बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

अनुवादित कविता - कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा : कन्नड कविता

हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा,
सर्व आकारांच्या पार जा.

सर्व अस्तित्वांच्या पार जा.
आर्त भावनांनी हृदयाच्या चिरफाळ्या केल्या तरी,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
शेकडो जातींची भुसकटं हवेत उडवून दे
तत्वज्ञानांच्या मर्यादा लांघून पार जा
अन दिगंतापार जाऊन उगव,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
तू कुठेही थांबू नकोस
चिंचोळ्या भिंतीत गुंतू नकोस
अंतास जाईपर्यंत कुणाचेही साधन होऊ नकोस
तू अमर रहा,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
जो अक्षय असतो तो सदैव अनंत असतो,
एका विमुक्त तपस्वीगत.
तू अमर आहेस, अनंत आहेस.
अन अमर अनंत राहण्यासाठी,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !


विख्यात प्रतिभावंत कन्नड कवी कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुगलने त्यांचे डूडल बनवून आदरांजली अर्पण केलीय. जगभरातला कानडी माणूस कुप्पलींना 'कुवेम्पू' या नादमाधुर्य असणाऱ्या टोपणनावाने ओळखतो. माझ्या कानीही त्यांचे नाव पडलेय. सोलापूरातल्या सिद्धेश्वर प्रशालेत माझे प्राथमिक - माध्यमिक शिक्षण झाले. त्या शाळेत मराठी सोबतच कन्नड हा विषयही ऐच्छिक (ऑप्शनल) होता. कन्नड मायबोली असणारी मुले हा भाषाविषय निवडत. त्यांच्या तोंडून बऱ्याचदा कुवेम्पू यांचे नाव ऐकलेले. एक श्रेष्ठ कादंबरीकार, कवी, नाटककार, समीक्षक आणि व्यासंगी विचारवंत म्हणून ते कन्नड साहित्यात ओळखले जातात. ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, पद्मभूषण, पद्मविभूषण, कर्नाटकरत्न अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील कुप्पल्ली या गावात त्यांचे वडिलोपार्जित घर अत्यंत नेटक्या आणि देखण्या पद्धतीने जतन केले आहे. अनोख्या स्थापत्य शैलीतले त्यांचे स्मारकही अचंबित करते. कुवेम्पूंचा जतन केलेला हा भव्य वारसा पाहता क्षणी आपल्या मराठी कवींची निवासस्थाने आणि स्मारके यांची दुर्दशा काळजाला डंख मारून जाते. कुवेम्पूंच्या कविता तरल आणि भावसुलभ होत्या. त्यांच्या 'अनिकेतना' या कवितेस कर्नाटकमध्ये प्रार्थनेचा दर्जा आहे. या कवितेचा स्वैर मराठी अनुवाद वरती दिलाय.

कोणत्याही वर्णाच्या, लिंगाच्या, वयाच्या अन कोणत्याही जातधर्मातील, भाषेतील, प्रांतातील, देशातील साहित्यिकाच्या रचना असोत, त्यात सच्चेपणा आणि प्रतिभा यांचा अनुभवसमृद्ध मिलाफ असला की सर्व सीमा पार करून ते साहित्य आपलेसे वाटू लागते. हा साहित्याचा सर्वात मोठा सदगुण आहे. यामुळेच साहित्याला कोणत्याही सीमा नाहीत की कोणतीही बंधने त्यावर लादता येत नाहीत. कुणी कितीही आदळआपट केली वा नाके मुरडली तरी साहित्य आपल्या वाटेने जोमाने वाढत असते, फुलत असते, जगत असते आणि रसिकांनाही जगवत असते. आपण त्याचा फक्त मनमुराद आस्वाद जरी घेतला तरी आपलं जगणं त्यातून सफल होऊन जातं....

- समीर गायकवाड

~~~~~~~~~~~~~~~~~~


O nanna chetana
Aagu nee aniketana!
O my spirit,
Transcend all boundaries!
Roopa roopagalanu daati,
Naama kotigalanu meeti,
Edeya biriye bhaavadeeti,
O nanna chetana,
Aagu nee aniketana!
Transcend all forms,
Transcend all identities,
Even as sentiment pierces the heart,
O my spirit,
Transcend all boundaries!

Nooru matada hotta thoori,
Ella tatvadelle meeri,
Nirdigantavaagi aeri,
O nanna chetana
Aagu nee aniketana!

Blow away the chaff of a hundred castes,
Transcend the limits of all philosophies,
Rise beyond the horizons,
O my spirit,
Transcend all boundaries!

Elliyoo nilladiru,
Maneyanendu kattadiru,
Koneyanendoo muttadiru,

O anantavaagiru!
O nanna chetana
Aagu nee aniketana!

Do not stop anywhere,
Do not be bound by narrow walls,

Never be content in reaching the finite
O be eternal,
O my spirit,
Transcend all boundaries!

Ananta taan anantavaagi,
Aagutihane nityayogi,
Ananta neen anantavaagu:
Aagu, aagu, aagu, aagu,
O nanna chetana

Aagu nee aniketana!
The eternal always remains eternal,
A yogi becomes eternal,
You are eternal, be always eternal:
Be, be, be, be eternal,
O my spirit,
Transcend all boundaries!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा