सोमवार, २५ एप्रिल, २०१६

माणसातला 'देव' ...


वाढत्या वयाबरोबर काळ माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांची नक्षी काढायला स्रुरुवात करतो तेंव्हा त्याच्या मनातला भक्ती भाव अधिक तीव्र होतो. पैलतीरीचा तट जेंव्हा खुणवू लागतो तंव्हा देव -देवत्व याविषयी अधिक ओढ लागते. अंगावरची कातडी जसजशी ढिली होत जाते तसतशी ती अधिक नरम पडत जाते अन मनातला ताठा देखील तोवर गळून पडलेला असतो, उरलेली असते ती काळजी, भीती अन त्यातून जन्मलेली श्रद्धा. काळजी राहिलेल्या आयुष्याची असते तर भीती मरणाची असते अन श्रद्धा देवावरची ! काहींची श्रद्धा पूर्वापार असते तर काहींची समयोचित असते तर काहींची गरजेतून उत्पन्न झालेली असते मात्र क्वचित काही लोकांचीच श्रद्धा अंतःकरणातून पाझरलेली असते. पण बहुतांश करून वयपरत्वे अशी श्रद्धा दाटून आलेलेच जास्ती असतात. श्रद्धा जेव्हढी उत्कट आणि प्रामाणिक असते तितकी काळजी आपसूक कमी होते अन काळजी कमी झाली की मरणाची भीतीही कमी होते म्हणून उतारवयात माणसे परमार्थाकडे सहजच झुकतात. 'शेवटचा दिस सुखाचा व्हावा' हा स्वार्थही त्यात असतो. आयुष्यभर केलेल्या चांगल्या वाईट कर्मांनी ज्याची त्याची श्रद्धेची शिदोरी तयार होते, कधी आयुष्यात आई वडीलांची सेवा केलेली नसेल अन त्यांच्या पश्चात कोणी काशीत उंबरठे झिझवत असेल तर त्याला आईबापही कळले नाहीत अन देव तर नाहीच नाही.

बुधवार, २० एप्रिल, २०१६

काव्यमय पितापुत्र - 'राना'-माधव !


एखादया प्रथितयश डॉक्टरांचा मुलगा बहुतांश करून डॉक्टरच होतो तर राजकारणी माणसांची मुले सर्रास राजकारणी होतात. त्याच चालीवर मोठया वकिलांची अपत्ये वकिली करताना आढळतात तर बिल्डरची मुले वडिलांचा कित्ता गिरवतात. कलाक्षेत्रात ही बाब सिनेमा वा नाट्य क्षेत्रात कमीअधिक लागू होते, तिथे मातापिता जे कुणी सिनेमा नाटकाच्या क्षेत्रात असतात त्यांचा सहज पाठिंबा मिळतो. त्यांचे वलय, त्यांची साधने यांचा फायदा होतो अन पुढच्या पिढीला पाय रोवणे तिथं सोपे जाते. मात्र पुढच्या पिढीचे नाणे खोटे असेल तर मात्र ते आपोआपच मागे पडते. इतर कलाक्षेत्रात मात्र असे घडताना दिसून येत नाही. चित्रकाराचं अपत्य चित्रकारच होईल किंवा शिल्पकाराचं अपत्य पत्थराला आकार देईल असे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. अशीच अवस्था क्रिडाक्षेत्रातही पाहायला मिळते. असंच काहीसं साहित्यिकाचं असतं. उत्तम साहित्यिकाचं अपत्य देखील प्रतिभावंत साहित्यिकच झाल्याचं अपवाद वगळता दृष्टीस पडत नाही. मराठी साहित्यात अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे आहेत जिथे मायबापापैकी कुणीतरी साहित्यिक आहे अन त्यांची दुसरी पिढी देखील साहित्यात रममाण झाली आहे. अशा दुर्मिळ साहित्यिक पितापुत्रात सोलापूरचे ज्येष्ठ कवीश्रेष्ठ रा.ना.पवार व त्यांचे प्रतिभावंत कवी पुत्र माधव पवार यांची नोंद होते. गिरणगांव म्हणून परिचित असणाऱ्या व कलाक्षेत्रात काहीसं बकालपण असणाऱ्या सोलापूरसारख्या शहरास या पवार पितापुत्रांच्या लेखनाने एक नवी ओळख प्राप्त करून दिली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

'बाप'कवी - इंद्रजित भालेराव



इंद्रजित भालेराव हे अस्सल काळ्या मातीचे कवी महाराष्ट्राला कसे गवसले त्याची कथा मोठी सुरस आहे. १९८५ च्या दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं एक नवलेखक शिबीर कोल्हापूरच्या पन्हाळगडावर सुरू होतं. त्यात भालेराव शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले होते. कवितांचं सादरीकरण सुरू होतं. भालेरावांची पाळी आली. त्यांनी एक कविता सादर केली. त्यांच्या कवितेत नवशिक्षित शेतकरी दाम्पत्याचं वर्णन होतं. नवविवाहित कुळंबीण आपल्या काबाडाच्या धन्याला सांजच्या पहारी लवकर घरी येण्याचं निमंत्रण कसं देते, हा प्रसंग भालेराव कवितेतून मांडत होते.

रविवार, १० एप्रिल, २०१६

'पंत गेले, राव चढले' आणि नाट्यछटाकार 'दिवाकर' - एक आकलन...



नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. हा साहित्यप्रकार मराठीत दिवाकरांनी ईतका समर्थपणे हाताळलाय त्याला तोड नाही. 'पंत मेले, राव चढले' ही दिवाकरांची एक प्रसिद्ध नाट्यछटा आहे.

शनिवार, २ एप्रिल, २०१६

रणरागिणी ताराराणी ...


दख्खन जिंकायचीच ह्या मनसुब्याने औरंगजेबाने जेंव्हा दिल्ली सोडली तेंव्हा सह्याद्री गालातल्या गालात हसला, कळसूबाईच्या शिखरावर रोमांच उठले. मावळच्या खोऱ्यात वारा बेभान होऊन वेड लागल्यागत हसत सुटला. संतांच्या ओव्या थरारून गेल्या. काहीशी मरगळून गेलेली सृष्टी टक्क सावध होऊन बघत राहिली. गडकोटांना स्फुरण चढले. कडयाकपारया उल्हासित झाल्या, नदीनाल्यांना भरून आले. तिन्ही ऋतूंना गहिवर दाटून आला. काळवंडलेल्या आभाळात पिसाळलेले ढग जमा झाले, सौदामिनींचा चित्कार सुरु झाला अन काळाला उधाण आले ! कारण सावज आपण होऊन मृत्युच्या दाढेत जणू चालतच आले ! काळाहून क्रूर असणाऱ्या औरंगजेबाने आधी कपटाने शंभूराजांचा काटा काढला त्याला वाटले मरगट्टे संपले. पण तिथूनच एका विलक्षण चमत्कारक अध्यायास सुरुवात झाली. भद्रकाली रणरागिणी ताराराणी कोपली आणि तिने औरंग्यास पुरते नेस्तनाबूत केले. त्याला इथल्याच मातीत चिरनिद्रा घ्यावी लागली. पण त्या नंतर जे काही घडले त्यामुळे मराठी मातीस भाऊबंदकीचे रक्तरंजित इतिहास घडताना मूक रुदन करण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते. त्या इतिहासाची ही पोस्ट .....

बुधवार, ३० मार्च, २०१६

फोटोची गोष्ट - तपकीरवाली मावशी .....



काही क्षणच असे असतात की एका झटक्यात काही वर्षे मागे घेऊन जातात, तसाच हा क्षण होता...."विटून गेलेल्या हिरव्या रंगाचे काठापदराचे नऊ वारी लुगडं अन रुपेरी बुट्टीची इरकली खणाची चोळी अशा टिपिकल गावाकडच्या वेशातल्या आजींना पाहून मी एका झटक्यात अनेक वर्षे मागे गेलो. खिळे ठोकलेल्या ढवळपुरी जाड चपला त्यांच्या पायात होत्या. नक्षीचे छर्रे उडालेल्या हिरव्या बांगड्या त्यांच्या दुई हातात भरलेल्या होत्या, माळकरयांचे भूषण असणारी तुळशीची माळ अन एक काळ्या मण्यांची सर गळ्यात होती. कपाळावर बारीक तुळशीचे पान गोंदवलेलं होते....."

सोमवार, २८ मार्च, २०१६

सर्वसामान्याचा अनोखा ताजमहाल !



महाल,राजवाडे,प्रतिके,स्मारके काय राजे लोकांनीच बांधावीत का ? सामान्य माणसाचे प्रेम हे बादशहाच्या प्रेमाइतके उत्तुंग प्रेम नसते का ? साध्या भोळ्या सर्वसामान्य माणसालाही प्रेमाचे प्रतिक निर्माण करावे वाटले तर त्याने काय करावे ? राजा महाराजांनी आपल्या प्रेमाच्या खातीर उंचे राजवाडे, महाल उभे केले म्हणून त्यांचे प्रेम श्रेष्ठ अन म्हणूनच इतरांचे प्रेम कदाचित तितके श्रेष्ठ ठरवले जात नाही असे का ? राजा महाराजांकडे तितकी संपत्ती, तितके मनुष्यबळ सहज उपलब्ध होते, सामान्य माणसाचे तसे नसते. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या प्रेमाचे तसेच उत्तुंग प्रतिक उभारावे वाटले तर त्याकडे जग कुतूहलाने पाहते. आपल्या पत्नीवर असीम प्रेम करणारी काही आगळी वेगळी माणसे अशीच झपाटून जातात अन काही तरी वेगळे करून दाखवतात. ही माणसे इतरांच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनतात.

गुरुवार, २४ मार्च, २०१६

गोष्टीवेल्हाळाची बाराखडी - साहित्यिक वर्कशॉप !


एखादं गाणं विविध गायकांनी कसं गायलं असतं याचं सादरीकरण आपण अनेकदा ऐकतो, पाहतो. मात्र एक समान रचना विविध लेखकांनी कशी सादर केली असती याची अनुभूती आपल्याला क्वचित लाभते. त्यादृष्टीने हा खटाटोप.
इथे एका वाक्यात एक घटना नमूद केलीय. या एकपंक्तीय घटनेची मांडणी विविध साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या नि कल्पनाविलासाच्या आधारे कशी केली असती याचे हे प्रकटन.
"वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले..." – हे ते वाक्य !

मंगळवार, २२ मार्च, २०१६

पाऊलवाट…



पाऊलवाट हे वाटसरूच्या मनावर होणारे एक गारुड असते, वाटसरूनी तयार केलेले ते जादुई रस्ते असतात. कधीतरी कुणीतरी उजाड माळरानातून पायी जाताना या वाटा तयार होतात.कधी भरल्या रानातून तर कधी उंच सखल शिवारातून पायी जाताना या वाटा तयार होतात. आधी गेलेला खाच खळग्यातून, अडथळ्यातून पार गेलेला असतो. त्याच्या पावलाच्या ठसे मागून येणारयाला दिशा दाखवतात. अन अनेक माणसे त्या वाटेने जाऊ लागतात, अन तयार होते पाऊलवाट.वाटेने लागणारे काटे-कुटे जाणारा प्रत्येक माणूस काढून बाजूला टाकून देतो, काटाडयांनी भरलेले वाळके फांद्यांचे तुकडे देखील आधी जाणारे मागून येणारयासाठी बाजूला सरकवत जातात. पाऊलवाटेत अडथळे काहीही असोत ते बाजूला केलेले असतात, एखादी भली मोठी शिळ आडवी आली तर तिला वळसा घालून ही वाट पुढे सरकते. डोंगराच्या अल्याड पल्याड नाचत नाचत जाते,खोल दरीत निसरडी होऊन हळूवार उतरते पण चालणारयाला हाताचा आधार मिळेल याची तजवीज करते. झरे,ओहोळ,ओढे,नाले याना पार करून मागे पुढे जाते. शेताच्या रस्त्याने कधी नागमोडी होते तर कधी सरळसोट असते. पाऊलवाटेवर कधी कुठले दिशादर्शक फलक नसतात, पण आधी जाणारयाने मागच्यासाठी एक विश्वास तयार केलेला असतो त्याच्या आधारावर मागचा त्याच वाटेने पुढे जातो......

बुधवार, १६ मार्च, २०१६

चक्रव्युहातले भुजबळ ….



बालपणीचे हलाखीचे दिवस काढणाऱ्या भुजबळांपासून ते आताच्या अब्जाधीश भुजबळांच्या वाटचालीचा मागोवा घेणारा हा लेख …
छगन चंद्रकांत भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिक जिल्ह्यातला. भुजबळ चार वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील वारले . त्यांच्या आईच्या मावशीने त्यांचा व त्यांच्या भावंडाचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांचे बालपण हलाखीचे गेले. माझगावला पत्रा चाळीत ते वाढले. पुढे पोटापाण्यासाठी भायखळा भाजी मंडई बाजारात ते भाजीपाला विकू लागले. मात्र, नंतर तेथील जागा, दुकान गावगुंडांनी ताब्यात घेत हडप केले. पुढे काहीतरी करायचे म्हणून स्थानिक नेत्यांच्या मदतीने आपल्या जागेचे दिवसाला दोन रुपये भाडे गोळा करण्याचे काम सुरु केले. २ रुपये घ्यायचे व जमेल तशी भाजी गोळा करून फूटपाथवर विकत बसायचे. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला. शिक्षण घेत असताना त्यांनी आपला व्यवसाय बंद केला नव्हता ह्या बाबीचा इथे उल्लेख करावा वाटतो. भाजी मंडई, नातेवाईकांची शेती व या शेतीवर आधारित व्यवसाय भुजबळांनी सुरु केला. पुढे सामाजिक व राजकीय क्षेत्रात रस निर्माण झाला व त्यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दरम्यान त्यांचे डिप्लोमाचे शिक्षण सुरु होते अन तरीही ते सक्रीय शिवसैनिक झाले ! ते सेनेत शाखाप्रमुख झाले. ७० - ८० च्या दशकातला सेनेचा शाखाप्रमुख काय चीज असायची हे वेगळे लिहायचे गरज नाही !

मंगळवार, १५ मार्च, २०१६

भावकवी - भा.रा.तांबे....


कविवर्य भा.रा. तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाच्या काव्यजन्माची एक कथा आहे. आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्यांना जाणवत होते. त्या दरम्यानच्या काळातच त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती.

तांबेंनी लिहिलेली ती कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली एक तक्रारवजा कैफियत आहे ! अंथरुणाला खिळलेल्या तांबेंनी आपल्या मित्राची विनंती पुरी करताना आर्त शब्दात स्वतःच्या वेदना भावबद्ध केल्या अन एक अजरामर कविता जन्मास आली ती म्हणजे, 'मधु मागसी आता …"

गुरुवार, १० मार्च, २०१६

मर्मकवी - अशोक नायगावकर !



मोठाल्या मिशांचे नायगावकर आपल्या त्या चिरंतन हास्य मुद्रेत ऐसपैस मांडी घालून बसतात, त्यांच्या उजव्या हातात कवितेचे टिपण वाट बघत असते. मंचावरील निवेदकांनी, संयोजकांनी माईकचा ताबा त्यांच्याकडे दिला की ते थोडे बाह्या सरसावून बसतात आणि मग सुरु होते शब्दांची आतिशबाजी, कोट्यांचे षटकार अन अंगावर न उमटणारे पण मनावर करकचून आसूड ओढणारे शब्दांचे फटके !
एकामागून एक फुलबाज्या उडाव्यात तसे तडतडणारे काव्यात्मक रचना ते लीलया पेश करत जातात. ऐकणाऱ्याच्या कानाखाली जाळ निघावा अशा आशयाच्या कवितांना ते हास्यरसाच्या रुपेरी वर्खात बेमालूमपणे गुंडाळून समोरच्यांना सुपूर्द करतात. मधूनच मिशीवरून हात फिरवत समोरच्या श्रोत्यांकडे मिश्कील नजरेने बघत समोरच्या श्रोत्यांची तल्लीनता किती रंगली आहे याचा अंदाज घेतात. त्यानंतर ते नकळत सभागृह ताब्यात घेतात आणि शब्दांच्या शस्त्राने गुदगुल्या करत करत अंतर्मनावर घावही करून जातात. ते हे कसे आकारास आणतात ते भल्या भल्यानाही उमगत नाही.

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१६

आयसीस, हेजबोल्लाह आणि हमास - तीन वेगळ्या धारणा...


कालच्या तारखेस १६ फेब्रुवारीस स्थापन झालेली हेजबोल्लाह (अरबी: حزب الله) ही पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील एक ज्यूविरोधी शिया अतिरेकी संघटना व राजकीय पक्ष आहे. अत्यंत कडवी लढाई करणाऱ्या आणि हार न मानणाऱ्या माथेफिरू देशप्रेमी तरुणांची संघटना असे या संघटनेचे वर्णन केले जाते

१९८२ साली इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्ल्यानंतर काही मुस्लिम धर्मगुरूंनी इराणच्या पाठिंब्यावर हेजबोल्लाहची स्थापना केली. हेजबोल्लाहचे पुढारी इराणचे अयातोल्ला रुहोल्ला खोमेनी ह्यांचे अनुयायी होते. इराणी सैन्याने हेजबोल्लाहला लष्करी प्रशिक्षण दिले. १९८२ च्या हल्ल्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधील काही भूभाग बळकावला होता. १९८५ ते २००० दरम्यान हेजबोल्लाहने इस्रायली सेनेविरूद्ध गनिमी कावा वापरून लढाई चालू ठेवली आणि इस्त्राईलच्या नाकात नऊ आणले. केल्यानंतर अखेर मे २००० मध्ये इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधून माघार घेतली.

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ...


"लहान मुलीसारखी कविता कोणासमोर उभी करणे आणि अनुकूल अभिप्रायासाठी कटोरा पुढे उभे करणे म्हणजे कवितेचा अपमान आहे" - कुसुमाग्रज आपल्या या मताशी ठाम राहिले आणि त्यांनी कवितेच्या शैशवात लिहिलेल्या अशा जवळपास दीडशे 'कुमारकविता' आपल्या संग्रहातून वगळल्या !

कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या 'म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !' या कवितेने पिचलेल्या मनगटात शंभर हत्तींचे बळ दिले. मायबाप रसिक आजही त्यांना लवून कुर्निसात करतात ! ही कविता आजही मराठी माणसासाठी अखंड प्रेरणास्त्रोताचे काम करते तर 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा' असं मातीचं गौरवगानही त्यांची कविता करते. 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’! असं सांगत जगण्याची लढाई जिंकायची अनामिक ताकद त्यांची कविता देते. त्यांनी लिहिलेली 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कविता त्यांच्या प्रतिभाशक्तीची दार्शनिक ठरावी अशी आहे.

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

आठवणी जयवंत दळवी आणि प्रवीण बर्दापूरकर यांच्या ......



ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या कालच्या पोस्टच्या निमित्ताने दिग्गजांच्या आठवणींचा एक अनोखा पुनर्प्रत्यय या पोस्टमधून आपल्यापुढे मांडताना मला विलक्षण आनंद होतोय. .
प्रख्यात संपादक, लेखक व ज्येष्ठ विचारवंत श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी 'नोंदी डायरीनंतरच्या' (प्रकाशक -ग्रंथाली) या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकांत त्यांच्या काही आठवणी, काही प्रसंग व त्यांच्या प्रदिर्घ वृत्तपत्रीय कारकिर्दीत आणि दैनंदिन जीवनात संपर्कात आलेल्या काही व्यक्तीविशेषांवर त्यांच्या ओघवत्या, रसाळ, प्रवाही शैलीत लेखन केले आहे. यातीलच एक प्रकरण आहे 'अनुभवसंपन्नता'....

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

बाळासाहेब आणि पवार साहेब - एक दिलदार यारीदुष्मनी !



बाळासाहेबांचे आणि पवारसाहेबांचे आपसातील नातेच वेगळे होते. वैयक्तिक जीवनात मैत्री आणि  राजकारणात वैमनस्य असं असूनही त्यांनी आपसातले संबंध तुटूपर्यंत कधीच ताणले नाहीत. 'मैद्याचे पोते' म्हणून बाळासाहेब ज्यांची टिंगल करायचे ते शरद पवार हे त्यांचे पाच दशकाचे सोबती आणि मैत्र होते. 'ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर उगवतात की मातीखाली उगवतात हे  माहिती नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये' अशा शब्दात पवारसाहेबदेखील त्यांच्यावर सभांमधून बोलायचे. सभा - भाषणे यातून दोघे जरी एकमेकावर राळ उडवत असले तरी त्यांनी त्यांच्यात आपसात असलेले एक ट्युनिंग कधी बिघडू दिले नाही अन ते दोघे कधी एकही झाले नाहीत अन आपसातल्या मैत्रीतून विभक्तही झाले नाहीत. ही दोन ब्रम्हफुले महाराष्ट्राच्या एकाच वेलीवर फुलली असल्याने त्यांची आपसातील वीण घट्ट होती याचे दार्शनिक असणारे अनेक किस्से गेल्या साठ वर्षात घडले. त्यापैकीच एक किस्सा शरद पवारांनी २०१७ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. डॉ.जनार्दन वाघमारे, कवी फ. मुं. शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांना बोलते केले होते, या मुलाखतीत त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी प्रकाशात आणल्या. त्यातली एक गोष्ट बाळासाहेब आणि पवारांनी एकत्र येऊन काढलेल्या मासिकाच्या जन्मकथेची होती….

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

दत्ता सामंत - झुंझार पण हटवादी संघर्षाचा करुण अंत !


'सिंहासन'मध्ये सीएमपदावर डोळा असणारे मंत्री विश्वासराव दाभाडे हे उद्योगपती व कामगारांचे समर्थन एकाच वेळी मिळवण्यासाठी कामगार पुढारी डिकास्टाला (सतीश दुभाषी) चर्चेला बोलावतात. अस्थिर औद्योगिक वातावरण, टाळेबंदी, संप इ. जर नियंत्रणात आणलं तर पक्षश्रेष्ठी आपल्याला सीएमपदी बसवतील हा अंदाज यामागे असतो. भीडभाड न बाळगणाऱ्या तोंडाळ डिकास्टाला विकतही घेण्याचा प्रयत्न असतो. पण प्रत्यक्षात होते उलटेच "आपल्या मागण्या लेखी असू शकत नाहीत म्हणून जर त्या पुर्‍या झाल्या नाहीत, तर नव्या मुख्यमंत्र्याला मी सचिवालयासमोर जोड्यानं मारेन" अशी धमकी त्यांना ऐकून घ्यावी लागते. ही बैठक निष्फळ होते. दाभाडेंना शब्दात अडकवण्याची डिकास्टा अचूक संधी साधतो. नंतर सीएमसोबतच्या चर्चेतही तो बाजी मारतो.

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

सोलापूरची गड्डा यात्रा - नऊशे वर्षापासूनच्या एका अनोख्या यात्रेची गाथा....



तथाकथित मोठ्या शहरातले सृजन माझ्या सोलापूरला बरयाचदा नाके मुरडतात, टवाळकी करतात. कधीकधी काही क्षणासाठी मी ही वैतागतो पण पुढच्याच क्षणाला मातीवरचे प्रेम उफाळून येते. काहीजण तर सोलापूरला एक मोठ्ठं खेडं म्हणून हिणवतात ! एका अर्थाने हे त्यांचा हा टोमणा बरोबर देखील आहे कारण यात्रा, जत्रा, उरूस हे आता मोठ्या शहरांचे घटक राहिले नाहीत. उलट खेड्यातून देखील ते हद्दपार होतील की काय अशी स्थिती झालीय. माझ्या सोलापूरमध्ये मात्र एक यात्रा दर वर्षी साजरी होत्येय ! ती ही तब्बल सातशे वर्षापासून. याचा सगळ्या सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आम्हाला कुणी डिवचलं की मी आवर्जून उत्तरतो, "ठीक आहे ! खेडं तर खेडं ! 
सिद्धेश्वर देवस्थान 
खेड्यात काय माणसे राहत नाहीत का ? खेड्यातल्या माणसाला आपण गावंढळ वा खेडूत म्हणतो. त्या नुसार आम्ही खेडवळ माणसं ! त्यात काय वाईट ? आम्हा सोलापूरकरांचा आमच्या मातीवर, इथल्या माणसांवर, सणावारांवर फार फार जीव ! इथे मोहरमचे पंजे अंगावर घेऊन नाचणारे, अंगावर पट्टे ओढून मोहरमचे वाघ झालेले अन पवित्र रोजे धरणारे हिंदू दिसतील. गड्डा यात्रेत मोठ्या संख्येने सामील होणारे मुस्लिम बांधव दिसतील, चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवासोबत अन्यधर्मीयही नक्कीच भेटतील. सर्व जयंत्या, उत्सव अन सर्व जातींचे सणवार सगळे मिळून साजरे करणारे आमचे हे मायेच्या माणसाचे तरीही थोडेसे उग्र बोलीभाषेचे सगळ्यांच्या मनामनातले गाव, सोलापूर !!! अशा या मुलुखावेगळ्या गावाची दर वर्षी भरणारी हौसेची - नवलाची यात्रा म्हणजे 'गड्डा यात्रा' !! सिद्धेश्वर महाराजांचा अड्ड (पालखी) यात्रा महोत्सव म्हणजेच गड्डा यात्रा !

सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

काँग्रेस - अंधारलेल्या रस्त्यावरचा जाणत्या माणसांचा भरकटलेला जत्था....



स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देण्यास तयार असणारया, घरादारावर तुळशीपत्र वाहण्याची तयारी असणारया, समता - बंधुता याचे आकर्षण असणाऱ्या अन सामाजिक बांधिलकी जपत अंगी सेवाभाव असणारया भारलेल्या लोकांची सर्वजाती -धर्मांच्या लोकांची एक सर्वसमावेशक चळवळ होती. या चळवळीला लाभलेले नेते देखील त्यागभावनेला प्राधान्य देऊन संपूर्ण स्वराज्य या एकाच मंत्राने प्रदीप्त झालेले देशव्यापी जनमान्यता असणारे होते. काँग्रेसची ती पिढी आपल्या लोकशाहीचा पाया होती म्हणूनच आपली लोकशाही आजही भक्कम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतच्या काँग्रेसच्या कालखंडाचे ढोबळमानाने पंडित नेहरूंचा कालखंड, इंदिराजींचा कालखंड, राजीव - नरसिंहराव कालखंड अन सोनिया गांधींचा कालखंड असे चार भागात विभाजन करता येते.

विटंबना ..




देवदासींचे एक बरे असते
त्या विधवा कधी होत नाहीत
कारण देवाला त्याचे दलाल मरू देत नाहीत.
एव्हढे सोडल्यास देवदासींचे काही खरे नसते,
जगणे फक्त नावाला असते
त्यांची मयत केंव्हाच झालेली असते.
देवाला कशाला हव्यात दासी
हा सवाल विचारायचा नसतो,
प्रश्नकर्त्यास पाखंडी ठरवले की 'काम' सोपे होते.
लाखोंच्या अधाशी नजरा झेलणाऱ्या
सहस्त्रावधींच्या बदफैल स्पर्शाना झिडकारणाऱ्या
शेकडोंना शय्येसाठी निव्वळ अंगवस्त्र वाटणाऱ्या
रक्तहळदीच्या घामात चिंब थबथबलेल्या
गात्रांची चिपाडे झालेल्या
अभागिनी, म्हणजे देवांच्याच की भोगदासी ?

रविवार, २७ डिसेंबर, २०१५

अंधारवेळेचा आधारवड - ग्रेस !


मराठी साहित्यात असे अनेक दिग्गज कवी होऊन गेलेत की त्यांनी आपल्या दिव्य प्रतिभेचा ठसा विविध वाड्मयीन साधनांत उमटवला आहे. अनेक प्रतिभावंतांनी गतकालीन कवींनी लिहिलेल्या कवितांना एक नवे परिमाण पाप्त करून दिले आणि त्यांच्या नंतरच्या कवींना एक वेगळी दिशा दाखवून दिली. आद्य कवी केशवसुतांनंतरचे मराठीतील एक प्रयोगशील आधुनिक कवी व मराठीतील युगप्रवर्तक कवी म्हणून बा.सी. मर्ढेकर यांना ओळखले जाते.
लेखक समीक्षक विश्राम गुप्ते लिहितात की, मर्ढेकरांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. सुदैवाने नवी किंवा नवोत्तर जाणीव मराठी वाड्मयीन पर्यावरणाला नवी नाही. मर्ढेकरांपासून जर या जाणिवेचा प्रवास सुरू झाला असं मानलं तर तिला व्यामिश्रतेचे धुमारे फुटले ते दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, मनोहर ओक आदी संघर्षवादी कवींच्या अफलातून कवितांमुळेच. याच काळात ढसाळांच्या परंपरांच्या मूर्तिभंजक कविता घडल्या. बालकवींनी निसर्गाचे बोरकर, पाडगावकर, बापट यांच्या कवितेतून सौंदर्यवादी अविष्काराचे मनोहर दर्शन साहित्यविश्वाला झाले. मराठी वाड्मयाला विंदांच्या व कुसुमाग्रजांच्या आदर्शाचा ध्यास घेणाऱ्या अलौकिक कवितांचा नवा आयाम प्राप्त झाला. केशवसुत, बालकवी आणि मर्ढेकरी काव्यशैलीचे पाईक असणाऱ्या कवींची पुढे अनेक आवर्तने झाली.

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

अटलजी.......



राजकारणाचे एक युग गाजवलेल्या अन आपल्याच पक्षाच्या सद्य विचारसरणीहून भिन्न विचारशैली व मर्यादेचे सजग समाजभान असणारया, आपल्या विचारधारांशी समर्पित राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींची आज उणीव भासत्येय आणि त्यांची किंमत अधिक प्रखरतेने लक्षात येतेय. वाजपेयीजींच्या काळातील लोकसभेच्या निवडणुकात मी भाजप उमेदवारास पसंती दिली होती. अपेक्षित असलेले बदल त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले नाहीत त्याच बरोबर फारशी निराशाही पदरी पडली नाही. यथातथा असे ते अनुभव होते. मात्र काँग्रेसच्या भ्रष्ट शासनापेक्षा त्यांचे सरकार उजवे वाटायचे.

गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

शिवप्रभूंचे जातीविषयक विचार ...

शिवछत्रपती हे अखिल रयतेचे राजे होते. ते कोणा एका विशिष्ठ जातीधर्म समुदायाचे राजे नव्हते. त्यांच्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांप्रती समानता होती, त्यात कुठलाही दुजाभाव नव्हता. त्यांच्या सैन्यदलात, कारभारात आणि सलगीच्या विश्वासू माणसांत देखील सर्व जाती धर्माचे लोक आढळतात. शिवबाराजांनी त्यांच्या उभ्या हयातीत एखादा इसम केवळ अमुक जातीचा वा धर्माचा आहे म्हणून त्याला काही सजा दिल्याचे वा शिरकाण केल्याचे इतिहासात कुठेही आढळत नाही. त्याचबरोबर कुणी एक व्यक्ती एखाद्या विशिष्ट जातधर्माची आहे या एका कारणापोटी त्यांनी कुणालाही स्वराज्याबाहेर काढले नव्हते हे ही विशेष. रयतेच्या हिताच्या आड येणाऱ्यास मात्र त्यांनी जातधर्म न पाहता दोषानुरूप समज – सजा दिली होती याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.


गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

अखेरचा हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान आणि परकीय आक्रमक - संघर्षाचा एक आलेख.



पृथ्वीराज चौहान हा दिल्लीच्या तख्ताचा शेवटचा हिंदू राजा. महापराक्रमी योद्धा व कुशल धनुर्धर अशी त्याची ख्याती होती. चौहान वंशाच्या क्षत्रिय राजांचे १२व्या शतकाच्या उत्तरार्धात अजमेर राज्य होते. यातीलच एका राजा होता पृथ्वीराज चौहान. याला 'राय पिथौर' नावानेही ओळखले जाते ! राजपूत इतिहासातील चौहान (चाहमान) घराण्यातील तो सर्वात प्रसिद्ध राजा होय. गझनीच्या शहाबुद्दीन मुहम्मद घौरीने भारतावर अनेकदा आक्रमणाचे प्रयत्न केले. दोन वेळा स्वाऱ्या केल्या त्यात एकदा पृथ्वीराजाने त्याचा पराभव केला. मात्र दुसरयावेळी घौरीने पृथ्वीराजाचा पराभव केला होता ही त्याची इतिहासातली ओळख. अशा या पराक्रमी पृथ्वीराजचा जन्म अजमेरचे राजपूत राजे महाराज सोमेश्वर यांच्या घराण्यात झाला होता. त्यांची आई होती कर्पुरादेवी. या दाम्पत्याला तब्बल १२ वर्षांनंतर पुत्ररत्न प्राप्त झाले होते. पृथ्वीराजच्या जन्मानंतर मात्र त्यांना हरिराज नावाचा आणखी एक पुत्र झाला. खरे तर पृथ्वीराजच्या जन्मानंतर काही वर्षांपासूनच त्याला मारण्याच्या योजना आखल्या जात होत्या. हा वीर राजपूत योद्धा बालपणीच युद्धात तरबेज झाला होता. तलवारबाजीची त्याला विशेष आवड होती आणि त्याची धनुर्विद्या ही एखाद्या वीर योद्धयाला साजेशी होती. पृथ्वीराजने कुमार वयात असताना जंगलातील शिकारीदरम्यान एका वाघाशी झटापट करुन त्याचा जबडा फाडून काढला होता. तलवार, धनुष्य यात रमणाऱ्या या राजपुत्राचा एक मित्र होता चंद बरदाई, जो या युद्धकलांसोबत कवितांमध्ये रमणारा होता. चंद बरदाई हा अनाथ बालक होता जो महाराज सोमेश्वर यांना सापडला होता. चंदबरदाई आणि पृथ्वीराज दोघेही सोबतच वाढले. ते एकमेकांचे मित्र तर होतेच, त्याहीपेक्ष ते एकमेकांना भावाप्रमाणे मानत. याच चंद बरदाईने पुढे पृथ्वीराज चौहानचे चरित्र लिहून ठेवले.

सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

अघळपघळ ....बायडाअक्का



गावाकडची माणसं मोकळी ढाकळी असतात अन त्यांची मने देखील ऐन्यासारखी !
मी घेऊन जातोय तुम्हाला अशाच एका निर्मळ मनाच्या आजीकडे जी फटकळ आहे पण मायाळू आहे..
चला तर मग माझ्या बायडाअक्काला भेटायला ...
गावाकडं कधी कधी अत्यंत इरसाल शब्दांत असे माप काढले जाते की समोरच्या माणसाची बोलती बंद व्हावी..

संजय गांधी - काही आठवणी .....



देशात जेंव्हा आणीबाणीची घोषणा झाली होती तेंव्हा पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार लुईस एम सिमन्स हे 'द वॉशिंग्टन पोस्ट'चे संवाददाता म्हणून दिल्लीत कार्यरत होते. याच वर्तमानपत्रात त्या काळात एक बातमी छापून आली होती की, एका खाजगी पार्टीमध्ये संजय गांधीनी आपल्या मातोश्री, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या श्रीमुखात भडकावली होती. स्क्रोलडॉटइन या वेब पोर्टलवर एका मुलाखतीत काही दिवसांपूर्वी त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना आणीबाणीपूर्वी काही दिवस अगोदरची असून एका निकटवर्तीय खाजगी जीवनातील जवळच्या माणसाच्या घरी एका पार्टीत घडली होती. त्यात नेमका काय वाद झाला माहिती नाही, पण संजय गांधी यांनी संतापाच्या भरात हे कृत्य केले असे ते म्हणतात. याचे दोन प्रत्यक्षदर्शी सूत्र त्यांच्या संपर्कात असल्याने ही माहिती कळाल्याची पुष्टी त्यांनी जोडली होती. कुलदीप नय्यर यांच्या आणीबाणीवरील' द जजमेंट' या पुस्तकातदेखील हा उल्लेख आहे. 'द इमरजेंसी : अ पर्सनल हिस्ट्री' या पुस्तकात वरिष्ठ पत्रकार कुमी कपूर यांनीही या घटनेला पुष्टी देणारे विधान केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेची तेंव्हा वाच्यता देखील झाली होती अन वणव्यासारखी ही बातमी पसरली होती, पण मीडियात असलेल्या अघोषित सेन्सॉरशिप आणि दहशत यामुळे ही बातमी तेंव्हा छापली गेली नाही… आता संजय गांधी हयात नाहीत आणि इंदिराजी देखील हयात नाहीत. या घटनेची सत्यासत्यता तपासणे काळाच्या कसोटीवर व्यक्तीसापेक्ष प्रामाणिकता पाहू घेता कठीण असल्याचे वाटते. सत्य काहीही असो पण संजय गांधींचे जगणे हे वादग्रस्त होते हे मात्र निर्विवाद सत्य आहे…. 

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

काहूर ....



दावणीचं दावं तोडून मोकाट उधळणाऱ्या खोंडासारखी वाऱ्याची गत झालीय. जेंव्हा बघावं तेंव्हा चौदिशेने बेफाम आणि सुसाट वावधान सुटलंय. त्याला ना आचपेच ना कसली समज. चौखूर सुटलेलं खोंड जेंव्हा अनिवार धावत सुटतं तेंव्हा कधी कधी ना कधी ते दमतंच. मग एखाद्या बांधाच्या कडेला असणाऱ्या चिचंच्या पट्टीला नाहीतर वाळून खडंग झालेल्या माळातल्या हिरव्यापिवळ्या लिंबाखाली ते जाऊन बसतं. त्याला कडबा लागत नाही की चारा लागत नाही, नुसती ताजी हवा पिऊन डेरेदार सावलीतला बावनकशी विसावा घेऊन ते पुन्हा ताजेतवानं होतं. कान टवकारून उभं राहतं, अंगावरचं पांढरं रेशमी कातडं थरथरवतं. पुढच्या उजव्या पायाने माती खरडून काढतं आणि पुन्हा उधळत फिरतं.

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

बैल आणि ढोल ...



जगात बैलांच्या इतके दुःख अन वेदना कोणाच्या वाटेला येत नाहीत…. बैल आयुष्यभर ओझी वाहतात अन बदल्यात चाबकाचे वार अंगावर झेलत राहतात. बैल उन्ह वारा पाऊस यांची तमा न बाळगता झिझत राहतात, कष्टत राहतात. कितीही वजनाचे जू मानेवर ठेवले तरी तोंडातून फेसाचा अभिषेक मातीला घालत बैल तसेच चालत राहतात पण थांबत नाहीत. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या तरी बैल हुंदके देत नाहीत. बैल आयुष्यभर कासऱ्याला बांधून असतात, वेसण आवळून नाकातनं रक्त आले तरी मान वर करत नाहीत. बैल ढेकूळल्या रानातनं जिंदगीभराचं मातीचं ऋण उतरवत राहतात, बैल क्वचित सावलीत बसून राहतात, मानेला गळू झाले तरी ओझे ओढत राहतात, बैल अविरत कष्ट करत राहतात. इतके होऊनही कुठल्याच रातीला बैलांच्या गोठ्यातून हुंदक्यांचे उमाळे ऐकायला येत नाहीत.…थकले भागलेले बैल एके दिवशी गुडघ्यात मोडतात, तर कधी बसकण मारतात तर कधी गलितगात्र होऊन कोसळून जातात अन लवकरच त्यांचे अखेरचे दिवस येतात.... पाझर सुटलेले मोठाले डोळे पांढरे होऊन जातात, पाय खरडले जातात, नाकातोंडातून फेसाचे ओघ येतात, कान लोंबते होतात, श्वासाची प्रचंड तडफड होते, मोकळी झालेली वशिंड पार कलंडून जाते, शेपटीला अखेरचे हिसके येतात अन अंगावरचे रेशमी पांढरे कातडे हलकेच थरथरते….

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

आम्ही ....



गावाच्या वेशीपासून कोसो दूर असणाऱ्या शेताजवळील वस्तीत राहणाऱ्या हरिबाला एकशे चाळीस रुपयाची जाडजूड ढवळपुरी चप्पल घ्यायचीय. एक महिन्यापासून तो तळपायाला चुका ठोकलेल्या, चार ठिकाणी शिवलेल्या चपला घालतोय. अजून पैसे बाजूला काढणे त्याला शक्य झालेले नाही.

बुधवार, २ डिसेंबर, २०१५

अनुवादित कविता - अहमद मोईनुद्दिन : मल्याळी कविता

अम्मा फक्त भल्या सकाळीच ओसरीत जाते
सूर्यकिरणे येण्याआधी ती घराबाहेर येते
लख्ख झाडून अंगण स्वच्छ करते.

अनोळखी कोणी भेटायला अब्बूकडे आला की
स्वतःला लपवत दाराआडून बोलते.

आता तीच अम्मा पडून आहे
त्याच ओसरीवरची जणू शिळा !

अनोळखी माणसांच्या त्याच
गर्दीने वेढले आहे तिला.

आता मात्र तिला अगदी मोकळं वाटत असेल.
अब्बूनंतरची आठ वर्षे एकाकी जगल्यानंतर
आता ती अब्बूच्या शेजारी असेल.

माझे ओलेते डोळे
शोधताहेत
थोडीशी जागा माझ्यासाठी
गर्दीत मेंदीच्या पानांत तिथेच
स्वतःला गुरफटून घेण्यासाठी !

माझे हृदय अजूनही आक्रंदतेय
थोडीशी घट्ट मिठी मारून
अम्माशेजारी झोपण्यासाठी ....

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

विंदानुभूती - आनंददायी जीवनाची समृद्ध अनुभूती !


आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. मग जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला उभारी मिळणे खूप गरजेचे असते. अन्यथा दैनंदिन जीवनशैलीतली व्यावहारिक रुक्षता मनात खोल रुजते. परिणामी माणूसपणच हरवून जाते. अशा स्थितीत जीवनाला वळण देणारी एखादी भव्य कविता समोर आली तर जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलून जातात. विंदा करंदीकरांची अशीच एक कविता आहे जी जगणे सुसह्य करते अन जीवनातले विविधार्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. कवितेचे नावच आहे 'घेता'. यावरून यातील आशयाची कल्पना यावी. ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात संदेह नाही...

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

गदिमा पर्व...



काही शाळांमध्ये मराठी हा विषय 'ऑप्शनल सब्जेक्ट' झाला आहे. त्यामुळे तिथली मुले मराठी वाचन लेखनाच्या मुलभूत मराठी शालेय संस्काराला मुकतात हे कटूसत्य आहे. इतर शाळातील विद्यार्थ्यांचा मराठीकडे 'वैकल्पिक' म्हणून बघण्याचा दृष्टीकोन चिंताजनक आहे. त्यात भरीस भर म्हणून मराठी हा ‘स्कोअरिंग’चा विषय नसल्याची गुणात्मक आवई ‘पैकीच्या पैकी' छाप शिक्षण पद्धतीत उठवली गेल्यामुळे मराठी भाषा आणि मराठी विषयाच्या नुकसानाचे खरे मूल्यमापन काही वर्षांनी अचूक होईल. बालभारतीच्या प्राथमिक व माध्यमिक इयत्तामधील क्रमिक पुस्तकातून मराठी साहित्याचे वाचन-लेखनाचे जे संस्कार मुलांच्या मनावर होत होते त्याला आता तडा जाऊ लागला आहे. ज्या प्रमाणे भक्तीसाहित्य म्हटले की ज्ञानोबांच्या ओव्या आणि तुकारामांचे अभंग आपसूक डोळ्यापुढे उभे राहतात तद्वत कविता म्हटले की केशवसुत, गदिमा, मर्ढेकर, बालकवी डोळ्यापुढे येतात. नुसते हे कवी चक्षुसापेक्ष येतात असं नव्हे तर त्यांच्या कविता वयाच्या सत्तरीत देखील तोंडपाठ असणारी माणसं आजही भवताली सापडतात. या कवितांचं बालमनावर इतकं गारुड आहे. 'आनंदी आनंद गडे' पासून ते 'पिपात पडले मेल्या उंदीर..' पर्यंत ही काव्यमाला विविध विषयात आणि आशयात बहरत जाते, इथूनच कवितेचं वेड डोक्यात शिरते. या काव्य संस्कारातून पुढे गेलेली मुले कोणत्याही शाखेतून पदवीधर होऊन कोणत्याही प्रांतात कोणत्याही क्षेत्रात चरितार्थासाठी रुजू झाली तरी डोक्यात ठाण मांडून बसलेल्या या कविता काही केल्या हटत नाहीत. शाळेतील मराठीचे शिक्षक, मराठीचे तास आणि चाल लावून म्हटलेल्या कविता मनाच्या एका कप्प्यात प्रत्येक विद्यार्थी खास आठवणी म्हणून जतन करतो कारण या कविता त्याला आपल्याशा वाटतात. या कवितांमध्ये प्रत्येकजण आपले बालपण कायम धुंडाळत असतो. इतकी परिणामकारकता या कवितांमध्ये आहे.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

आधुनिक कवी – बा. सी. मर्ढेकर



आजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात यंत्रवत आयुष्यात परावर्तीत झालेलं जिणं तकलादू आहे, त्यात जीवनातील रसरशीतपणा हरवला आहे. जीवनातील खरी आसक्ती सरून गेली आहे आणि उरली आहे ती निरस जीवन जगण्याची सक्ती. अगदी मर्मभेदक आणि परिणामकारक अशी शब्दरचना हे मर्ढेकरी काव्यवैशिष्ट्य इथेही आहे. कवितेत न वापरले जाणारे, रुढार्थाने दुर्बोध समजले गेलेले गद्याच्या अंगाने जाणारे शब्द लीलया कवितेत वापरण्यात मर्ढेकरांचा हातखंडा होता. सात दशकांपूर्वी लिहिलेल्या या कवितेत वर्णिलेली जीवनातील शुष्कता आजच्या काळात तर मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.

'पिपांत मेले ओल्या उंदिर; माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले; माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले, पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं गात्रलिंग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे...'
ही कविता जरी वाचली तरी मनःचक्षुपुढे बा.सी.मर्ढेकरांचे नाव येतेच ! या कवितेच्या योगाने मर्ढेकरांविषयी रसिक वाचकांच्या मनात एका विशिष्ट प्रतिमेचे घट्ट नाते तयार झाले आहे.

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

दिवाळीतले 'अर्धे आकाश' ....



दिवाळीच्या रात्री साखरझोपेत आपण जेंव्हा मऊ दुलईत झोपलेलो असतो तेंव्हा रानोमाळ कष्ट करत फिरणारया ऊसतोड कामगारांचे जत्थे थंडीत कुडकुडत असतात. अंगावर शहारे आणणारया अशा लोकांच्या दुर्दैवी अपूर्वाईची ही गाथा.. जिथे या बायकांपैकी दहा मागे सात स्त्रियांचे गर्भाशय काढलेले असते, तीसपेक्षाही कमी वयाच्या तरुण स्त्रियांचे देखील गर्भाशय काढले जातात. कशासाठी, तर मासिक पाळीच येऊ नये, तिला विटाळ येऊ नये म्हणून ! ही काळजी तिच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी नव्हे तर कामाचा खाडा होऊ नये म्हणून ! ऊसतोड कामगारांच्या टोकदार दुःखांच्या जाणिवांची अनुभूती देणारा हा लेख अवश्य वाचा.......

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

उन्हातले चांदणे - दत्ता हलसगीकर


दिलेल्या शब्दांसाठी एके काळी लोक स्वतःचे आयुष्य उध्वस्त करून घेत असत, वाट्टेल ती किंमत मोजून शब्द पूर्ण करीत. कारण दिलेल्या शब्दाला तितकी किंमत असायची. 'चले जाव' हे दोनच शब्द होते पण ब्रिटीश महासत्तेला त्यांनी घाम फोडला होता, 'स्वराज्य' या एका शब्दाने अनेकांच्या हृदयात चैतन्याचे अग्निकुंड प्रदिप्त झाले होते. इतकेच नव्हे तर शब्दांची महती सांगताना तुकोबा म्हणतात "आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे । यत्नें करू ।" शब्द हे जीवनाच्या प्रारंभापासून आपली साथसोबत करतात ते थेट श्वासाची माळ तुटल्यावरच थबकतात. शब्द कधी चांदण्यासारखे शीतल असतात, तर कधी पाण्यासारखे निर्मळ असतात, तर कधी कस्तुरीसारखे गंधित असतात तर पाकळ्यांसारखे नाजूक असतात, निखाऱ्यांसारखे तप्त असतात तर कधी ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखे दग्ध असतात, तर कधी आईच्या मायेसारखे सोज्वळ असतात तर कधी गायीच्या डोळ्यासारखे दयाशील असतात तर कधी देव्हाऱ्यातील निरंजनाच्या ज्योतीसारखे मंगलमय असतात. शब्द आहेत म्हणून जीवन आहे आणि शब्द आहेत म्हणून जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे. ह्या सर्व शब्दकळांचे प्रकटन म्हणजे मानवी जीवनाचा जणू आत्मा बनून गेला असावा इतके महत्व या शब्दांना आहे.

"कळ्यांची फुले व्हावीत तसे शब्द उमलतात
खडकातून झरे फुटावेत तसे भाव झुळझुळतात
हाक यावी अज्ञातातून शब्द साद घालतात मला
माझ्या ओळीओळीतून नाजूक मोगरे फुलतात ...
..शब्द मनाचे आरसे ....शब्द ईश्वराचे दूत
माझ्या कवितांमधून मीच होतो आहे प्रसूत !"
शब्द आणि जीवन व शब्द आणि आत्मा यांचे परस्परसंबंध उधृत करणारी ही कविता आहे कवी दत्ता हलसगीकरांची ! ज्यातल्या शब्दकळां आपल्या मनाला स्पर्शून जातात व त्याचबरोबर कवीच्या काव्यप्रेरणांना उत्तुंग स्वरूप देऊन जातात.

इंदिराजी ....काही आठवणी ...



आजपासून बरोबर ३३ वर्षापूर्वीची ही घटना आहे. ३० ऑक्टोबर १९८४, भुवनेश्वर, ओरिसा. दुपारी ३ वाजताची रणरणती दुपार. निवडणुकीची प्रचारसभा सुरु होती. समोर गर्दीचा सागर उसळलेला होता आणि व्यासपीठावरून त्या नेहमीच्या तडफदार शैलीत बोलत होत्या. त्यांच्या भाषण माध्‍यम सल्लागार एच.वाय.शारदा प्रसाद यांनी तयार केलेल्या नोट्सचा कागद बोलता बोलता त्यांनी बाजूला सारला आणि त्याऐवजी दुसरेच काहीतरी त्या बोलून गेल्या. "मैं आज यहां हूं। कल शायद यहां न रहूं। मुझे चिंता नहीं मैं रहूं या न रहूं। मेरा लंबा जीवन रहा है और मुझे इस बात का गर्व है कि मैंने अपना पूरा जीवन अपने लोगों की सेवा में बिताया है। मैं अपनी आखिरी सांस तक ऐसा करती रहूंगी और जब मैं मरूंगी तो मेरे ख़ून का एक-एक क़तरा भारत को मजबूत करने में लगेगा।" त्यांच्या या भाषणाने सगळेच जण अवाक झाले अन दुसऱ्याच दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची निर्घृण हत्या केली...

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

अनुवादित कविता - कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा : कन्नड कविता

हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा,
सर्व आकारांच्या पार जा.

सर्व अस्तित्वांच्या पार जा.
आर्त भावनांनी हृदयाच्या चिरफाळ्या केल्या तरी,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
शेकडो जातींची भुसकटं हवेत उडवून दे
तत्वज्ञानांच्या मर्यादा लांघून पार जा
अन दिगंतापार जाऊन उगव,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
तू कुठेही थांबू नकोस
चिंचोळ्या भिंतीत गुंतू नकोस
अंतास जाईपर्यंत कुणाचेही साधन होऊ नकोस
तू अमर रहा,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
जो अक्षय असतो तो सदैव अनंत असतो,
एका विमुक्त तपस्वीगत.
तू अमर आहेस, अनंत आहेस.
अन अमर अनंत राहण्यासाठी,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !

उच्चवर्णाच्या झुली पांघरणारया मठ्ठ कर्मठांसाठीचे अंजन...



१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस दसऱ्याचा होता. तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जातो.१९५६मध्‍ये दस-याच्या दुस-या दिवशी बाबासाहेबांनी लाखो बौध्द उपासकांसमोर अत्यंत उद्बोधक भाषण केले होते. त्या ऐतिहासिक भाषणात.समाजाच्या साक्षरतेचे महत्व, महिला सन्मान, मासाहार विरोधातील चळवळ, माध्यमांनी केलेली टीका, नागपूरमध्‍येच सभा घेण्याचे कारण असे विविध विषय त्यांनी मांडले होते. यावेळी झालेल्या भाषणात बाबासाहेबांनी एक प्रसंग सांगितला, 'एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणुन सांगता. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगाचे, मांसाचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय?"

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

मामाचा सांगावा ...



माझ्या लाडक्या सोनुल्यांनो तुम्हाला मामाचा आशीर्वाद. तुमच्या परीक्षा संपल्या असतील. आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुटीचे वेध लागले असतील.
मी लहान असताना परीक्षा झाल्या की माझ्या मामाच्या गावाला जायचो. झाडांच्या गर्दीत वसलेल्या रम्य नगरीत, चिरेबंदी वाड्यात जाऊन राहायचो. तुम्हीही काही वर्षे माझ्याकडे आलात. याही वर्षी तुम्हाला आपल्या लाडक्या मामाच्या गावाला जावेसे वाटत असेल होय की नाही ? पण जरा अडचण आलीय बाळांनो.
काळजावर दगड ठेवून एक गोष्ट सांगतो. तुम्ही यंदा माझ्याकडे येऊ नका असं माझं सांगणं आहे.
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही आपल्या लाडक्या मामाच्या घरी यायचं नाही बरं का छकुल्यांनो...

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

यादवाडच्या शिल्पाआड दडलेला शिवबांचा जाज्वल्य इतिहास....



शिवबांनी त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे डोळे काढण्याची सजा फर्मावली होती हे फार कमी लोकास ज्ञात असेल. अश्वारूढ शस्त्रसज्ज छत्रपती शिवरायांचे शिल्प वा जिजाऊ मांसाहेबासोबतचे शिल्प / चित्र आपण अनेक ठिकाणी पाहतो. मात्र शिवबा मांडी घालून बसलेले आहेत, त्यांच्या मांडीवर एक लहान मुल आहे, त्याच्याकडे ते प्रेमाने पाहत आहेत असंही एक शिल्प आहे. विशेष म्हणजे हे शिल्प शिवाजीराजे हयात असताना कोरलेलं आहे ! शिवबांनी मेहुण्यास दिलेली सजा आणि हे अनोखं शिल्प यांचा परस्पराशी संबंध आहे. या दोन्ही घटनामागे एक जाज्वल्य इतिहास आहे. शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकातून जाणीवपूर्वक गाळीव व ठोकळेबाज ठाशीव इतिहासाची पाने रचत गेल्यामुळे या गोष्टी ठळकपणे समोर आल्या नाहीत.

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

जीवनगाण्यांच्या कवयित्री - शांता शेळके.


'काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे..'
कवयित्री शांता शेळके यांची ही कविता म्हणजे जगण्याचा अर्थ सांगणारी एक कैफियतच आहे. मनातले भाव आणि मनोमीत व्यक्त करण्याची संधी जगात खूप कमी लोकांना मिळते. आपण म्हणू तसे फासे जीवनाच्या सारीपाटावर कधीच पडत नसतात हे जवळपास साऱ्यांना आयुष्याच्या एका वळणावर कळून चुकते. आपल्या मनातलं ओठावर येत नाही. जे घडत राहतं ते आपल्याला उमगत नाही. जरी उमगलं तरी ते आपल्याला पटत नाही. अशीच प्रत्येकाची जीवनाविषयी तक्रार असते. पण साऱ्यांच्या बाबतीत असं घडत नाही. शांताबाई लिहितात की, 'कुणाच्याही पायी काटा रुतला तर त्यामुळे साहजिकच त्याचे आक्रंदन असणार आहे, मात्र माझ्या वाट्यास काटे न येता फुले आली. असे असूनही इतरांना जसे काटे रुततात तशी मला फुले रुतली !' हा एक अजब दैवयोग आहे अशी पुस्तीही त्या जोडतात.

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

दिडशतकापासूनचे निर्दोष गुन्हेगार (?)



दिडशतकापासूनचे निर्दोष गुन्हेगार ( ! ) आणि आरक्षण...एक मागोवा ...

१२ ऑक्टोबर १८७१ चा तो दुर्दैवी दिवस होता... भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे देशभरातील १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. त्यांच्यावर गुन्हेगारीचे शिक्के मारून त्यांचे आयुष्य नासवले आणि जनमाणसात त्यांची प्रतिमा कायमची मलीन केली...या सर्व १६१ जातीजमातींच्या लोकांचा अनन्वित छळ केला गेला. यात स्त्रिया, बालके आणि वृद्धदेखील अपवाद नव्हते...

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तैमुरलंग ..



तैमूरलंग अत्यंत क्रूर, कपटी व दुष्ट होता आणि केवळ अमुक एका धर्माचा द्वेष्टा होता हे सांगण्याची चढाओढ काही लोकात लागली आहे. तैमूर फक्त तेव्हढाच सीमित होता की अजून कसा होता याविषयी थोडे लिहिले जाणे क्रमप्राप्त आहे. साम्राज्याच्या रक्तपिपासू विस्ताराची भूक असणाऱ्या सम्राटास आवश्यक असणारे सर्व गुण तैमूरच्या अंगी होते. त्याच्या विषयी अधिक बारकाईने पाहण्याआधी त्याचा एक प्रसिद्ध किस्सा जाणून घेतला तर त्याचे कंगोरे कळण्यास मदत होईल.

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

संभाजीराजे - वादग्रस्त मुद्द्यांची एक चिकित्सा ....



आपल्याकडे स्वतःच्या राजकीय, जातीय फायद्याच्या गणितानुसार इतिहासाच्या चिंधडया उडवण्याचे काम सर्रास केले जाते. छत्रपती संभाजीराजांच्याबद्दल तर तीन शतकापासून हा उद्योग सुरु आहे. त्याचीच एक चिकित्सा...

ऑक्टोबर १६७६ पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आले नव्हते. असं ऐतिहासिक साधनं दर्शवतात तरीही मल्हार रामरावाची बखर, इंग्रजी वार्ताहराच्या नोंदी आणि आदिलशाही इतिहासातील बुसातिन-उस-सुलातिन या तीन ऐतिहासिक साधनानुसार संभाजीराजांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगितलं जातं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो !

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

रेड लाईट डायरीज - कोरं पत्र..



तू कुठे आहेस मला नेमकं ठाऊक नाही,
तुझ्याकडे पोस्टमन येतो का याचीही माहिती नाही.
पत्र आलंच तुझ्या नावाचे तरी ते तुला पोहोच होते का तेही ज्ञात नाही.
मागच्या दोन दशकात खरंच तुला कुणाचं पत्र आलं का हे तरी कसं विचारू ?
तुझं नाव तेच आहे की, शहर बदलल्यावर नावही बदलते ?
तू आता कोणती भाषा बोलतेस, पैशाची तर नक्कीच नाही !
तुला पत्र पाठवलं तर ते तुझ्याच जीवावर तर बेतणार नाही ना ?
तसं मी तुला खूप खूप शोधलंय पण तू पुन्हा एकदाही दिसली नाहीस...

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

क्रांतिकारी भीमगीतांचे रचेते – वामनदादा कर्डक


आंबेडकरी चळवळीतला माणूस वा सर्वसामान्य माणूस असो ज्याचे बाबासाहेबांवर अपार प्रेम, निस्सीम श्रद्धा आहे अशा मराठी माणसाला महाकवी वामनदादा कर्डक यांचे नाव माहिती नाही असे होत नाही. याचे कारण वामनदादांनी लिहिलेली अवीट गोडीची आवेशकारक भीमगीते आणि आंबेडकरी चळवळीची गीते ! वामनदादा कर्डर्कांची भीमगीते आंबेडकर जयंतीचा अविभाज्य घटक झालीत. ही गीते सामान्य माणसाच्या मनाला भावलीत. नुकतेच मिसरूड फुटलेल्या मुलांपासून ते संघर्षमय जीवनाचा अखेरचा काळ व्यतित करणारे वृद्ध असोत, सर्वांना ही गाणी तोंडपाठ आहेत. वामनदादांनी लिहिलेल्या गाण्यात असे कोणते रसायन आहे की ज्याने माणसाचे रुपांतर भीमसैनिकात होते हे पाहण्यासाठी त्यांच्या गीतांवरून नुसती नजर फिरवली तरी ध्यानी येते की ही लोकांची बोली आहे, हा लोकांचा आवाज आहे, हा लोकांच्या डोळ्यातला तप्त अंगार आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे, हा जल्लोषही आहे अन वेदनेचा हुंकारही आहे, हा मनामनात दफन केलेल्या उपेक्षेचा आक्रोश आहे, हा धगधगत्या अग्नीकुंडाचा निखारा आहे आणि हा आंबेडकरी जनतेचा बुलंद नारा आहे !

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

हिंदुस्थानच्या अखेरच्या बादशहाची दर्दभरी दास्तान .....



बाबरच्या रूपाने मुघल ज्या क्षणी हिंदुस्थानात दाखल झाले त्या क्षणापासून त्यांनी ह्या भूमीकडे केवळ लुटमार, साम्राज्यविस्तार व अय्याशीच्या हेतूने पाहिले. त्यांच्यातल्या एकाही बादशहाने ह्या भूमीला आपले सरजमीन-ए-वतन मानले नाही की ह्या मातीचे त्यांना ऋण वाटले नाही. पण ह्या सर्व मुघल बादशहांना अपवाद राहिला तो हिंदुस्थानचा अखेरचा बादशहा, बहादूरशहा जफर. आधीच्या सम्राटांनी हिंदुस्थानची लयलूट केली तर याचे प्राणपाखरू ह्या भूमीसाठी रुंजी घालत निशब्दतेने भयाण अवस्थेत मरून पडले. ज्या मुघलांनी हिंदुस्थानला कधी आपला वतनमुलुख मानला नाही त्यांचा अखेरचा शिलेदार मात्र ह्या भूमीत दफन केले जावे म्हणून तडफडत राहिला ! किती हा दैवदुर्विलास !

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

छायाचित्रकाराची अनोखी दास्तान ....केविन कार्टर !



संवेदनशील व्यक्तीने काळजाला हात घालणारी एखादी कलाकृती बनवली आणि त्यातून त्याच्या मनात अपराधीत्व दाटून आले तर त्याच्या मनातील भावनांचा कडेलोट होतो. अशाच एका सहृदयी व्यक्तीबद्दल, केविन कार्टरबद्दल जेंव्हा कधी विचार करतो तेंव्हा डोळ्यात नकळत पाणी येतेच....

छायाचित्रकाराच्या मनात भावनांचे कल्लोळ दाटतील अशा काही क्षणांचे त्याला साक्षीदार व्हावे लागते अन त्यातून जन्माला येते एक अप्रतिम छायाचित्र. त्यात कधी दुःख असते तर कधीवेदना, राग, आक्रोश, शृंगार, प्रेम, आनंद, द्वेष, मोह अशा अगणित भावनांचे हुंकार त्यात व्यक्त होतात. छायाचित्रकारासाठी त्याच्या आयुष्यातले सर्वोच्च ध्येय पुलीत्झर पुरस्कार ठरावा. या पुरस्काराच्या वेडाने झपाटलेले छायाचित्रकार जगाच्या पाठीवर कुठेही अन कसल्याही परिस्थितीमध्ये जातात.ताजी उदाहरणे म्हणजे सिरीयाचे गृहयुद्ध असो वा इबोलाचा आउटब्रेक असो आपल्याला खरी आणि नेमकी परिस्थिती तंतोतंत माहिती छायाचित्रकारच पोहोचवतात.त्यासाठी प्रसंगी ते जीवसुद्धा धोक्यात घालतात.....

सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

वेध 'शिशिरागमना'चा ......


जगाला भले बहारदार 'वसंत' अतिप्रिय वाटत असेल पण मला 'शिशिर' भावतो...
शिशिरागमन होताच झाडांची पाने एकेक करून गळून जातात, जणू सर्व विकार वासना गळून पडाव्यात तशी सगळी पाने गळून पडतात...
झाड निष्पर्ण होऊन जाते आणि उरते त्याचे अस्सल देहमूळ !
आपल्या विचारांच्या पुनर्विलोकनात दंग असणारे खोड राहते.
थंड वाऱ्यास आपला पूर्वेतिहास विचारणाऱ्या, टोकाकडे निमुळत्या होत गेलेल्या फांदया विचार करायला भाग पाडतात.
'वर्षा' झाडांच्या तृषार्तमुळांना तृप्त करून गेलेली असते,
पानझडीमुळे शिशिरात झाडांना पाणी कमी लागते त्यामुळे शिशिरात झाडे जणू उपवासाची तपश्चर्या करतात.
शिशिरातल्या झाडांना रंग, गंध, आकार आणि स्पर्श यातील कशाचेही अप्रूप नसते. जणू ध्यानस्थ ऋषी मुनीच !

गुरुवार, ३० जुलै, २०१५

परीकथेतील राजकुमारा …


'परीकथेतील राजकुमारा… 'हे एकेकाळी रेडीओवर अफाट गाजलेले गीत. या गीताची सुरुवातच जादुई शब्दांनी होती. ज्या पिढीने परीकथा वाचल्या होत्या अन त्यातील राजकुमार - राजकुमारीचे स्वप्न पाहिले होते त्यांना यातील आर्त प्रतीक्षा भावली होती. ज्या पिढीला ह्या परीकथा अन त्यातील राजकुमाराचे आकर्षण उरले नाही, त्याची ओढ राहिली नाही त्या पिढीला यातील सहवेदना कदाचित जाणवणारच नाहीत. कारण आजची पिढी एका आभासी जगात जगते. खेळाच्या मैदानावर लहान मुलांचे दिसणे दुरापास्त होऊ लागलेय. मोबाईल - कॉम्प्यूटरवरील व्हिडीओ गेमपासून ते दुरचित्रवाहिन्यातील ‘डोरेमॉनच्या जंगलात’ ही मुले हरवून गेलीत. तरुणांची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट आहे, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या कृत्रिम मायाजालात ही पिढी अशी काही हरवून गेलीय की त्यांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा, ध्येय धोरणांचाही विसर होतोय. लहानग्या वयापासून पीसी गेमच्या जाळ्यात गुरफटलेली अन व्हॉटसेप ते फेसबुकच्या फेऱ्यात अडकलेली ही मुले. त्यांना परीकथेचे स्वाभाविक वावडे असणार. पूजेचे ताट उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे फिरवायचे हे ज्यांना ठाऊक नाही, दंडवत अन नमस्कार यात काय फरक आहे किंवा आपले लोकसाहित्य कधी ढुंकूनही ज्यांनी पाहिले नाही अशीही मुले यात आहेत. फास्ट फुड ते हायटेक शिक्षण व्हाया ब्रेकअप इन माईंड एण्ड कल्चर हे ठायी असणाऱ्या पिढीस भावगीतांचा एक हृदयस्पर्शी जमाना होता यावर कसा विश्वास ठेवावासा वाटेल ?

परीकथेतिल राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का ?

शनिवार, २५ जुलै, २०१५

हरवलेली गाणी....



फेसबुकवरच्या मायभगिनींनो, मैत्रिणींनो तुम्ही हातात बांगड्या घालता का ? स्वतःच्या हाताने घालता की कासाराकडे जाऊन घालता ? कासाराकडे जाताना एकटयाने जाता की मैत्रिणीसवे, नात्यागोत्यातल्या महिलांसवे ग्रुपने जाता ? तिथे गेल्यावर त्याने एका पाठोपाठ एक रंगीबेरंगी फिरोजाबादी बांगडया मनगटातून पुढे नजाकतीने सरकावताना हाताला रग लागलीय का ? बोटं रटरटलीत ? ढोपर अवघडले ? त्या त्रासाकडे लक्ष जाऊ नये म्हणून माझ्या गावाकडच्या मायभगिनी काही दोन ओळींची गाणी गुणगुणत तुम्ही तसं कधी गायलात का ? एकीचे झाले की दुसरी गाई, मग तिसरी असं करत पुन्हा पहिली गात असे. लग्नघरी कासार आल्यावर मग तर एकीच्या ओळींना जोडून दुसरी उस्फुर्त काव्य रचत असे. भलीमोठी कविता तिथे जन्म घेई. यातल्याच काही जणी मग जात्यावरच्या ओव्याही रचत आणि मग काय आपला क्रम कधी येतो याची प्रत्येकजण हरीणीगत वाट बघे. ह्या साऱ्या जणी म्हणजे गावोगावच्या बहिणाबाईच की ! की तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही ? चला तर मग मी काही अशी ओव्यांची / द्विरूक्तीची ओळख करून देतो. तुम्हाला आवडतात का बघा. एखादी छानशी कॉमेंट करा. तुम्हालाही एखादी ओळ सुचली तर लिहा, तुमच्या घरी आता कोणी बांगडया भरतात की नाही हे मला माहिती नाही, पण घरी पोरीबाळी असतील तर त्यांना ह्या पोस्टबद्दल, गावाकडच्या ह्या गोड रिवाजाबद्दल सांगा. त्यांना नक्कीच बरं वाटेल. जमलंच तर चाल लावून सांगा, खूप गोड आहेत हो ही बांगडयांची गाणी. एकदा गाऊन तरी बघा....