुरु झालेला 'माध्यमातील ती'चा प्रवास अनेक रोचक वळणे घेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कोनांबे नावाच्या छोटयाशा गावातील मेघना ढोकेंपाशी येऊन ठेपतो. त्यांना 'डेव्हलपमेंट जर्नालिस्ट ऑफ द ईअर'चा २००८ सालचा पुरस्कार मिळाला होता. पत्रकारांच्या पुरुषी व्यवस्थेनं राजकीय पक्ष, राजकारण आणि मंत्रालय, गुन्हेगारी कव्हर करणारे तेव्हढेच पत्रकार अशी जी सोयीस्कर व्याख्या बनवली आहे त्याला मेघना ढोकेंचा रास्त आक्षेप आहे.

मराठीत पूर्णवेळ राजकीय वार्ताक्षेत्रात पहिली महिला वार्ताहर म्हणून नीला उपाध्ये याना आलेले अनुभव वाचनीय आहेत. बातमीदाराची नोकरी करताना सतत पुरुषात वावरणे, घडयाळाकडे न बघता काम करावे लागत असे. घरी परतायला रात्र अपरात्र होई. अशावेळी आजुबाजूचे लोक कुत्सित शेरे न मारतील तर नवलच ! पण घरच्या लोकांनी अशा अपप्रवृत्तींचे वेळीच दमन केले असं नीला उपाध्ये सांगतात. 'मटा'च्या पुरुषी स्टाफमध्ये वावरणारी एकमेव स्त्री म्हणून काम करताना नऊ वारी साडी नेसण्याच्या स्पर्धेच्या बातमीसंदर्भातील त्यांचा किस्सा खूप बोलका आहे. असे अनेक किस्से यात आहेत. महिला पत्रकार म्हणजे केवळ न्यूजरूममध्ये बसून आधीच एडीट / शूट केलेल्या बातम्यांचे सादरीकरण करणारया बोलक्या वा देखण्या बाहुल्या याना छेद देणारी कुप्रसिद्ध गुंड इक्बाल मिर्चीच्या साम्राज्यात जाऊन त्याचं सीक्रेट शूट करणाऱ्या वैजयंती कुळकर्णी आपटे यांचे मनोगत थक्क करून जाते. पत्रकारिता तीही सिनेसृष्टीशी निगडीत म्हटले की सगळे पुरुष पत्रकार डोळ्यापुढे तरळत असत, पण त्यात देखील महिलांचा झेंडा रोवला रेखा देशपांडे यांनी ! त्या म्हणतात, "आयुष्यात खोडा घालणाऱ्या नकारात्मक तत्वांची कमतरता कधीच नसते पण शेवटी सकारात्मक तत्वंच जगवतात. पुढं पुढं तर भूतकाळाचे नकारात्मक भागही मनोरंजनात्मक वाटू लागतात."

एखाद्याच्या वडीलांचे अकाली निधन झाले आणि वडील जर काही मित्रांना जामीनदार राहिले असतील तर ? मग संबंधित वित्तसंस्था पैशासाठी पठाणी तगादा लावतात. अशा दुर्धर प्रसंगी मी मी म्हणणारे देखील कोसळून जातात. पण हीच वेळ तरुण बहिणी भावंडावर आली तर ती चिमणीपाखरे सैरभैर होतात. असाच प्रसंग आला होता मंगला विंचूर्णे यांच्या जीवनात. अशा समरप्रसंगी नोकरी धुंडाळताना त्या पत्रकारितेत शिरल्या आणि एक नवा अध्याय घडवला. त्यांच्या जीवनात प्रवीण बर्दापूरकर आले आणि हे पत्रकार दांपत्य अनेक कठीण प्रसंगात देखील आपली तत्वांना कसे चिकटून राहिले ते ही उदबोधक आहे. महिला पत्रकाराला तिचं बाईपण टाकून द्यावं लागतं आणि पुरुष पत्रकारितेची मक्तेदारी मोडून काढताना जनभावनांची बूज राखून चालत नाही. एक महिला म्हणून प्रत्येक स्त्रीसाठी दिवाळी हा वर्षातील महत्वाचा सण असतो पण दिवाळीच्या सणातील सलग पाच दिवस बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाचे कव्हरेज करताना मनात कोणत्या विचारांचे मळभ दाटून आले असेल याचे उत्तर भारती अत्रे यांच्या लेखात मिळते.

अनेकांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन केवळ देवभोळी वा निर्बलतेची गाऱ्हाणी सांगत बसणारी दुबळी व्यक्ती असा असतो. पण एक महिला पत्रकार किती डॅशिंग असू शकते, ती किती कॉंन्फीडंट राहू शकते. पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून स्वतःची इमेज निर्माण करू शकते हा आत्मविश्वास दीप्ती राऊत यांच्याकडे पाहताच येतो. स्त्री कितीही बदलली तरी तिच्या माथ्यावर चुलीचा किचनचा शिक्का मारण्यात काही लोकांना धन्यता वाटते, पण याच किचनला आपला आधार बनवून त्याला रंगतदार रेसिपीचे स्वरूप देऊन त्याचं एक चमचमीत स्वरूप देखील लोकांपुढे मांडता येतं हा कन्सेप्ट सायली राजाध्यक्ष यांनी यशस्वीपणे रुजवला आहे. पोटापाण्याची निकड म्हणूनच पत्रकारिता करावी असेही काही नाही, पण ती करताना नैतिकता सांभाळून केवळ आपल्याला व्यक्त होता यावं म्हणूनही या क्षेत्रात आलेल्या निवेदिता खांडेकर असोत वा सरिता कौशिक असोत, त्यांच्या कारकिर्दीकडे बघून बहुआयामी पत्रकारिता एक स्त्री किती सफाईदारपणे करू शकते याचा अंदाज येतो.

महिलांना काही दशकांपूर्वी क्रीडा क्षेत्र वर्ज्यच होते अशी एकेकाळी घरोघरची परिस्थिती होती पण क्रीडापत्रकारितेत देखील महिला पत्रकार आपला अटकेपार झेंडा लावू शकते हे मीना कर्णिक यांनी दाखवून दिले. मध्यमवर्गीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध घरात वाढलेल्या मध्यमवयीन विवाहित महिलेचा आकाशवाणीतील निवेदक ते प्रिंट मिडीयातील बातमीदाराचा रेखीव प्रवास स्वाती शहाणे यांच्या रुपात समोर येतो. चुणचुणीत व्यक्तीमत्वाच्या आधारे कमी वयात देखील एखादया तरुण मुलीस ह्या क्षेत्रात गरुडझेप घेता येते हे रेणूका जोशींनी दाखवून दिले आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हेच खरे हिरो असतात असं भावूक मन असणारी स्त्री देखील ह्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकते हे स्नेहल बनसोडे शेलुडकर यांनी दाखवून दिले आहे. वूत्तपत्रकारिता म्हणजे केवळ अग्रलेख, स्तंभलेख, सदर वा स्फुट नव्हे तर बातमीमागचा मागोवा असतो. त्या बातमीचा प्राण असतो छायाचित्रात ! बातमीच्या मुळाशी जाऊन त्यातील खाच खळगे शोधताना महिला छायाचित्रकार - पत्रकाराचा कस लागतो. अनेक दिव्यातून तिला जावे लागते. हे काम हिमाचल प्रदेशातील एका छोटयाशा गावातून आलेल्या रेणुका पुरींनी करून दाखवले आहे.

सगळे शहर दंगलीने धडाडून पेटले आहे. सर्वत्र कर्फ्यू लागलेला आहे. एक महिला पत्रकार अशा तंग वातावरणात रिपोर्टिंगला बाहेर पडते. रस्त्यावरील काही माथी भडकलेली मुलं तिला 'कुंकू कसे काय लावलेले नाही ? हिंदी कशी काय बोलतेस ? तू नेमकी हिंदू की मुसलमान ?' असे म्हणत तिला अडवतात. तिच्या मदतीसाठी आसपासच्या घराची एकही खिडकी उघडत नाही पण त्या कठीण प्रसंगातून सहीसलामत सुटका करून घेऊन 'त्याच' मुलांना पुढे आपल्या बातम्यांचा सोर्स म्हणून वापरते तेंव्हा आपण दिग्मूढ होतो ! हा अनुभव आहे सरिता कौशिक यांचा ! आपल्या मुलीला नोकरीच करावीशी वाटत असेल तर तिने फार तर एखादी सरकारी नोकरी करावी अशीच धारणा सर्व मध्यमवर्गीय कुटुंबात पाहायला मिळते. मात्र काहीतरी करून दाखवण्याची उर्मी काहींना शांत बसू देत नाही, त्या चाकोरी बाहेरील मार्ग निवडतात आणि स्वयंसिद्धा होऊन जातात. कुटुंब आणि मुलुखावेगळी नोकरी या दोन्ही जबाबदारया समर्थपणे पार पाडताना आपल्यातली संवेदनशीलता जपता येते हे सविता हरकरे यांनी दाखवून दिलेय. आजच्या दूरचित्रवाहिनीवरील चोवीस तास बातम्यांच्या माऱ्यात खरे तर बातमीचाच जीव गुदमरतोय. बातम्या पाहणं कंटाळवाणे होऊन जाते, त्यातला नीरसपणा अंगावर येतो पण कधी कधी ह्या अखंड बातम्यांचा मारा काही वृत्तनिवेदिकांच्या ओघवत्या शैलीने सुसह्य होऊन जातो. पद्मा शिंदे, जान्हवी मुळे, प्राजक्ता धर्माधिकारी, ज्ञानदा कदम आणि प्रणाली कापसे ही या क्षेत्रातील घरोघरी पोहोचलेली नावे !

आज अनेक मुलींना ही वाट साद घालते पण अजूनही ह्या क्षेत्रात महिला काही प्रमाणात चेष्टेचा वा कुचाळकीचा विषय वाटाव्यात असे माहौल आपल्याकडे आहे. याला छेद देणारे, रूढार्थाने महिला पत्रकारितेचे नवे आयाम जनमानसात पोहोचवण्याचे नेटके काम ह्या विशेषांकातून झाले आहे. महिलांनी स्वतःला कमी लेखले नाही तर इतरांची तशी हिंमत होत नाही. जग काय म्हणते यापेक्षा आपले अंतर्मन काय म्हणते याचा वेध घ्यायला स्त्रियांनी सुरुवात केली की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. स्त्री केवळ शोभेची बाहुली नसून वा चूल-मूल ह्या आवडत्या शब्दात तिला गुंतवून ठेवता येणार नाही. कुठलेही क्षेत्र तिच्यासाठी वर्ज्य वा निषिद्ध करता येणार नाही, वयाच्या कुठल्याही वळणावर अनेक आव्हानांना तोंड देत आत्मसन्मानपूर्वक ती स्वतःचा मार्ग स्वतः धुंडाळू शकते. मात्र त्यासाठी तिच्याकडे हवी जिद्द आणि इच्छाशक्ती ! पत्रकारितेतील स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूप कमी असली तरी आगामी काळात ह्या काहीशा उपेक्षित क्षेत्रात महिलांनी नवनवी शिखरे पादाक्रांत केली तर नवल वाटायला नको. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता फडणवीस ह्या या अंकाच्या अतिथी संपादिका आहेत. विख्यात पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय भाष्यकार प्रवीण बर्दापूरकर यांनी या अंकाचे कौशल्यपूर्वक व नेटके संपादन केलं आहे. विवेक रानडे यांनी अंक अप्रतिम देखणा बनवला आहे. अंकातील सर्व लेख वेगळ्या धाटणीचे असूनही, सर्वांची पार्श्वभूमी वेगवेगळी असूनही एका समान सूत्रात देखण्या पद्धतीने गुंफल्याने माध्यमातील स्त्रियांविषयी परिपूर्ण वैचारिक बैठक या विशेषांकामुळे तयार होते...

मूल जन्माला घालणं हा निसर्गचक्रातला भाग निसर्गाने स्त्रीला दिला आहे. 'मातृत्व स्वीकारून मुलांचे संगोपन करणं' ही तिच्याकडून केली जाणारी अपेक्षा आहे की ते 'तिचे एकटीचेच ते कर्तव्य आहे' ह्यावर येणाऱ्या पिढीतील मुली नक्की सावध व दृढ भूमिका घेतील तेंव्हा पुरुषी वर्चस्व असणारी समाजव्यवस्था काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे असेल. कारण नव्या पिढीतील मुली 'लिव्ह इन' ते 'सेल्फ सिलेक्टेड लाईफ पार्टनर' या मुक्त वृत्तीने विवाहाकडे पाहतात. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या कदाचित आणखी वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. मात्र सद्य काळातील मध्यमवयीन स्त्रिया ज्यांनी कुटुंबाच्या जबाबदारीसाठी आपली नोकरी सोडून दिली होती किंवा ज्यांनी नोकरीची इच्छाच व्यक्त केली नाही त्यांना पुन्हा नोकरी करावीशी वाटली तर तिच्यासमोर खुजे पर्याय उभे केले जातात. ज्या टाईमस्पॉटला नोकरी सोडलेली असते त्याच जागेवर वा हुद्द्यावर तीच नोकरी बऱ्याच वर्षाच्या काळानंतर मिळणे जवळपास दुरापास्त असते. शिवाय पतीपासून ते इतर कुटुंबसदस्यांकडून परवानगी घेणे क्रमप्राप्त ठरते, कारण ह्या सर्वांच्या डेली लाईफची ती एक घटक झालेली असते. तिने नोकरीसाठी वेळ दिला तर घराची आणि घरातील माणसांची आबाळ होणार असा धोशा घरात सुरु होतो. अशा कॉम्प्लेक्स जेंडराईज्ड मानसिकतेत अडकलेल्या स्त्रियांना हा विशेषांक वेगळी दिशा देईल. नोकरी करण्याची इच्छा मनी धरून असणाऱ्या कोणत्याही वयोगटातील, वर्गातील स्त्री साठी 'माध्यमातील ती'ची वाट निश्चितच अनुसरणीय अशी आहे हे नक्की ....

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा