गुरुवार, ३० जुलै, २०१५

परीकथेतील राजकुमारा …


'परीकथेतील राजकुमारा… 'हे एकेकाळी रेडीओवर अफाट गाजलेले गीत. या गीताची सुरुवातच जादुई शब्दांनी होती. ज्या पिढीने परीकथा वाचल्या होत्या अन त्यातील राजकुमार - राजकुमारीचे स्वप्न पाहिले होते त्यांना यातील आर्त प्रतीक्षा भावली होती. ज्या पिढीला ह्या परीकथा अन त्यातील राजकुमाराचे आकर्षण उरले नाही, त्याची ओढ राहिली नाही त्या पिढीला यातील सहवेदना कदाचित जाणवणारच नाहीत. कारण आजची पिढी एका आभासी जगात जगते. खेळाच्या मैदानावर लहान मुलांचे दिसणे दुरापास्त होऊ लागलेय. मोबाईल - कॉम्प्यूटरवरील व्हिडीओ गेमपासून ते दुरचित्रवाहिन्यातील ‘डोरेमॉनच्या जंगलात’ ही मुले हरवून गेलीत. तरुणांची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट आहे, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या कृत्रिम मायाजालात ही पिढी अशी काही हरवून गेलीय की त्यांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा, ध्येय धोरणांचाही विसर होतोय. लहानग्या वयापासून पीसी गेमच्या जाळ्यात गुरफटलेली अन व्हॉटसेप ते फेसबुकच्या फेऱ्यात अडकलेली ही मुले. त्यांना परीकथेचे स्वाभाविक वावडे असणार. पूजेचे ताट उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे फिरवायचे हे ज्यांना ठाऊक नाही, दंडवत अन नमस्कार यात काय फरक आहे किंवा आपले लोकसाहित्य कधी ढुंकूनही ज्यांनी पाहिले नाही अशीही मुले यात आहेत. फास्ट फुड ते हायटेक शिक्षण व्हाया ब्रेकअप इन माईंड एण्ड कल्चर हे ठायी असणाऱ्या पिढीस भावगीतांचा एक हृदयस्पर्शी जमाना होता यावर कसा विश्वास ठेवावासा वाटेल ?

परीकथेतिल राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का ?

भाव दाटले मनी अनामिक,
साद तयांना देशिल का ?

या डोळ्यांचे गूढ इशारे
शब्दांवाचुन जाणुन सारे
'राणी अपुली' मला म्हणोनी,
तुझियासंगे नेशिल का ?

मूर्त मनोरम मनी रेखिली
दिवसा रात्रीं नित्य देखिली
त्या रूपाची साक्ष जिवाला,
प्रत्यक्षांतुन देशिल का ?

लाजुन डोळे लवविन खाली
नवख्या गालीं येइल लाली
फुलापरी ही तनू कांपरी,
हृदयापाशीं घेशील का ?

लाजबावरी मिटुन पापणी
साठवीन ते चित्र लोचनी
नवरंगी त्या चित्रामधले,
स्वप्न च माझे होशील का ?

परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल का ? असे हळुवार मागणे आताची पिढी कधी मागू शकेल का ? बहुधा शक्य नाही… ‘गाण्याचा स्पीड स्लो आहे अन ओल्ड फिलिंग आहे…डेफिनीटली प्रपोज फेल जाईल… बेटर वे ट्राय ईट बाय हनी सिंग मेथड…हा जमाना गेला....’ काही जण असंही ऐकवतील ! मग हे अजरामर गाणे लिहिणाऱ्या कवयित्री वंदना विटणकर तसेच या गीताच्या गायिका कृष्णा कल्ले राहिल्या काय वा कसे याच्याशी यांना कसे सोयर सुतक असणार ? मुळातच जिथे सोयरेच शिल्लक ठेवायचे नाहीत ( कुटुंब कसे शॉर्ट असले पाहिजे नाही का ?)हा आजचा मुलमंत्र आहे मग कोणाच्या अस्तित्वाविषयी काय माहिती असणार ? असेही लेखक, कवी, गायक इत्यादींना कोण खातोय ? हे राहिले काय अन नाही काय ? काय घेणे देणे आहे ? आपल्या जन्मदात्यांशी घेणे देणे बाकी ठेवायचे नाही अशी विचारसरणी जिथे जोमात वाढते आहे तिथे ‘परीकथेतल्या राजकुमारा’ हे काव्य न वाटता भाकडकथा वाटेल.

पण अजूनही सारेच दिवे मंदावले नाहीत, कुठे कुठे आशेचे नंदादीप तेवत आहेत अन ते भविष्यातले दीपस्तंभ वाटतात. काही तरुण मुला मुलींच्या सोशल मिडीया स्टेटसवर मागे कवयित्री वंदना विटणकर आणि जेष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांना समयोचित श्रद्धांजली वाहिलेली पाहून अशा नंदादीपांच्या ज्योतीभोवती आपले हात ठेऊन त्यांना तेवत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे आहे असे राहून राहून वाटते. नवी पिढी चांगले वाचत नाही, तिला वाचनाचा नाद नाही असा शंखनाद अलीकडे सातत्याने ऐकायला मिळतो. अशा वेळेस याची दुसरी बाजू तपासली जात नाही. आता पूर्वीइतके कसदार लेखन नव्याने केले जातंय का ? किंवा आताच्या लेखकांत ती ‘बात’ आहे का ? याचे उत्तर बहुतांशी नकारार्थीच मिळते. मग जे साहित्य विस्मृतीच्या कोशात लुप्त होत चालले आहे याचे तरी पुनःप्रकटीकरण वा पुनर्मांडणी होणे गरजेचे आहे, मात्र दुर्दैवाने तसे प्रयत्नही होताना दिसत नाहीत.

'निंबोणीच्या झाडामागे चंद्र ...' ही अंगाई आजची आई गात नाही अशी ओरड आपण करायची अन आपणच सारी झाडे कापत सुटायचे याला काय अर्थ आहे. त्यासाठी आधी आपण पावले उचलली पाहिजेत. हीच बाब साहित्यक्षेत्रात देखील लागू होते. एके काळी गाजलेल्या या कविता तत्कालीन सामाजिक जाणिवांचा संदर्भ नकळत देतात त्यामुळे त्यातून त्यांचे महत्व ठळकपणे अधोरेखित होते.

‘परीकथेतील राजकुमारा...’ या कवितेत एक आर्त कैफियत आहे, जी आपल्या स्वप्नवत प्रेमाला हळुवार साद घालते अन आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या भावनांना वाट करून देते. आपण ज्याच्यावर मनोमन प्रेम केले त्याने आपल्या प्रेमाशी प्रतारणा तर केली नसेल ना या भावनेची अप्रत्यक्ष भीती या कवितेत व्यक्त होत राहते. आणि या बेचैनीतून मनात प्रश्न उपस्थित होत राहतात, त्याचे हे प्रकटीकरण होय. 'परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?' अशी सुरुवात करून कवयित्री पुढे विचारतात की, 'तुझी प्रतीक्षा करून मनी अनामिक भाव दाटून येताहेत त्यांना साद देशील का ?'. ज्यांना परीकथेतील राजकुमार ही संकल्पना उमजली असेल त्यांनाच यातील आर्तता समजू शकते अन्यथा ही एक साधी प्रश्नावली वाटल्यास त्यात नवल ते काय ?

प्रेमाची भाषा डोळ्यातून व्यक्त होते तिला शब्दांच्या कुबड्या लागत नाहीत. म्हणून तर प्रेमवीरांच्या शब्दकोशात 'डोळे हे जुल्मी गडे' या म्हणीला अनन्यसाधारण महत्व आहे. याला अनुसरून वंदनाजी पुढे लिहितात की, 'या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दावाचून जाणून सारे, राणी आपुली म्हणून तुझ्यासंगे नेशील का ?' थेट निरवानिरवीची भाषा इथे त्यांनी केलीय ! ताकाला जाऊन भांडे लपवण्यात काय अर्थ ? त्यामुळे आडवाटेने प्रश्न विचारून गोंधळून टाकण्यापेक्षा इथे थेट 'आपली राणी' म्हणून त्या राजकुमाराने घेऊन जावं असं आर्जव केलं आहे. आपल्या मनात आपल्या प्रियतमाची एक प्रतिमा असते, त्या प्रतिमेची- मूर्तीची अनुभूती देण्यासाठी एखादी भेट देशील का ? असा हळवा प्रश्न त्यांनी पुढे विचारला आहे. 

प्रेमात ज्याची आस मनोमन लागून राहिली आहे, ज्याच्या एका भेटीसाठी मन चकोर झाले आहे, त्याला पहिल्यांदा पाहताना 'प्रथम तुज पाहता जीव वेडावला' अशीच अवस्था होते, विटणकर अगदी नेटक्या शब्दात हे भाव व्यक्त करतात. ‘तुला पाहताच लाजून डोळे खाली लववीन, षोडश वयाच्या सुकुमार गाली लाली येईल अन नाजूक फुलांसारखी ही कोमल काया आनंदआवेगाने थरथर कंप पावू लागेल मग मात्र तु मला हृदयाशी कवटाळावे लागेल’ असं गहिरं वर्णन त्या करतात. शेवटच्या कडव्यात मात्र त्यांनी हुरहूर लावणारी कलाटणी दिली आहे. आपला प्रीतम एकदा जरी भेटला तरी लाजबावरी होऊन माझे डोळे मिटून घेईन अन मनःचक्षुत ते चित्र अल्वारपणे साठवून घेईन, मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या त्या नवरंगी चित्रामधले स्वप्न माझे होशील का ? असा प्रश्न शेवटी विचारून केवळ आभासी जगातील स्वप्नपूर्ती झाली तरी चालेल असं विटणकर इथे सुचवतात. वास्तवातल्या जगात प्रेमाची तहान भागवली जात नाही तेंव्हा निदान आभासी दुनियेत तरी प्रेमाचे आपले स्वप्न हे केवळ स्वप्न राहिले तरी चालेल मात्र त्यातील भावबंधाचे नाते दृढ व्हावे असं त्यांनी यातून सूचित केलंय. या सदाबहार गीताला गायिका कृष्णा कल्ले यांनी अप्रतिम स्वरात गायले अन अनिल मोहिले यांनी सुरेख स्वरसाज चढविले.

बालगीते, चित्रपटगीते आणि भावगीतांच्या माध्यमातून प्रत्येक मराठी मनावर राज्य करणाऱ्या वंदना विटणकर यांचं लेखन सर्वंकष असं होतं. शब्दांचं अवडंबर न माजवता सोप्या शैलीत लिहिणं हे खूपच अवघड काम आहे. वंदना विटणकर यांनी हे अवघड काम केलं आणि म्हणूनच त्यांची गाणी रसिकांच्या स्मरणात राहिली. संगीतकार श्रीकांत ठाकरे, गायक मोहम्मद रफी आणि गीतकार वंदन विटणकर या त्रयीच्या गाण्यांनी मराठी संगीतात अढळ स्थान प्राप्त केलं होतं.

मोहम्मद रफी यांना मराठीत आणण्याचं श्रेय संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना जातं ; परंतु त्यांनी जी गीतं रफीसाहेबांकडून गाऊन घेतली त्यातील बहुतांशी वंदना विटणकर यांची होती. "हा रुसवा सोड सखे', "हे मना आज कोणी', "अगं पोरी संबाल दर्याला', "तुझे सर्वरंगी रूप', "शोधिसी मानवा राऊळी मंदिरी', "खेळ तुझा न्यारा' आदी गाणी ऐकल्यावर मोहम्मद रफींना मराठी गीत गाणं सोपं जावं याची संपूर्ण काळजी गीतकारानं घेतलेली दिसते, यातच वंदना विणटकर यांच्या काव्यशैलीतील सहजता लक्षात येते.

