मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७
अनुसरणीय वाटेवरची 'माध्यमातील ती' ...
शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७
ऋणानुबंधाच्या गाठी - बाळ कोल्हटकर
एक भारलेला काळ होता, जेव्हा देशभरातल्या बहुतांश घरात सर्व सदस्यांचं एकमेव करमणुकीचं साधन रेडीओ होता. त्या काळातली सकाळ भारलेल्या वातावरणाची असायची. तेंव्हा भल्या पहाटे उठून घरातल्या माऊलीने घराचे अंगण झाडून घेतलेले असायचे, हे अंगण कधीकधी थेट रस्त्यापर्यंत खेटलेले असायचे. त्यामुळे अख्खा रस्ता भल्या पहाटेच लख्ख स्वच्छ झालेला असायचा. अंगण झाडून झाले की त्यावर बादलीभर पाण्याचा मस्त सडा टाकून झालेला असायचा. सडासंमार्जन होताच पांढऱ्या शुभ्र रांगोळीचे स्वस्तिक घराच्या उंबरठ्यावर अवतीर्ण होई, अंगणात एखादी सुबक ठिपक्यांची रांगोळी चितारली जाई. मग घरातली लहानगी चिमुरडी जागी केली जात असत, या सर्वांचं आवरून होईपर्यंत देवघरातील समईच्या मंद वाती तेवलेल्या असत, गाभाऱ्यातील निरंजनाचा पिवळसर प्रकाश देवदेवतांच्या तसबिरीवरून तरळत जात असे. अंगणातल्या तुळशीला पितळी तांब्यातून पाणी वाहिले जाई, पूर्वेच्या देवाला डोळे झाकून, हात जोडून नमन होई. मग माजघरात स्टोव्हचा बर्नर भडकून पेटलेला असला की त्याचा फर्रफर्रचा आवाज लक्ष वेधून घेत असे. त्यावर चढवलेल्या पातेल्याचा चर्रचर्र आवाज आणि चहाचा दरवळणारा गंध एकच तलफ जागवत असे.
शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७
'अमृततुल्य'....
चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच ! नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय ! चहा म्हणजे भारतीय जनतेचा हळवा कोपराच जणू ! हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत.. त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणारया गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच ! त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते. शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी तो आधणासाठी ऑर्डरप्रमाणे एका ओगराळयाने त्या पातेल्यात ओतत असतो.झाकणं काढून ठेवलेल्या डब्यातील चहा - साखर चमचाने काढता डाव्या हाताच्या तळहातावर खोलगा करून ओतून घेतो अन फक्कन पातेल्यात टाकतो.बऱ्याचवेळा चहा पावडरीचे त्या पातेल्यात पखरण होत असताना तिचा तरतरीत वास डोक्यात असा काही घुमतो की जणू काही क्षणासाठी दार्जीलिंगमधल्या चहाच्या मळ्यात उभं राहिल्यागत वाटावं.
गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७
रेड लाईट डायरीज - सेक्सवर्कर्सचे रॅकेट...
वेश्याव्यवसाय हा जगभरात चालणारा व्यवसाय आहे. त्याचे जागतिक स्वरूपदेखील प्राचीन पार्श्वभूमीचे आहे, त्याला प्रदीर्घ इतिहास आहे. आपल्या देशातील सर्व राज्यात हा व्यवसाय आढळतो. पूर्वीच्या काळी मेट्रो सिटीजसह केवळ मोठ्या शहरांत एका वस्तीत, वसाहतीत वा इमारतीत वेश्याव्यवसाय चाले. हे लोण नंतर सर्वत्र पसरत गेले. महानगरे जसजशी मोठी होऊ लागली त्यांचा पसारा वाढू लागला तसतसे यांचे स्थित्यंतर होऊ लागले. आजघडीला देशातील महानगरांना जोडणाऱ्या हायवेंवर याचा मोठा प्रसार आढळतो. ढाबे, हॉटेल्स, लॉजेस, पत्र्याची शेड्स यात हे लोक आसरा घेतात. सर्व मोठ्या शहरांत एखाद्या गल्लीत, तालुक्यांच्या ठिकाणी एखाद्या इमारतीत, पंचक्रोशीतल्या एखाद्या तालेवार गावात एखाद्या खोपटात हा व्यवसाय चालतो. ट्रकचालकासारख्या वाहत्या ग्राहकांसोबत फिरता व्यवसाय करण्याचा प्रवाहही आजकाल आढळून येतोय. पूर्वी एखाद्या वस्तीत मर्यादित असणाऱ्या या लोकांकडून छोट्यामोठ्या शहरात एखाद्या अपार्टमेंटमध्ये एक दोन सदनिका भाड्याने घेऊन त्यात कुंटणखाना चालवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. गर्दीची सार्वजनिक ठिकाणे एसटी स्थानक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सिनेमा थियेटर्स, बागा, अद्ययावत हॉटेल्सचे पार्कींग स्लॉटस अशा ठिकाणी हे मुक्त वा छुप्या पद्धतीने वावरत असतात. स्पा, मसाज सेंटर्सच्या नावाखालीही हा व्यवसाय करण्याचे प्रमाण जाणवण्याइतके वाढलेले आहे. तसेच ग्रामीण भागातही छुप्या पद्धतीने याला उधाण आलेले आहे. एका आकडेवारीनुसार देशभरात उघड पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सेक्सवर्कर्सची संख्या पन्नास लाखाइतकी आहे, आणि छुप्या पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्या याहून अधिक आहे. या व्यवसायासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मुली, बायका कोण आणि कुठून पुरवतं याची माहिती वेधक वाटू शकते पण ती खऱ्या अर्थाने धक्कादायक असूनही त्याची तीळमात्र दखल घेतली जात नाही.
शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
'ट्रोलभैरवां'चे समर्थक...
आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ काहीच द्यायचे नाही व आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पोस्टवर जाऊन त्यांना आडवं लावणे, मुद्द्यापासून पोस्ट भरकटवणे, पोस्टकर्त्यावर हीन दर्जाची टीकाटिप्पणी करणे, कॉमेंट करणारया लोकांशी अकारण वाद घालणे यांना ऊत आलाय. असे उद्योग करणारे लोक सोशल मिडीयात ‘ट्रोल’ म्हणून कुख्यात आहेत. कहर म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी पगारी (पेड) ट्रोल आता आपल्या पदरी बाळगलेत. परिणामी याला अधिक बीभत्स, ओंगळवाणे, हिंस्त्र स्वरूप आलेय. यामुळे दंगली घडल्यात, जातधर्मीय सलोखा धोक्यात येऊ लागलाय. हे सर्व घडत असताना काही ठिकाणी पोलिसात तक्रारी दाखल झाल्यात तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. काही ट्रोल फेक अकाउंटद्वारे कार्यरत असतात. वाईट बाब अशी की ट्रोल्सना आवर घालून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम राजकारणी करताना दिसत नाहीत, यात नाव घ्यावे असा अपवादही नाही ही शरमेची बाब आहे.
रविवार, १० सप्टेंबर, २०१७
रेड लाईट एरिया आणि मुंबईतल्या एनजीओ...
रेड लाईट एरियावरील पोस्टस वाचून अनेकजण भारावून जातात. 'यासाठी आम्ही काय करू शकतो ?' अशी विचारणा करतात. सर्वांनीच प्रत्यक्ष ठोस कृती करावी म्हणून मी हे लेखन करत नाही. या उपेक्षित आणि शोषित घटकाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलावा यावर मुख्य फोकस आहे. ज्यांना प्रत्यक्ष मदत करावी वाटते त्यांनी शक्यतो एनजीओजच्या कार्यालयांना थेट भेट दिल्याशिवाय आर्थिक मदत देऊ नये असे माझे मत आहे. पेक्षा आपल्या भागातील एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यास सोबत घेऊन अशा वस्त्यांत आपली मदत वस्तूस्वरूपात देणं योग्य.
सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७
रेड लाईट डायरीज - गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)
कोणताही उत्सव आला की कुठल्याही भागातील रेड लाईट एरियातील
स्त्रियांना थोडीशी धास्तीही वाटते अन काहीसे हायसेही वाटते. कारण येणारा दिवस
कशाचे तोंड बघायला लावतो,
काय घडवतो याची त्यांना धास्ती असते अन
उत्सवामुळे गर्दीत, गिऱ्हाईकात वाढ होऊन कमाईत चार पैशांची वाढ होणार या जाणीवेने
हायसे वाटत असते. खरे तर सण, उत्सव कोणत्याही धर्माचा असो जातीचा असो वा पोटजातीचा असो
त्याच्या कामांचा जास्त ताण त्या त्या वर्गातील स्त्रियांना पडतो. मग त्या
स्त्रिया गरीब वर्गातल्या असोत वा उच्चभ्रू वर्गातील्या असोत, त्यांना ताण हा पडतोच. बहुतांश पुरुष मंडळी त्या त्या सण
उत्सवासाठी लागणारं साहित्य आणून दिलं की आपलं काम संपलं अशा अविर्भावात असतात, सणासुदी दरम्यान लहान मुलांचा वा वृद्ध व्यक्तींचा सहयोग कमी अन
त्रास जास्त असतो. पण बायका त्याबद्दल कधीही तक्रार करत नाहीत. या सणाउत्सवातला
खरा आनंद त्या मिळवतात कारण, त्या आनंद वाटत असतात ! याला रेड लाईट एरियातील स्त्रिया देखील
अपवाद नसतात.
सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७
रेड लाईट डायरीज - गणेशोत्सवातल्या आम्ही (पूर्वार्ध)
मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७
'लांड्या' विचारांचा मुखभंग ...
पंधरा ऑगस्टच्या एक दिवस आधी आपल्या लोकांच्या
मेंदूपासून ते बुडख्यापर्यंत राष्ट्रप्रेमाचे झरे वाहत असतात. हा साथीचा आजार फक्त
तीन दिवसच असतो. आता तर व्हॉटसएपचे बिनडोक फॉरवर्डछाप पब्लिक देशभरात प्रसरण
पावलेलं असल्याने याचे पेव गल्लोगल्ली आढळते. कुणी कच्चा हरभरा खाल्ला तरी त्याचा गंध त्याच्या सोशलमिडीयातून
इतरांच्या मोबाईलमध्ये पसरतो. असो. आवड ज्याची त्याची..
तर पंधरा ऑगस्टला आलेल्या देशप्रेमाच्या भरतीत
पाण्यात उभं राहून तिरंग्याला सलाम करणारी मुले आणि त्यांचे शिक्षक हा फोटो
देशभरात व्हायरल वगैरे झाला. अनेकांनी त्यांना सलाम, त्रिवार वंदन, कडक कुर्निसात, सेल्युटही केला. अनेकांनी त्यासोबत आपल्या बद्धकोष्टी कवितादेखील
पोष्टून आपलं काव्योदर साफ करून घेतलं. असो ज्याचं त्याचं पोट...
सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७
दाभोलकरांच्या पश्चातची चार वर्षे....
२० ऑगस्ट २०१३ ला पुण्यात नरेंद्र दाभोलकरांच्या रूपाने
महाराष्ट्राच्या विवेकवादाची दिवसाढवळ्या निर्घृणहत्या करण्यात आली. त्या घटनेला
आज चार वर्षे पूर्ण झाली. अत्यंत भ्याड हल्ला करून या दिवशी त्यागवादी सजगतेवर
नियोजनपूर्वक घाला घातला गेला. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सनातनी विचारांना वंदनीय
मानणाऱ्यांनीच केल्याचा कयास त्या दिवसापासूनच उभ्या महाराष्ट्राने व्यक्त केलाय.
ही हत्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वसनांवरचा रक्तरंजित डाग आहे ज्याचे
सद्य स्थितीत तर कोणत्याच राजकीय पक्षाला कसलेच सोयरसुतक दिसून येत नाही.गांधीवादी
विचारांवर श्रद्धा ठेवून आपली चळवळ शांततेच्या मार्गाने पुढे नेणाऱ्या, वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका निशस्त्र व्यक्तीस मारलं गेलं
तेंव्हा राज्यभर नव्हे तर देशभर त्याबद्दल निषेध व्यक्त केला गेला,सर्वत्र एकच कोलाहल माजला तरी तपास यंत्रणांच्या कानात जू रेंगली
नाही की कोणा राजकारण्याला याचा खंतखेद वाटला नाही. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना
अटक व्हावी,
तपास जलदगतीने व्हावा म्हणून
राज्यातील विरोधी पक्ष लाजेकाजेने का होईना अधूनमधूनक्षीण आवाज उठवताना दिसतात.
त्यांचा आवाज असा क्षीण का आहे याला विविध कारणांची 'भगवी','हिरवी', 'निळी' झालर आहे.
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
रेड लाईट डायरीज - स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण देशातील
सर्व घटकांना स्वातंत्र्य मिळाले का याचे उत्तर नकारार्थी येते. आपल्या देशात आजही
अनेक प्रकारचे वंचित, पीडित, शोषित आहेत, त्यातलेच काही वर्ग आजही खऱ्या अर्थाने
स्वतंत्र झालेले नाहीत. यातीलच एक घटक म्हणजे अलीकडच्या सभ्य जगाच्या ढोंगी शब्दात
सेक्सवर्कर वा देशी भाषेत वेश्या होत. त्यांच्या जीवनातील स्वातंत्र्याची ‘खरी’ सकाळ
कधी उगवेल की नाही हे नेमके कोणी सांगू शकत नाही. अशाच एका दुर्दैवी मुलीची ही एक
करुण कथा.
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
'आई'ची कविता आणि महाकवी नामदेव ढसाळ....
आई गेली याचं दुःख नाही प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते. दुःख याचं आहे की, अज्ञानाच्या घोषा आड तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या, गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली मरीआईचा गाडा. विस्थापित होऊन बाप आगोदरच धडकला होता शहरात आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन ; कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा ,रक्तबंबाळ व्हायचा चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता जुनेराला ठिगळ लावलं बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे आई आगोदर बाप मेला असता, तरी मला त्याचं काही वाटलं नसतं दुःख याचं आहे, तोही तिच्या करारात सामील होता दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला आभाळाकडे हात करून ती म्हणायची, त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...
शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७
वृत्तवाहिन्यातील पत्रकारिता - अस्तंगत होत चाललेले सत्यतत्व.
मंगळवार, २५ जुलै, २०१७
परंपरांचे गळके सण...
आखाडात मरीआई आणि म्हसोबाचा रुबाब असतो.
तोंडाला शेंदूर फासून अभ्राणात मिरवणाऱ्या पोतराजालाही भाव चढतो.
सतराशेसाठ रूढी परंपराच्या डबक्यात लोळणाऱ्या सकल समाजाला आखाड ही पर्वणी असते.
ग्रामीण भागात याच्या जोडीला आणखी एक पात्र जोमात असते ते म्हणजे 'साती आसरा'.
हे पात्र जरा हॉरर कॅटेगरी मोडणारे आहे.
याची खानेसुमारी स्त्री पिशाच्चात (?) केली गेलीय.
आत्म्याला आणि भूताला लिंग असते का असा खोचक सवाल आपल्या लोकांना पडत नाही. साती आसरा या अप्सरारुपी हडळीच आहेत असं अजूनही अज्ञानात खोल बुडालेल्या समाजाला वाटते.
स्त्री पिशाच्च प्रकारामध्ये हडळ या नावातच एक जरब आहे नुसत्या उच्चारानेही काही भोंगळ लोकांना कापरे भरते.
जिथे जिथे जलाशय असतात, तिथे तिथे साती आसरा (जलदेवता/ अप्सरा/ हडळी) असतात, अशी लोकधारणा आहे...
शनिवार, २२ जुलै, २०१७
गुन्हेगारांचे जातीय उदात्तीकरण..
राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजनीतीकरण आपल्या देशाला अलीकडे सवयीचे झाले आहे त्याचे फारसे वैषम्य कुणालाच वाटत नाही. हा मुद्दा आता नागरीक, प्रशासन आणि सरकार या तिन्ही प्रमुख घटकांच्या अंगवळणी पडला आहे. सर्व वर्गातील गुन्हेगार राजकारण्यांच्या संपर्कात असतात हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे. जनतेने, मिडीयाने त्यावर वेळोवेळी टीकाही केली आहे. पण मागील काही दशकात याचा एक वेगळा ट्रेंड तयार होताना दिसतो आहे त्याचा थेट परिणामही आता दिसून येऊ लागला आहे. स्वातंत्र्याआधीही आपल्या देशात अनेक गुन्हेगार होऊन गेलेत. पण त्यांची कधीच व कुणीच भलावण केली नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात या दृष्टीकोनात झपाट्याने बदल घडत गेले. गुन्हेगारी जगतात शिरताना काही लोकांनी आपल्यावरील अन्यायासाठी बंदूक हाती घेतली, अपराधाचा रक्तरंजित इतिहास लिहिला. त्या व्यक्तीशी निगडीत काही वर्गातील विशिष्ट लोकांनाच या बद्दल थोडीफार सहानुभूती असल्याचंही दिसून आलं. फुलनदेवी हे याचं सर्वात बोलकं उदाहारण ठरावं. फुलनचे समर्थन करणारे एका विशिष्ट भूभागापुरतेच मर्यादित होते. तिच्यावरील अन्यायाचे कोणीही समर्थन करायला नको होते पण एका ठराविक वर्गाने तेही केलं तेंव्हा त्यांच्या अरेला कारेचा आवाज आपसूक आलाच. हीच अवस्था विविध राज्यात थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या रुपात आढळून येऊ लागली आणि राजकारण्यांना यातील व्हॅल्यू पॉईंट ध्यानी आले. त्यांनी खतपाणी घालायला सुरुवात केली आणि असे लोक सर्वच राज्यातील विधीमंडळातच नव्हे तर संसदेतही दिसू लागले.
शुक्रवार, ३० जून, २०१७
अनुवादित कविता - रफिक अहमद : मल्याळी कविता
ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती.
एकेक करून सगळे नातलग निघून गेले तेंव्हा
अंगणात कुणीच राहिले नव्हते..
भाड्याने आणलेल्या खुर्च्या परत देतानाच
गॅसबत्ती आणि चटयाही देऊन टाकल्या होत्या.
वहिदाने कधी काळी लावलेल्या प्राजक्ताच्या
चिमुकल्या फांद्यांवर अंधार रात्र चांगलीच सुस्तावली होती.
जीर्ण चिमणीचा मंद पिवळा उजेड
दीनवाणा होऊन जणू अश्रू ढाळत होता.
उदास मखमली पट्टेरी मांजरी तिथेच होती उभी,
वहिदाच्या गुळगुळीत स्लीपरवर हळुवार नाक घुसळत.
काही वेळापूर्वीच जणू
मनमुराद खेळून येऊनी तिने सोडल्या होत्या त्या
दगडांच्या ओबड धोबड पायऱ्यांवर.
झोपडीच्या दक्षिणेस कपडयांच्या तारेवरती
वहिदाचा फ्रॉक झिरलेला वाळत घातलेला, अजुनी होता लटकत.
जवळून जाणाऱ्या उनाड वाऱ्याने एका लाटेत त्याला उडवले,
जणू वहिदालाच जागे करायचे होते त्याला.
ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती......
पाऊस वादळी अकस्मात दाखल झाला तिथे.
आस्मा घरात धावली, परतली अन निमिषार्धात
ठिपक्यांची शुभ्र छत्री हाती घेऊनि
याच छत्रीसाठी वहिदाची तक्रार असे की
चक्र तिचे तुटके आहे अन दुरुस्तीच्या पलीकडची गत आहे.
दफनभूमीतल्या ताजी माती अंथरलेल्या जागेवरती धाव आस्माने घेतली
मातीच्या आडोशाला छत्री धरली, माती घेतली कवेशी,
जमेल तितकं ती झाकत होती.
पाऊस संततधार कोसळतच होता, आस्मा मातीवर आडवी पडून होती.
मातीच्या कुशीतली वाहिदा तिला घट्ट चिकटली होती.
पावसात भिजणं आवडणाऱ्या वहिदाच्या देहावरील मातीत आस्माचे अश्रू मिसळत होते.
वहिदा मरून गेलेल्या रात्री पाऊस संततधार कोसळतच होता....
~~~~~~~~~~~~~~~~
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती.
एकेक करून सगळे नातलग निघून गेले तेंव्हा
अंगणात कुणीच राहिले नव्हते..
भाड्याने आणलेल्या खुर्च्या परत देतानाच
गॅसबत्ती आणि चटयाही देऊन टाकल्या होत्या.
वहिदाने कधी काळी लावलेल्या प्राजक्ताच्या
चिमुकल्या फांद्यांवर अंधार रात्र चांगलीच सुस्तावली होती.
जीर्ण चिमणीचा मंद पिवळा उजेड
दीनवाणा होऊन जणू अश्रू ढाळत होता.
उदास मखमली पट्टेरी मांजरी तिथेच होती उभी,
वहिदाच्या गुळगुळीत स्लीपरवर हळुवार नाक घुसळत.
काही वेळापूर्वीच जणू
मनमुराद खेळून येऊनी तिने सोडल्या होत्या त्या
दगडांच्या ओबड धोबड पायऱ्यांवर.
झोपडीच्या दक्षिणेस कपडयांच्या तारेवरती
वहिदाचा फ्रॉक झिरलेला वाळत घातलेला, अजुनी होता लटकत.
जवळून जाणाऱ्या उनाड वाऱ्याने एका लाटेत त्याला उडवले,
जणू वहिदालाच जागे करायचे होते त्याला.
शेजारच्या झाडावरील घरट्यावरती उडुनी तो पडला.
ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती......
पाऊस वादळी अकस्मात दाखल झाला तिथे.
आस्मा घरात धावली, परतली अन निमिषार्धात
ठिपक्यांची शुभ्र छत्री हाती घेऊनि
याच छत्रीसाठी वहिदाची तक्रार असे की
चक्र तिचे तुटके आहे अन दुरुस्तीच्या पलीकडची गत आहे.
दफनभूमीतल्या ताजी माती अंथरलेल्या जागेवरती धाव आस्माने घेतली
मातीच्या आडोशाला छत्री धरली, माती घेतली कवेशी,
जमेल तितकं ती झाकत होती.
पाऊस संततधार कोसळतच होता, आस्मा मातीवर आडवी पडून होती.
मातीच्या कुशीतली वाहिदा तिला घट्ट चिकटली होती.
पावसात भिजणं आवडणाऱ्या वहिदाच्या देहावरील मातीत आस्माचे अश्रू मिसळत होते.
वहिदा मरून गेलेल्या रात्री पाऊस संततधार कोसळतच होता....
~~~~~~~~~~~~~~~~
शनिवार, २४ जून, २०१७
माहेरची पाखरे .....
सोबतच्या छायाचित्रातल्या या सर्व जणी कोण आहेत ? मैत्रिणी ? भिशीग्रुपच्या महिला मेम्बर्स ? कुठल्या संस्थेतील स्टाफ कुलिग्ज ? की शेजारणी ? ..... काही अंदाज लावता येतो का ?
हरलात ना !
मीच सांगतो .... या सर्वजणी माझ्या बहिणी आहेत !!!! तब्बल वीस बहिणी !
यातली कुणी वयाची सत्तरी जवळ आलेली तर कुणी पस्तिशीच्या उंबरठयावर पोहोचलेली ! इतका मोठा जनरेशन गॅप असलेल्या तरीही एकमेकांची मने ओळखणाऱ्या अशा प्रेमळ, सोज्वळ आणि नितांत लडिवाळ मायाळू स्वभावाच्या माझ्या या बहिणी .... यांच्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे...
हरलात ना !
मीच सांगतो .... या सर्वजणी माझ्या बहिणी आहेत !!!! तब्बल वीस बहिणी !
यातली कुणी वयाची सत्तरी जवळ आलेली तर कुणी पस्तिशीच्या उंबरठयावर पोहोचलेली ! इतका मोठा जनरेशन गॅप असलेल्या तरीही एकमेकांची मने ओळखणाऱ्या अशा प्रेमळ, सोज्वळ आणि नितांत लडिवाळ मायाळू स्वभावाच्या माझ्या या बहिणी .... यांच्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे...
शनिवार, १७ जून, २०१७
'आनंदयात्री' कवी बा.भ. बोरकर ....
‘स्नेहगाथा’ या पुस्तकामधून बा. भ. बोरकर वेगळ्याच स्वरुपात वाचकांसमोर आले होते. त्यास अनुसरून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याशी अनौपचारिक गप्पाष्टक साकारताना बोरकरांनी आपल्या लेखन प्रयोजनाबद्दल आणि लेखनप्रकृतीबद्दल भाष्य केलं होतं. अगदी तरल मनमोकळ्या शब्दांत ते व्यक्त झाले होते. बोरकर म्हणतात की, "त्याकाळी स्वत:च्या पत्नीशी आणि स्वत:च्या घरातदेखील पांढरपेशा माणसाला मनमोकळेपणानं शृंगार करता येत नसे. एवढंच काय, आपल्या मुलाचा मुकाही वडील माणसांसमोर घेता येत नसे. त्यामुळं या समाजाचा सारा शृंगार चोरूनच व्हायचा. शृंगार- मग तो घरातला असो की घराबाहेरचा असो, त्याबद्दल उघडपणं बोलणं हे अशिष्ट समजलं जात होतं. जो खालचा समाज म्हणून गणला गेलेला होता त्याचं जगणं-वागणं आमच्यासारखं दांभिक नीतीनं ग्रासलेलं नव्हतं. आमच्या मानानं तो समाज कितीतरी मोकळा आणि म्हणूनच धीटही होता. त्यामुळं त्यांच्या लावणी वाङ्मयातला जातिवंत जिवंतपणा आपणाला जिव्या सुपारीसारखा झोंबतो. आमची सुपारी वाळलेली आणि पुटं चढवून मऊ केलेली. त्यामुळं त्यावेळचा आमचा प्रेमकवी राधाकृष्णाचा आडोसा तरी घ्यायचा किंवा प्रेमाच्या शिष्टमान्य कल्पनांचा आपल्या खर्या भावनेवर साज चढवून तिचा तोंडवळा कवितेत लपवून टाकायचा. माझ्या विधानाची सत्यता तुम्हाला पडताळून पाहावयाची असेल तर आपल्यातील चांगल्या कवींनी आपल्या पत्नीवर जी मनापासून कवनं लिहिली, ती त्यामानानं किती खरी वाटतात पाहा.
मी फार काळ वाट चुकलो नाही, याला माझ्या मते दोन कारणं घडली. विसाव्या वर्षी माझं लग्न झालं. त्यामुळं प्रणयाचा प्रत्यक्ष अनुभव मिळून माझा संकोच बराचसा चेपला गेला. दुसरं- त्या कालावधीत ख्रिस्ती समाजातलं माझं दळणवळण वाढलं. गोव्यातला ख्रिस्ती समाज बव्हंशी लॅटिन संस्कृतीत वाढलेला असल्यामुळं शृंगाराच्या बाबतीत तो अधिक प्रांजल, सौंदर्यासक्त आणि प्रीतीतल्या धिटाईचं कौतुक करणारा आहे. स्त्रीच्या सहवासात योग्य वेळी चातुर्यानं तिला उद्देशून समुचित Gallantry फेकणं हे त्यांच्यात सुसंस्कृतपणाचं लक्षण समजलं जातं. त्या समाजात वावरल्यामुळं माझी भीड चेपली आणि प्रेमभावना खरी असेल तर तिचा विमुक्त आविष्कार करण्यात कसलाच कमीपणा नसून, उलट पुरुषार्थच आहे असं मला वाटू लागलं. ‘प्रतिभा’ आणि ‘जीवनसंगीत’ यांच्या मधल्या काळातले माझे दोन छोटे हस्तलिखित कवितासंग्रह मी माझ्या गलथान व्यवहारात हरवून बसलो. ते आज हाताशी असते तर त्या काळात माझ्यात घडलेल्या या पालटाची काही प्रभावी प्रात्यक्षिकं तुम्हाला पाहायला सापडली असती."
गुरुवार, १५ जून, २०१७
नक्षत्रांचे देणे - आरती प्रभू
आरती प्रभू हे सुप्रसिद्ध लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव. आरती प्रभूंची म्हणजे खानोलकरांची काव्यसंपदा त्यांच्या कादंबरी, कथा, नाटक या साहित्य प्रकारांइतकी विशाल विस्तृत नसली तरी तिची नोंद घेतल्याशिवाय मराठी कवितेच्या अभ्यासाची इतिश्री होऊ शकत नाही. ८ मार्च १९३० रोजी वेंगुर्ला तालुक्यातील बागलांची राई या छोट्याशा गावी चिं. त्र्य. खानोलकर यांचा जन्म झाला. वडिलांचे छत्र बालपणीच हरपल्यावर आई हेच त्यांचे सर्वस्व झाले होते. वडिलांच्या मागे किशोरवयीन चिंतामणच्या मातोश्री खानावळ चालवत. त्यातून त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह होत असे. खानोलकरांचे शिक्षण त्यामुळे फारसे होऊ शकले नव्हते. लहानपणी अंगी असणारी बेफिकिरी आणि त्या छोट्याशा व्यवसायातही असलेली स्पर्धा यामुळे त्यांच्या खानावळीचे बस्तान लवकरच उठले. व्यवसाय मंदावला. धनकोंच्या चकरा सुरु झाल्या, देणी वाढत गेली. घरातील चीजवस्तुंना हात लावायची वेळ आली.अशा रीतीने आयुष्य जगून चालणार नाही हे ते जाणून होते, नोकरी करावी म्हटलं तर शिक्षण खूप काही झालेले नाही. परिणामी इच्छा नसूनही घरातील वस्तू विकून दिवस काढायची वेळ त्यांच्यावर आली. जेंव्हा आर्थिक ओढाताण असह्य झाली तेंव्हा त्यांनी आपली वस्तुस्थिती मधू मंगेश कर्णिकांना कळवली. अशाच एका उनाड दिवशी ते अनाहुतासारखे मुंबईत येऊन धडकले.
शनिवार, १० जून, २०१७
शेतकरी आंदोलनाचे जागतिक दुखणे...
आपल्या देशाला शेतकरी आंदोलने नवी नाहीत. त्याची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशभरात अनेक ठिकाणी अनेक वेळा विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली, विविध पक्ष वा संघटनांच्या बॅनरखाली ही आंदोलने झालीत. देशातील शेतकरी आंदोलने तीन टप्प्यात विभागता येतील, एक म्हणजे आणीबाणीपूर्व काळ ज्यात पूर्णतः काँग्रेसशासित राजवट होती. दुसरा टप्पा म्हणजे आणीबाणी पश्चातचा काळ ते जागतिकीकरणादरम्यानचा काळ, तिसरा टप्पा म्हणजे जागतिकीकरणानंतरची कृषी आंदोलने. या तीनही टप्प्यात थोडं साम्य आहे. एक म्हणजे यात काही मागण्या सातत्याने नेहमी समोर येत राहिल्या तरीही त्यांचे पूर्ण निराकरण केले गेले नाही. या साठी तत्कालीन सत्ताधीशांबरोबरच विरोधी पक्षही काही अंशी जबाबदार ठरतात कारण त्यांनी एकी दाखवून या मागण्या कधीही पदरात पाडून घेतल्या नाहीत. दुसरे म्हणजे या तीनही टप्प्यात शेतकरयांसाठी एकछत्री देशव्यापी संघटना उभी राहू शकली नाही व देशव्यापी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्वही पुढे आले नाही. देशात व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांचे अनेकपदरी देशव्यापी संघटन उभे राहिले. सरकारवर दडपण आणणारे त्यांचे दबाव गट निर्माण झाले मात्र शेतकरयांच्या आघाडीवर याचा सदासर्वदा दुष्काळ राहिला.
मंगळवार, ६ जून, २०१७
'जंगलाचा आलेख' - धर्मराज निमसरकर
दलितांचे तथाकथित नेते आणि त्यांच्यासाठी झटत असल्याचा आव आणणाऱ्या दलितेतर राजकारण्यावर विचार करण्याजोग्या संदर्भाची जुळवाजुळव करताना निमसरकरांच्या एका कवितेची प्रकर्षाने आठवण येते. या कवितेचा संयमी अर्थपूर्ण सवाल आणि अत्यंत टोकदार पद्धतीने मांडलेला आशय सध्याच्या काही प्रश्नावर मार्मिक भाष्य करू शकतो.....
'त्याने जंगलाच्या संदर्भाचा नवा आलेख
उसवून द्विधा झालेल्या झुडुपांसमोर सादर केला
तो त्यांचेसाठीच होता असा त्याचा सूर होता.
पण उपस्थितांमध्ये फक्त रंगविलेले एक
चिनार झाडच होते,
तेव्हढ्यामध्येही त्याला बरंच समाधान झालं.
नाहीतरी आलेख तयार करत असताना
त्याला असंच वाटायचं....आपला आलेख
समजून घेण्याची पात्रता फक्त चिनार झाडामध्ये आहे.
पण, झुडुपाबाद्द्ल स्तोत्र आहे
हेही त्याला सांगायचं होतं ;
म्हणजे चिनार झाडांचीही मेहेरनजर
अटळ राहील आणि झुडुपामाध्येही
भरभक्कम पत अबाधित राहील.
यामध्ये आपण काही बनवाबनवीचा प्रकार करतो आहो
असे त्याचे गावीही नव्हते,
रविवार, ४ जून, २०१७
ताईच्या (हरवलेल्या) बांगड्या ......
नागपंचमी आणि बांगडया यांचे नाते म्हणजे आई आणि मुलीच्या नात्यासारखे !
मुलगी आईजवळ असली की उजळून निघते, तिला लकाकी चढते.
लेक आईपाशी आली की आईचा जीव आभाळाएव्हढा होतो. तसंच या बांगड्या आणि स्त्रीच्या नात्याचं तत्व आहे ! नागपंचमीला हात बांगडयांनी मढून निघाले की त्या बांगड्यांना निराळेच चैतन्य लाभते.
अन बांगड्या हाती चढल्या की त्या परिधान करणाऱ्या स्त्रीला मुठभर मांस अंगावर चढल्यासारखे वाटते अन तृप्तीची लकेर तिच्या स्मितहास्यात चमकून जाते.
अलीकडे शहरात मोठाले वासे आणून झोके बांधले जातात अन स्त्रिया त्यावर उंच उंच झोके घेतात अन झोके घेतानाच हलकेच आपल्या माहेरच्या नागपंचमीच्या आठवणीत दंग होऊन जातात.
ओलाव्यातले जळते ठसे – केशव मेश्राम
शब्दाचे रुपांतर अणकुचीदार बाणात आणि आशयाचे रुपांतर ज्वालामुखीच्या उद्रेकात झाले तर निर्माण होणारे काव्य कोणत्या प्रकारचे असेल असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचे निसंशय उत्तर दलित साहित्य असेच असेल ! त्यातही नेमके पृथक्करण करायचे झाले तर विद्रोही दलित कवितांचे नाव घ्यावे लागेल.
‘एक दिवस मी परमेश्वगराला
आईवरून शिवी दिली :
तो लेकाचा फक्कन हसला.
शेजारचा जन्मजात बोरुबहाद्दर उगीचच हिरमुसला,
एरंडेली चेहरा करून मला म्हणाला :
"तु असा रे कसा, त्या निर्गुण निराकार
अनाथ जगन्नाथाला काहीतरीच बोलतोस ?
शब्दांच्या फासात त्याचा धर्मफणा धरतोस ?"
पुन्हा एकदा मी कचकून शिवी दिली,
विद्यापीठाची इमारत कमरेपर्यंत खचली,
माणसाला राग का येतो या विषयावर
आता तेथे संशोधन सुरु आहे,
उदबत्तीच्या घमघमाटात भरल्या पोटाने
भावविव्हळ चर्चा झाली,
माझ्या वाढदिवशी मी परमेश्वराला शिवी दिली..
शिवी दिली,शिव्या दिल्या, लाटांसारखे
शब्दाचे फटकारे मारीत मी म्हटले,
‘साल्या! तुकडाभर भाकरीसाठी
गाडीभर लाकडं फोडशील काय?
चिंधुक नेसल्या आईच्या पटकुराने
घामेजले हाडके शरीर पुसशील काय?
बापाच्या बिडीकाडीसाठी
भावाबहिणीची हाडके झिजवशील ?
त्याच्या दारूसाठी भडवेगिरी करशील ?
बाप्पा रे,देवबाप्पा रे ! तुला हे जमणार नाही,
त्यासाठी पाहिजे अपमानित
मातीत राबणारी,
प्रेम करणारी मायमाऊली.......'
एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली.
शुक्रवार, २ जून, २०१७
बहिणाई चौधरी ......मायमराठीची तेजस्वी लेक ...
‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणारी एक कवयित्री माय मराठीत होऊन गेली जिचे ऋण व्यक्त करण्यास शब्द कमी पडतात. त्या महान कवयित्री म्हणजे बहिणाई चौधरी. छोट्याशा शब्दात आभाळभर उंची गाठणारी त्यांची शब्दरचना अद्भुत आणि अद्वितीय अशी होती, मराठी साहित्यात तिची सर कधी कुणाला भरून काढता आली नाही.
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’या पंक्तीचा विस्तार एका कथेत आहे. एका खेडेगावात एक साधू भिक्षा मागत फिरत होता. काही घरी त्याला भिक्षा मिळत होती तर काही घरी त्याला भिक्षा द्यायला कुणी नव्हतं. जी ती माणसं शेतशिवारात कामाला गेलेली होती. भटकंती करत ते साधू शेतांमधून फिरू लागले. एका वस्तीवरील घरातल्या तरुण स्त्रीने त्यांची विचारपूस केली. गूळाचा खडा, पाणी दिलं. इकडची तिकडची माहिती विचारत त्यांना भिक्षा दिली, जेवण दिलं.
मंगळवार, ३० मे, २०१७
गाय, गोमांस आणि इतिहास
एके काळी भारतातील खेड्यांत स्थायी जमातीचे लोक व वाताहत झालेले लोक राहत होते. पहिले गावकुसाच्या आत आणि दुसरे गावकुसाच्या बाहेर असे परस्परांपासून वेगवेगळे राहत असले तरी त्या दोन्ही वर्गातील लोकांत आपसात सामाजिक व्यवहारावर कसलीही सामाजिक बंधने नव्हती. 'हु आर शूद्राज'मधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'जेंव्हा गाय पवित्र बनली आणि गोमांस भक्षण निषिद्ध ठरले तेंव्हा समाजाचे विभाजन दोन वर्गामध्ये झाले.' भारतीय समाजात अस्पृश्यता किंवा प्रखर सामाजिक भेद करणारा जातीभेद/ वर्णभेद पूर्वापार अनेक सह्स्त्रकांपासून कधीच नव्हता. एका विशिष्ट कालखंडापासून अस्पृश्यता रूढ झाली असे नव्हे तर चढत्या कमानीत वाढत राहिली. समाजात अस्पृश्यता रूढ होण्याच्या कालावधीवरून गाय पवित्र कधी मानली जाऊ लागली याचा अंदाज काढणे सोपे जाते. या साठी दोन घटक विचारात घ्यावे लागतील ते म्हणजे किमान व कमाल कोणकोणत्या काळापासून गाय पवित्र मानणे सुरु झाले तो कालखंड हा अस्पृश्यता दृढ होण्याचा कालावधी होय.
सोमवार, २९ मे, २०१७
मंगळवार, २३ मे, २०१७
ओसरीवरची माणसं ......
ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.
आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे . गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी.
शुक्रवार, १९ मे, २०१७
अंघोळाख्यान ...
बाळ जन्मल्यानंतर त्याला अंघोळ घालून स्वच्छ केले जाते आणि मग आईकडे त्याला सुपूर्द केले जाते. तेच मूल मोठे होते. बाल्य, कुमार, तारुण्य, प्रौढ अवस्थेनंतर वृद्धावस्था पार केल्यानंतर एका दुर्दैवी दिवशी त्याचा मृत्यू होतो आणि त्याचे अंतिम संस्कार करण्याआधी त्याला अंघोळ घातली जाते. व्यक्ती कोणत्याही जातधर्माचा असो त्याच्या आयुष्यात आरंभ, अंताच्या या बाबी घडतातच. एक जितेपणी तर एक मृत्यूनंतर ! अशा रीतीने आपल्या जीवनाचा अंघोळीशी अत्यंत जवळचा संबंध येतो ! अंघोळ ही कोणत्याही व्यक्तीच्या दिनक्रमात नित्यनेमाचे स्थान असणारी बाब आहे. तरीही काही आळसप्रेमींना अंघोळ नकोशी वाटते. 'अंघोळीची एखादी गोळी असती तर किती बरे झाले असते' अशी हुरहूर त्यांना वाटते. पण अशी सोय अजून तरी झालेली नाही त्यामुळे जन्मल्यावर सुरु होणारी अंघोळ श्वास थांबल्यावरही एकदा 'अंगावर' येतेच, मग कुठे त्यातून सुटका होते.
बुधवार, १० मे, २०१७
मंगळवार, ९ मे, २०१७
पुराने 'जख्म' - तुम आये तो आया मुझे याद....
१९९८ मध्ये महेश भट्टनी 'जख्म' हा चित्रपट काढला होता. त्यात एक अवीट गोडीचं अर्थपूर्ण गाणं होतं. "तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला.."
अलका याज्ञिकनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं होतं. आर्त हळव्या स्वरातील ही रचना गाणं ऐकल्यानंतर ओठांवर रेंगाळत राहते. गाणं बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की या दाखवलेला प्रसंग म्हणजे महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या जीवनातला 'तो' प्रसंग आहे.महेश भट्टच्या प्रेमात देहभान हरपलेली परवीन एकदा सुरा हातात घेऊन त्याच्या घरात घुसली होती आणि महेशनी अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर हात जोडल्यानंतर तिने तिथून पाऊल काढते घेतले होते. (हाच प्रसंग त्यांनी 'अर्थ'मध्ये दाखवला होता). या नंतर बरेच दिवस महेशभट्ट परवीन बाबीकडे फिरकले नाहीत. तिनं मात्र पिच्छा पुरवला. शेवटी काही दिवस तिच्यापासून स्वतःला चुकवत फिरणाऱ्या महेश भट्टनी तिचं घर गाठलं तर त्यांना दारात उभं पाहून तिला हर्षवायुच व्हायचा राहिला होता. महेश आत आल्यावर तिनं भाबडेपणाने सगळी दारं खिडक्या लावून घर बंदिस्त करून घेतलं. जणू आता महेश तिच्या घरात कायमचे कैद झाले असा तिचा होरा असावा. पण पुढे जाऊन नियतीने तिची क्रूर चेष्टा केली हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. असो.... ही घटना महेश भट्ट यांच्या मनावर खोल कोरली गेली अन तिचे पडद्यावरील प्रकटीकरण म्हणजे 'जख्म'मधलं हे गाणं...
सोमवार, १ मे, २०१७
महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनाच्या लाह्या बत्तासे ...
आज एकाच दिवशी दोन ‘दिन’आल्याने शुभेच्छोत्सुकांची चंगळ आहे.. किती शुभेच्छा देऊ आणि किती नको असे काहीसे झाले असेल नाही का ?..असो...
महाराष्ट्राच्या विभाजनाची स्वप्ने पाहणाऱ्या, त्याची शकले करू इच्छीणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र दिनाचे गोडवे गावेत हे म्हणजे कसायाने गाईची महती सांगण्यासारखे आहे....
एकीकडे मंगल देशा, राकट देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा आणि कुठल्या कुठल्या देशा म्हणून तुताऱ्या फुकत राहायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्र विभाजनाचे 'रेशीम' विणत राहायचे हा दुट्टपीपणा आहे.
रविवार, ३० एप्रिल, २०१७
रेड लाईट डायरीज - एक रात्र 'दिवाली नाईट'ची.....
शनिवार, २९ एप्रिल, २०१७
अनुवादित कविता - ए. के. रामानुजन ; तमिळ कविता
बांगडया...
सख्यांनो तो ज्या समुद्रात जातो, तो गगनभेदी रोरावतो, प्रलयंकारी फुगतो.
शंख शिंपल्यांना उधळतच किनाऱ्यावर आणतो, कधी त्यात आवाज शिटीचा घुमवतो.
पण माझा नावाडी त्याच्या लाकडी होडक्यातून पुढेच जात राहतो. लाटांच्या थंड फटक्यांना वल्ह्यांचे गतिमान संगीत देतो.
सख्यांनो तो ज्या समुद्रात जातो, तो गगनभेदी रोरावतो, प्रलयंकारी फुगतो.
शंख शिंपल्यांना उधळतच किनाऱ्यावर आणतो, कधी त्यात आवाज शिटीचा घुमवतो.
पण माझा नावाडी त्याच्या लाकडी होडक्यातून पुढेच जात राहतो. लाटांच्या थंड फटक्यांना वल्ह्यांचे गतिमान संगीत देतो.
शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७
कसदार 'जयवंत' साहित्यिक .....
कोकणच्या लाल मातीला आपल्या दर्जेदार साहित्यातून उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख सांगता येतील, ते म्हणजे जयवंत दळवी. जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. काही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे, यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.
गुरुवार, २७ एप्रिल, २०१७
'लिओ टॉलस्टॉय' - कादंबरीकार ते तत्ववेत्ता .... पूर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध
काही काळापूर्वी अभिनेता रजनीकांतचा एक किस्सा वाचनात आला होता. रजनीकांत मंदिराबाहेर थांबलेला असताना एका महिलेने त्याला भिकारी समजून दहा रुपये दिले आणि त्याने ते भीक म्हणून स्वीकारले ! असाच किस्सा लिओ टॉलस्टॉय यांच्याबाबतीत पूर्वी घडलाय. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होता. तो आपल्या काही सैनिकांची मॉस्को स्टेशनवर वाट पाहत होता. मॉस्कोत नेहमीच रक्त गोठवणारी थंडी असते त्यामुळे अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच उमगत नव्हतं. तेव्हढ्यात एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ हमाल आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय गोंधळला. पण पुढच्याच क्षणी त्यानं ते सगळं सामान उतरवलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना ! हे सैनिक एका हमालाला का सॅल्यूट मारतायत ? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्यावर बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर उभ्या असलेल्या सार्वकालीन महान कादंबरीकाराने आपलं सामानही उतरवून दिलं या कृतीनं बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनंच त्यांचे आभार मानले, ते तिने दिलेल्या कामाबद्दल. हमालाला देय असलेली रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.
बुधवार, २६ एप्रिल, २०१७
कल्पवृक्ष ....
बघता बघता पावसाच्या बातम्या हळूहळू कमी झाल्यात, कवींच्या कविता करून झाल्यात... आणि बघता बघता पाऊस थबकलाय देखील... इकडे काळ्या मातीने सगळे पाणी अधाशासारखे गटागटा पिल्येय... काही ठिकाणी कोवळे हिरवे कोंब आलेत तर मातीच्या सांदीत दडून बसलेल्या चुकार बीजाला कुठे तरी अंकुर देखील आलेत.. वाळून काडी कामटी झालेल्या खोडाला पालवी देखील फुटलीय... पण हे सारं कुठं होतंय ? .. हे सारं लगोलग फक्त काळ्या मातीतच होतंय... मात्र बरड रानात, मुरमाड जमिनीत हे इतकं सहजासहजी होत नाहीय....
'सिंहासन' - त्रिकालाबाधित राजकारणाचा मानबिंदू..
खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेलं दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस(निळू फुले) भल्या सकाळी घरातल्या लाकडी खुर्चीत अंगाचे मुटकुळे करून बसलाय.
काही वेळापूर्वी त्याला दस्तुरखुद्द 'सीएम'चा फोन येऊन गेलेला आहे. तो अजूनही त्याच फोनच्या विचारात आहे.
इतक्यात डोअरबेल वाजते. सिगारेट शिलगावत रेडिओ सुरु करून तो दरवाजा उघडतो, बाहेर त्याची तरुण मोलकरीण छातीवरच्या पदराचे नेहमीप्रमाणे भान नसल्यागत उभी!
तिच्याकडे एक विलक्षण जहरी कटाक्ष टाकत दिगू बाजूला होतो.
ती आत येते. रेडिओवर मंद स्वरात गाणे सुरु असतं - 'झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं, हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा गं, अजुन तुझे हळदीचे अंगअंग पिवळे… '
दिगू परत खुर्चीवर येऊन बसतो.
बाई आत जाते अन फरशी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन बाहेर येते.
दिगूची सिगारेट पेटलेली आहे अन डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले आहे.
त्याचं सारं ध्यान तिच्याकडे आहे अन इतक्यात टेबलावरच्या फोनची रिंग वाजते.
पलीकडून संवाद सुरु होतो -
"श्रीमंतांचा फोन आला होता वाटतं? काय म्हणत होते श्रीमंत?"
दिगू उत्तरतो, "काही नाही, त्यांची तब्येत नरम आहे म्हणत होते, दुष्काळाचं विचारत होते…"
पलीकडून प्रतिप्रश्न येतो "पण असं झालं काय अचानक. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?"
बोलत बोलत आलखनपालखन मांडी घालून खुर्चीवर बसलेला दिगू तीक्ष्ण नजरेने फरशी पुसणाऱ्या पाठमोऱ्या असलेल्या कामवाल्या बाईच्या पुठ्ठयाला निर्लज्जपणे न्याहळत खवचटपणे छद्मीपणे हसत उत्तरतो,
"काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल !"........
शनिवार, २२ एप्रिल, २०१७
सौतन - पडद्यामागची करुण कथा ...
बुधवार, १९ एप्रिल, २०१७
वियोगकविता ...
लढाईवर गेलेल्या एका तरण्याबांड वीराचा मृतदेह घरी आणलाय आणि त्याच्या पाठी आता त्या घरात त्याची तरूण विधवा पत्नी व तान्हुले मूल मागे राहिले आहेत. आपल्या पतीच्या कलेवराकडे शोकमग्न अवस्थेत दग्ध झालेली ती स्त्री स्तब्ध झाली आहे. तिने आपले दुःखावेग मोकळे करावेत मनातले अश्रुंचे बांध फुटू द्यावेत यासाठी तिचे स्वकीय प्रयत्न करताहेत. काहीही केले तरी अतीव दुःखामुळे समाधिस्त स्तब्धतेत गेलेली ती स्त्री काही बोलत नाही. हे पाहून तिथे असणारी एक वृद्धा उठते अन त्या वीरपत्नीच्या मांडीवर तिचे तान्हुले ठेवते. तिच्या मांडीवर ते तान्हुले येताच तिला वास्तवाचे भान येते आणि तिच्या अश्रूंचा बांध आता फुटतो. कवी लॉर्ड टेनिसन यांच्या 'Home they Brought her Warrior Dead' या वियोगकवितेतली ही काव्यकथा आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या करते...
गुरुवार, १३ एप्रिल, २०१७
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ....अत्रेंच्या कविता
सिनेमागृहातल्या पडद्यावर दृश्य दिसतेय - 'देव्हारयासमोर बसलेली तिशीतली ती प्रसन्न मुद्रेतली तेजस्वी स्त्री निरंजनासाठी, समईसाठी कापूस वळून त्याच्या नाजूक वाती तयार करत्येय. कानातली कुंडले, गळ्यात काळ्या मण्यांची सर, सैल अंबाडयात खोवलेले फुल तिच्या सध्या सोज्वळ व्यक्तिमत्वास खुलून दिसते आहे. तिच्या समोरच्या लाकडी देव्हारयातील देवांच्या मूर्तींवर पिवळसर आभा पसरलेली आहे. समईची मंद ज्योत तेवते आहे, तिचा उजेड सारया खोलीत पसरलेला आहे. तिच्या मागे असणारया भिंतीवर देखील देवांच्या तसबिरी डकवलेल्या आहेत. तिच्या शेजारी एक विधवा वृद्धा एका मुलाचे डोके मांडीवर घेऊन बसलेली आहे. काही वेळापूर्वीच तिथे भावंडांत पाय दाबण्यावरून भांडण झालेलं आहे, 'घरातली सगळी लहान सहान कामे एकानेच का करायची ? एकानेच का ऐकायचे ?" असा सवाल एका गोजिरवाण्या मुलाने केला आहे. इतक्यात आपला अभ्यास संपवलेला दुसरा एक साजिरा मुलगा त्या वृद्धेस लाडाने म्हणतो की, "ए आजी एखादं गाणं म्हण की गं !". त्यावर ती वृद्धा हसून म्हणते की, 'मी जर गाणं गायलं तर सगळी आळी गोळा होईल हो ! मग त्या सुहास्यवदनेकडे बघत ती म्हणते, "यशोदे तूच म्हण की गं गाणं !" आणि ती विचारते, "ते चिंधीचं गाणं म्हणू का ?"तो गोजिरवाणा सोडून सारे जण तिला होकार देतात आणि ती गाऊ लागते- 'द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरजरी गं पितांबर दिला फाडून..." आता खोलीत बसलेले सगळेच जण एका तालात हळुवार टाळी वाजवून तिला साथ देतायत...' सिनेमागृहात हे दृश्य पाहणारया सर्वांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या असतात. साल होते १९५३. चित्रपट होता 'शामची आई'. हे अवीट गोडीचं गाणं लिहिलं होतं आचार्य प्र.के.अत्रे यांनी !
मंगळवार, ११ एप्रिल, २०१७
मैत्र जीवांचे .....
शाळा म्हणजे फक्त बहुमजली इमारती नसतात,
नक्षीदार आकाराच्या रंगीबेरंगी ढंगाच्या इमारतीदेखील शाळा नसतात..
शाळा म्हणजे नुसत्या खोल्या आणि मुले- माणसे नसतात, न केवळ मोठे प्रवेशद्वार अन शिस्तबद्ध आवाज ! शाळा असतात तरी काय ?
पोपडे उडालेल्या,जागोजागी गिरवागिरवी केलेल्या,विटक्या रंगाच्या वर्गाच्या चौकोनी भिंती !
अन त्यावर लटकणारे वेगवेगळ्या चित्रांचे फळांचे, फुलांचे अन विज्ञानाचे गोल चौकोनी तक्ते.
नक्षीदार आकाराच्या रंगीबेरंगी ढंगाच्या इमारतीदेखील शाळा नसतात..
शाळा म्हणजे नुसत्या खोल्या आणि मुले- माणसे नसतात, न केवळ मोठे प्रवेशद्वार अन शिस्तबद्ध आवाज ! शाळा असतात तरी काय ?
पोपडे उडालेल्या,जागोजागी गिरवागिरवी केलेल्या,विटक्या रंगाच्या वर्गाच्या चौकोनी भिंती !
अन त्यावर लटकणारे वेगवेगळ्या चित्रांचे फळांचे, फुलांचे अन विज्ञानाचे गोल चौकोनी तक्ते.
सोमवार, १० एप्रिल, २०१७
गोडी होळी-धुळवडीची !
नागरी भागातील बेचव होळी आणि धुळवडीच्या तुलनेत हे सण गावाकडं अधिक उजवे वाटतात. उपदेशाचे डोस पाजणाऱ्या लोकांचे या दोन दिवसात तिकडं काहीच खरं नसतं. त्यातही प्रत्येक गावात या सणांची रंगत न्यारीच असते. माझ्या गावाशेजारी लमाण तांडा आहे. तिथल्या होळीची लज्जत जगात सर्वात न्यारी असावी. आजच्या दिवशी विवाहित लमाण स्त्रिया आपल्या नवऱ्यांना वेताच्या फोकाने किंवा पोकळ बांबूने फटके देतात. नवरोबाने उत्तरादखल हात उचलायचा नसतो. त्याला फार तर एखादा वार चुकवता येतो. खास वेशभूषा केलेल्या देखण्या केशभूषेतल्या बायका विशिष्ठ हेल काढत आगळ्या सुरात गाणं गात हा उद्योग पार पाडत असतात. नवरोबांना ठोकून झाल्यावर उन्हं काहीशी डोक्यावर आल्यानंतर आपआपल्या दारापुढं पाच गोवऱ्यांची होळी पेटवून झाली की मग जेवणाचे वेध लागतात. चुलीवर शिजवलेलं तिखटजाळ मटण आणि पुरणपोळी दोन्हीचा बेत असतो. नवसागरापासून बनवलेली गावठी दारू अफाट झिंगवते. दिवस नुस्ता झिंगाटून जातो. दुपार कलताना माणसं दमून जातात. बसल्या जागी लुडकतात. होळीच्या या आगळ्या वेगळ्या रिवाजात मनमोकळं जगताना सगळी दुःखे वेदना विसरून सहजीवनाचा खरा आनंद घेताना कुणीही जुनं चंदन उगाळत बसत नाही. की कुठला कृत्रिमतेचा लवलेश त्यांच्या वागण्यात राहत नाही. जुनी भांडणं मिटवून आपसातला सलोखा टिकवण्यावर भर राहतो.
गुरुवार, ६ एप्रिल, २०१७
एक उनाड दिवस .....
माझी आई, आजी तिच्या संभाषणात ही म्हण अधून मधून वापरायची. तेंव्हा तिचा अर्थ कळत नसे. आता तिचा अनुभव येतो. बेफिकीर उनाड माणसाला कशाचीही काळजी नसते, तो आपलं खुशाल फिरत राहतो. हे वेड त्याच्या डोक्यात इतकं भिनलेलं असतं की गोठ्यात गाय जर व्यालेली असली तर तो पठ्ठ्या तिचं तान्हं वासरू खांद्यावर टाकून जत्रेला जातो. मीही यातलाच एक...
बुधवार, ५ एप्रिल, २०१७
चिंचपुराण....
प्रत्येकाच्या आठवणींना अनेक मुलामे असतात, अनेक कंगोरे असतात. नानाविध घटना आणि घटकांशी त्या निगडीत असतात. आठवणी जशा सुखाच्या दुःखाच्या असतात तशा विविध चवीच्याही असतात. म्हणूनच संभाषणात म्हटले जाते की. आठवणी या कधी कडूगोड असतात तर कधी आंबटगोड असतात. आंबट आठवणींचा विषय निघावा अन त्यात चिंचेचा उल्लेख होत नसावा असे कुठे घडत नाही. या आंबट आठवणी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते प्रेमाच्या आंबटगोड शेवटापर्यंत मनात झिलमिलत असतात. पूर्वी रेडीओवर ‘मधुचंद्र’ चित्रपटातील एक गाणं नेहमी लागायचे त्यात चिंचेच्या झाडाचा वेगळाच उल्लेख होता. “हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नवतरुणी काश्मिरी बघ निळसर पाणी..” अशा काहीशा त्या पंक्ती होत्या. त्यातला नायक सांगतो की हे चिंचेचे झाड त्याला चक्क चिनार वृक्षासारखे दिसते आणि त्यामुळे त्या झाडाखाली उभी असलेली त्याची प्रियतमा ही एखाद्या काश्मिरी नवतरुणीसारखी दिसते आहे.. चिंचेच्या झाडाचे चिनार वृक्षाशी असणारे साधर्म्य याहून देखण्या शब्दात व्यक्त झालेले नाही. असो..
गुरुवार, ३० मार्च, २०१७
'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...
खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.
मंगळवार, २८ मार्च, २०१७
नवविचारांची गुढी ...
चैत्र शुक्ल प्रतिपदेस 'सालाबादप्रमाणे यंदाही'च्या धर्तीवर महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्यभर विविध आक्षेप साक्षेपांच्या फैरी झडतात. त्यातील काही मुद्द्यांचा हा परामर्श..
गुढीपाडवा साजरा करताना त्यामागे असणारी धार्मिक पार्श्वभूमी सांगितली जाते. यानुसार गुढीपाडव्याच्या परंपरेस मुख्यत्वे तीन घटना कारणीभूत आहेत.
गुढीपाडवा साजरा करताना त्यामागे असणारी धार्मिक पार्श्वभूमी सांगितली जाते. यानुसार गुढीपाडव्याच्या परंपरेस मुख्यत्वे तीन घटना कारणीभूत आहेत.
गुरुवार, २३ मार्च, २०१७
घाल घाल पिंगा वाऱ्या - कवी निकुंब
एक काळ होता जेंव्हा दळणवळणाची साधने अत्यंत पुरी होती. विवाह हे बहुतांश करून पारंपारिक भारतीय पद्धतीने होत असत. विवाहेच्छुक मुलगा नवऱ्या मुलीला बघायला तिच्या घरी येई. यथासांग मुलीला पाहून झाल्यावर तो त्याची पसंती वा नापसंती कळवत असे. या प्रक्रियेत बऱ्याचदा मुलींचे मत विचारात घेतले जात नसे. पसंती कळवल्यानंतर लगीनघाई होई. पुढे जाऊन मुलाच्या वा मुलीच्या निवासी भागात किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री विवाह सोहळा संपन्न होई. पूर्वी ग्रामीण भागातले लग्नाचे वऱ्हाड बैलगाडयातून जाई, निमशहरी भागातले वऱ्हाड बंदिस्त ट्रकमधून तर शहरी भागातील वऱ्हाड एसटीबस मधून जाई.
एखादयाचा आर्थिक स्तर थोडा चांगला असला की याहून थोडीशी वरच्या स्तरावरची व्यवस्था याकामी ठरलेली असे. लग्न लागले की सासरला निघालेली नवरीमुलगी काहीशी धास्तावूनही जायची आणि तिला नवजीवनाचा आनंदही वाटायचा. मनाच्या द्विधा मनःस्थितीत अडकलेली ती नवविवाहिता तिच्या निरोपसमयी आईवडिलांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत असे. तिची भावंडे तिला मिठया मारून रडत. सारे वातावरण शोकाकुल होऊन जाई, मग जमलेल्या बायाबापड्यादेखील डोळ्याला पदर लावत. कुणाला नुकत्याच निवर्तलेल्या एखाद्या नातलगाची आठवण निघाली मग सारेचजण शोकसागरात बुडून जात.
बुधवार, १५ मार्च, २०१७
'व्हॅलेंटाईन डे' रेड लाईट एरियातला..
व्हॅलेंटाईन-डे रेड लाईट एरियातही साजरा होतो.
तिला सोडवू न शकणारे,
तिच्या सुटकेसाठी आवश्यक असणारे पैसे जवळ नसलेले,
तितकी धमक मनगटात नसलेले,
तिला कोठे न्यायचे आणि
कसे सांभाळायचे याचे उत्तर माहित नसलेले,
पण तिच्यावर मनापासून प्रेम करणारे
आजच्या दिवशी भर दुपारी इथे येताना किंचित सुकून गेलेला,
पाकळ्या झडायच्या बेतात असलेला,
लाली फिकी झालेला थोडासा स्वस्तातला गुलाब
शर्टमध्ये लपवून येतात.
जोडीला पाच पन्नास रुपयांची कचकडयाची भेटवस्तूही आणतात.
आम्ही सोलापूरी ....
सोलापूरातल्या अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळीमध्ये काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात, ही म्हटली तर देवमाणसे आहेत नाहीतर सीधी-साधी महापुरुष वजा सोलापूरी माणसे ! विश्वनिहंत्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार आहे, त्यामुळे यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसांत सोलापूरच्या लाल चटणीचे, मऊ इडलीचे, आंबुस ताडीचे, कडू बाजरीचे, गोड हुरडयाचे, उजनीच्या खारटतुरट पाण्याचे, खरमुडया वाणाचे, गोडतिखट सांबाराचे, हलवाई गल्लीतल्या घमघमाटाचे, आबे काबे म्हणणारया एकेरीपणाचे अन डोळे वटारून उग्रट वाटणारया पण हळव्या मनाच्या माणसाचे सगळे गुण अगदी ठासून भरलेले आहेत.
बुधवार, १ मार्च, २०१७
रेड लाईट डायरीज - 'पवित्र' गंगा-जमुना ...
पवित्र काय आणि अपवित्र काय याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात, पण रेड लाईट एरियात त्या जितक्या तीक्ष्ण आणि कटू असतात तितक्या अन्यत्र असू शकत नाहीत....
जमुनाबाईचे ओठ सदा न कदा पान खाऊन लाल झालेले असत.
वरवर साधी वाटणारी पण एकदम फाटक्या तोंडाची, पक्की जहांबाज !
तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला की भल्याभल्यांना घाम फुटे.
आवाज एकदम मधाळ, ओठातून साखरपाक ओघळावा इतका.
तारसप्तकात चढला तरी त्यातही एक गोडवा वाटे.
हापूस आंब्यासारखी रसरसलेली काया अन मुखडयावर कत्लवाली नजाकत.
एका नजरंत पुरुषाचं पाणी जोखणारी, डोक्यात त्याची कुंडली बनवणारी.
कुणाला कुठवर घोळवायचं, कुणाला खेळवायचं अन कुणापुढं नांगी टाकायची हे तिला चांगले ठाऊक.
कुठल्याही विषयावर बोलताना बागेतून फिरवून आणून अखेरीस आपल्याला हवं तसं धोपटून काढण्यात तिचा हातखंडा.
बोलताना विषय पुरत नसत. तिचे पदराचे चाळे सुरु असत. अंगठा जमिनीवर मुडपून पाय हलवत खुर्चीत रेलून बसे आणि केसांचं विस्कटणं सुरु होई.
आपण काहीही बोललो नसलो तरी ती म्हणे, “हां तो क्या कह रहा था तू ?”
तिनं टाकलेला तो फास असे, सावज त्यात अलगद अडके. मग ती त्याला आपल्या साच्यात घुसळून काढे.
जमुनाचं रसायनच वेगळं होतं, ती या लाईनमध्ये फिटही होती आणि अनफिटही होती.
एका उन्हाळ्यातल्या संध्याकाळी चाईल्डसेक्सवर्कर्सची नवी रसद आल्याचे कळल्यामुळे खबरबात मिळवण्यासाठी तिच्याकडे गेल्यावर तिने आधी हजेरी घेतली.
कदाचित त्या दिवशी माझ्या आधी कुणी तरी तिचा भेजाफ्राय करून गेलं असावं.
नया बच्ची लोग का मालुमात हैं क्या असं म्हणायचा अवकाश तिने विचारलं, “तुला कशाला हवी रे ही जानकारी ?”
तिथेच मी चुकलो, चुकून बोलून गेलो – “ये ऐसाच ग्यान बटोरने के लिये !”
झालं. उत्तर ऐकताच तिच्या डोळ्यात चमक दाटून आली.
“कसलं ग्यान ?” – हातभर पुढे सरकत जमुना बोलली.
माझी तंतरली होती, ऐन वेळेस काय बोलावं ते सुचलं नाही. गडबडीत बोलून गेलो - “तेच ज्ञान, आपलं कर्म आणि कर्माच फळ, त्या शिवाय का कुणी इथं येतं ?”
"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी...
अरे, इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम...
वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..
सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७
मराठीचं जगणं म्हणजे काय ?
दुकानांमध्ये, मॉलमध्ये गेल्यावर मराठी संभाषणाची लाज वाटून 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच इट कॉस्ट्स ?' असं विचारणाऱ्या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा गौरव दिनाच्या बळेच शुभेच्छा... आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरणऱ्या गुणीजनांनाही कोरड्या शुभेच्छा!
खरेदीस गेल्यावर मराठी दुकानदारासमोर इंग्रजीत बोलून पुन्हा आपसात मराठीत बोलणाऱ्या मराठी दांपत्यास तर अनेकोत्तम शुभेच्छा!
दूरध्वनीवरचे संभाषण अकारण हिंदी इंग्रजीतून झाडणाऱ्या, कथित दृष्ट्या आपला रूबाब वाढवण्यासाठी(!) मराठी भाषेऐवजी इतर भाषांचा अंगीकार करणाऱ्या लोकांना त्रिवार शुभेच्छा..
शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७
सय ....
गेल्या दोन तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं ? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभे केलेल्या पोराने दारापाशी थांबून एकसुरात रडत राहावं आणि एकाच वेळी त्याच्यावरच्या प्रेमाने, संतापाने व्याकुळ झालेल्या आईने अधून मधून हळूच खिडकीतून डोकावून त्याच्याकडे पाहत राहावं तसं ह्या पावसाचं झालंय. कधीकाळी काळजावर ओरखडे ओढून हरवून गेलेली एक रात्र डोळ्यापुढून अलगद तरंगत जावी तसं ह्या पावसाचं झालंय. प्रेमात पडल्यानंतर पहिल्यांदा भांडण झाल्यावर सख्याच्या विरहात होरपळून निघणाऱ्या प्रियेने रात्रभर एका कुशीवर झोपून हलकेच आसवं गाळीत पडून राहावं तसं ह्या पावसाचं झालंय. घरापासून दूर शेकडो किलोमीटर अंतरावर एकट्याने होस्टेलवर राहतानाच्या पहिल्या रात्री आईवडिलांच्या आठवणींनी या कुशीवरून त्या कुशीवर होताना सतत स्मृतींची सय मनात दाटून येत राहावी अन अश्रुंचे पाझर लागून राहावेत तसं ह्या पावसाचं झालंय.
बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७
सांगावा ...
काळ्या मातीतली मऊ ढेकळे बोटांशी खेळवत रानातले तण खुरपणे म्हणजे एखाद्या चिमुरडीने तिच्या आईचे केस विंचरण्यासारखेच. आपल्या सोबतीच्या कारभारणीसोबत काम करणारया या काळ्या आईच्या लेकी वेगळ्याच धाटणीच्या असतात.एकोप्याने काम करतील. एकत्र जेऊन एकाच जागी विसावा घेऊन एकमेकीच्या सुखदुखात आत्मभान विसरून एकरूप झालेल्या असतात. आपआपल्या घरातल्या या लेकुरवाळ्या इथल्या काळ्या आईची सेवा करताना आपली पोटची लेकरे देखील कधी कधी झोळीत बांधून काम करतात तेंव्हा पांडुरंग देखील हातात खुरपे धरून ढेकळाच्या बंधनात अडकलेल्या गवताच्या पात्यांना हळुवार मोकळे करत असावा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)