शनिवार, १८ जुलै, २०१५

चंद्राची कैफियत.....


तुम्हाला मामा आहे ? तुम्ही अंगाई ऐकलीय ? तुमचे बालपण पाळण्यात गेलंय? तुम्ही चांदोबा पाहिलाय ? तुमच्या घराला खिडकी आहे ? यातील एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर हे लेखन आवर्जून वाचा...
काल पहाटेच्या स्वप्नात चांदण्यांच्या गावी गेल्यावर वाटेत मला हिरमुसला चंद्र भेटला … मी विचारलं "काय झालं ?" ओलेत्या डोळ्यांनी उतरल्या चेहरयाने तो उत्तरला, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ असेल तरच बोलतो.. नाहीतर तू आपला तुझ्या वाटेने मला असेच मागे सोडून पुढे निघून जा …" मान डोलावून मी खुणावले, तसे तो रडवेल्या आवाजात बोलू लागला…
"काय सांगू तुला ? रात्र रात्र झोप येत नाही मला ! असाच जागा असतो, डोळे लावून बसतो, मान दुखायला होते. शेवटी डोळे पत्थरून जातात अन डोके बधीर होते !"
हमसून हमसून रडत चंद्र असं का सांगतोय मला काही कळत नव्हतं. तो डोळे पुसत पुसत पुढे सांगू लागला, "अलीकडे माझे फार फार वाईट दिवस आलेत रे ! माझ्याकडे बघून आता कुठली आई अंगाई गात नाही नी कुठले तान्हुले बाळ माझ्याकडे बघत बघत झोपी जात नाही…आता कुठल्या तान्हुल्याचा पाळणा कुण्या खिडकीतूनही दिसत नाही… मी तासंतास खिडकीशी तसाच उभा असतो, दारे खिडक्या सारं सारं बंद असतं.. आत तान्हुल्याचा आवाज येतो पण तोही माझ्यासाठी रुसत नाही..… "

"अरे, तो चिरेबंदी वाड्यात राहणारा मामा देखील आता मुक्कामाला इथेच चांदण्यांच्या गावी आलेला आहे. तो देखील म्हणत होता की, त्याच्या जीर्ण वाड्याचे भक्कम चिरे कधीच ढासळून गेले आहेत, मामांचा मुलगा तिथे आता अलिशान बंगला बांधणार आहे म्हणे ! आणखी काय सांगू बाबा तुला ?
गल्लोगल्लीच्या कोपरयावर असणारी निंबोणीचे झाडे देखील एकटी राहून इतकी कंटाळली की शेवटी त्यांनी सौदामिनीच्या मिनतवारया केल्या एन एका धुंवाधार पावसात विजेने त्यांना कवटाळले, तेंव्हा ती सगळी झाडे रडत रखडत वर आली आणि माझ्या गळ्यात पडून रडली. त्यांच्याशी बोलावे काय मला सुचत नव्हते... "

"अंधारून येताच मी तुमच्याकडे टक लावून बघत बसतो आणि तुम्ही टीव्हीकडे नाहीतर हातातल्या डब्याकडे डोळे लावून बसता !
माझ्याकडे कुणी साधं बघत देखील नाही !
उपकार त्या गणेशाचे अन अल्लाचे की निदान चतुर्थीला अन ईदला तरी काहीजण माझ्याकडे बघतात ! पण आता सोसवत नाही रे !
फार फार एकटे वाटते. पूर्वी मी मुलांच्या पुस्तकात होतो 'चांदोबा' म्हणून अन तरुणाईच्या प्रेमाचा साक्षीदारही होतो. लहान मुले माझ्यावर जीव टाकायची अन तरुण तरुणी माझ्याकडे बघून आणाभाका घ्यायचे !
आता डोरेमॉनच्या जंगलात ती मुले हरवलीत अन खरे प्रेमवीरही उरले नाहीत ! आता प्रेमी युगुलं एखादा शुष्क 'डे' निवडून प्रेम व्यक्त करतात आणि ब्रेकअप फिकपची गाऱ्हाणी गात बसतात ! "

"शहरातील लोकांमुळे होणारे हे दुःखही मी समजू शकतो... काळ बदलला आहे हे मलाही कळतं रे ! पण गावाकडची माणसेही आता बदललीत...
पूर्वी बाजा टाकून त्यावर पहुडलेली ही माणसे माझ्याकडे बघत झोपी जात.
माझ्या शीतल प्रकाशात त्यांच्या शांत चेहऱ्यावरचे समाधान बघत बघत मीही झोपी जात असे... आता रानात काही पिकत नाही म्हणून ते वस्तीवरही येत नाहीत, माझ्याशी दुरावा करून तेही चार भिंतीआड झोपी जातात.… "इतके बोलून तो ओक्साबोक्शी रडू लागला… "हे असं जीवाला लागेल असं तुम्ही वागता.. इकडे येण्याआधी तुम्हाला चौघांच्या खाद्यावर जावे लागते तेंव्हा मात्र आकाशाकडे तोंड करून माझ्या वाटेकडे डोळे लावून येता…. इथे आल्यावर मग माझ्या पाठीशी फिरत राहता... तुमचं असं माझ्या अवतीभोवती फिरणं माझ्यासाठी त्रासाचं झालंय… अस्स वाटतं की एक अमावस्या यावी अन ती कधी हटूच नये ! माझ्याच्याने अजून सहन होत नाही. आईच्या स्नेहार्द्र डोळ्यात, बाळाच्या फुलवेली पाळण्यात, निंबोणीच्या पानात, प्रेमिकेने केसात माळलेल्या धुंद गजरयात, अंगणातल्या पवित्र तुळशीत, देव्हारयातल्या निरंजनाच्या शीतल ज्योतीत, गाईच्या ओलेत्या डोळ्यांत, विहिरीतल्या गोलाकार प्रतिबिंबात, कवितेच्या सळसळत्या पानापानांत, वृद्धांच्या चंदेरी माथ्यात रमणारा माझा जीव आता मला नकोसा झाला आहे… बहुतेक मला आता अंधाराची सक्त गरज आहे, सक्त गरज आहे !!"
चंद्राचे ते कळवळून बोलणे ऐकून मला गलबलून आले, काय बोलावे सुचेनासे झाले. मी तसाच बराच वेळ बसून राहिलो, माझ्या छातीवर डोके टेकून तो शांतपणे पडून राहिला ….काल रात्री मी 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई…' हे गाणे माझ्याहून उंच झालेल्या माझ्या मुलाला मल्हारला ऐकवले.. माझ्या डोळ्यातले पाणी बघून त्याने विचारले, "काय झाले ?". मी त्याला चंद्राची कैफियत सांगितली पण त्यालाही वाईट वाटले … माझ्या घराची खिडकी आता चांदोबाने घरात डोकावून पहावे म्हणून उघडी असते …

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा