शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

मामाचा सांगावा ...



माझ्या लाडक्या सोनुल्यांनो तुम्हाला मामाचा आशीर्वाद. तुमच्या परीक्षा संपल्या असतील. आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुटीचे वेध लागले असतील.
मी लहान असताना परीक्षा झाल्या की माझ्या मामाच्या गावाला जायचो. झाडांच्या गर्दीत वसलेल्या रम्य नगरीत, चिरेबंदी वाड्यात जाऊन राहायचो. तुम्हीही काही वर्षे माझ्याकडे आलात. याही वर्षी तुम्हाला आपल्या लाडक्या मामाच्या गावाला जावेसे वाटत असेल होय की नाही ? पण जरा अडचण आलीय बाळांनो.
काळजावर दगड ठेवून एक गोष्ट सांगतो. तुम्ही यंदा माझ्याकडे येऊ नका असं माझं सांगणं आहे.
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही आपल्या लाडक्या मामाच्या घरी यायचं नाही बरं का छकुल्यांनो...

तुमच्याशी खेळायला गोठ्यात वासरं नाहीत की झाडावर पाखरं नाहीत !
झाडांना पानं नाहीत तिथं बोरं चिंचा कुठून असणार ? आंब्यालाही यंदा बहर नाही अन शेतशिवाराला कळा नाही !
पाणी नसलेल्या विहिरीत पोहायला कसे जाणार ?
घरापुढची हिरवाई नाहीशी झालीय. अंगणातली तुळस जळून गेलीय. अंगणात आता झाडांचा वाळलेला पालापाचोळाही पडत नाही कारण, झाडांना पानेच उरलेली नाहीत !
पडवी रोज शेणाने सारवली जात नाही, तिच्या सारवलेल्या अंगणाच्या खपल्या सगळीकडे इस्कटून गेल्यात. कुडाच्या भिंतीला लावलेला शाडू आता गळून पडलाय, सुर्यनारायण छपरातल्या काड्याकुड्यातनं घरात उतरून सारया घरभर डोळं वटारत फिरत असतो. घर काय अन दार काय सारं कसं रखरखीत झालंय..

सारं शिवार माळरानासारखं झालंय अन सारी माळराने वाळवंटासारखी झालीत!
झाडांच्या फांद्यांच्या काटक्या उरल्यात अन काटक्यातली घरटी ओस पडलीत,
कधीकाळी तिथं मोठी किल्बील होती आता सारी पाखरे दूरदेशी निघून गेलीत ! गायींचे गोठे भकास झालेत, तिथल्या दावणी रिकाम्या आहेत, कासरयाच्या दोरयाचे भेंडोळे कोपरयात अंग मोडून पडले आहे. तिथं आता ना हंबरडा ऐकू येतो ना त्यांच्या घंटांचा आवाज कानी पडतो. कोंबडयाची खुराडी मोकळी झालीत. बांधा-बांधावरच्या झाडांच्या सावल्यांना आताशा वाट बघून भोवळ येत असते, कारण त्या झाडांच्या सावलीखाली बसायला आता कोणी वाटसरूच येत नाही ! तरीही काळी पिवळी झालेली जीर्ण झाडे पांथस्थाची वाट बघतच असतात.

आपल्या गावात आता माणसं नाहीत असं नाही, आता फक्त म्हातारी कोतारी पिकली पानं, आयाबाया अन त्यांची चिल्लीपिल्ली इतकेच लोक आता गावात आहेत. माणसांनी झाडे ओरबाडली म्हणून देवाने माणसांची हिरवी पाने तोडून दूर नेली ! घराघरातली कर्ती सवरती माणसे पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलीत.
ज्यांच्या पोटासाठी ते गाव सोडून गेले त्यांची पाठपोट एक झालीय हे त्यांना बी ठाव हाये पण माघारी फिरून तरी काय करणार ?

ओढे नाले तलाव सारं आटून गेलंय, विहिरींचे गाळाचे जबडे आ वासून बाहेर आलेत, तिथलं पारव्याचं संगीत आता बंद झालंय. मातीची ढेकळे केविलवाण्या चेहरयाने शेतात पडून असतात, मातीला पाय नाहीत नाहीतर तीसुद्धा गाव सोडून गेली असती. तिच्या कुशीतलं बीज अंकुरल्याविना मरून गेलंय याचं माणसापेक्षा जास्त दुःख तिलाच झालंय ! मातीतलं पाणी आटून गेलंय अन डोळ्यातल्या पाण्याला धार लागलीय. सूरपारंब्या खेळावं असं झाड नाही अन तळ्याकाठी गारवा राहिला नाही. पारावरचा पिंपळ उदास होऊन मान वेळावून बसलाय तर पाणंदीतल्या वडाच्या पारंब्यांनी आता झाडालाच फास लावलाय !

मी तर असंही ऐकलंय की आपल्या वेशीवरच्या देवळातला मारुतीराया गावातल्या पांडुरंगाला संगट घेऊन लांब निघून गेलाय. अशा ओसाड देवळात तुम्ही शिरापुरी कशी खेळणार ? रामप्रहरीच्या काकड आरतीचे सूर आता कानी येत नाहीत अन मावळणारी सांज आता घरी परतणारया गायींच्या गळ्यातल्या घंटानादाकडे कान लावून बसते, मात्र हिरमुसल्या चेहऱयाने अंधारात तोंड लपवते ! दगडधोंडे देखील रातच्याला कण्हत कुथत असतात, त्यांना सुद्धा आठवणी येत असतील नाही का ? सगळं गाव जणू ठप्प झालंय, जागच्या जागी थिजून गेलंय ! पण हे सगळं इथल्या माणसांच्या बेपर्वाईने झालंय. लोकांनी निसर्गाशी खेळ केला त्याने माणसाशी खेळ केला यात त्याचे काय चुकले. निसर्गाने माणसाचा हिशोब चुकता केलाय अगदी व्याजासकट. तेंव्हा त्याची सजा आम्हाला भोगायला पाहिजे. पण त्याच्या झळा तुमच्या बालपणाला लागतायत याचं फार वाईट वाटते...

तेंव्हा माझ्या चिमणी पाखरांनो यंदा मामाच्या गावाला येऊ नका ! पाऊसपाणी नीट झालं तर मग मात्र यील त्या साली बिनघोर या अन रानातलं वारं अंगात शिरू द्या, पानाफुलांतून खेळा अन पिकापिकातून डोला ! विहिरीत मनसोक्त डुंबा, शिवारभर फिरा, आमरस प्या, पोटभर खा, हिंडा, फिरा अन चांदणं डोळ्यात साठवत अंगणातल्या मऊ रजईत झोपी जा.. सकाळी उठून गायीच्या डोळ्यात आपल्या मायला बघा !

तेंव्हा यंदाच्या उन्हाळयात काँक्रिटच्या जंगलात अन कागदी फुलांत मन रमवा...

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा