गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

शिवप्रभूंचे जातीविषयक विचार ...

शिवछत्रपती हे अखिल रयतेचे राजे होते. ते कोणा एका विशिष्ठ जातीधर्म समुदायाचे राजे नव्हते. त्यांच्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांप्रती समानता होती, त्यात कुठलाही दुजाभाव नव्हता. त्यांच्या सैन्यदलात, कारभारात आणि सलगीच्या विश्वासू माणसांत देखील सर्व जाती धर्माचे लोक आढळतात. शिवबाराजांनी त्यांच्या उभ्या हयातीत एखादा इसम केवळ अमुक जातीचा वा धर्माचा आहे म्हणून त्याला काही सजा दिल्याचे वा शिरकाण केल्याचे इतिहासात कुठेही आढळत नाही. त्याचबरोबर कुणी एक व्यक्ती एखाद्या विशिष्ट जातधर्माची आहे या एका कारणापोटी त्यांनी कुणालाही स्वराज्याबाहेर काढले नव्हते हे ही विशेष. रयतेच्या हिताच्या आड येणाऱ्यास मात्र त्यांनी जातधर्म न पाहता दोषानुरूप समज – सजा दिली होती याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.


पत्र क्रमांक १

असे असूनही काही लोक स्वतःच्या स्वार्थी भावनेपोटी, स्वतःच्या जातीय अभिनिवेशापोटी, तसेच स्वतःच्या मनात असणाऱ्या इतर जातीधर्माच्या असूयेपोटी शिवरायांना जातधर्मांच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे कपटप्रयत्न करत असतात. याकरिता काही जातीय संघटना हिरीरीने पुढे असतात. यांना खतपाणी घालण्याचे काम काही राजकीय पक्ष व सामाजिकतेच्या बुरख्याआडून काम करणाऱ्या व्यक्ती / संघटना करत असतात.

याचे आणखी विश्लेषण केले तर असे आढळून येते की दोन मतप्रवाह मोठ्या संख्येने पाहण्यात येतात, अर्थात हे जाणीवपूर्वक पसरवलेले असल्याने समाजाच्या सर्व स्तरात हे आढळतात. पहिला प्रवाह असा की काही ब्राम्हण्यविरोधी व्यक्ती, संघटना, पक्ष व काही ब्राम्हणद्वेषी व्यक्ती, संघटना, पक्ष यांच्याकडून सतत एक प्रचार केला जातो की शिवाजीराजे हे ब्राम्हणविरोधी होते. वस्तुस्थिती काय सांगते याचे अनेक दस्त ऐवज आहेत. त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. इथे दोन पत्र दिली आहेत

पत्र क्रमांक १ – हे पत्र वेदमूर्ती आबदे भट ढेरगे व इतर भिक्षुक ब्राम्हणांना उद्देशून लिहिलेला कौलनामा आहे. या पत्रातून शिवाजीराजे ह्या ब्राम्हण मंडळींना अभय देतात की आपल्यापैकी कोणालाही सैन्याचा कसलाही उपद्रव होणार नाही. सबब कुठलीही शंका मनात न धरता त्यांनी सुखात राहावे असे यात म्हटलेले आहे.

(सोबत मूळ पत्र आणि त्याचा मराठीत तजुर्मा दिला आहे )
पत्र क्रमांक एकचा तजुर्मा

पत्र क्रमांक २ - भोसले घराण्याचे वतीने श्रीची पूजा व नैवेद्य करण्यासाठी आबदे भट ढेरगे यांना उपाध्येपण देऊन दरसाली १४० होन देण्याचे मुक्रर करत असल्याचे या पत्रात नमूद आहे. हा ऐवज घेऊन श्रींची (यथासांग) पूजा करून राजांचे अभिष्टचिंतन केले जावे अशी अपेक्षाही त्यात व्यक्त केलेली आहे. या दोन्ही पत्रांचा कालावधी इस. १६७० ते १६७१ च्या दरम्यानचा आहे. ही पत्रे मुंबई पुरालेखागार इथे उपलब्ध आहेत.

(खाली मूळ पत्र आणि त्याचा मराठीत तजुर्मा दिला आहे )





पत्र क्रमांक दोनचा तजुर्मा

ही दोन्ही पत्रे असं दर्शवतात की शिवाजीराजे ब्राम्हणद्वेष करत नव्हते. त्याचबरोबर जे ब्राम्हण भिक्षुकी करतात किंवा पौरोहित्य करतात त्यांना संरक्षण देण्याची हमी देखील ते देतात. याशिवाय त्यांच्या देवोपासकतेचे दर्शनही पत्रातून घडते. देवपूजेसाठी (त्यांच्या वंशपरंपरेनुसारच्या) ब्रह्मवृंदास सालीना काही रक्कम दिली जात होती. हे ही इथे दिसून येते.