"ए आई मला पावसात जाऊ दे', "ये रे ये रे पावसा रुसलास का', "पिरपिर पावसाची' ही व अशा त्यांच्या अनेक बालगीतांनी तीन पिढ्यांना खऱ्या अर्थानं वेड लावलं. बालगीतांसाठी सोप्या शब्दांची गुंफण करताना ती सर्वांना गुणगुणावीशी वाटतील, याची सर्व काळजी त्यांनी घेतली. म्हणूनच ही गाणी ऐकत आजोबा झालेले, त्यांच्या नातवांनाही ही बालगीते आवर्जून ऐकवताना दिसतात.

वंदना विटणकर यांनी चित्रपटांसाठी लिहिलेली गीतेही प्रचंड लोकप्रिय झाली. "खेळ कुणाला दैवाचा कळला', "नाते जुळले मनाशी', "मी प्रेम नगरचा राजा' यासारख्या अनेक चित्रपटगीतांसह "परिकथेतील राजकुमारा', "राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं' ही भावगीते कानावर पडताच आजही रसिकांचे पाय थांबतात. आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेलं "आज तुजसाठी या पावलांना', शोभा गुर्टू यांनी गायलेलं "अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा' ही वंदना विटणकर यांची गीतं कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही. शेवटच्या काही वर्षांत प्रकृती साथ देत नसल्यानं वंदना विटणकर यांनी लिहिणं थांबविलं होतं; पण ती उणीव त्यांच्या आधीच्या गीतांनी यापूर्वीच भरून काढली होती. 'एप्रिल फूल', 'बजरबट्टू'. 'भं भं भोला', 'हे गीत चांदण्यांचे' हे वंदना विटणकर यांचे कविता संग्रह होत.

एकमुखाने चला गाऊ या, गाणी नव्या युगाची
सारे मिळुनी चला गुंफुया , सरगम सात सुरांची
सा म्हणतो साथी आपण भेदभावना दूर करा
रे म्हणतो रेंगाळू नका रे सदैव अपुले काम करा
निर्धाराने पुढे जाऊ या, पर्वा करू ना कोणाची |
ही एक वेगळ्या आशयाची त्यांची कविता आहे, यातून त्यांची विश्वासकता व आशादायक आश्वासकता व्यक्त होते. नवे युग आले, नवा जमाना उगवला की त्याच्या स्वागताची तयारीही वेगळ्या पद्धतीने केली जाते, करणे योग्य असते. आपल्या नव्या युगाचे स्वागत येथे कवियत्रीने कल्पकतेने केले आहे. सा, रे, ग, म, प, ध, नी या सप्तसुरांनी कवियत्रीने हे स्वागत केले आहे. त्यातून नव्या युगाच्या नव्या आशादायक चित्रात रंग भरले आहे. आपल्या मधली भेदभावना दूर सारून एक दिलाने, जोशात, निर्धाराने काम करणे, अहंकार न बाळगता मानवतेचा मंत्र जपत, परिश्रमाने यशाची ज्योत पेटवणे , खरा धर्म मानवता, खरे मन निर्मळपणा हे लक्षात घेऊन भविष्याचा फुलोरा फुलविणे आणि यातून एका समर्थ युगाची उभारणी करणे हे आपले काम आहे असे कवियत्री सांगत आहे. हे सप्तसूर जर असे गुंफले तर त्यातून सुरेल मेळ तयार होईल हा कवियत्रीचा विश्वास आशादायक आहे.

वंदना विटणकर या नेरूळच्या मराठी मातीतल्या कवयित्री. त्यांना गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार म्हणूनही रसिकमान्यता मिळाली होती. मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली 'रॉबिनहूड', 'टिमटिम टिंबू बमबम बगडम', 'बजरबट्टू' इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले. वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी सातशेहून अधिक गाणी व सुमारे पंधराशे कविता लिहिल्या आहेत. अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या तर सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत.

वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता. चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर काही वर्षांनी साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला. आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वंदना विटणकर नेरूळ येथील आनंदाश्रमात पतीसह वास्तव्यास होत्या. वयाच्या सत्तराव्या वर्षी ३१ डिसेंबर २०११ रोजी त्यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान व देहदान करण्यात आले होते.जणू काही त्यांना यातून एखादा संदेश दयायचा होता. तो संदेश त्यांच्याच शब्दात सांगायचे झाला तर -
'कळीकळीच्या कोषामधुनी निसर्ग गातो गीत उदयाचे,
संजीवन हसते नाशामधुनी, हीच जगाची रीत !
गतकाळाची कशास भीती ? भविष्य अपुलें अपुल्या हाती
फुलव निराळे तुझ्या मुठीतुनीं, तूच तुझे संचीत !...'

वंदना विटणकर यांची काही गीते -

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे….
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे...
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल्‌ ते होऊ दे…

...........................................................................................................................................

अंधाराची खंत तू कशाला करिसी रे ?
गा प्रकाशगीत !…
रोज नवी ही उषा उगवते कवच भेदुनी अंधाराचें
कळीकळीच्या कोषामधुनी निसर्ग गातो गीत उद्याचे
संजीवन हसते नाशामधुनी, हीच जगाची रीत !…
दु:ख निराशा दूर सारुनी सदा पडावे पाउल पुढती
गतकाळाची कशास भीती ? भविष्य अपुलें अपुल्या हाती
फुलव निराळे तुझ्या मुठीतुनीं, तूच तुझे संचीत !
स्वर - जयवंत कुलकर्णी .

...........................................................................................................................................

तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावि पिसें !
ती वीज तुझ्या नजरेमधली
गालीं खुलते रंगेल खळी
ओठांत रसेली जादुगिरी
उरिं हसति गुलाबी गेंद कसे !
नखर्‍यांत तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी
हा झोक तुझा घायाळ करी
कैफांत बुडाले भान असे !
ती धुंद मिठी, बेबंद नशा
श्वासांत सखे विरतात दिशा
बेहोश सुखाच्या या गगनीं
मी आज मला हरवून बसे !
स्वर - मोहम्मद रफी.

...........................................................................................................................................

खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !
जवळ असुनही कसा दुरावा ?
भाव मनींचा कुणा कळावा ?
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
हार कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन मनांची
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
स्वर - आशा भोसले. उषा मंगेशकर, सुरेश वाडकर.

...........................................................................................................................................

शोधिसी मानवा राऊळीं, मंदिरीं
नांदतो देव हा आपुल्या अंतरीं….
मेघ हे दाटती कोठुनी अंबरीं ?
सूर येती कसे वाजते बांसरी ?
रोमरोमी फुले तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी….
गंध का हासतो पाकळी सारुनी ?
वाहते निर्झरी प्रेमसंजीवनी
भोवताली तुला साद घाली कुणी
खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी….
भेटतो देव का पूजनीं, अर्चनीं ?
पुण्य का लाभते दानधर्मांतुनी ?
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनीं
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ?
स्वर - मोहम्मद रफी.

.......................................................................................................................................

हा रुसवा सोड सखे ! पुरे हा बहाणा
सोड ना अबोला !
झुरतो तुझ्याविना, घडला काय गुन्हा ?
बनलो निशाना, सोड ना अबोला !…
इष्काची दौलत उधळि तुझा हा नखरा
मुखचंद्राभवतीं कितीक फिरती नजरा
फसवा राग तुझा, अलबेला नशिला
करि मदहोश मला
नुरले भान अतां, जाहला जीव खुळा…
तुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला
मदनाने केले मुष्किल जगणे मजला
पाहुनी मस्त अदा, फुले अंगार असा
सावरू तोल कसा ?
नको छळवाद अतां, झालो कुर्बान तुला…
स्वर - मोहम्मद रफी.

...........................................................................................................................................

रसिका, मी कैसे गाऊ गीत ?
दाटून आले घन आसवांचे
मिटलेल्या पापणींत !
तुटल्या मनाच्या हळुवार तारा
गेला सुरांचा जळुनी फुलोरा
नाचे प्रलय लयींत !
मैफल सुखाची झाली विराणी
उरे वेदनांची जखमी कहाणी
रडते स्वप्‍न व्यथीत !
स्वर - अनुराधा पौडवाल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा