फेसबुकवरच्या मायभगिनींनो, मैत्रिणींनो तुम्ही हातात बांगड्या घालता का ? स्वतःच्या हाताने घालता की कासाराकडे जाऊन घालता ? कासाराकडे जाताना एकटयाने जाता की मैत्रिणीसवे, नात्यागोत्यातल्या महिलांसवे ग्रुपने जाता ? तिथे गेल्यावर त्याने एका पाठोपाठ एक रंगीबेरंगी फिरोजाबादी बांगडया मनगटातून पुढे नजाकतीने सरकावताना हाताला रग लागलीय का ? बोटं रटरटलीत ? ढोपर अवघडले ? त्या त्रासाकडे लक्ष जाऊ नये म्हणून माझ्या गावाकडच्या मायभगिनी काही दोन ओळींची गाणी गुणगुणत तुम्ही तसं कधी गायलात का ? एकीचे झाले की दुसरी गाई, मग तिसरी असं करत पुन्हा पहिली गात असे. लग्नघरी कासार आल्यावर मग तर एकीच्या ओळींना जोडून दुसरी उस्फुर्त काव्य रचत असे. भलीमोठी कविता तिथे जन्म घेई. यातल्याच काही जणी मग जात्यावरच्या ओव्याही रचत आणि मग काय आपला क्रम कधी येतो याची प्रत्येकजण हरीणीगत वाट बघे. ह्या साऱ्या जणी म्हणजे गावोगावच्या बहिणाबाईच की ! की तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही ? चला तर मग मी काही अशी ओव्यांची / द्विरूक्तीची ओळख करून देतो. तुम्हाला आवडतात का बघा. एखादी छानशी कॉमेंट करा. तुम्हालाही एखादी ओळ सुचली तर लिहा, तुमच्या घरी आता कोणी बांगडया भरतात की नाही हे मला माहिती नाही, पण घरी पोरीबाळी असतील तर त्यांना ह्या पोस्टबद्दल, गावाकडच्या ह्या गोड रिवाजाबद्दल सांगा. त्यांना नक्कीच बरं वाटेल. जमलंच तर चाल लावून सांगा, खूप गोड आहेत हो ही बांगडयांची गाणी. एकदा गाऊन तरी बघा....
सोलापूरच्या गल्लो गल्लीन मनारी
रामजीची सीता चुडा भरते सोनेरी
कोल्हापूरच्या गल्लोगल्यानी कासार
रामाच्या सीताने दीला चुड्याला इसार
राम करी काम सिता वाहीती भाकरी
पिकली धरणी माता रामा दोहीची चाकरी
कैकयीच्या त्यागे, राम निघाले राग राग
सितामाई त्यांच्या मागे
कैकयीच्या त्याग राम वनवासाला गेला
पलंग हाताने उभा केला
राम लक्ष्मण दोघं निघाले वनाला
रेशमाचे गोंडे ह्यांच्या धनुष्य बाणाला
लंकचा रावण भिक्षा मागतो आळीत
नेली रामजीची सीता ह्यान घातली झोळीत
देवामधी देव मारुती मोठा
आणली जमनागीरी तळहातावरी गोटा
मारुती ग बोले अंजनी माझे आये
आणली द्रोणागीरी नेत्रा उघडुनी पाहे
पहाट समया नाद घुंगराचा येतो
राजा मारुती संग मुंजा अंघोळीला जातो
धोतराचा पीळा सापडला जाता जाता
बाबा मारुती आंघोळीला गेला होता
माझ्या अंगणात बाबा मारवती न्हाला
उरले ते पाणी तुम्ही तुळसीला घाला
आपल्या दैनंदिन जीवनात देवांना सामावून घेण्याचे हे कसब खूप नैसर्गिक वाटते.
एकीने एक ओवी म्हणली की दुसरी त्याला जोडून मोठ्या खुबीने गायची. डोक्यावरचा पदर सावरत एकमेकींच्या चेहऱ्याकडे आनंदाने डोळे भरून
बघणाऱ्या ह्या साऱ्याजणी प्रत्यक्षात लंकेच्या पार्वती असत. एखादीच्याच हातात बिल्वर पाटल्या, एखादीच्या गळ्यात मोहनमाळ, बोरमाळ. बाकी सारयाजणी काळ्या मण्यांच्या मालकिणी. अनेकींची लुगडी दंड मारलेली असत. पण चेहऱ्यावर तरतरीतपणा आणि विलक्षण प्रसन्न भाव विलसत असे. ह्या सारया सवाष्ण बायका हातात बांगडया भरत असताना एखादी विधवा तिथेच कोपऱ्यात खिन्न मनाने, उतरत्या चेहऱ्याने बसून असली की तिच्याबद्दलची माया दाटून येई. तिला ह्या सगळ्याजणी म्हणत, 'तुमचा हात लई मऊ हाय जणू, आमच्या हातावर वाईच चार बांगडया तुम्ही चढवा की !' मग तिला आग्रह होई. अशा प्रकारे तिला देखील त्या गराडयात सामील करून घेतले जाई. बांगडया भरता भरता आपल्या गोड आवाजात गात ती कधी मिसळून गेली हे कुणाच्या ध्यानात देखील येत नसे.
देवई ग बाई हरीला सांग काही
सुना गवळ्याच्या आम्हा सरपणा जाऊ देत नाही
मथुरा बाजारी कान्हा झाला हलवाई
अपरुक मेवा गवळ्याच राही बाई
मथुरा बाजारी कान्हा झाला सांगरधरु
डोई कारल्याची पाटी हिंडतो हळु हळु
(या ओवीतला साधेपणा अगदी मधाळ आहे, त्यातला गोडवा लाजवाब आहे)
देव खंडेराया तुझा वनामधी झेंडा
तुझ्या पालखीचा बाळ माझा गोंडा
गोसाव्याने जटा आपटील्या ठायी ठायी
आभंड गंगुबाई गेली त्रिंबकाच्या पायी
त्रिंबकापासुन गंगुबाई ती निघाली
लई आक्काळत गेली नासिकामधुनी
माझ्या मांडवात ग गणराया तुम्ही यावा घोळ घागर्याच्या संग सारजाला घ्यावा
सकाळ उठुन मी उघडते कडी माझ्या नजर पड देवा म्हसोबाची माडी
बोलले नवस मढीच्या कान्होबाला आत्ता माहे भाऊ वाडा बांध डाळींबीला
शिमग्याचा सण तुला घरी नाही झाला आता माझा भाऊ मढीच्या जतरा गेला
येशीच्या येसकरा जाऊ दे माझा टांगा देवई बाईच कारट म्हणत सांगा तुमची जागा
पंढरीची वाट दिसती हिरवी नीळी देवा िवठ्ठलान लावल्या सोनकेळी
पंढरीची वाट ओली कश्यान झाली न्हाली रुखमीण केस वाळवीत गेली
पंढरीच्या वाट दिंड्या दिंड्याचा घोळका आत्ताये माझे भाऊ दिंडी सर्जाची ओळखा
पंढरीच्या वाट दिंडी कोणाची थोपली तुकया रामाची देवा विठ्ठलाची तार वीन्याची तुटली
(अशी करुणेची झाक असणाऱ्या ओळी बांगडया चढवणाऱ्या विधवेच्या मुखातून बाहेर पडल्या की काही क्षणासाठी वातावरण थोडेसं गंभीर होऊन जाई, पण पुढची जी कोणी असे ती तिथला नूर पालटून टाके)
पंढरी जायाला माझी झाली तयारी विठ्ठल मुराळी घोड्या चारती न्याहरी
जाती पंढरीला संग नेते बापाला तांब्याचा गडवा पाणी घालीते चाफ्याला
जाते पंढरीला संग आईच लुगडं चंद्रभागेमधी नाही धुवाया दगड
एकादशी बाई तु कुणाची कोण पंधरा दिवसाचा प्रहर त्याची वडील बहीण
विठ्ठलाची माडी यंगते दणादणा विठ्ठलाला एकादशी तबकी शेंगदाणा
पंढरी जायाला औंदा नव्हतं माझं मन देवा विठ्ठलानं चिठ्ठ्या पाठविल्या दोन
कोणी तरी एक जण मग देवधर्माचे बोल बाजूला सारत माहेरघरातली कथा सांगे. तीही रम्य वाटे.
शांताराम नवरा जीव कावरा बावरा आत्ता माझा भाऊ कधी होईल नवरा
चंदनाचे पाट टाका बसायला सुख माहेराचे पुसा बसायला
बाप माझा वड आई माझी फुलजाई
काय सांगू बाई दोघांच्याही वेडजाई
नवरा बाळनाथ याला बाशींग जाईच चुलत ग हौशीदार लावी वल्हार वाईच
सात खणाच बाशींग वार्यान केली सीमा नवरा बाळनाथ हात लावी तुझा मामा
नवरा ग बाळनाथ बाशींगी याचा जाई परन्या ग जातो मामा मावशीच्या गावी
सया घेती मान पान ग आपण घेऊ हंडा डेरा बाळनाथ बाळ उचल नवरी चला घरा
बाळनाथाच्या अख्ख्या लग्नाची कथाच तिथे त्या ओव्यातून सादर होई. मग मध्येच एखादी नवाडी हळदीच्या अंगाची कुणी ओठात पदर धरून खुदकन हसे. तिच्या हसण्याचे कारण ओळखून बाकीच्या सगळ्या जणी मोठ्याने हसत आणि सारा माहौल त्या आनंदात सामील होई. सगळ्यांच्या बांगडया भरून होईपर्यंत अवघं चराचर कान देऊन ऐकत राही आणि तृप्त होऊन जाई. एकामागून एका देवाची आणि एकेकीच्या माहेरची, सासरची कथा त्या गाण्यांतून सादर होत जाई. बघता बघता कासारणीच्या बांगडयांनी गच्च भरलेले डालगे हलकं होऊन जाई ...
या सारयाजणी जेमतेम शिकलेल्या असत. त्यांचे राहणीमान साधे. फारशा अपेक्षा नसत. पण अशा प्रसंगी त्या बोलत्या होत. त्यांचे विचार बाहेर पडत. आता गावाकडे जाती नाहीत पण कासार अजूनही टिकून आहे. किती काळ टिकून राहील माहिती नाही. 'जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी' हे जरी खरे असले तरी जुने इतके कालबाह्य होता कामा नये की त्या जुन्यावर जगणारी माणसेच मरावीत ! या लोभस सणाच्या निमित्ताने असे म्हणावे वाटते की माझ्या मायभगिनींच्या हातातल्या या बांगड्या काळाच्या ओघात हरवू नयेत, स्त्रीने आधुनिक जरूर व्हावे मात्र येणाऱ्या पिढीसाठी अशा आठवणींची थोडीशी का होईना शिदोरी मागे ठेवावी, काळाच्या ओघात हरवलेल्या या गाण्यांची एक तरी ओळ नव्या पिढीला सांगावी ....
- समीर गायकवाड.
( सोबतच्या फोटोत कासारणीचे काम करणाऱ्या माझ्या मानसभगिनी ताहेराबी शेख यांच्या सोबत अस्मादिक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा