
बाळासाहेबांचे आणि पवारसाहेबांचे आपसातील नातेच वेगळे होते. वैयक्तिक जीवनात मैत्री आणि राजकारणात वैमनस्य असं असूनही त्यांनी आपसातले संबंध तुटूपर्यंत कधीच ताणले नाहीत. 'मैद्याचे पोते' म्हणून बाळासाहेब ज्यांची टिंगल करायचे ते शरद पवार हे त्यांचे पाच दशकाचे सोबती आणि मैत्र होते. 'ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर उगवतात की मातीखाली उगवतात हे माहिती नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये' अशा शब्दात पवारसाहेबदेखील त्यांच्यावर सभांमधून बोलायचे. सभा - भाषणे यातून दोघे जरी एकमेकावर राळ उडवत असले तरी त्यांनी त्यांच्यात आपसात असलेले एक ट्युनिंग कधी बिघडू दिले नाही अन ते दोघे कधी एकही झाले नाहीत अन आपसातल्या मैत्रीतून विभक्तही झाले नाहीत. ही दोन ब्रम्हफुले महाराष्ट्राच्या एकाच वेलीवर फुलली असल्याने त्यांची आपसातील वीण घट्ट होती याचे दार्शनिक असणारे अनेक किस्से गेल्या साठ वर्षात घडले. त्यापैकीच एक किस्सा शरद पवारांनी २०१७ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. डॉ.जनार्दन वाघमारे, कवी फ. मुं. शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांना बोलते केले होते, या मुलाखतीत त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी प्रकाशात आणल्या. त्यातली एक गोष्ट बाळासाहेब आणि पवारांनी एकत्र येऊन काढलेल्या मासिकाच्या जन्मकथेची होती….