या दोन पत्राद्वारे शिवाजी राजे ब्राम्हणद्वेष्टे होते हा अपप्रचार चुकीचा असल्याचे लक्षात येते.
________________________________________
आता दुसरा मतप्रवाह...

या विचारधारेनुसार काही लोक अशी कंडी पिकवत असतात की शिवबाराजे ब्राम्हणांना कायम पूजीत असत, ते त्यांच्याविरोधात बोलत नसत. ब्राम्हण आणि ब्राह्मण्य त्यांनी सदैव शिरोधार्ह मानले असा हा विचारप्रवाह आहे. पण खरेच असे होते का ? वस्तुस्थिती वेगळयाच निष्कर्षांकडे बोट दाखवते. त्यासाठी एक खाली पत्र दिलेले आहे. 

फोटोकॉपी  
हे पत्र १९ जानेवारी १६७५ चे असून त्यात आरमारास मदत पोहोचवण्याच्या कामी कुचराई केल्याबद्दल प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक यास अत्यंत कडक शब्दात ताकीद दिलेली आहे. पद्मदुर्गासाठी पाठवलेली रसद रकम यांनी पुढे आरमारास न देता स्वतःजवळ ठेवून घेतली. याचा पत्रातील शब्दशः उल्लेख हरामखोरी असा आहे. याहीपुढे जाऊन शिवाजी राजांनी फटकारले आहे की ‘तुम्हास वाटत असेल की आपण मुजरा केला तरी राजा पाझरून जाईल आणि सर्व माफ करेल. असं काहीही होणार नाही, अशा चाकरांना ठीकठाकच करावे लागते. ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ?”

(सोबत मूळ पत्र आणि त्याचा मराठीतील तजुर्मा दिला आहे, पत्र मोठे असल्याने त्याचे दोन भाग करून प्रतिमा दिल्या आहेत.)



या मजकुरावरून स्पष्ट होते की एखादी व्यक्ती केवळ ब्राम्हण आहे म्हणून त्यांनी त्याला दोषमुक्त केले आहे किंवा त्याच्याकडे कानाडोळा केला आहे असे काही नव्हते. उलटपक्षी ब्राम्हण व्यक्ती आहे असे समजून कोणी वागत असेल तर त्याच्या जातीचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही आणि त्याला ठीकठाकच केले जाईल असे त्यांनी ठणकावले आहे. हे पत्र कोल्हापूर पुरालेखागार इथे उपलब्ध आहे. पंत अमात्य रा. बावडा यांचेकडील दप्तरात हे पत्र होते.

या मजकुरातील फक्त "ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ?” हे एव्हढेच वाक्य काही व्यक्ती / संघटना / पक्ष आपल्या ब्राम्हणद्वेषासाठी मुक्तहस्ताने वापरताना दिसतात. पण हे वाक्य हेच वास्तव होते असे काही नव्हते.

पत्रातील दुसऱ्या भागाचा तजुर्मा ....

वरील दोन्ही मतप्रवाहांना छेद देणारे दस्तऐवज हे दर्शवतात की राजांनी कोणा एका व्यक्तीला अमुक जातीचा आहे म्हणून केवळ त्याची जपणूक केली वा त्याला आदर दिला असे नव्हे आणि कोणी एक व्यक्ती अमुक एका जातीचा आहे म्हणून त्याला दोषमुक्त समजले गेले असेही नाही. लोककल्याण हा एकच विचार त्यांच्या ठायी होता. रयतेतला प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी सारखा होता. त्यांनी सर्वांची काळजीही घेतली आणि जिथे कर्तव्य कसूर झाली तिथे कडक भूमिका घेण्यात हयगयही केली नाही.

असे असूनही अनेक जण आपला जातीय अभिनिवेश व इतर जातींविषयीचा विद्वेष जोपासण्यासाठी खुलेआमपणे शिवाजीराजांचे नाव घेतात ही बाब अत्यंत निंदनीय आहे. या अपप्रचारामुळे शिवबांची प्रतिमा आपण मलीन करतो याचेही या लोकांना भान नसते हे फार वाईट आहे.

या ब्लॉगपोस्टचा आधार घेऊन कोणीही कोणत्याही जातीधर्माच्या / संघटनेच्या / पक्षाच्या व्यक्ती वा समुदायाविरुद्ध राळ उडवू नये ही अपेक्षा.

- समीर गायकवाड

संदर्भ - शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे,
प्रकाशक - महाराष्ट्र शासनाचे पुराभिलेख संग्रहालय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा