शिशिरागमन होताच झाडांची पाने एकेक करून गळून जातात, जणू सर्व विकार वासना गळून पडाव्यात तशी सगळी पाने गळून पडतात...
झाड निष्पर्ण होऊन जाते आणि उरते त्याचे अस्सल देहमूळ !
आपल्या विचारांच्या पुनर्विलोकनात दंग असणारे खोड राहते.
थंड वाऱ्यास आपला पूर्वेतिहास विचारणाऱ्या, टोकाकडे निमुळत्या होत गेलेल्या फांदया विचार करायला भाग पाडतात.
'वर्षा' झाडांच्या तृषार्तमुळांना तृप्त करून गेलेली असते,
पानझडीमुळे शिशिरात झाडांना पाणी कमी लागते त्यामुळे शिशिरात झाडे जणू उपवासाची तपश्चर्या करतात.
झाडाने मन लावून वाढवलेली आप्तपर्णे एकेक करून झाडापासून विलग होत जातात पण प्रत्येक पान विलग होताना झाड त्याच्या कानात मातीसाठी पुनर्जीवनाचा निरोप देते.
त्या निरोपाने बेभान झालेली पाने गळून पडताना अत्यानंदाने स्वतःभोवती गिरक्या घेत हवेच्या संगीतलयीवर नाचत हळुवारपणे खाली येऊन मातीचे चुंबन घेते.
झाडांचा निरोप ऐकून माती सद्गतीत होते, ती प्रत्येक पान उराशी घट्ट कवटाळून ठेवते.
शिशिरातली मातीवर गळून पडलेली पाने एकमेकाखाली पुरली जातात, त्यांचे अनेक थर तयार होतात आणि त्यातून नव्या जन्माचे अणुरेणु जन्म घेतात...
खरे तर शिशिरात थकून गेल्यागत वाटणारे झाड प्रत्यक्षात स्वतःचा शोध घेत असते. त्याला जगाची पर्वा नसते, ते अस्तित्वाचा आणि नवतेचा शोध घेत असते.
शिशिरातील पानगळीच्या पानांचे माती खत तयार करते आणि झाडांच्या नव्या रुपाचे, नव्या आकाराचे संवर्धन करण्यात मोलाचे काम हे खत करते.
शिशिरात माझ्या मनात साठलेले विचारांचे गढूळ आकाश मी हलकेच उतरवून ठेवतो, ओल्या सुक्या मातीत खोलखोल पुरतो.
जुने कालबाह्य झालेले विचार आणि माझ्या मनाचा ताबा घेऊन माझ्यावर स्वार झालेले विकार गळून जातात, मातीत मिसळतात.
देह जणू मोरपीस होऊन जातो.
मान वेळावून बसलेले असंख्य बगळे जणू मनाच्या निष्पर्ण वृक्षावर येऊन राहतात.
विचारांचेही असेच असते, चुकीच्या विचारांचा निचरा झाला की त्या विचारांच्या कबरींवर उत्तुंग विचारांचे महाल उभे राहतात.
लोक त्याला प्रतिभासंपन्न विचारांचा उत्कट अविष्कार म्हणतात.
प्रत्यक्षात हेही विचारांचे निसर्गचक्रच असते.
निसर्गचक्रात सर्वच ऋतूंचे काम महत्वाचे आहे पण आपले वैभव त्यागून स्वतःचीच झाडाझडती घेणारा शिशिर मला जास्त महत्वाचा वाटतो कारण हा एकच ऋतू असा आहे ज्यात झाडे आत्मसन्मुख होतात आणि त्यांच्या विचारमग्नतेतून जन्म घेते नवी बहार ! नवा उन्मेष ! नवी पालवी !
- शिशिरागमनाच्या प्रतीक्षेतला समीर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा